26 September 2020

News Flash

दुर्गविधानम् : दुर्ग.. कल्पनेपलीकडले!

दुर्गाच्या बांधकामातील अजून एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे दगडांचे सांधे भरण्यास लागणारा चुना.

डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com

माणसाने छपराखाली राहायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने त्याच्या गरजेनुसार व उपलब्ध साधनांनुसार नाना प्रकारची बांधकामं करायला सुरुवात केली. याचा अभ्यास करू गेलं तर मोठा रंजक इतिहास समोर येईल. काटेरी वेली, झाडाचे ओंडके, वाळक्या झुडपांचे दांडे, नाना परीचं गवत, दगड, धोंडे, माती, पाणी अशा अगदी प्राथमिक घटकांच्या मदतीने त्याने त्याच्या निवाऱ्याची गरज सुरुवातीच्या काळात भागवली. काळाचा प्रवाह वाहता राहिला. दिसमास उलटले, वर्ष गेली, शतकं, सहस्रकं उलटली. मात्र, हे प्राथमिक घटक तसेच राहिले. त्यात तिळमात्र फरक पडला नाही.  पण माणसाच्या कालानुरूप परिपक्व होत गेलेल्या बुद्धीमुळे साधने सुधारली आणि मूळच्या घटकांनी वेगळं रूप धारण केलं..!

दुर्गाच्या बांधकामातही हा क्रम स्पष्टपणे दिसून येतो. बदलत्या काळाच्या बदलत्या गरजांनुसार जमिनीवरचे दुर्ग अस्मानी चढले. महाराष्ट्रदेशी तर या गिरिदुर्गानी कमाल केली. साडेचारशे वर्ष या देशाच्या प्रचंड भूभागावर, जगासोबतच्या व्यापारावर, या देशींच्या व्यापारी वाटांवर, राजसत्तेवर आणि धर्मसत्तेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या सातवाहनांनी या देशी जे अश्मदुर्ग रचले त्या कालखंडापासून ते शनिवारवाडय़ाच्या रचनेपर्यंत महाराष्ट्रदेशाने निष्णात हातांनी रचलेली दुर्गरूपांची अनेकानेक स्थित्यंतरे डोळेभरी पाहिली. त्याचसोबत अनुभवली, मूळ घटकांची ही नवकथा!

दुर्गाच्या बांधकामातील अजून एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे दगडांचे सांधे भरण्यास लागणारा चुना. सर्वच दुर्गाच्या बांधकामांमध्ये चुन्याचा वापर अतिशय महत्त्वाचा असे. खनिज चुनखडी व शंखिशपल्यांपासून केलेला चुना असा दोन प्रकारचा चुना वापरला जाई. मात्र प्राधान्य असे शंखिशपल्यांपासून तयार केलेल्या चुन्यास. हा चुना तयार करण्यासाठी शंखिशपले जाळून त्यांची भुकटी किंवा चुनखडी जाळून त्यापासून तयार केलेल्या चुनकळीची भुकटी करण्यासाठी चुन्याची चक्की वा घाणा वापरला जाई. यामध्ये एक वर्तुळाकार चर करून त्यात ही चुनकळी वा जाळलेले शंखिशपले घातले जात. या चरात लाकडाचा अतिशय जड ओंडका वा दगडी चाक ठेवून ते खड्डय़ाच्या मध्यभागी लावलेल्या खुंटय़ास एका दांडय़ाने जोडत. त्या दांडय़ाच्या बाहेरच्या टोकास बल जोडला जाई. हा बल गोल गोल फिरू लागला की खड्डय़ातल्या जड ओंडक्यामुळे वा दगडी चाकामुळे खड्डय़ातील चुनकळी वा जाळलेले शंखिशपले कुटले जाऊन चुन्याची भुकटी तयार होई. ही भुकटी मग काही काळ पाण्यात भिजवून अथवा या चुन्याच्या दमट भुकटीमध्ये वाळू, डिंक, हिरडा, मेण, इत्यादी घटक मजबुतीसाठी मिसळून ते मिश्रण सांधे भरण्यासाठी वापरलं जाई.

