21 April 2019

News Flash

आखीव-रेखीव : सजावटीचे पर्याय

फर्निचर बनवून घेताना आपण बऱ्याचदा ते फिक्स बनविलेले असते, त्यामुळे ते हलवता येत नाही

कविता भालेराव

घर सजवणे हा तसा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. घर सजवायचे आहे असा विचार जरी मनात आला तरी मन प्रसन्न होतं. आपलं आणि आपल्या घराचं नातंच वेगळं असतं. प्रसन्नता, शांतता, उल्हास अशा गोष्टींवर आपलं आणि आपल्या घराचं नातं अवलंबून असतं. आणि या गोष्टी जशा आपल्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतात, तशाच आपल्या घरातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर अवलंबून असतात. मन प्रसन्न राहण्याकरता छोटे बदलही महत्त्वाचे असतात.

वाचताना थोडं वेगळं वाटेल, पण विचार केला की लक्षात येतं की अनेक वर्षे एकच वस्तू सतत डोळ्यासमोर बघूनही आपण कंटाळतो.. बदल हा असलाच पाहिजे. नाहीतर रूमच काय, आपले आयुष्यही एकसुरी होऊन जाते. आणि या बदलाला दर वेळेला खूप खर्च होतो असे नाहीच ..हे सगळे गैरसमज आहेत.

बदल करण्यासाठी एखाद्या कार्यक्रम किंवा सणाची वाट का पाहायची? आपण समजावून घेऊ की घरात सतत बदल करायचे म्हणजे काय करायचे?

* आपण बाजारातून नवीन वस्तू घेतो. आपण वस्तूंची बेरीजच करतो, पण आपण वस्तूंच्या वजाबकीचाही विचार केला पाहिजे. किती गोष्टी जमवायच्या हेही ठरवायला लागते. जर का घरात वस्तू नीट व्यवस्थित ठेवायला जागा नसेल तर घर खूप भरलेले दिसते. अनेकदा घर म्हणजे खूपच गर्दी वाटते वस्तूंची. ज्या वस्तू वापरत नाहीये किंवा मागच्या दोन वर्षांत एकदाही त्या जागेवरून  काढल्या नाही, अशा वस्तू आधी मोडीत काढल्या तर नवीन वस्तू ठेवायला जागा होईल. बऱ्याचदा खूप स्टोअरेज असूनही वस्तू बाहेरच असतात, म्हणून वस्तूंची बेरीज आणि वजाबाकी आवश्यक असते.

* फर्निचर बनवून घेताना आपण बऱ्याचदा ते फिक्स बनविलेले असते, त्यामुळे ते हलवता येत नाही. किंवा रूमची रचना आणि साइज यामुळेही फर्निचरच्या रचनेत बदल करता येत नाही. अशा वेळी आपण सोफ्याची जागा बदलू शकतो. डायनिंग टेबल जरा वेगळ्या पद्धतीने ठेवू शकतो.

जर का फर्निचर बनवून बरीच वर्षे झाली असली तर आणि परत नवीन फर्निचर करायचे बजेट नसेल तर आपण तज्ज्ञांकडून आपल्या फर्निचरची पाहणी करून जर का त्याचे वरचे फिनिशिंग मटेरियल बदलले तरी आपल्याला छान वाटते. किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याला नवीन लुक देऊ शकतो.

* नवीनच फर्निचर करायचे असेल आणि जागा लहान असेल तर खूप अवजड फर्निचर न घेता जागा वाचवणारे आटोपशीर फर्निचर घेणे.

* कपाट आतून व्यवस्थित ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या ऑर्गनायझरच्या वस्तू मिळतात त्या वापरणे. म्हणजे त्याच कपाटाला एक प्रकारचा सुटसुटीतपणा येईल.

* घरात काही जागा असतात, कॉर्नर असतात जे मोकळेच असतात. ते कॉर्नर, त्या जागांची सजावट केली तर  घर छान वाटते. काही भिंती या कायमच मोकळ्या असतात. त्यामुळे त्यावर काही पेंटिंग लावता येईल का; किंवा एखादे शेल्फ लावून काही छोटय़ा सुंदर सजावटीच्या वस्तू ठेवता येतील याचा विचार नक्की करावा. जर का आपल्याकडे पेंटिंग आहे, पण ते वेगळ्या भिंतीला आहे तर त्याची जागा बदलावी.

खरे तर या बदलाची सुरुवात मुख्य दरवाजापासूनच करावी. आजकाल खूप सुंदर नेमप्लेटस् मिळतात, आपण त्यांचा विचार करावा. तसेच तोरणामध्येही अनेक उत्तम डिझाइन्स उपलब्ध आहेत. रांगोळीचे स्टिकरही छान वाटतात. नवीन स्टाइलच्या लाइटच्या माळाही आपण वापरू शकतो; तोरणाला पर्याय म्हणून.

* जर का एन्ट्रन्स लॉबी असेल तर आपण त्या जागेत छोटे बदल करू शकतो. जसे लाइट बदलणे, एखादा छानसा आरसा लावणे किंवा रोपटे ठेवणे. रंगीत आणि आटोपशीर मोडा ठेवणे किंवा ड्रायव्हर युनिट ठेवून त्यावर रनर टाकून सुगंधित आणि डेकोरेटिव्ह दिवे /मेणबत्त्या ठेवणे.

