01 October 2020

News Flash

घरगोष्टी : आटोपशीर स्वयंपाकघरे

शहरात जागेच्या टंचाईमुळे २ किंवा ३ खोल्यांमधे ऐसपैस स्वयंपाकघरे अशक्यच.

प्रतिनिधिक छायाचित्र

परवा मैत्रिणीबरोबर तिला नुकताच पुनर्विकासांतर्गत नव्याने मिळालेला फ्लॅट बघायला गेले होते. मुंबईसारख्या शहरात अतिशय प्रशस्त असा टू बेड हॉल किचन आणि पुढे सुंदरशी बाल्कनीसुद्धा असलेल्या त्या फ्लॅटमधे राहायला जाण्यापूर्वी तिथे अंतर्गत सजावट चालू होती. सर्व खोल्या ऐसपैस असलेल्या त्या घराचे स्वयंपाकघर मात्र मला फारच लहान वाटले. तिला तसे म्हटल्यावर, ‘‘अगं स्वयपाक करायला अशी कितीशी जागा लागते? आणि आजकाल स्वयंपाकघरात आपण असतो कितीसा वेळ.. शिवाय इथे कुणाला पाट रांगोळ्या घालून जेवणाच्या पंगती बसवायच्यात या स्वयंपाकघरात?’’

घरी आल्यावर तिच्या पाटरांगोळीची पंगत शब्दावरच विचार करत बसले. नुकतीच कोकणातील आजोळच्या ऐसपैस घरात जाऊन आल्यामुळे वरचेवर त्याची शहरातल्या घरांबरोबर तुलना मनात चालूच होती त्यात आता पाटाचे निमित्त पुरले. एकेकाळी जेवण खाली पाटावर बसूनच जेवायचे हा रिवाज होता. पाट कमी पडले तर छोटय़ा चटया.. बसकर म्हणजेच अरुंद सतरंजी घेऊन बसायचे, पण शक्यतो जमिनीवर बसून जेवणे अमान्य होते. आजोळच्या लांबलचक स्वयंपाकघरात दारामागच्या कोनाडय़ात किमान १०-१२ तरी चांगले भरभक्कम असे लाकडी पाट ठेवलेले असत. त्यातील काही पाटांच्या चार कोपऱ्यावर खिळ्याने ठोकलेली पितळेची चपटी फुले होती. तेच पाट बसायला घ्यायची आम्हा मुलांमध्ये चढाओढ असायची. आता त्या आठवणीनेही हसू येते ‘‘चला, पाटपाणी घ्या..’’ अशी हाक घरातल्या मुलींना (फक्त मुलींनाच बर का, मुलांना नाही) ऐकू आली की जेवण तयार झाले समजावे. त्या लांबलचक स्वयंपाकघरात घरातली पुरुष माणसे आणि लहान मुला-मुलींची पंगत आधी व्हायची. आणि त्यांना अदबीने वाढायचे काम घरातील बायकांचे असे. त्यांच्यानंतर घरातल्या बायकांची अन्न पुढय़ात घेऊन अंगतपंगत होई. त्यांनी मात्र पाटावर बसले तरी शक्यतो मांडी घालून न बसण्याचा रिवाज होता. त्यामागील कारण मला तरी माहीत नाही. काही खास प्रसंगी त्या लांबलचक पंगतीत ताटाभोवती रांगोळीची महिरप किंवा किमान रांगोळीची चार बोटे तरी काढली जात आणि अशा वेळी उदबत्तीही आवर्जून लावली जाई. थोडक्यात, सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत उदरभरणाचे सर्व कार्यक्रम त्या ऐसपैस स्वयंपाकघरातच चालायचे. फक्त कुणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना चहा-फराळासारखा पाहुणचार मात्र स्वयंपाकघरात न होता बाहेरच्या ओटीवर होई. मात्र कुणी बाईमाणूस पाहुणी आली की तिच्यासाठी चहापाणी मात्र थेट स्वयंपाकघरात तिला पाटावर बसवून होई.

