04 March 2021

News Flash

उपराळकर पंचविशी : नवनिर्मितीचा घोळ

यातूनच सुरू झालं वसुंधरेचं ऋतुचक्र आणि वेगवेगळ्या परिसरांतील जैवविविधतेची उत्क्रांती.

बुद्धपौर्णिमेला उपराळकर देवचाराला सुचवल्याप्रमाणे वास्तुपुरुष आता कोकणाच्या ‘उष्ण-आद्र्र’ परिसराच्या बाहेर पडून उष्ण-शुष्क परिसरातील वास्तुरचना व नगररचना यांचा विचार करत होता. हवामान आणि ऋतुचक्र यांचा विचार म्हणजे प्रथम उजळणी करायला हवी सूर्य आणि पृथ्वी यांच्या आटय़ापाटय़ा खेळाची!
अदित्याने जन्म दिलेले अष्टग्रह आणि त्यांचे उपग्रह वेगळे झाले, पण आजही तो आदित्य त्यांना प्रकाशमय करत आहे, ऊर्जा पुरवत आहे. ही ग्रहमालिकाही आपल्या या पित्याच्या कक्षेतच राहिली आहे- प्रदक्षिणा घालत पश्चिमेकडून पूर्वेकडे आपापलं अंतर राखून लंबगोलाकार मार्गाने! त्यातही पृथ्वी सूर्यापासून एवढय़ा अंतरावर, की अति उष्ण नाही की अति शीत नाही. त्यामुळे पृथ्वीवर जैवविविधता बहरलीच. शिवाय ही वसुंधरा आपल्या उत्तर-दक्षिण आसावर कलली आहे, प्रदक्षिणामार्गाशी २३.५ अंशांनी. त्यामुळे सुमारे ३६५ दिवसांच्या सूर्यप्रदक्षिणेत तिच्या उत्तर-दक्षिण परिसरांवर वेगवेगळ्या प्रमाणात सौरऊर्जा मिळायला लागली. मध्य भागातील कर्क, विषुव आणि मकर वृत्तांतील कमरपट्टय़ात सर्वाधिक ऊर्जा तर अगदी टोकाकडील ध्रुवप्रदेशात सर्वात कमी. यातूनच सुरू झालं वसुंधरेचं ऋतुचक्र आणि वेगवेगळ्या परिसरांतील जैवविविधतेची उत्क्रांती. पृथ्वीवरच्या हवामानाचा ढोबळ आराखडा हा असा आहे- विषुववृत्तावर म्हणजेच शून्य अक्षांशावर सर्वाधिक उष्ण हवामान तर त्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील उच्च अक्षांशावर कमी होत जाणारं शीत हवामान. तसंच समुद्र सपाटीपासून उंच जाताना अधिकाधिक शीत होणारं हवामान. त्यापुढे जाऊन मग स्थनिक हवामानाचे बारकावे हे समुद्र सान्निध्य, पाणवठे, नद्या, वाळवंट, डोंगर-दऱ्या, वाऱ्यांच्या दिशा, समुद्री-उष्ण प्रवाह इत्यादी घटकांवर अवलंबून असतात व त्यानुसार हवामानाचे विभाग असतात. या प्रत्येक विभागातही सूक्ष्म-हवामान परिसर असतात, जे हिरवाई, नद्या-नाले, मोकळ्या जागा, इमारती, शहरीकरण, उद्योग-परिसर, प्रदूषण इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असतात. या परिसरांतील मानवाचं सुसह्य़ जीवन हे परिसर स्नेही इमारती व नगररचना यांवर मुख्यत: अवलंबून असतं. मानवाला सुसह्य़ हवामान हे तापमानावर आणि आद्र्रतेवर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे सरासरी तापमान २० ते ३० अंश सेल्सियस दरम्यान आणि सरासरी आद्र्रता ३०% ते ६५% दरम्यान हे हवामान सुसह्य़ समजलं जातं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून मानवाने कल्पकतेने, विविध तंत्रांच्या योजनेने, उपकरणांद्वारे, विजेच्या वापराने इमारतींतील तापमानावर नियंत्रण ठेऊन ते सुसह्य़ ठेवायला सुरुवात केली. पण हे उपाय खर्चीक आणि बहुधा शहर परिसरांपुरतेच मर्यादित राहिले. सर्वसामान्य माणसासाठी परिसरस्नेही वास्तू आणि राहाणीमान हाच प्रमुख आधार आहे. म्हणूनच वास्तुपुरुषाने हेच धोरण अंगीकारलं आहे.