यामुळे दुर्गाच्या बांधकामाच्या पूर्वतयारीमध्ये चुन्याची उपलब्धता हेसुद्धा एक महत्त्वपूर्ण अंग असे. असा चुना खाणींमधून व समुद्रकिनाऱ्यावरून शंखिशपल्याच्या रूपात मागवला जाई. इ. स. १७८५ मध्ये, पेशवेकाळात, रायगडावर हत्तीखान्याचे काम काढलं गेलं. त्यास लागलेला चुना, बाणकोटच्या कोळ्यांकडून कालवं (शिंपल्यांसारख्या वेष्टनात राहणारे एक प्रकारचे समुद्री जीव) खरेदी करून भट्टी लावून करवला व तो बांधकामास वापरला अशी नोंद पेशवे दप्तरात सापडते. आज राजगडासारख्या एखाद्या बलदंड दुर्गाच्या तटबंदीचं प्रचंड बांधकाम पाहावं आणि चुन्याचा केवढा मोठा डोंगर या तटबंदीच्या कामी आला असेल याची केवळ कल्पनाच करावी!

या पद्धतीने तयार केलेला चुना हा ताकदीला तर उत्तम असतोच, परंतु भिंतींमधून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठीही तो उत्तम असतो. या प्रकारे तयार केलेल्या चुन्याचं मिश्रण भिंतींना गिलावा देण्यासाठीही वापरतात. जंजिऱ्याला शह देण्यासाठी जंजिऱ्यासमोर कांसा किंवा पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग एका बेटावर रचला गेला. या दुर्गाच्या पश्चिमेकडचे उधाणभरतीला तोंड देणारे चिरे समुद्राच्या लाटांचा मार खाऊन खाऊन झिजले आहेत; मात्र दोन चिरे सांधणारा चुना मात्र अजून जसाच्या तसा आहे. किंबहुना दगड झिजून आत गेला आहे तर चुना वीतवीतभर बाहेर डोकावतो आहे. हे अतक्र्य वाटलं तरी खरं आहे!

कौतुकाची गोष्ट म्हणजे, या अशा पद्धतीने रचलेली बांधकामं आज अनेक शतकं ताठ मानेनं उभी आहेत. मात्र त्यांची डागडुजी करण्यासाठी आज वापरलेलं सिमेंटकाँक्रीट सह्य़ाद्रीतल्या एकाच पावसाळ्यात निखळून पडतं आहे, हे वास्तव बोलकं म्हणावं असंच आहे!

लाकूड हा कोणत्याही प्रकारच्या सार्वकालिक बांधकामांमध्ये लागणारा महत्त्वाचा घटक. दुर्गाच्या बाबतीत लाकडाचा उपयोग सर्वसाधारणपणे दोन वेळा : पहिल्यांदा तटाच्या बांधकामाच्या वेळी कळकाच्या- बांबूंच्या- पराती उभ्या कराव्या लागत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर बांबू लागे. मग ज्या भागात दुर्ग उभारायचा त्या सबंध परिसरातली बांबूंची बेटे विकत घेऊन तो सारा बांबू दुर्गावर पोचता केला जाई. आजही या तटांची बांधकामे पाहिली तर केवढय़ा मोठय़ा प्रमाणात कळकाची आवश्यकता भासत असेल याची निश्चितच कल्पना येते. तर दुसरी गरज असे इमारती लाकडाची. तटबंदीची कामं पूर्ण झाली की दुर्गामधली राहती घरं, कार्यालयं, मंदिरं यांच्या इमारती उभ्या राहत. त्यांची दारं, खिडक्या, खांब, तुळया, दुर्गाचे दरवाजे यांसाठी उत्तम प्रतीच्या लाकडांची आवश्यकता भासे. साग, देवदार, आंबा, फणस या झाडांची लाकडं या उपयोगाची. मात्र या झाडांची तोड गडाच्या घेऱ्याच्या रानातून वा गावांमधून होत नसे. दुर्गाच्या परिसरातल्या एका काठीसही हात लावू देऊ नये, अशी शिवछत्रपतींची आज्ञा होती. कारण ही झाडी म्हणजे दुर्गाच्या संरक्षणाचं एक कवच आहे अशी त्या सावध राजाची धारणा होती. युद्धप्रसंगी दुर्गाभोवतीची ही जंगलं त्या दुर्गासाठी चिलखतासारखी कामी येतील, त्या गर्द रानात सैनिक दडवून ठेवून आक्रमकांचा पहिला जोर खच्ची करण्याचं काम ही जंगलं करतील अशी विचारधारा यामागे होती.

रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात म्हटलं आहे : ‘गडाची राखण म्हणजे कलरग्याची झाडी, ते झाडी हरप्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये येक काठी तेही कोणास तोडू न द्यावी.. गडावरील झाडे जी असतील ती राखावी. याविरहित झाडे, आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष व निंबे, नारिंगे आदिकरून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष, वल्ली, किंबहुना प्रयोजक- अप्रयोजक जे जे झाड होत आसेल ते गडावरी लावावे; जतन करावे..’

ज्या राज्यकर्त्यांची झाडांकडे वा राज्याच्या वनसंपत्तीकडे पाहायची दृष्टी ही अशी परिपक्व, तो राजा दुर्गावरील इमारतींसाठी लागणारी लाकडं बाहेरूनच- तेसुद्धा राज्याबाहेरूनच, कदाचित मागवीत असावा असा प्रबळ तर्क करता येतो, किंबहुना आज्ञापत्रात तसं म्हटलंच आहे : ‘आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठय़ा अदिकरोन थोर लाकूड आसावे लागते. ते आपल्या राज्यात आरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाचीच. परंतु त्यास हात लावू न द्यावा. काये म्हणोन की ही झाडे वर्षां दो वर्षांनी होतात यसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविली असता, ती झाडे तोडिलियावरी त्यांचे दु:खास पारावार काय आहे? येकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल, ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहीसेच होते. बहुदा धन्याचेच पदरी प्रज्यापीडनाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित येखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरि त्याचे धण्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याच्या संतोषे तोडून न्यावे. बलात्कार रयतेवरी सर्वथा न करावा..’

अपवादात्मक परिस्थितीत शिसे हा घटकसुद्धा दुर्गाच्या बांधकामामध्ये वापरला जाई. तटबंदीचा पाया शिशामध्ये ओतून मग त्यावर तट बांधत असत. भक्कमपणाच्या व टिकाऊपणाच्या दृष्टीने हे बांधकाम अद्वितीय ठरलं, तरी तेवढंच खर्चीकसुद्धा असल्यामुळे निरतिशय आवश्यक अशाच ठिकाणी त्याचा उपयोग केला जात असे.

स्वत:ची सागरी राजधानी म्हणून सिंधुदुर्ग बांधायचे ठरल्यावर, शिवछत्रपतींनी सिंधुदुर्गाचा पाया शिसं ओतून त्यात बांधला. कारण स्पष्ट होतं की, समुद्राच्या लाटांचा अवजड मारा वर्षांनुवर्ष सहन करू शकेल अशाच दणकट तटबंदीची तिथं आवश्यकता होती.

मात्र गिरिदुर्गाच्या बाबतीत बहुतेक वेळा याची जरूरी भासत नसे, कारण निसर्गाच्या अशा थेट तडाख्यांना त्यांना असं सतत तोंड द्यावं लागत नसे, हे एक प्रमुख कारण. दुसरी गोष्ट अशी की, गिरिदुर्गाचा तट भक्कम हवा. तो तोफगोळ्यांचा मारा सहन करण्यासाठी अन् असा मारा नेहमीच होत असे अशातलाही भाग नाही. तशी पाळी कधी तरीच येणार, म्हणून मग तटाचा पाया शिशामध्ये रचायची तितकीशी आवश्यकता भासत नसे. त्याचमुळे गिरिदुर्गाची तटबंदी शिसं ओतून रचली आहे असं उदाहरण सापडत नाही. मात्र नियमालाही अपवाद हवा, या न्यायानुसार कोल्हापूरच्या पन्हाळ्याचं उदाहरण देता येतं. पन्हाळ्याच्या दुर्गाचा तीन दरवाजा हे द्वारसंकुल बहुधा बहामनी काळात रचले गेले. त्या दरवाजांचे चिरे शिसं ओतून सांधलेले आहेत. मात्र त्याचमुळे अपवादात्मक म्हटला तरीही शिसं हादेखील बांधकामातला महत्त्वाचा घटक मानायला हवा.