शहरात जागेच्या टंचाईमुळे २ किंवा ३ खोल्यांमधे ऐसपैस स्वयंपाकघरे अशक्यच. त्यामुळेच तिथे उपलब्ध जागेत कालानुरूप बदल पटापट स्वीकारले गेले. ओटे बैठे न राहता उभे झाले. गृहिणीचा खाली वाकून दहा वेळा उठाबश्या करून स्वयंपाक करायचा त्रास कमी झाला. तरीही त्या आटोपशीर स्वयंपाकघरातही पाटपाणी घेऊन जेवायची परंपरा बरीच वर्षे चालूच होती. फक्त जागेप्रमाणेच कुटुंबातील सदस्यांचा आकारही कदाचित लहान झाल्यामुळे एकाच पंगतीत सर्वाची जेवणे आटोपली जाऊ  लागली. अपवाद फक्त घरात काही खास कार्यक्रमामुळे बरीच पाहुणेमंडळी जेवायला असतील..  स्वयंपाकघरात जेवणाचा भरपूरच पसारा असेल तर त्या दिवशी मात्र मुद्दाम बाहेरच्या खोलीतले सामान वगैरे हलवून तिथे पाटपाणी घेतले जाई. एरवी मात्र बाहेरच्या खोलीत बसून जेवणे  अयोग्य वाटायचे. क्वचित त्या खोलीत जेवायला बसले असताना कुणी पाहुणा अचानक दारात येऊन उभा राहिला तर घाईघाईने त्याच्या समोरून सर्व भांडीकुंडी आत नेण्याची धावपळ होई.. कदाचित त्यावेळी ते शिष्टसंमत नसावे. बसून स्वयंपाक करायची पद्धत मोडली तशीच बसून जेवण्याचीही पद्धत हळूहळू बंद होऊ  लागली. बदलत्या जीवनशैलीमुळे पाटावर बसून मांडी घालून बसणे जेव्हा कठीण होऊ  लागले, तेव्हा जेवण्यासाठी डायनिंग टेबल आणि खुर्च्या हे घरोघरीचे आवश्यक फर्निचर बनले. डायनिंग टेबलमुळे खाली वाकून जेवण वाढण्याचे किंवा प्रत्येकाला स्वहस्ते वाढण्याचे बायकांचे कामही तसे कमीच झाले. अर्थात टेबल्सचा आकार मात्र प्रत्येकाच्या स्वयंपाकखोलीच्या आकारावरून ठरत असे. छोटय़ा स्वयंपाकघरासाठी तर फोिल्डगची टेबले आली. जी हवी तेव्हा उघडता येतील आणि जेवणे झाल्यावर भिंतीला चिकटून उभी राहतील किंवा अरुंद होतील. खुर्च्याही त्याच प्रकारच्या फोिल्डगच्या पाहिजे तेव्हा उघडायच्या आणि नको तेव्हा पाटांप्रमाणे भिंतीशी मुकाटय़ाने उभ्या करायच्या.

कालांतराने सर्वाच्या घरात टेलिव्हिजन नामक एका नव्या इलेक्ट्रॉनिक वस्तूने शिरकाव केला. ज्याने समस्त कुटुंबीयांचे मनोरंजन करायचा जणू वसाच घेतला. सुरुवातीला त्यावर मोजकेच कार्यक्रम बघायला मिळायचे म्हणून त्यांच्या वेळानुसार घरातील मंडळींनी आपल्या जेवणाची वेळ ठरवून घेतली म्हणजे.. गजरा किंवा चित्रहार संपला की सगळ्यांनी (स्वयंपाकघरात) जेवायला बसायचे असे वेळापत्रक तयार झाले. पण पुढे पुढे दबक्या पावलांनी घरात शिरलेल्या टी.व्ही.ने मग पूर्ण घरावर चक्क आक्रमणच केले. वाहिन्यांची संख्या वाढली. त्यांच्या आपापसातील स्पर्धेमुळे मनोरंजनाचा भरगच्च रतीब चालू झाला. घरच्या मंडळींना मग मालिकेतल्या कुटुंबातील भडक आणि नाटकी सुखदु:खाच्या घटनांमध्ये फारच रस निर्माण झाला. त्याचे पर्यवसान म्हणजे, एकेकाळी एकत्र जेवताना एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी करण्यासाठीची खास जागा म्हणजेच डायनिंग टेबल आता रिकामे राहू लागले. तयार झालेले अन्न एकदाच काय ते वाढून घेऊन मंडळी आपापली ताटे घेऊन बाहेरच्या खोलीत सोफ्यावर किंवा दिवाणावर अगदी जमिनीवरही बसून टी.व्ही.च्या पडद्यावर नजर खिळवून जेवणे उरकू लागली.

