दिवसभर या बिनपगारी रखवालदाराची उपस्थिती जाणवत नाही. रात्री ठरावीक वेळेनंतर सोसायटीची मुख्य प्रवेशद्वारे बंद झाली, आपापल्या घरी रहिवासी झोपी गेले की त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी इमारतीच्या खाली फक्त पगारी रखवालदार आणि हे महाशय एकमेकांच्या साथीने पहारा देत राहतात. रखवालदारांना या कुत्र्याचा रात्री केवढा आधार वाटत असेल! अचानक काही प्रसंग उद्भवला तर त्याच्या मदतीला हमखास वेगवान हालचाली करून धावून जाणारा याच्याशिवाय तेथे असतोच कोण!

शहरात किंवा गावात एखाद्या ठिकाणी गुन्हा घडतो आणि यथावकाश पोलीस तेथे येऊन गुन्ह्य़ाचा तपास सुरू करतो. काही गुन्ह्य़ाचा तपास करण्यासाठी माणसाला एखाद्या इमानदार मुक्या प्राण्याची मदत घेण्याची आवश्यकता भासते आणि तेथे कामी येतो पोलीस खात्याचा एखादा प्रशिक्षित कुत्रा. कोणीतरी दूरध्वनीवरून रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा एखादी सार्वजनिक कार्यक्रमाची जागा येथे बॉम्ब ठेवल्याची सूचना देतो आणि त्याची सत्यता पडताळणीसाठी पोलिसांचे श्वानपथक तेथे दाखल होते. ज्या ठिकाणी काही दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरलेली असते किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची ज्या ठिकाणी उपस्थित रहाणारा असते, असे ठिकाण सुरक्षित आहे की नाही, याची खातरजमा करून घेण्यासाठी पोलिसांच्या प्रशिक्षित श्वानपथकाची मदत घेण्यात येते. अर्थातच इतके महत्त्वाचे काम करणाऱ्या कुत्र्याची शासनाकडून विशेष काळजी घेण्यात येते. त्याच्या प्रशिक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, त्याच्या देखभालीसाठी, अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शासनातर्फेसर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला जातो.

समर्थाघरच्या श्वानाची तर गोष्टच वेगळी. त्याचे खास महागडे खाणे, त्याचे खास डॉक्टरकडून औषधोपचार, त्याला फिरवून आणण्यासाठी पगारी नोकराची व्यवस्था, माणसासाखेच कौतुकाचे बाळंतपण, पावसाळ्यात बाहेर फिरताना घालण्यासाठी खास कपडे, थंडीचे कपडे, त्यांच्या सौंदर्य स्पर्धा.. थोडक्यात, माणसासारखेच त्याचेही कौतुक आणि लाड पुरविले जातात. पण त्याच्याच एखादा भाईबंदाच्या नशिबी मात्र हे सुख नाही. तो म्हणजे प्रत्येक इमारतीत असणारा, भटका म्हणून समजला जाणारा तरीही समाजोपयोगी काम करणारा सोसायटीचा कुत्रा.

