डॉ. अभय खानदेशे khandeshe.abhay@gmail.com

वर्तमानपत्रात भूकंपाच्या ज्या बातम्या येतात त्यात ‘भूकंपाचा केंद्रिबदू इथे होता,’ असं वर्णन असतं. हा केंद्रबिंदू भूपृष्ठावर नसतो तर जमिनीच्या खाली असतो. भूगर्भात ज्या ठिकाणी भूकंपाचा उगम  होतो तो केंद्रिबदू (फोकस). या फोकसपासून उभी सरळ रेष काढल्यास भूपृष्ठाला जिथे छेदेल त्या बिंदूला इपीसेंटर असं नाव आहे. भूकंपाच्या बातम्यांत आणखी एक उल्लेख आवर्जून असतो- ‘भूकंप या रिश्टर स्केलचा होता’. अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर याने १९३५ च्या आसपास भूकंपलेखावरून (सिसमोग्राफ) भूकंपाची परिमाण (मॅग्निटय़ूड) ठरविण्याची मोजपट्टी (स्केल) प्रमाणित केली. त्यानुसार सर्वात कमी एकपासून जास्तीतजास्त दहापर्यंत भूकंपाचे परिमाण असू शकते. आकडा जितका जास्त तितकी भूकंपामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याची शक्यता जास्त. कारण हा आकडा एकने वाढला तर भूकंपातून उत्सर्जति होणारी ऊर्जा एकतीस पटीने वाढते.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
High Court
घोटाळा हा शब्द सध्या परवलीचा बनला आहे!

गुजरातमधील भूजच्या भूकंपात (रिश्टर स्केल ७.७) नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या, चारशे पटीपेक्षा जास्त ऊर्जा बाहेर टाकली गेली. जर कुठे ८.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर नागासाकी अणुबॉम्बच्या बारा हजार पटीपेक्षा जास्त (४०० गुणिले ३१) ऊर्जा उत्सर्जति होईल. एका अंदाजानुसार, २००४ च्या हिंद महासागरात झालेल्या ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपात जी ऊर्जा मुक्त झाली त्यातून ३७० वर्षे संपूर्ण अमेरिकेची ऊर्जेची गरज भागली असती. आणि हो, रिश्टर स्केल ९ च्या वरचे भूकंप अगदी अपवादात्मक, पण या परिमाणाचे भूकंप होत असतात. २२ मे १९६० ला दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशात झालेला भूकंप हा जगाच्या पाठीवर नोंदला गेलेला आजवरचा सर्वात मोठा धरणीकंप समजला जातो. रिश्टर स्केलवर ९.५ एवढा मोठा.

भूकंपाची तीव्रता (इंटेन्सिटी) हे गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) मापन. कुठल्याही भूकंपाची तीव्रता इपीसेंटरपासून जितके दूर जाऊ तितकी कमी होत जाते. वर उल्लेखिलेला भूजचा भूकंप महाराष्ट्रातदेखील जाणवला, पण त्याने फारशी हानी झाल्याची नोंद नाही. अहमदाबाद मात्र भूजच्या जवळ असल्याने तिथे बरीच हानी झाली.

भूकंपाचं आणखी एक वर्गीकरण केंद्रिबदूच्या खोलीवरून (फोकल डेप्थ) करतात. उथळ, मध्यम आणि खोल. उथळ म्हणजे भूपृष्ठापासून अंदाजे ७० किमी खोलीपर्यंत तर खोल भूकंप ७०० किमीपेक्षा जास्त खोलीला होणारे. अर्थात, उथळ भूकंप जास्त धोकादायक हे उघड आहे. आणि बहुतांशी भूकंप हे उथळ वर्गीकरणात मोडणारेच असतात.(उदाहरण- भूज भूकंपाचा केंद्रिबदू जमिनीपासून २६ किमी खोलीवर होता; तर किल्लारीचा १४ किमी.). साहजिकच व्यापक हानीला ते कारणीभूत ठरतात.

भूकंपाच्या बाबतीत कायम विचारला जाणारा प्रश्न असतो. आमच्या भागाला, गावाला भूकंपाचा कितपत धोका आहे? तांत्रिक भाषेत बोलायचं तर कोणता भूभाग जास्त भूकंपप्रवण आहे?