एकेकाळी स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारले. अर्थार्जनासाठी करिअरसाठी त्यांचा दिवसाचा बराच काळ घराबाहेर जाऊ  लागल्यावर वेळ वाचवण्यासाठी अनेक कल्पनांचा आणि आधुनिक उपकरणांचाही उपयोग होऊ  लागला. वर्षभरासाठीचे धान्य, पापड, लोणची, मसाले निगुतीने करून ते भरून ठेवण्याचे प्रकार हळूहळू बंद होऊन हे सर्व पदार्थ आयते बाजारातून गरजेनुसार आणले जाऊ  लागल्यामुळे साठवणासाठीच्या मोठय़ा मोठय़ा डबे बरण्यांची गरजही कमी झाली. मिक्सर ग्राईंडर तसेच फूडप्रोसेसरसारख्या आधुनिक उपकरणांनी स्त्रियांना कमी कष्टात आणि झटपट स्वयंपाक करायला हातभार लावल्यामुळे एकेकाळी स्वयंपाकखोलीत आवश्यक असणारा पाटा-वरवंटा, खलबत्ता, विळी वगैरे वस्तूही बसण्याच्या पाटासारख्याच अडगळीत गेल्या, शिवाय आजकाल घरातील एखाद्या छोटय़ाशा समारंभासाठीसुद्धा घरी जेवण न बनवता बाहेरून जेवण मागवायची पद्धत सुरू झाल्याने आणि त्यासाठीच्या ताटवाटय़ा वगैरेची सोय केटरर मंडळीकडूनच होत असल्याने एकेकाळी अगदी १५-२० माणसांसाठी लागणाऱ्या भांडय़ा-कुंडय़ांचीही गरज कमी होत जाऊन त्यांचीही रवानगी माळ्यावर झाली.

बदलत्या काळाची पावले अचूक ओळखून बांधकाम व्यावसायिकांनी नवीन गृहरचनेत स्वयंपाकखोली म्हणजे जेवण बनवण्याची तसेच एकत्रितपणे जेवण्याची खोली ही संकल्पनाच मोडीत काढली. त्याऐवजी, जिथे एखाद् दुसऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करण्यासाठी वावरता येईल..  जिथे स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू आणि उपकरणे सामावतील (उदा. रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह मिक्सर किंवा ओटय़ाखालच्या किचन ट्रॉलीज) इतक्याच आकाराचे स्वयंपाकघर बांधण्याची कल्पना यशस्वीपणे रुजवली. जेवणाच्या टेबल खुर्च्याची प्रतिष्ठापना आता जेवताना टी.व्ही. ही दिसेल अशा बेताने लििव्हगरूममध्येच झाल्यामुळे! एकेकाळी परक्या व्यक्तीसमोर अचानक आलेल्या पाहुण्यासमोर बसून न जेवण्याची शिष्टाचाराची कल्पनाच रद्दबातल झाली, त्यामुळे आजकाल घरातील सदस्य तसेच पाहुण्यांचे जेवणही स्वयंपाकखोलीबाहेरच्या लििव्हगरूममध्येच होते.

छोटय़ा स्वयंपाकघराचे समर्थन करताना मैत्रीण म्हणाली ते खरंच आहे. पाटपाणी किंवा पाटरांगोळ्या हे यापुढे फक्त शब्दप्रयोग म्हणूनच वापरले जातील. पाटरांगोळ्याच्या पंगती तर आता फक्त पूर्वीच्या लग्नाच्या कृष्ण-धवल फोटोंच्या अल्बममधूनच पाहायला मिळतील. विचार करता करता मनाशी म्हटले, खरंच बदल फक्त गृहरचनेतच झाले नाहीत, तर काळानुरूप आपल्या मानसिकतेतही बदल होत चाललेत आणि ते आपल्या चांगलेच पचनीही पडलेत की!

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:01 am

Web Title: compact kitchen ideas
Next Stories
1 गाळयाचे हस्तांतरण कायद्यानेच!
2 घर बदलत्या काळाचे मातीविना शेती
3 दुर्गविधानम् : दुर्गाची दुनिया..
Just Now!
X