वास्तुपुरुषाने प्रथम भारतातील प्रमुख हवामान- विभागांकडे पाहायचं ठरवलं. समुद्रकिनाऱ्या लगतच्या उष्ण-आद्र्र परिसराचं विश्लेषण नुकतंच सुंदरवाडीच्या उदाहरणातून झालं. पुढचा विभाग आहे उष्ण-शुष्क परिसराचा. हा विभाग म्हणजे दख्खन पठाराचा पर्जन्यछायेतील परिसर आणि राजस्थानचा मरूभूमी सदृश्य विषम हवामानाचा परिसर. त्यानंतर येतो संमिश्र-सम परिसर. हा विभाग म्हणजे भारताचं अंतरंग- मध्यावरचा परिसर. शेवटचा विभाग आहे समशीतोष्ण व अतिशीत परिसराचा, उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगेचा. या प्रत्येक विभागातील हवामान आणि तिथली भूगर्भरचना यानुसार तिथली नसíगक जैवविविधता उत्क्रांतीत होत गेली आणि पुढे मानवी जीवनही या नसíगक परिसराशी मिळून मिसळून विकसित होत गेले.
वास्तुपुरुष या बिकट हवामान-परिसरांच्या आणि भारतातील ऋतुचक्राच्या विचारात गुंगून गेला होता. हवामानाची उजळणी करत, बुद्धपौर्णिमेला सुंदरवाडीहून निघालेला वास्तुपुरुष सह्यद्री पर्वतरांग ओलांडून बेळगाव, बागलकोट, विजापूर या पर्जन्यछायेतील उष्ण-शुष्क परिसरातून भ्रमंती करत मराठवाडय़ातील सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या एकेकाळच्या दुष्काळी विभागात पोचला. सह्यद्रीत उगम पावलेल्या कृष्णा व तिच्या उपनद्यांवरील बंधारे, धरणांमुळे काही प्रमाणात आता या भागातील दुष्काळी परिस्थिती बदलली आहे. हवामान मात्र तसंच आहे, कदाचित जागतिक ऋतुबदलाच्या चक्रात ते अधिक तीव्र आणि विषम होत चाललं असावं. कालव्यांलगतची शेती सोडली तर बाकी सर्व परिसर हा रखरखीत, रेताड, धुळीने चरचरलेला. नैसर्गिक वनस्पती जीवन म्हणजे पानगळीचं शुष्क जंगल, बहुतांश काटेरी झुडुपं व झाड-बोरी-बाभळी, सागरगोटा यांसारखी. अधूनमधून रानगवत, रानवेली, निवडुंगाचे प्रकार. मधूनच या खडतर परिसरालाही सुजल-सफल करणारे नांदुरकी, पर, वड, पिंपळ यांसारखे अश्वत्थ कुलातील, परिसरातील जैवविविधतेला आधार देणारे महावृक्ष. शुष्क झऱ्यांकडेनं करंज, कडूलिंब, उंबर, पळस यांसारखे औषधी वृक्ष, तर कुठे चुकूनमाकून चकित करून टाकणारे सदाहरित चंदनवृक्ष. अशा खास वनस्पती जीवनाच्या सहाय्याने बहरणारी वैशिष्टय़पूर्ण जैवविविधता- माळढोक, तणमोर, तितर, मोर, धाविक यांसारखे भूचर पक्षी, उष्ण हवामानाला तोंड देऊ शकणारे चंडोल, बाया सारखे छोटे पक्षी आणि वैविध्यपूर्ण शिकारी पक्षी. खास प्राणिजीवन म्हणजे नीलगाय, काळवीट, खोकड, बिबटय़ा आणि असंख्य सरपटणारे प्राणी. असा संतुलित निसर्ग परिसरच या परिसरातल्या मानवालाही आधारभूत ठरतो. निसर्गातील सर्व घटकांप्रमाणेच इथला मानवही या ऋतूबदलाशी आणि परिसरांशी समरूप होऊन नांदू शकेल, निरामय जीवन जगू शकेल.
वास्तुपुरुषाला या परिसरातील एका नैसर्गिक दुर्घटनेची आठवण झाली- ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेला महाकाय भूकंप. या धरणीकंपात ५२ गावं उद्ध्वस्त झाली, सुमारे १० हजार जीवितहानी तर सुमारे ३० हजार जखमी झाले. भूकंप ६.२ रिश्टर प्रमाणाचा होता, म्हणजे तसा फार मोठा नव्हता. पण एवढी मोठय़ा प्रमाणावर हानी झाली, अवैज्ञानिक तंत्राने केलेल्या दगडी बांधकामामुळे. वास्तुपुरुषाने या भूकंपग्रस्त परिसराचं निरीक्षण सुरू केलं. काय परिस्थिती आहे आता दोन दशकांनंतर, तथाकथित पुनर्वसनानंतर? एका दुर्घटनेमुळे मिळालेल्या नवनिर्मितीच्या संधीचा कसा वापर केला गेला? किती आदर्श गावं, नगरं उभी रहिली? दोन आठवडय़ांच्या या परिसरातील भटकंतीनंतर पदरी निराशाच आली. गणेश विसर्जनाच्या रात्री जीव गमावलेल्या आत्म्यांचा टाहो वास्तुपुरुषाला अस्वस्थ करून गेला. काय सांगणार आज उपराळकर देवचाराला? आज वैशाख अवसेची रात्र, लगेचच सुरू होईल ग्रीष्म ऋतू. उन्हाळा अगदी पराकोटीला पोचत असतानाच मृग नक्षत्र लागेल.
