21 October 2018

News Flash

रंगविश्व : रंगशिदोरी

‘रंगविश्व’ या सदरातून मिळालेल्या रंगशिदोरीचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यात करणं सोपं जाईल.

आपण ‘रंगविश्व’ या सदरातून गेल्या वर्षभरात रंगांच्या दुनियेत डोकावून बघायचा एक छोटासा प्रयत्न केला. छोटासा प्रयत्न म्हणायचं कारण की, खरोखरच रंगांचं हे विश्व इतकं अफाट आहे की, या रंगसागरातले काही थेंबच आपल्याला न्याहाळता आलेत. या सदराच्या शेवटाकडे जात असताना, रंगांबाबत नेमकं कोणतं ज्ञान आपण कमावलं, याला एकदा थोडक्यात सिंहावलोकन करून उजाळा द्यायचा प्रयत्न आजच्या या एकविसाव्या आणि शेवटच्या भागात आपण करू या. म्हणजे ‘रंगविश्व’ या सदरातून मिळालेल्या रंगशिदोरीचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यात करणं सोपं जाईल.

अगदी शालेय चित्रकलेत शिकलेल्या रंगज्ञानापासून आपण सुरुवात केली. पण ती करत असतानाच आपण हेही पाहिलं की, हे रंगविज्ञान भारतीय संस्कृतीत किती प्राचीन आहे. ऋग्वेदातल्या ऋचेमध्ये सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशापासून त्याच्या रथाच्या सात घोडय़ांच्या लगामाच्या सíपलाकार दोऱ्या म्हणजे त्या पांढऱ्या प्रकाशापासून तयार होणारे सात रंग आणि त्यांचा सíपलाकार म्हणजे इंग्रजीत ज्याला ‘साइन वेव्ह’ म्हणतात, त्या सात रंगांच्या विविध फ्रिक्वेन्सी असलेल्या वेव्ह्ज कशा आहेत, ते आपण पाहिलं. त्याचबरोबर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कलर्स तसंच कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणजे काय, तेही आपण पाहिलं. रंगछटांच्या फिक्कट किंवा गडदपणानुसार टोन, टिंट आणि शेड यातला फरकही आपण सुरुवातीच्या भागात समजून घेतला. त्यानंतर आपण रंगांचे स्वभाव कोणते, ते जाणून घेताना पेस्टल कलर्स, वॉर्म आणि कूल कलर्स, न्यूट्रल कलर्स कोणते आणि त्यांचा वापर विविध खोल्यांसाठी करताना कोणते परिणाम साधले जातात, ते आपण जाणून घेतलं. रंग प्रकाशाचं नातं कसं आहे, ते आपण त्या पुढल्या भागात पाहिलं होतं. रंगांचा जन्मच प्रकाशातून होत असल्यामुळे त्यांचं नातं अतूट आहे. एकच रंग आपल्या डोळ्यांना वेगवेगळ्या प्रकाशात कसा वेगवेगळा दिसतो, याचं गमक आपण त्या भागात जाणून घेतलं. म्हणूनच आपल्या घरातल्या विविध खोल्यांसाठी रंगांची निवड करताना कोणती काळजी घ्यायची, आणि आवश्यक ते ‘मूड’ कसे साधायचे हेही आपण त्या भागात समजून घेतलं. रंगांची निवड करताना त्रिमितीचा आभास निर्माण करणारे ‘टेक्श्र्चर पेंट’ कसे तयार करता येतात आणि त्यांचा कुठे वापर करायचा यासंबंधीची माहिती आपण त्या पुढल्या भागात घेतली. रंगांची कुटुंबं कोणती, त्यांची एकमेकांशी असलेली नाती, म्हणजे मत्री आणि विरोधाभास कसा साधायचा हेही आपण या सदराच्या नंतरच्या भागात पाहिलं. त्यानंतरच्या भागात आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला होता आणि तो म्हणजे रंगांचं मानसशास्त्र! कारण यावरच आधारित असा सदराचा पुढला सगळा प्रवास आपण केला.

