सुसंवाद राखणं ही मानवी जीवनातील एक अविभाज्य बाब आहे, असा विचार करणारी समिती सुसंवादाचा गाभा आस्थेनं जपू शकेल. मात्र यासाठी ‘सहकार’ या शब्दाची व्याख्या जाणीवपूर्वक जोपासण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य या दोघांचीही आहे. म्हणून ती ऐच्छिक न ठेवता अपरिहार्य म्हणूनच मानावयास हवी. हा दृष्टिकोन जेवढा प्रवाही राहील तेवढी संस्थेची मार्गक्रमणा योग्य दिशेने होत जाईल.
सहकारी गृहनिर्माण संस्था आणि तिचं व्यवस्थापन हा सतत चर्चिला जाणारा विषय आहे. त्यावर चर्चा होत राहते कारण तो महत्त्वाचा विषय आहे. म्हणूनच सुसंवादी व्यवस्थापन समिती असणे ही गृहनिर्माण संस्थेसाठी आवश्यक बाब ठरते. संस्थेचा कारभार हा समितीच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असल्याने सुसंवादी व्यवस्थापनाची गरज अधिकच भासते.
सुसंवाद राखणं ही मानवी जीवनातील एक अविभाज्य बाब आहे, असा विचार करणारी समिती सुसंवादाचा गाभा आस्थेनं जपू शकेल. मात्र यासाठी ‘सहकार’ या शब्दाची व्याख्या जाणीवपूर्वक जोपासण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य या दोघांचीही आहे. म्हणून ती ऐच्छिक न ठेवता अपरिहार्य म्हणूनच मानावयास हवी. हा दृष्टिकोन जेवढा प्रवाही राहील तेवढी संस्थेची मार्गक्रमणा योग्य दिशेने होत जाईल.
वरील बाबींचा अभाव असेल तर ‘सहकार’ या शब्दाची मूल्ये न जपता केवळ दिखाऊपणासाठी वापरायचा एक गुळगुळीत शब्द इतकंच त्याचं महत्त्व असेल. हे सर्व विवेचन करण्यामागचं कारण म्हणजे एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घडलेला एक प्रसंग..
संस्थेचा कारभार हातात घेऊन केवळ चार महिने पुरे झालेले असताना व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि समिती सदस्य यांच्यातील सामंजस्याच्या अभावामुळे विसंवादाचं  वातावरण तयार झालं आणि त्याचा परिणाम म्हणून विशेष सर्वसाधारण सभेत या विसंवादी वातावरणाची चिरफाड झाली. तू-तू मै-मै होऊन अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. या प्रकरणामागची कारणे पुढील प्रमाणे होती-
समिती सदस्यांचं पदाधिकाऱ्यांना सहकार्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी.
व्यवस्थापन समितीच्या मासिक बैठकींना किमान दोन सदस्यांची अनुपस्थिती.
खर्चाचं बजेट मंजूर करताना कमिटी सदस्यांचा नकारात्मक पवित्रा.
कामाचा ‘प्राधान्यक्रम’ ठरविण्यावरून मतभेद.
कार्यालयीन कामकाजाच्या नोंदी करण्याबाबतची अनियमितता.
सदस्यांमध्ये एकवाक्यतेचा अभाव.
पदाधिकारी आणि सदस्य यांच्यामध्ये परस्परांबाबत असलेला अविश्वास.
वर उल्लेखलेली परिस्थिती अंतर्मुख करणारी आहे. मुळात गृहनिर्माण संस्थेचा कारभार पाहणाऱ्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि समिती सदस्यांमध्ये विश्वासाची भावना नसेल आणि सुसंवादाचा अभाव असेल तर त्यांचे विपरीत परिणाम सोसायटीच्या कारभारावर होणारच. पण अशी परिस्थिती का निर्माण होते? पदाधिकारी आणि समिती सदस्य यांच्या विचारधारा जुळण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? विसंवाद कशामुळे होतो? या प्रश्नांचा विश्लेषणात्मक विचार करता प्रामुख्याने पुढील बाबी हे वातावरण तयार होण्यास कारणीभूत ठरत असाव्यात असे वाटते.
१) पदाधिकारी आणि कमिटी सदस्य यांच्या शैक्षणिक आणि वैचारिक पातळीमध्ये असणारे अंतर.
२) पदाधिकाऱ्यांमध्ये असणारी मतभिन्नता.
३) कामकाज हाताळण्याच्या पद्धतीमध्ये असणारी नाराजी.
