आपल्याला एखादी गोष्ट टाकून द्यायची आहे, नकोशी झालेली आहे, पसारा वाटते आहे म्हणून फेकतोच आहोत; तर त्यातही चॅरिटी करू आणि कसे थोर समाजकार्य केले, असे मिरवू ही एक टिपिकल मानसिकता असते. घरातले नकोसे झालेले कपडे, चादरी जणू कचरा फेकावा, ‘छूटकारा मिल गया’ थाटात गरिबांना दिल्या जातात. वर, कपडे ही कशी मूलभूत गरज आहे, आणि आपण कोणाची गरज कशी भागवली, ही भावना उरी बाळगून स्वत:वर खूश होण्यात डुंबत बसायचे! कपडे ही मूलभूत गरज असेल, तर नवीन कपडे द्यायला कोणी रोखलेले नसते. झेपेल तितके असेही करता येतेच की! परंतु ते कशाला करायचे? झळ न सोसता सहजच कोणावर उपकार करून ठेवता आले तर बरेच, हा तो विचार असतो. हा एक मुद्दा झाला. जुन्या चादरी, टॉवेल्स, कपडे यांना घरातून काढून टाकायचे.  दुसरा मुद्दा- आपल्या घरात गिफ्ट्स म्हणून काय काय येऊन पडते? बहुतांश गोष्टी शोच्या असतात. त्यात खरोखर काहीतरी चांगल्या कलाकृती असतात. पण चांगल्या कलाकृती आहेर किंवा गिफ्ट प्रकारात देणे म्हणजे खूपच अपेक्षा झाली. निरुपयोगी मूर्ती, प्लॅस्टिकची फुले, भिंतीवरची घडय़ाळे, लाइटवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तू, नको होतील इतके बाऊल सेट असे काहीतरी घरात येऊन पडते .

पायपुसणी आणि फडकी यांच्या नशिबी असे मानाने गिफ्ट म्हणून जाणे देखील नाही. उपयोगाच्या, वापरल्या जातील अशा गोष्टी भेट द्यायला जणू बंदी घातलेली आहे, इतक्या प्रमाणात निरुपयोगी वस्तूंची ‘भेट’ म्हणून देवघेव होते. एखाद्या आर्ट गॅलरीच्या महागडय़ा ग्रिटिंग कार्डाचे करायचे काय? निव्वळ घरात डांबून ठेवायचा कागदाचा तुकडा, असे कोणी त्याकडे बघेल. बरं, ग्रिटिंग कार्ड कसे देणार नुसतेच, म्हणून अजून एखादी तशीच निरुपयोगी वस्तू सोबतीला जोडली जाते. त्यापेक्षा वापरले जाईल असे काहीही देता येऊ  शकते. पायपुसणी आणि फडकी याच्या नशिबी असा मान विरळाच! तर ट्राय करून बघू अशा गिफ्ट्स. आपल्यात कळत नकळत जे स्टेट्स सिम्बॉल्स आपल्या विचारांत घुसलेले असतात, आपल्यावर हावी होत असतात, त्यांना शांतपणे समजून घ्यायची नामी संधीच म्हणता येईल ही!

‘‘आयुष्यभरकष्ट केले, आता चार सुविधा हव्यात, कचकच नको कसली, ही भारतातल्या आधीच्या पिढीतल्या अनेक नवश्रीमंतांची गोष्ट असू शकते. क्रयशक्ती वाढल्याने आणि खरोखर काडी काडी जमवून त्यांनी घर उभे केल्याने ते आता मॉलमधून फडके, पायपुसणी, स्वच्छतेची विविध साधने, मॉप्स वगैरे आणू शकतात. तरी जुन्या सवयी जात नसल्याने वापरून टाकू प्रकारच्या गोष्टीही करत असतात. जुन्या चादरींचे, पडद्यावरचे, कपडय़ांचे टॉवेल्स आणि नॅपकिन्सचे फडके इकडे दिसू शकते. एखादी गोष्ट पुरेपूर वापरून मग टाकावी, असाही गट मोठाच असतो. पण पुरेपूर वापरात गचाळपणा आणि लक्तरं दिसायला नकोत, ही खबरदारी त्यांना पुरेशी जमत नाही. त्यांच्यामुळेच ‘‘शी, ते काय डाऊन मार्केट’’ म्हणणारे वर उल्लेखलेले लोक तयार होत असतात.

पुसायचे फडके नीटनेटके, स्वच्छ असणे, पायपुसणे स्वच्छ असणे आणि खूप काही खर्च न होता जरा बऱ्या दर्जाचे काही वरचेवर वापरता, बदलता येणे, यासाठी घरातल्या जुन्या कापडाचा खूपच चांगला वापर होऊ  शकतो. सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे जुन्या उशीच्या खोळीत तशीच कापडे कापून टाकून एका बाजूने आणि मध्ये शिवून घेणे. मोठय़ा सुईने हाताने देखील ते शिवता येते. मशीनच पाहिजे, असे नाही. जुन्या चादरी, पडदे, ओढण्यांमध्ये धान्याची जुनी छोटी पोती टाकून शिवून घेता येते. मोठय़ा सुयांनी हवे तसे पायपुसणे, फडके चटकन शिवून देणाऱ्या बायका अजूनही काही शहरांत घरोघरी फिरत असतात. चिंध्या करून त्यांचे गालिचे, पायपुसणे देखील त्या लगेच किंवा दोन दिवसांत तयार करून देतात. होलसेलने टॉवेल्स, नॅपकिन्स विकणाऱ्या दुकानांत मॉल्सइतकीच किंवा त्याहून जास्त व्हरायटी पुसायच्या फडक्यांची मिळू शकते. जुनी ब्लाऊज पिसं, कॉटन वेस्ट, चांगली पण उसवलेली, जराशी रंग पडलेली पण रिजेक्ट झालेली कापडं इथे नगाने, डझनाने, किलोने अतिशय स्वस्त दरात मिळतात.तुमच्याकडच्या कोणत्याही सुती कापडाला चारी बाजूने एखादी पट्टी शिवून चांगले फडके कुठे कुठे शिवून मिळते. तिथे एखादी टीप कमी जास्त झाली, आडवी तिरपी झाली, तर चालते. त्यामुळे, जुने कापड फाडणे आणि शिवणे हे एक उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणून देखील बघता येते. घरात, घराबाहेर अनेक जागा अशा असतात की त्या सातत्याने धुळीने माखून घेतात स्वत:ला. तिथे जुने-फाटके पण धुतलेले सॉक्स, बनिअन्सचे तुकडे एकदा वापरून टाकून देता येतील, असे वापरता येतात. स्वयंपाकघरात अंतर्वस्त्र वापरण्यापेक्षा हे नक्कीच बरे. अनेक घरांमध्ये केवळ जेष्ठ नागरिक राहत असतात. हात-पाय चालावे म्हणून थोडीफार कामे करतात दिवसभर. त्यांना अशी छोटय़ा कपडय़ाच्या तुकडय़ांची सोय फारच कामास येते. धुऊन वापरायचे काम वाचते. एरवीही कुठे आणि किती धुळीचे ते काम आहे, त्यानुसार अशी छोटय़ा छोटय़ा कापडाची वर्णी लावता येते. चांगली फडकी दुसऱ्या त्याहून बऱ्या सफसफाईला वापरता येतात. धुऊन परत परत वापरता येतात.

prachi333@hotmail.com