जिथे जिथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते, मग ती इमारत सोसायटीची असो, कारखान्याची असो, किंवा कुठल्याही अन्य कारणासाठी बांधली जाणारी असो, तेथे रखवालदार नेमण्यात येतोच. कारण तेथे बरेच बांधकाम साहित्य येऊन पडत असते आणि त्यासाठी रखवालदार लागतोच. त्या रखवालदाराला सोबत करण्यासाठी, कोणीही न सांगता, कोणीही नेमणूक न करता अजून एक प्राणी हमखास आलेला दिसतो तो म्हणजे, आजूबाजूला भटकणारा एखादा कुत्रा किंवा कुत्र्याचे पिल्लू. रखवालदार स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे पोट मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसेबसे भरत असतो. त्याला या कुत्र्याचे लाड करणे परवडणे शक्यच नसते, आपल्या घासातील उरलासुरला घास तो त्याच्या पुढे एकदाच टाकतो आणि मग त्याचे आणि त्या मुक्या प्राण्याचे कायमचे नाते जडून जाते. त्याला त्या जमिनीच्या तुकडय़ाशी नाते जोडून आपली हद्द ठरवून घ्यायची असते. त्यासाठी जागोजागी जाऊन त्या जमिनीच्या तुकडय़ावर शक्य तितक्या ठिकाणी मागील एक पाय उचलून धार सोडून खुणा पक्क्या करून टाकतो. आणि त्या दिवसापासून तो त्या एरियाचा स्वयंघोषित बिनपगारी रखवालदार म्हणून कामावर रुजू होतो. थोडय़ाच दिवसात एखादा रखवालदार त्याचे नामकरण करून टाकतो. मोती, टॉमी, गब्बर, डॉन, कुठलेही नाव त्याला चालते. रखवालदार जिथे जिथे जाईल तेथे तेथे हा त्याची न बोलावता न कंटाळता सोबत करणार. त्याच्या पायाजवळ कायम घुटमळत राहणार, त्यांनी दिले तर काही तरी खाणार, त्यांनी  लाथाडले तरी थोडा वेळ दूर जाऊन परत त्याच्याशी लाडीगोडी चालू ठेवणार. त्यासाठी त्याच्या अंगावर उडय़ा मारणार, त्याच्या लाडेलाडे मारलेल्या थपडा खाणार. परत त्याच्या बरोबर कान टवकारून रखवाली करायला उभा राहणार. रखवालदाराच्या हावभावावरून तो ओळखतो कोणावर भुंकायचे आणि कोणाला नुसतेच तपासल्यासारखे करायचे.

यथावकाश इमारतीचे बांधकाम पूर्ण होते. रहिवासी इमारत असेल तर तेथे कुटुंबे राहू लागतात. त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू होतात आणि अर्थातच इमारतीच्या रखवालीसाठी रखवालदाराची नेमणूक पुढे चालूच राहते. पगारी रखवालदारासाठी कामाचे तास ठरलेले असतात, ते संपताच दुसरा रखवालदार त्याच्या जागी हजर होतो, दिवस-पाळी, रात्र- पाळीचे रखवालदार वेगवेगळे असतात. पण या मुक्या चार पायाच्या बिनपगारी रखवालदाराची डय़ुटी मात्र कधीच संपत नाही. ऊन-वारा-पाऊस सोसत वर्षांचे बारा महिने आणि दिवसाचे २४ तास हा कामावर हजर. पाच पैशाचीही अपेक्षा नाही. मिळेल ते आणि  मिळेल तेथून अन्न मिळवून आपली भूक भागवणार, असेल त्या पाण्यात आपली तहान भागवणार. जागा मिळेल तेथे अंगाचे मुटकुळे करून विश्रांती घेणार, त्याही स्थितीत जागृत. जरा खुट्ट व्हायची खोटी न कंटाळता कान टवकारून धावून जाणार. मध्यंतरीच्या काळात सिक्युरिटी कंपनी बदलते त्यांचे नवीन रखवालदार नवीन गणवेशात कामावर हजर होतात. हा प्रत्येकाशी जुळवून घेतो. रहिवासी इमारत असली तर मग तेथे राहणाऱ्या सर्व लहान मुलांचा हा मुका प्राणी दोस्त होतो. त्याच्याबरोबर खेळू लागतो. पण दोस्ती झाली असली तरी त्यांच्या घरापर्यंत याला जायला बंदी असते. बाहेरच्या आसपासच्या एखाद दुसऱ्या कुत्र्याशी हा दोस्ती जोडतो. मधे मधे ते याला भेटायला येतात. हा क्वचित त्याना भेटायला त्यांच्या सोसायटीत जाऊन येतो. पण बहुतकरून हा आपली जागा सोडत नाही.