वरच्या सर्व विवेचनांवरून एक लक्षात आलं असेल, भूकंप ही जमिनीच्या पोटात घडणारी नैसर्गिक घटना. त्यातून उत्सर्जति होणारी अति प्रचंड ऊर्जा. त्यामुळे निर्माण होणारे तरंग सर्व दिशांना पसरतात. या तरंगांचा वेग १०००० ते १६००० किमी प्रति तास इतका असतो. त्यामुळे जगाच्या कुठल्याही ठिकाणी झालेल्या भूकंपाची नोंद जगभर अत्यंत थोडय़ा वेळात पोहोचते. गोलाकार पृथ्वीच्या आत होणाऱ्या धरणीकंपाचा धक्का, भूपृष्ठावर बसणार नाही असा भाग, जगात कुठेही असूच शकणार नाही. बघा पटतंय ना? आता मुद्दा राहतो तो तुलनात्मक कुठल्या भागात जास्त मोठा भूकंप होऊ शकेल हे शोधण्याचा.

भारतात ‘ब्युरो ऑफ इंडिअन स्टॅन्डर्ड्स’ ही  सरकारी संस्था सर्व विषयांवर आपल्या देशातील परिस्थिती विचारात घेऊन मानके  प्रमाणित करते (स्टॅन्डर्ड्स ठरविते). त्या संस्थेने प्रकाशित केलेल्या नकाशात (आय एस १८९३-२०१६) भारताचे २, ३, ४ आणि ५ अशा चार भागांत (झोन) भूकंपक्षेत्राचे विभाजन केले आहे. भूतकाळात झालेल्या भूकंपांची तीव्रता आणि त्यामुळे झालेली मनुष्य व वित्तहानी विचारात घेऊन चढत्या क्रमाने झोन ठरविले आहेत. (अत्यंत कमी धोका असलेला पहिला झोन २००२ पर्यंत अस्तित्वात होता. नंतर तो दुसऱ्या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.) दुसरा झोन कमी धोक्याचा, तर पाचवा सर्वात जास्त धोका असलेला. मुंबई, चेन्नई, कोलकाता तिसऱ्या झोनमध्ये, तर दिल्ली चौथ्या झोनमध्ये आहे. पाचवा झोन आसाम आणि पूर्वोत्तर राज्ये, गुजरातमधील कच्छ, बिहारमधील दरभंगा आणि हिमालयाचा काही भाग इतका मर्यादित आहे. भारतासारख्या खंडप्राय देशासाठी प्रत्येक ठिकाणाची भूगर्भरचना आणि स्थानिक जमिनींची स्थिती इतक्या छोटय़ा स्केलचा नकाशा तयार करताना विचारात घेणे केवळ अशक्य आहे. साहजिक धरणे, अणुऊर्जा केंद्र अशा महत्त्वाच्या बांधकामासाठी त्या शहराचा मायक्रोझोन तयार करून त्यानंतर संरचना केली जाते. उरलेल्या  जवळपास ९९ टक्के बांधकामासाठी हा नकाशा (अर्थात बांधकामाशी संबंधितांनी वापर केला तर) अत्यंत परिणामकारक आहे. भारतातल्या भूकंपाचा आढावा घ्यायचा झाला तर आजतागायत मोठे आणि विध्वंसक भूकंप आसाम, बिहार आणि नेपाळची सीमा, कच्छ, उत्तराखंड, पाकव्याप्त काश्मीर याच भागांत अधिकांश प्रमाणात झाले आहेत.

सुनामी ही भूकंपाइतकीच सर्वसामान्यांना भीतीयुक्त कुतूहल असणारी आपत्ती. सुनामी म्हणजे भूकंपामुळे निर्माण होणारी, समुद्राच्या तळाशी उद्भवलेली आणि किनाऱ्यावरील भूप्रदेशाचा विध्वंस करणारी महाकाय लाट. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील विध्वंसक सुनामी येऊ शकते. १८८३च्या इंडोनेशियातील क्राकाटोआ ज्वालामुखीमुळे आलेल्या सुनामीत ३६००० पेक्षा अधिक माणसे मरण पावल्याची नोंद सापडते. सुनामी भूस्खलन (लँड स्लाइड) झाल्यानेदेखील येते. दगडमातीचे मोठाले कडे किंवा मोठा हिमनग तुटून, समुद्रात पडल्यानेसुद्धा सुनामी आल्याचे दाखले आहेत. पण असे प्रसंग अपवादात्मक. प्रामुख्याने सुनामी ही भूकंपामुळे जी प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते त्यामुळे येते.