अशीच गरज कोळशाची भासे. दुर्गाचं बांधकाम सुरू असताना अनेकानेक प्रकारची दुय्यम कामंसुद्धा सुरू असत. चिरे एकमेकांवर रचणाऱ्या गवंडय़ांच्या जोडीला ते चिरे घडवणारे पाथरवट असत. छिन्नी, हातोडे ही त्यांची हत्यारं. दगड छिनून छिनून छिन्न्यांची धार जाई. सुकत्या बोथट होत. सुरुंगाची भोकं पाडणं, सुरुंग भरणं ही कामं बेलदारांची. ते करून करून बेलदारांच्या पहारींची टोकं बोथट होऊन जात. मग या साऱ्यांच्या हत्यारांची देखभाल करण्यासाठी लोहारांच्या टोळ्या बांधकामाच्या जागी असत. त्यांस मुबलक कोळसा लागे. कोळसा नसला तर लोहार थांबणार, लोहार थांबले की पाथरवट, बेलदार थांबणार अन् ते थांबले की बांधकामाचा हा प्रचंड गाडा करकरत एका जागी रुंधणार. म्हणून मग कोळशाचा अव्याहत पुरवठा अतिशय महत्त्वाचा. जिन्नस नासुकला दिसला तरीही मर्माचा म्हणायचा!

याखेरीज वर उल्लेखलेली सारी साधनसंपत्ती हाताशी असली, मात्र ते काम तडीस नेणारे प्रशिक्षित असं मनुष्यबळ नसलं तर मग या निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा उपयोग तरी काय? म्हणूनच हे प्रशिक्षित मनुष्यबळही तेवढय़ाच तोलामोलाचं. तेवढय़ाच महत्त्वाचं. कामं नाना प्रकारची असत. म्हणजे अगदी ज्या जागी तट बांधायचा तिथली झाडी तोडण्यापासून, उभ्या कडय़ावर तटाचा पाया खोदण्यापासून ते इमारतींमधला शेवटचा खिळा ठोकला जाईपर्यंत या साऱ्या नाना प्रकारच्या हुन्नरी माणसांस नाना परींची कामं असत.

शिवकालात बारा बलुतेदारीची समाजव्यवस्था अस्तित्वात होती. सर्वसाधारणपणे महार, मांग, सोनार, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, मुलाणी व परीट अशी ही बारा हुन्नरांची बारा कुळं गावोगाव असत. या साऱ्यांचाच सहभाग गावगाडय़ामध्ये अतिशय महत्त्वाचा असायचा. बलुतेदार हे गावचे प्रतिष्ठित नागरिक असत व गावच्या कामकाजात त्यांना हक्काने भाग घेता येई. गोतसभेच्या निवाडपत्रात त्यांची नावं त्यांच्या व्यावसायिक मुद्रेसह नोंदली जात असत. यांच्याखेरीज वडार, बेलदार, गवंडी, पाथरवट अशाही हुन्नरी जाती असायच्या. यांच्यापैकी सुतार, लोहार, वडार, बेलदार, कुंभार, पाथरवट, गवंडी असे हुन्नरी लोक दुर्गउभारणीच्या कामी अतिशय महत्त्वाचे असत. यांमध्ये वडार, बेलदार दगडांच्या खाणी पाडण्यात व त्यांची गाढवं खाणीतले दगड बांधकामापर्यंत वाहून नेण्याच्या कामी येत. पाथरवटांच्या छिन्न्या-हातोडे या दगडांचे घडीव चिरे बनवीत. गवंडी तटबंदी रचत. सुतार लाकडी कप्प्या, घराची व दुर्गाची दारं, खिडक्या, त्यांच्या चौकटी, तुळया, वासे, सुरुदार खांब, फडताळे, पेटारे अशा वस्तूंची घडाई करत. विटा, घडे, माठ, रांजण, मर्तबान, नळ्यांची व खपरेली कौलं या वस्तूंचा गडाला पुरवठा करणं ही जबाबदारी कुंभारांची. लोणारी कोळसा पुरवीत. लोहारांचीसुद्धा शस्त्रविषयक अशीच नाना प्रकारची कामं असत.

