18 September 2020

News Flash

क्लोव्हर लीफ वाहतूक नियंत्रक नसलेला चौक

१९१६ साली अमेरिकेत आर्थर हेल या सिव्हिल इंजिनीअरने या शोधाचे पेटंट घेतले आणि याचा वापर सुरू झाला.

पराग केंद्रेकर parag.kendrekar@gmail.com

सकाळी आपल्या कामाला निघालो की काही वेळातच आपली गाडी थोडा वेळ थांबते. थांबा असतो- एक चौक आणि थांबवणारी ती गोष्ट असते- ‘सिग्नल’- चारही दिशांकडून येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण करणारी यंत्रणा. वाटेतल्या येणाऱ्या प्रत्येक चौकांमध्ये गाडीला थांबायची जणू सवयच झाली असते. कदाचित एखाद्या चौकात ‘सिग्नल’ हिरवा मिळतो आणि आपण मनातल्या मनात खूप खूश होऊन जातो. सगळे ‘सिग्नल’ हिरवे मिळणे म्हणजे स्वप्नवत असते. ते सुख आपल्यासाठी नसतेच असे आपण ठरवून टाकले आहे. आपल्या नागरी आयुष्यातला हा एक भाग होऊन बसला आहे.

पुरातन काळापासून गावातील किंवा नगरातील ‘चौका’ला फार महत्त्व होते. अशा या चौकातून सार्वजनिक वहिवाटीबरोबरच अनेक सामाजिक परिवर्तनांची वहिवाटपण झाली आहे. त्यामुळे त्या जागेला एक वेगळे सामाजिक, भावनिक संदर्भ होते. कालांतराने शहरं निर्माण झाली. नगर-वस्ती वाढत गेल्या आणि असे अनेक ‘चौक’ तयार झाले. नवीन जीवनशैली, वेगाने होणारे नागरीकरण या सगळ्याचा परिणाम वाहनाच्या संख्येवर थेट झाला. पूर्वीचे ‘चौक’ आता वाहनांनी गजबजून गेले आणि फक्त ‘वाहतूक व्यवस्थापन’ असे यांत्रिक स्वरूप राहिले आहे.

वाहनांची संख्या, वाहनांचे प्रकार, वेळेप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाना प्राधान्य, दुचाकी-चारचाकी वाहनांची वेगवेगळी व्यवस्था, बस थांबा, नागरिक सुरक्षा, वायू व ध्वनिप्रदूषण, अशा अनेकानेक विविध पैलूंची गणितं घालत व त्याचे व्यवस्थापन करीत हा ‘चौक’ दिवसभरात थकून जातो.

प्रत्येकाच्या मनात विचार येत असणारच की- याला काही उपाय नाही काय?  १९ व्या शतकाच्या शेवटी व २० व्या शतकाच्या सुरुवातीला शहरीकरणाची सुरुवात युरोप, अमेरिका, रशिया व इतर देशांमध्ये झाली. औद्योगिक क्रांतीने व पुढे विश्वयुद्धाने या देशांना कार्यमग्न बनवले. या देशातील विद्वानांनी अनेक विषयांमध्ये प्रचंड काम केले आणि मानवजातीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. असाच एक विषय- जो शहरीकरणाशी जोडला आहे तो म्हणजे ‘रस्ते’ योजनेचा. Transport Design, Highway इंजिनीरिंग हे त्याचे मुख्य विषय. वाहनाचा प्रकार, त्याचे वजन, त्यांची संख्या, त्यांचा वेग, वेगाप्रमाणे वळणाची भूमिती, वळण मार्गाची रचना, रस्त्यांच्या चौकांची भूमिती, त्याचा उतार कोन, पाण्याचा निचऱ्याची योजना, योग्य क्षमतेची सामग्री, मार्गातील चिन्हे, वेग नियंत्रक चिन्हे या व अशा अनेक बाबींचे  Design अथवा योजण्याची वैज्ञानिक पद्धत या विद्वांनांनी विकसित करून त्यांनी जगाला एक वेगळीच दिशा दिली. विशेषत: पश्चिमी देशांना याचा फायदा झाला.

