24 January 2019

News Flash

आठवण-साठवण : ‘ये दुनिया   पित्तल की..’

काळे दाम्पत्याच्या च्या या साठवणीमुळे जुन्या पितळी भांडय़ांची डिझाइन्स नव्या पिढीला दिसतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘आई’ म्हटलं की तिच्या प्रेमापासून ते मारापर्यंत सर्व आठवत जाते. आई ही स्वयंपाकघरात राबणारी व्यक्ती आहे असा समज पूर्वीच्या मुलांचा असे. त्यामुळे आईच्या आठवणी या मार देण्यासाठी वापरलेल्या लाटण्यात, उलतानं किंवा झाडूत असं कशातही असू शकतं. आईमुळे स्वयंपाकघराशी आपलं नातं मुरत जातं. तिथं आईचा वावर जाणवतो. तिच्या हाताखाली तयार झालेली भांडी असतात. तिथली भांडी केवळ आईचंच ऐकतात असं वाटतं. आणि लहानपणीची ही आपल्या आईचं ऐकणारी भांडी वारसाने आपली व्हावीत असं वाटणं हे स्वाभाविक आहे.

अहमदनगरचे अशोक काळे हे शिक्षणाने स्थपतीशास्त्र (जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर ) या विषयात पदवीधर! परंतु कुटुंबाचा परंपरागत असा शेतीव्यवसाय त्यांना खुणावत होता. मग स्वत:चं असं त्यांनी प्रचंड मोठं स्लॉटर हाऊस सुरू केलं. त्याच्या जवळच छोटेखानी बंगला आहे जो काळेंचं शिक्षण उत्तम झालं असल्याची ग्वाही देतो.

जगभरातील प्रसिद्ध चित्रांच्या प्रिंट्स, सोव्हिनीयर शोकेस भिंतीवर आहेतच. काचेच्या विविध आकाराच्या बाटल्यांचं मोठं कलेक्शनचं एक शोकेस आहे. पण बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडय़ावर समोरच दिसतात ती जुनी जिवंत अशी आईची भांडी!

घर हे भावनिक नात्यांतून बनते हे अधोरेखित होते. आज काळे यांच्या आईचे वय ९०च्या पुढे आहे. म्हणजे ही भांडी ५० हून अधिक वर्ष जुनी असल्याचा अंदाज आपल्याला लावता येतो. प्रत्येक भांडय़ाची आठवण सांगताना काळे यांच्या चेहऱ्यावर लहानपण अवतरतं. एखादा ठरावीक डबा, की ज्यात आईने साठवलेली चिल्लर ढापून सिनेमा पाहिल्याची आठवण सांगतात. एखाद्या शांत दुपारी लाडू, गूळ या खाण्याच्या पदार्थाची शोधमोहीम केल्याची आठवते. आणि मग पुढे ही रीतच बनली. असं प्रत्येक भांडं स्वत:ची अशी गोष्ट लेऊन आहे.

काळे दाम्पत्याच्या च्या या साठवणीमुळे जुन्या पितळी भांडय़ांची डिझाइन्स नव्या पिढीला दिसतात. त्यांनी त्यांची मांडणीही आकर्षक पद्धतीने केलेली दिसते. दर आठवडय़ाला यांची पितांबरी अंघोळ होत असल्याने अजूनही चकचकीत व स्वच्छ आहेत. घरात प्रवेश करताच पितळेची ही लख्ख भांडी आपलं मन वेधून घेतात.

श्रीनिवास बाळकृष्णन chitrapatang@gmail.com

First Published on February 10, 2018 12:15 am

Web Title: couple using brass home appliances