दिवसभर या बिनपगारी रखवालदाराची उपस्थिती जाणवत नाही. रात्री ठरावीक वेळेनंतर सोसायटीची मुख्य प्रवेशद्वारे बंद झाली, आपापल्या घरी रहिवासी झोपी गेले की त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी इमारतीच्या खाली फक्त पगारी रखवालदार आणि हे महाशय एकमेकांच्या साथीने पहारा देत राहतात. रखवालदारांना या कुत्र्याचा रात्री केवढा आधार वाटत असेल! अचानक काही प्रसंग उद्भवला तर त्याच्या मदतीला हमखास वेगवान हालचाली करून धावून जाणारा याच्याशिवाय तेथे असतोच कोण! मुंबईत रात्री बाहेर फेरफटका मारलात तर बऱ्याच ठिकाणी एक चित्र तुम्हाला हमखास पाहायला मिळू शकते, अगदी उच्चभ्रू वस्तीतही, सोसायटीची सर्व प्रवेशद्वारे बंद असतात. सोसायटीचा रखवालदार एखाद्या खुर्चीत बसून झोपेवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, आणि त्याच्या बाजूलाच एखादा कुत्रा अंगाचे मुटकुळे करून झोपलेला असतो. जरा खुट्ट वाजायचा अवकाश, तो कान टवकारून त्या आवाजाचा वेध घेऊ  लागते.

रात्रभर याचा पहारा आणि दरारा पाहून घ्यावा. त्याच्या आवारात अन्य कुठली व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना दिसली की हा भुंकून भुंकून त्याचा पिच्छा पुरवून त्याला हाकलून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. किंवा एखादा अनोळखी प्राणी किंवा सरपटणारे जनावर झाडाझुडपात वावरत असेल तर हा भुंकून भुंकून सगळ्यांना त्याची दखल घ्यायला लावणार. रात्री अपरात्री त्याचे असे जोरजोराने सारखे भुंकणे काहींना झोपमोड करणारे त्रास दायक वाटते, खरं म्हणजे, इतरवेळी  शांत असणारा हा आताच इतका जीव तोडून का ओरडतो आहे? असा विचार करून त्याच्याबरोबरच्या पगारी रखवालदाराने कुत्र्याच्या भुंकण्याचे कारण शोधले तर त्याला कळून येईल की त्याचे भुंकणे विनाकारण नाही. तो इतका जीवतोडून का ओरडतो आहे याचे कारण शोधून ते तत्काळ दूर केल्यास त्याला इतकावेळ भुंकत राहण्याची आवश्यकताच राहणार नाही. पण उलट त्यालाच दटावले जाते. वेळप्रसंगी काठीचा प्रसाददेखील दिला जातो. तरीही तो आपला धर्म सोडत नाही. ते कारण दूर होईपर्यंत ओरडायचा थांबत नाही.

पण वय कोणाला चुकले आहे? आठ-दहा वर्षे इमानेइतबारे, एका पैशाचीही अपेक्षा न करता वर्षांचे बाराही महिने आणि दिवसाचे चोवीस तास, एकही दिवस सुटी न घेता इमारतीची रखवाली करणारा हा मुका रखवालदार म्हातारपण अनुभवू लागतो. तशा स्थितीतही जमेल तेवढी रखवाली करत राहतो. सोसायटीत राहणारा एखादा प्राणीमित्र किंवा भूतदया असणारा रहिवासी त्याची जमेल तेवढी सोसायटीच्या आवारातच शुश्रूषा करतो आणि एकदिवस हा मुका रखवालदार सोसायटीच्या आवारात किंवा कारखान्याच्या आवारात, एखाद्या कोपऱ्यात देह ठेवतो, कायमचा शांत होतो. आजूबाजूचे लोक महापालिकेला कळवतात, महापालिकेचे कर्मचारी येऊन त्याला घेऊन जातात. सोसायटीतील मुलांसाठी आणि रखवालदारांसाठी तो दिवस आणि रात्र त्याच्या आठवणीनी सुनी सुनी होऊन जाते.

काही दिवसंपासून त्या इमारतीच्या जागेत, म्हाताऱ्या कुत्र्याबरोबर जुळवून घेत नव्याने प्रवेश मिळवलेला, दुसरा तरुण कुत्रा किंवा कुत्र्याचे पिल्लू आता रखवालदाराच्या पायाशी घोटाळू लागतो. त्याच्या बरोबरीने हा नव्याने आलेला बिनपगारी रखवालदार आपली डय़ुटी करू लागतो.

gadrekaka@gmail.com