‘चौक’ हा या विषयामधला एक महत्त्वाचा विभाग. सुरुवातीपासूनच सिग्नल अथवा नियंत्रक लावून वाहतूक नियंत्रण करण्याची पद्धत खूपच प्रचलित झाली. पण वाढत्या वाहतुकीमुळे होणारे अनिश्चित विलंब, थांबलेल्या गाडय़ातून होणारे प्रदूषण, लागणारे मनुष्यबळ या बाबींमुळे सिग्नल यंत्रणा १०० टक्के कार्यक्षमता गाठू शकली नाही. चौकांमध्ये वाढणाऱ्या वाहनाच्या व्यवस्थापनेचे कोडे सोडवण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले. भुयारी मार्ग, पूल, पदपथक असे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्यातला एक यशस्वी प्रयत्न म्हणजे ‘Clover Leaf Junction’ म्हणजे साध्या भाषेत ‘नियंत्रक नसलेला चौक. मुख्य रस्ता, वळण रस्ता, उड्डाण पूल, जोड रस्ता याची वीण करून ही संरचना बनवली गेली आहे. या योजनेची खासियत अशी की यामध्ये एखाद्या चौरस्त्याच्या, आठपैकी एका दिशेने येणारी गाडी उर्वरित सात दिशांपैकी कुठल्याही दिशेला सिग्नलशिवाय पूर्ण वेगाने मार्गक्रमण करू शकते. ही संरचना उ’५ी१ झाडाच्या पानाच्या रचनेसारखी दिसते म्हणून त्याला ‘ Clover Leaf ’ असे म्हणतात.

१९१६ साली अमेरिकेत आर्थर हेल या सिव्हिल इंजिनीअरने या शोधाचे पेटंट घेतले आणि याचा वापर सुरू झाला. पुढे १९२० नंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी हे जंक्शन बांधले गेले आहेत. इतरही जगात याचा वापर झाला आहे. पुढे या संरचनेमध्ये काही फेरबदल होत गेले आणि नवीन पद्धतीचे अधिक कार्यक्षम जंक्शन design तयार झाले आहेत. पण जसे प्रत्येक गोष्टीचे आहे तसेच या संरचनेच्या पण काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संरचनेला खूप जागा लागते. कमीत कमी १६ एकर जमिनीचा भूभाग यातून व्यापला जातो. महामार्ग असेन तर अधिक, कारण की वाहनांच्या वेगाचा आणि या संरचनेच्या भूमितीचा थेट संबंध. त्यात उड्डाण पूल, जोड रस्ते व इतर व्यवस्था करण्यास खूप खर्चही येतो. म्हणून शहरांमधील चौकात याचा वापर शक्य झाला नाही. परंतु महामार्गासाठी मात्र याचा वापर उत्तम झाला आहे. परदेशात नाही तर भारतातही. भारतात चेन्नई, दिल्ली, नोएडा, बंगलोर या ठिकाणी महामार्गावर ‘Clover Leaf’ जंक्शन बांधले गेले आहेत. त्यातले दक्षिण आशियातले सर्वात मोठे जंक्शन हे चेन्नईमधील काठीपारा येथे आहे. दुसरे चेन्नई मधेच कोयम्बेडू येथे आहे. यमुना द्रुतगती महामार्ग नोएडा- बदारपूर जंक्शन, मुकारबा चौक दिल्ली, बंगलोर -म्हैसूर महामार्गावरील हे जंक्शन दिमाखदारपणे उभे आहेत आणि अव्याहत वाहनांची वहिवाट घडवून देशाचे दळणवळण उत्तम कार्यक्षमतेने पेलत आहेत.

भविष्याच्या महामार्गावरचे  हे चौक खऱ्या अर्थाने टर्निग पॉईंटस् आहेत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:03 am

Web Title: cloverleaf flyover cloverleaf interchange clover leaf junction
Next Stories
1 ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’
2 मंजूर नकाशे आणि रेराचे नवीन परिपत्रक
3 घर बदलत्या काळाचे : परिसर आणि प्रदूषण
Just Now!
X