त्यानंतर मात्र, आपण प्रत्यक्ष एकेका रंगाबद्दल सखोल माहिती घेतली. यामध्ये सर्वात पहिला होता तो इंद्रधनुष्यातला तांबडा रंग! याचा तजेलदारपणा कसा असतो आणि तो या रंगाला का असतो, याचं शास्त्रीय विश्लेषण आपण या भागात पाहिलं. जिथे प्रसन्नपणा पाहिजे असेल, तिथे पिवळ्या रंगाचा वापर कसा करायचा, हे आपण त्यानंरच्या भागात पाहिलं. इंद्रधनुष्यातला यानंतरचा रंग असलेला नारिंगी रंग आनंद कसा प्रदान करतो, आणि म्हणून त्याचा वापर कुठे व कसा करता येईल, ते आपण त्यानंतरच्या भागात जाणून घेतलं. हिरव्या रंगाच्या टवटवीतपणाबद्दल आणि त्याच्या करायच्या घरातल्या उपयोगाबद्दल आपण पुढल्या भागात जाणून घेतलं. हिरव्या रंगाने मनावरचा ताण गेला, की त्यानंतर येणाऱ्या निळ्या रंगामुळे मनाला शांती कशी मिळते, ते आपण त्यानंतरच्या भागात अभ्यासलं. भारतीय संस्कृतीत रंगांच्या उगमापासून सुरुवात झाल्यानंतरचा प्रवास अध्यात्माच्या दिशेने कसा वळतो, ते आपण पारवा रंग जाणून घेताना पाहिलं. आपल्या याच संस्कृतीमध्ये अध्यात्मातून विरक्तीकडे जायचा जो मार्ग दाखवला आहे, त्या मार्गावरून जायला जांभळा रंग कसा मदत करतो, हे आपण इंद्रधनुष्यातल्या या शेवटच्या रंगाबाबतच्या भागात पाहिलं. पण त्याच बरोबर जांभळ्याचा पुन्हा फिरून तांबडय़ाकडे प्रवास सुरू होतो, तेव्हा त्याच्या परिणामांमध्ये कसे बदल होतात, तेही आपण त्याच भागात समजून घेतलं. याशिवाय रंगांचा तसा फार मोठा परिणाम मनावर न करणारे, पण इतर रंगांचा वापर करत असताना रंगांचं आणि म्हणून मनाचं संतुलन साधणारे न्यूट्रल कलर्स कसे काम करतात, याबाबत आपण त्यानंतरच्या भागात माहिती घेतली. त्यानंतरच्या निव्वळ रंगांवर आधारित असलेल्या अशा शेवटच्या भागात रंग नसूनही सर्वच रंगांवर फार मोठा परिणाम साधणाऱ्या काळ्या आणि पांढऱ्या ्नं्नरंगाबाबत माहिती मिळवायचा प्रयत्न केला.

घरांसाठी विविध रंगांचा वापर कसा करायचा, याबाबत अशी सखोल माहिती घेतल्यानंतर मग या रंगांचा वापर घरं नसलेल्या इतर वास्तूंमध्ये कसा करायचा, याबाबतचं ज्ञान आपण त्यापुढल्या भागांमध्ये घेतलं. त्यात आरोग्याचं आणि रंगांचं नातं सांगतानाच रुग्णालयांच्या विविध विभागांकरता करायच्या रंगांच्या वापराबाबत, आपण त्या भागात जाणून घेतलं. शिक्षण क्षेत्र हेही असंच एक महत्त्वाचं क्षेत्र! तिथे रंगांचा उपयोग कसा करून घ्यायचा याबाबतची माहिती आपण त्यापुढल्या भागात घेतली. दुकानं, मॉल्स यामधला रंगांचा वापर आणि त्यांच्या वापरामुळे होणारा परिणाम कोणता, हे आपण त्यानंतरच्या भागात पाहिलं. दिवसभरातला आपला बराचसा वेळ जिथे जातो, त्या कार्यालयांमध्ये रंग कसे उपयोगात आणावेत, याबाबतही आपण या सदरातून माहिती घेतली. मनोरंजनाच्या आणि विशेषत: चित्रपटांमधल्या आभासी वास्तवामध्ये, त्यातल्या वास्तूंमध्ये घडणाऱ्या घटनांची वास्तविकता मनावर अधिक ठसवण्यासाठी रंग कसे वापरले जातात, ते गेल्या भागात आपण पाहिलं.

अशा प्रकारे पहिल्या सहा भागांमध्ये रंगविज्ञानाविषयीची मूलभूत माहिती, सातव्या भागापासून पंधराव्या भागापर्यंत म्हणजे पुढल्या नऊ भागांमध्ये प्रत्यक्ष रंग आणि त्यांचा घरातल्या विविध खोल्यांमधला वापर, तर त्यानंतरच्या सोळा ते वीस या पाच भागांमध्ये या रंगांचे विविध क्षेत्रांमधले कंगोरे दाखवायचा हा अल्प प्रयत्न, गेल्या वीस भागांमधून यथामती केला. सदराचं हे एकविसावं पुष्प तुमच्यासमोर मांडताना आज समाधान वाटतं आहे. पण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही सर्व माहिती म्हणजे संपूर्ण रंगज्ञान नसले, तरीही या माहितीचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल, अशी आशा वाटते. त्यामुळेच ही रंगशिदोरी तुमच्या हाती सोपवून या सदरातून तुमचा निरोप घेतो.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in

समाप्त

First Published on December 30, 2017 12:35 am

Web Title: colour combination for interior interior designer