४) भाषेचा केला जाणारा सैल वापर.
५) जबाबदारी घेण्यावरून होणारी तू- तू मै- मै.
६) अहंभाव आणि ‘मी’ पणाच्या कोषात गुरफटलेली व्यक्तिमत्त्व.
इथे एक बाब स्पष्ट आहे की, व्यक्तीच्या स्वभावगुणानुसार आणि वैचारिक कुवतीनुसार माणसं एकमेकांशी जोडली जातात आणि एकदा का ही नाळ जोडली गेली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. पण हाच क्रम उलटा असेल तर? प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीतच, उलट वैचारिक मतभेद वाढीस लागतात. अनेक वेळा असे दिसून येते की, पदाधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचे ‘कल्चर’ आणि कमिटी सदस्यांचे ‘कल्चर’ जर एकसुरी नसेल तर त्याचा विपरीत परिणाम संस्थेच्या कारभारावर होत असतो. हे टाळायचं असेल तर अध्यक्ष आणि सेक्रेटरी या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी समिती सदस्यांची पाश्र्वभूमी, शैक्षणिक गुणवत्ता आणि कार्यक्षमता याची नीट माहिती करून घेतली पाहिजे आणि त्या पातळीनुसार त्यांच्याबरोबर संवाद करायला हवा, कारण अध्यक्ष आणि सेक्रेटरी हेच व्यवस्थापन समितीचे सुकाणूधारक असल्याने प्रभावी व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांचीच असते.
हाच मुद्दा वेगळ्या भाषेत पटवून द्यायचा तर एखाद्या वाद्यवृंदामध्ये अनेक वादक आणि गायक यांचा ताळमेळ जुळवून आणण्यासाठी सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणारा जो संवादक असतो, त्याच प्रकारची भूमिका व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष व सेक्रेटरी यांची असते. म्हणूनच संवादक या भूमिकेतून त्यांनी वागणे अपेक्षित आहे.
प्रत्येक कमिटी सदस्याची आवड ओळखून त्यांना कामाचं आणि जबाबदारीचं वाटप झालं. तर ते संबंधित सदस्याला समाधान देऊन जाईल. ही गुण वैशिष्टय़े अध्यक्ष व सेक्रेटरींना जाणता यायला हवीत. या विषयाला पुरक म्हणून काही कमिटी सदस्यांची मते जाणून घेतल्यावर पुढील बाबी निदर्शनास आल्या-
जे कमिटी सदस्य नियमांवर बोट ठेवून वागणारे असतात किंवा चिकित्सक वृत्तीने एखाद्या कामाविषयी चर्चा करू इच्छितात अशा सदस्यांवर पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होणे.
दबावाला बळी न पडणाऱ्या कमिटी सदस्याला मासिक मिटिंगमधून कसे डावलता येईल याची रणनिती आखणे.
वादग्रस्त किंवा एकमत होऊ न शकणारा विषय पुढील मिटिंगपर्यंत स्थगित ठेवणे.
विरोध करणाऱ्या कमिटी सदस्याच्या अनुपस्थितीत त्या विषयावर निर्णय घेणे.
आग्रही मताच्या सदस्याला मिटिंगची तारीख आगाऊ सूचना न देता ‘आयत्या’ वेळी कळविणे. जेणेकरून मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी त्याची तारांबळ व्हावी.
व्यवस्थापन समितीमध्ये विसंवादी वातावरण तयार झाले तर त्याचे रूपांतर वादविवाद आणि संघर्षांमध्ये होते. शह- काटशहाला ऊत येतो आणि अन्य सभासद पुढे न आल्याने एके दिवशी सोसायटी प्रशासकाच्या ताब्यात जाते ही बाब सभासदांना गौरवाची किंवा भूषणास्पद नसते. प्रशासकाचा कालखंड हा फार सुखावह किंवा कार्यकुशल संपन्न असतोच, असे नाही पण ही बाब जेव्हा ध्यानात येते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. हा विचार ध्यानात घेता प्रत्येक सोसायटीच्या ‘विद्यमान’ व्यवस्थापक समितीने सामंजस्याने आणि आवश्यक तेथे लवचीक धोरण स्वीकारून कारभार पाहणे यातच सोसायटीचं खरं हीत आहे. म्हणूनच प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला ‘सुसंवादी व्यवस्थापन समिती’ लाभणं ही महत्त्वाची गरज आहे.
अरविंद चव्हाण – vasturang@expressindia.com