याशिवाय दुर्गाचे नकाशे काढणारी, संकल्पित आराखडे काढणारी चितारी, रंग भरणारी रंगारी वगैरे आवश्यक तंत्रज्ञान जाणणारी हुन्नरवंत माणसंही बहुधा असत. होत असलेलं बांधकाम योग्य तऱ्हेने होत आहे अथवा

नाही, रेखलेल्या आराखडय़ानुसार होतं आहे अथवा नाही हे पाहण्याचं काम करणारे स्थपतीसुद्धा असत. प्रत्यक्ष काम करताना काही सुधारणा आवश्यक भासल्यास ती करण्याची जबाबदारीसुद्धा यांच्यावरच असे.

दुर्गाची जागा नक्की झाली की मग तेथे वडार-बेलदारांचे तळ पडत. दगडांच्या खाणी पाडणं, तटासाठी ऐन कडय़ावर पाया खोदणं ही अतिशय महत्त्वाची कामं यांच्यापाशी असत. स्थपतींनी सांगितलेल्या जागी यांनी दगडांच्या खाणी सुरू केल्या की पाथरवटांचंही काम सुरू होई. त्यांच्या छिन्न्या-हातोडे अनघड दगडांतून सुबक चिरे निर्माण करत. वडारांची गाढवं हे चिरे वाहून, तटाचं बांधकाम जिथं सुरू असेल तिथं नेत. मात्र कधीही हे धोंडे वाहून नेण्याच्या कामी युद्धकैदी वापरले गेले, अशा प्रकारचे उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये आढळत नाहीत. काही ठिकाणी वेठबिगारीचे उल्लेख आहेत. मात्र ते स्थानिकांचे नसून उपऱ्या लोकांसंदर्भात आहेत. हे प्रचंड धोंडे चढवणं, एकावर एक रचणं हे काम कोंगाडी लोकांचं. मग चुना ओतून, डबर भरून एका ओळीत, एका जागी रचायचं काम गवंडी करीत. चुना कालवायचा अन् तो तयार मसाला जागेवर पावता करण्याच्या कामी या कोंगाडय़ांची बायकामुलंही असत. याखेरीज पडल्या कामाला लागणारे मजूर स्त्री-पुरुष दुर्गाच्या पंचक्रोशीमधून आलेले असत. यामागे रोजच्या रोज मिळणाऱ्या रोजगाराची आशा असे. प्रत्येक कामगारास त्याच्या कामाचा मोबदला रोजच्या रोज मिळायलाच हवा, यावर शिवछत्रपतींचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांना मनुष्यबळाची कमतरता पडली नाही वा पडली नसावी.