* लिव्हिंग रूममध्ये तर सतत बदल करावे, फारच प्रसन्न वाटते. कधी सोफ्याची जागा बदलावी. वॉल फ्रेम बदलव्यात. एखादे फोल्डिंगचे कॉर्नर टेबल ठेवावे म्हणजे कधी त्यावरही शोभेच्या वस्तू ठेवता येतात आणि कधी ते फोल्ड करून उचलून ठेवता येते. सहज शक्य असेल तर कधी कॉर्नरमध्ये एखादी लॅम्पशेड ठेवावी. सेंटर टेबलवरील वस्तू बदल्याव्या. नसतील तर एखादीच कलात्मक वस्तू ठेवावी.

सोफ्याचे कापडही बदलता येते. जर का असे करणे सहज शक्य नसेल आणि खर्चीक असेल तर आपण त्यावर सोफा रनर टाकू शकतो. सगळे जर का लाइट रंगांचे असेल तर गडद रंगाची काचेची फुलदाणी ठेवून लिव्हिंग रूमचा लुक बदलवू शकतो.

ग् डायनिंग टेबलचाही मेकओव्हर गरजेचा असतो. आपण सगळे आपल्या घरच्यांबरोबर तिथे फार महत्त्वाचा वेळ घालवत असतो. आपण टेबल मॅट्स, रनर यांचे वेगवेगळे सेट ठेवून ते सतत बदलत राहू शकतो. याशिवाय टेबल क्रोकरीही छान मिळते. जसे- काचेच्या छोटय़ा बरण्या, आकर्षक स्पून स्टँड, देखणे काचेचे ग्लास आणि छोटा फ्लॉवरपॉट अशा नेमक्या आणि आकर्षक वस्तूंनी आपण डायनिंग टेबलवरची रचना कायम बदलत राहू शकतो. आणि यातील बऱ्याच वस्तू असतात आपल्याकडे. त्या फक्त एकामागून एक बदलणे आवश्यक असते.

ग् किचनमध्ये मोठे बदल हे शक्यच नाहीयेत, पण आपण किचन नॅपकिन, टिश्यू पेपर यांनी किंचनला आकर्षकपणा आणू शकतो. जर का काही ओपन शेल्फ असतील तर त्यावर आपण काही काचेचे आर्ट पिसेस ठेवू शकतो. किंवा तांब्याचे/पितळेच्या वस्तू ठेवून एक वेगळीच थीम करू शकतो स्वयंपाकघरासाठी. किचन विंडोवर छोटे आणि रंगीत पॉट असलेले प्लॅन्ट ठेवू शकतो.

ग् बेडरूममध्येही आपण जर का काळजीपूर्वक बदल करत राहिलो तर आपल्याला जराही कंटाळवाणे वाटणार नाही. रूमच्या रंगसंगतीनुसार बेडशीट, बेड रनरचे सेट आणणे. छोटय़ा छोटय़ा सुंदर आणि डार्क रंगाचे कुशन कव्हर असलेले ३ ते ४ कुशन ठेवणे. साइड टेबलवर पुस्तकांसारख्या सहज हलवता येतील अशा वस्तू ठेवणे.

खोलीनुसार काही बदल करता येतात. दर वेळेला आपण नवीन वस्तू आणायची अजिबातच गरज नाहीये. आपण आर्ट पीस कधी यारूममध्ये तर कधी दुसरीकडे अशा पद्धतीने ते ठेवू शकतो. याशिवाय पडदे, कुशन कव्हर, काप्रेट या वस्तू सतत बदलत ठेवाव्यात. एखादे छोटे रोपटेही आपण रूम टू रूम ठेवू शकतो. त्यांच्या जागा बदलू शकतो. फ्रेम, टेबल लाइट, छोटे दिवेही आपण बदलत ठेवू शकतो. गरजेचं नाही की ते जर का आपण एका रूमसाठी घेतले आहे तर कायमच तिथे ठेवावे. खिडक्या जर का मोठय़ा असतील तर िवडो हँिगगही छान मिळतात. नाजूक लाइटच्या माळा आपण लावू शकतो, काही झाडे ग्रिलवर अडकवता येतील अशा कुंडय़ा. अगदी साध्या वस्तूंनीही आपण रूम सजवू शकतो.

बऱ्याचदा आपण आवडते म्हणून अनेक गोष्टी आपल्या घरासाठी घेत असतो. दरवेळेला गरज म्हणून सजावटीच्या गोष्टी घेतल्या जात नाहीत. त्या फक्त आवडतात म्हणून घेतल्या जातात. अशा वेळी या वस्तू नीट ठेवण्यासाठी जागा करावी. बऱ्याचदा शोभेच्या वस्तू लोकांना दिसाव्या, किंवा आपले कलेक्शन लोकांना कळावे म्हणून वस्तुसंग्रालयात मांडाव्या तशाच पद्धतीने लोक वस्तू ठेवतात. आणि जे घरात अजिबातच सुंदर दिसत नाही. अनेकदा वस्तूंची खूप गर्दी वाटते. त्यामुळे आणलेल्या वस्तू या एकाच वेळी सगळीकडे ठेवण्याचा मोह अगदी टाळावा आणि त्या आलटूनपालटून ठेवाव्यात, त्यामुळे एक प्रकारचे नावीन्य टिकून राहते आणि सतत तेच ते बघण्याचा कंटाळा येत नाही.

बदल हा कायम आनंद, प्रसन्नता आणि उत्साह वाढवण्यासाठी असावा. आणि त्याची सुरुवात ही आपण येणाऱ्या सणांपासून करूच शकतो.

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

First Published on October 13, 2018 2:25 am

Web Title: decoration options for home best home decorating ideas