मोसमी पावसाची चाहुल लागेल. या परिसरात मात्र नुसते ढग दाटून येतील, एखाद् दुसरी सर पडेल, थोडीशी आद्र्रता वाढेल, उन्हाळ्याची काहिली जराशी कमी होईल, पावशा पक्ष्यांचे कुकारे सुरू होतील. सूर्य पश्चिमेला कलला. तिरके सोनेरी सूर्यकिरण एका पुरातन गढीच्या दगडी भिंतींना उजाळा देत होते. तटबंदीच्या कोनाडय़ात बसलेल्या गिधाडाने वास्तुपुरुषाचं लक्ष वेधून
घेतलं. ते गिधाड परिसराच्या भेसूरतेचं प्रतीक वाटायला लागलं. गिधाड फडफडाट करून वास्तुपुरुषाला काही संदेश देत होतं.
अरे, हा तर देवचाराचा निसर्गदूत. कधीच वेळ चुकवत नाही. ‘‘हे गृध्रराजा, यावेळी क्षमा कर मला. अजून देवचाराला सांगण्यासारखे विचार मनात जमले नाहीत. इथल्या नवनिर्मितीचा घोळ पाहून मनात काहूर उठलं आहे. कृपया माझा निरोप देवचारापर्यंत पोचव. पुढच्या वटपौर्णिमेला पोचतोच देवराईत. तू मात्र ये परत वाट दाखवायला. त्यावेळी आराखडा असेल या परिसरातील आदर्श नवनिर्मितीचा. अजूनही अनेक गावं, नगर भूकंपाच्या वेदना सहन करत खंगत आहेत. त्यांना दिलासा द्यायचा आहे. परिसरस्नेही नवनिर्मितीचा मार्ग दाखवायचा आहे. या कष्टकरी वारकऱ्यांच्या अंतकरणात आशेची ज्योत प्रज्ज्वलित करायची आहे. तोपर्यंत इथल्या ज्येष्ठ गावकऱ्यांकडून त्यांची जीवनशैली समजावून घेतो. क्षमा कर देवा महाराजा!’’
गृध्रराजाने हवेत झेप घेतली आणि उष्ण हवेच्या प्रवाहांवर तरंगत पश्चिम दिशेला प्रयाण केलं. सांज वेळ आता कातर वाटत नव्हती, आशादायक दिसत होती. वास्तुपुरुष गावाकडे निघाला. धनगर शेतात मेंढय़ांचा तळ ठोकत होते. काही माळरानांवर भटक्या लमाणांची पालं लागली होती, चुली पेटल्या होत्या, धूम्रवलयं हलकेच परिसरात पसरत होती. गावातल्या बाया एकटय़ा-दुकटय़ा गाईला हाकत सरपण जमा करत होत्या, पाथरवट शेवटचा दगड घडवत होते, कडुनिंबाच्या पारावर पांढऱ्या शुभ्र कपडय़ातील, गांधी टोपीच्या पेहरावातील काळेकभिन्न विठोबा भक्त बठक जमवत होते. दूरवरून टाळ-मृदुंगांची लय वातावरणात भिनायला लागली होती. वास्तुपुरुषही तल्लीनतेने आदर्श नवनिर्मितीच्या स्वप्नांत दंग झाला होता. तिकडे उपराळातील वटवृक्षावर गृध्रराज विसावला. देवचाराला वास्तुपुरुषाचा निरोप मिळाला. देवचाराचा धीरगंभीर आवाज परिसरात घुमला, ‘‘वास्तुपुरुषा, मला कल्पना होती तुझ्या खडतर प्रवासाची, वैचारिक वादळांची.
काही हरकत नाही आणखी एक पंधरवडा गेला
तरी मला खात्री आहे तुझ्या आदर्श नवनिर्मितीच्या धोरणाची. नाही तरी येणारी पौर्णिमा आहे यमराजाचा पराभव पाहाणारी, जीवनाला उजाळा देणारी. अनेक शुभेच्छा तुला!’’ भजनाच्या लयीत तल्लीन झालेल्या वास्तुपुरुषाला हे शुभेच्छांचे झंकार पुलकित करून गेले.
उल्हास राणे – ulhasrane@gmail.com.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 12:45 am

Web Title: design of town planning
टॅग : Town Planning
Next Stories
1 लळा लागला असा की.. : आयुष्य समृद्ध करणारे सहचर
2 कायद्याच्या चौकटीत : मालमत्ता आणि मृत्युपत्र
3 थंडगार पाणी देणारे ‘माठ’
Just Now!
X