सुतारांच्या कामाविषयी मागे उल्लेख आलाच आहे. त्याखालोखाल दुसरा महत्त्वाचा कारागीर म्हणजे लोहार. हा कारागीर दुर्गबांधणीच्या व दुर्ग नांदता झाल्यानंतरच्या काळातसुद्धा दुर्गाच्या कारभारातला अतिशय महत्त्वाचा घटक असे. बेलदार-पाथरवटांच्या छिन्न्या-पहारी नव्या बनवणं किंवा बोथटलेल्या जुन्यांना टोकं काढणं हे महत्त्वाचं काम याच्याकडे असे. त्याखेरीज दुर्गात ज्या इमारती उभ्या राहणार, त्यांच्यासाठी खिळे, अर्गळा, साखळ्या, बिजागरे, कडय़ा, कोयंडे हेसुद्धा त्यालाच करायचे असे. दुर्ग उभा राहिला की येणाऱ्या शिबंदीस नवी हत्यारं, जुन्यांची डागडुजी, तलवारी, भाल्यांची फाळे, मुठी, बाणांचे फाळ हे सारे लोहाराच्या भट्टीतूनच तावूनसुलाखून निघे. म्हणून मग ही असामी दुर्गकारभारात असीम महत्त्वाची.

ताज्या बांधकामावर पाणी मारावं लागे. त्यासाठी पखालजी, भिस्ती असत. त्यांना चामडय़ाच्या पखाली पुरवण्याचं काम चांभारांचं. मात्र यांचं हे काम नमित्तिक. मग त्यांनी पायथ्याच्या वा पंचक्रोशीतल्या गावांत असावे व तिथले धारे सांभाळावे. आज्ञापत्रात पंतअमात्य म्हणतात : ‘गडोगडी ब्राह्मण, ज्योतिषी, वैदिक वित्पन्न, तसेच रसायनी वैद्य व झाडपालियाचे वैद्य व शस्त्रवैद्य, पंच्याक्षरी व जखमा बांधणार, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गड पाहून येक-येक, दोन-दोन आसाम्या संग्रही ठेवाव्या. लहानसहान गडांस या लोकांची कामे नित्य पडतात यसे नाही. याकरिता त्या त्या कामाची हत्यारे त्यांजवल तयार असो द्यावी. जे समयी काम पडेल त समई काम करितील, नाही ते समई आदिकरून तहसील तलब चाकरी द्यावी; रिकामे न ठेवावे. गडोगडी तनखा, दास्तान, इस्ताद आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करून ठेवावेच लागते. याविरहित गड म्हणजे आपल्या कार्याचे नव्हेत, यसे बरे समजोन आधी लिहिलेप्रमाणे गडाची उस्तवारी करावी.’

दुर्गावरील इमारतींसाठी विटा, त्या इमारती उभ्या राहिल्या की त्या शाकारायला कौलांची आवश्यकता असे. मग घेऱ्यातल्या कुंभारांनी त्यांचा पुरवठा करावा. कौले दोन प्रकारची. चपटी खपरेली व अर्धगोल नळ्यांची. याखेरीज मग दुर्गावर राहणाऱ्यांसाठी नाना परींची भांडी लागत. दारूखान्यातील बारुद साठवून ठेवण्यासाठी मोठाले झोलमाठ, मडकी लागत. जखमांच्या उपचारांसाठी कुजलेले तूप साठवायचे रांजण, असा परीपरीचा मालमसाला लागे. हे सारं कुंभारांनी पुरवायचं असा धारा असे. रायगडावर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शाकारजत्रा भरे असे उल्लेख आढळतात. अर्थात, हे उल्लेख पेशवेकाळातील असले तरी ते रूढी-पद्धतींच्या व शिरस्त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. म्हणूनच ते उद्धृत करणं अतिशय बोधप्रद ठरावं. पेशवेकाळात रायगडावरील सर्व इमारती पावसाळ्याअगोदर शाकारल्या जात. राजवाडय़ावर व इमारतींवर कौलं होती. बाकीची सर्व घरं पेंढा व गवताने शाकारत. यात सायलीच्या पानांचाही उपयोग केला जाई. इ. स. १७७३-७४ मध्ये राजवाडय़ावर वीस हजार नवीन कौलं घातली गेली. इ. स. १८१३-१४ मध्ये चौदा हजार सातशे कौलं राजवाडय़ासाठी खरेदी केली गेली. रायगडखोऱ्यातील नाते या गावच्या ४५ असामी व बिरवाडीचे १० कुंभार दरसाल शाकारणीस गडावर यायचे असा शिरस्ता होता. हे काम एक महिना व नऊ दिवस चाले. इतर इमारतींच्या शाकारणीसाठी ५७०० सायलीच्या पानांचे भारे व २९,४०० जुडय़ा गवत लागे. त्याशिवाय ५६०० वेठीच्या जुडय़ा गोळा होत. प्रत्येक गावावर पन्नास जुडय़ांची वेठ होती. ही गावचे महार आणत. इ. स. १७७९ व १७८१ मध्ये रायगडचा शाकारणीचा खर्च ३७७ रुपये झाला. त्या वेळी शेजारच्या िलगाण्याच्या शाकारणीचा खर्च पावणेदोन रुपये नोंदवला गेला आहे. इ. स. १७८७ मध्ये तो १७२ रुपये तर इ. स. १८१४ मध्ये तो ४७७ रुपये एवढा झाल्याची पेशवेकालीन नोंद आहे.

हे उल्लेख एवढय़ासाठीच केले की, दुर्गाच्या प्रचंड कारभारातील दुर्गनिर्मितीच्या एका अंगाची ओळख व्हावी व त्यातील बारीकसारीक बाबींची कल्पना यावी. ही सारी हकिगत पेशव्यांच्या काळातील आहे. त्या काळात दुर्गाना फारसं महत्त्व राहिलं नव्हतं, तरी एके काळचा राजधानीचा दुर्ग म्हणून रायगडाचं महत्त्व अबाधित होतं. मात्र शिवकालात जेव्हा दुर्ग हा जणू राज्याचा प्राण अशी राज्यकर्त्यांची धारणा होती, त्या काळात या दुर्गाची वज कशी राखली जात असेल याची कल्पना करणंही मोठय़ा आनंदाचं ठरावं. त्यातही राजगड-रायगडासारखे राजधानीचे दुर्ग, प्रतापगड-सिंधुदुर्गासारखे व्यापारी वाटांवर लक्ष ठेवणारे दुर्ग व अहिवंत-साल्हेर वा पन्हाळ्यासारखे सरहद्दीवरील दुर्ग, सागरी सरहद्द सांभाळणारे सिंधुदुर्गासारखे दुर्ग यांसारख्या दुर्गाकडे किती नीट निरातीने लक्ष दिलं जात असेल याची कल्पनाच केलेली बरी!

अजून एका हुन्नरी अन् महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख केला की, दुर्गाच्या प्राथमिक गरजा भागविणाऱ्या कामगारांची यादी संपली असं ढोबळमानाने म्हणावं. हा कारागीर म्हणजे शिकलगार. बोथटलेल्या वा खांडे पडलेल्या हत्यारांना लोहाराने पाणी देऊन झालं की धार देण्यासाठी ही हत्यारं शिकलगाराच्या चाकावर धरली जायची. नंतरच ती तेज लखलखती हत्यारं गडाच्या शिलेखान्यात जमा व्हायची. एक तर्क या ठिकाणी लढवता येतो, तोसुद्धा रायगडाच्याच संदर्भात. स्कॉटवेरिंग आपल्या ‘मराठाज्’ या ग्रंथात म्हणतो : ‘रायगडावर शिवछत्रपतींच्या शिलेखान्यात १,८०,००० निरनिराळ्या प्रकारच्या तलवारी, ४०,००० भाले अन् १,८०,००० बाण होते.’

आपण केवळ कल्पना करायची, की एवढय़ा प्रचंड म्हणावे अशा शस्त्रसाठय़ाची उस्तवार करण्यासाठी किती लोहार, सुतार अन् शिकलगार या राजधानीच्या दुर्गावर मुक्कामाला असतील!

प्राचीन काळापासून आजवरच्या दुर्गाचा विचार करू जाता बहुतेक गोष्टी या कल्पनेपलीकडल्याच आहेत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:05 am

Web Title: durg fort beyond imagination
Next Stories
1 क्लोव्हर लीफ वाहतूक नियंत्रक नसलेला चौक
2 ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’
3 मंजूर नकाशे आणि रेराचे नवीन परिपत्रक
Just Now!
X