ज्या भागात सुनामी वरचेवर येतात, तिथे एक प्रवाद आढळतो. ‘सुनामी पाहिलेला माणूस जिवंत राहत नाही’. आपण कारण समजून घेऊया. सुनामी लाटांचा वेग समुद्राच्या खोलीला १० ने (अचूक ९.८१) गुणून आलेल्या उत्तराच्या वर्गमूळ इतका असतो. समजा ४००० मी. खोलीच्या सागरात सुनामी लाट निर्माण झाली. तिचा वेग (४०००० चे वर्गमूळ) अर्थात २०० मी. प्रती सेकंद म्हणजेच ७२० किमी प्रति तास एवढा असेल. समुद्रसपाटीवर उभे असताना क्षितिजाचे अंतर जास्तीतजास्त ५ किमी असते. म्हणजेच किनाऱ्यावर उभे असताना जर सुनामी तुम्हाला अगदी क्षितिजावर दिसली तरी मिनिटाच्या आत सुनामी तुमच्यापर्यंत पोहोचते. अर्थात, जीव वाचवायला वेळच मिळत नाही. आणि ज्या पॅसिफिक महासागरात बऱ्याच सुनामी निर्माण होतात (जवळजवळ ८० टक्के) तो काही ठिकाणी १०००० मी. पेक्षा जास्त खोल आहे (एव्हरेस्ट शिखर बुडेल त्याहून जास्त). अशा ठिकाणी भूकंप झाला तर निर्माण होणाऱ्या सुनामीचा वेग ११०० किमी/तासपर्यंत जाऊ शकेल.

समुद्राच्या लाटेची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) याचा अर्थ एका लाटेच्या शिखेपासून दुसऱ्या लाटेच्या शिखेपर्यंतचे अंतर. सुनामीची ही वेव्हलेंग्थदेखील जिथे भूकंप झाला तेथील समुद्राच्या खोलीच्या सम प्रमाणात बदलते. वर उल्लेखिलेल्या ४००० मी. खोलीच्या सागरात निर्माण होणाऱ्या सुनामीची वेव्हलेंग्थ २०० किमीपर्यंत असते. लक्षात येतंय ना एका लाटेची लांबी २०० किमी आहे. मात्र या लाटेची ऊर्जा कमी होते तिच्या लांबीच्या व्यस्त प्रमाणात. या कारणांमुळे, अत्यंत कमी वेळात आणि ऊर्जेचा फारसा ऱ्हास न होता, सुनामीच्या लाटा आंतरखंडीय प्रवास करतात. या लाटा किनाऱ्याला पोहोचतात तेव्हा त्या एकमेकांजवळ येतात आणि ऊर्जा संवर्धन (लॉ ऑफ कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ एनर्जी)च्या तत्त्वामुळे त्यांची उंची वाढू लागते. वर उल्लेखिलेल्या हिंद महासागरातल्या भूकंपाने जी सुनामी आली तिचा तडाखा भारतासह १४ देशांना बसला. यामुळे ३० मी. (अंदाजे दहा मजले) उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आल्याची नोंद आहे. इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आणि थायलंडमधील दोन लाखांहून अधिक बळी सुनामीने घेतले आणि हजारो कोटींची मालमत्ता जमीनदोस्त करून टाकली. अगदी २८ सप्टेंबर २०१८ च्या इंडोनेशियातील पालू येथील सुनामी संकटात दोन हजारांहून अधिक मृत्युमुखी पडले. सुनामी भयंकर ठरते ती अशी!

सुनामी हा विषय वर्गात शिकवताना किंवा त्यावर भाषण देताना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘जर किनाऱ्यावर सुनामीमुळे इतकं नुकसान होतं, तर त्या वेळी जगभराच्या सागरात हजारो बोटी असतात (जागतिक व्यापारात, सागरी वाहतुकीचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक असतो) त्यांचं काय होतं? त्या बातम्या कधीच का येत नाहीत?’ ज्या वेळी लाटेची वेव्हलेंग्थ जास्त असते तेव्हा लाटेची उंची (अ‍ॅम्प्लिटय़ूड) कमी असते. उदाहरण म्हणून घेतलेल्या २०० किमी  वेव्हलेंग्थच्या लाटेची उंची अवघी १ मी. इतकी असू शकते. भर सागरात त्यामुळे सुनामी बिलकुल जाणवत नाही. किनाऱ्यावर येता येता लाटेची  वेव्हलेंग्थ कमी कमी होते, त्यामुळे उंची वाढू लागते. लाट मोठी मोठी होत जाते आणि धोकादायक व अक्राळविक्राळ बनते. सुनामी हा शब्द मूळचा जपानी. त्याचा त्या भाषेतला अर्थ होतो बंदर लाट. जी बंदरावर येते किंवा किनाऱ्यावर दिसते ती सुनामी. भर सागरात ती असते सामान्य लाट. अर्थात, मध्य सागरातल्या बोटींचं नुकसान वगैरे तर दूरची गोष्ट, त्यांना धक्काही जाणवत नाही.

जगातला दुसऱ्या क्रमांकाचा महासागर अटलांटिक. पॅसिफिक महासागरात जर इतक्या मोठय़ा प्रमाणात सुनामी येत असतात तर अटलांटिकमध्येही येत असतील किंवा येतील असं वाटणं स्वाभाविक. पण या महासागराच्या सीमा (सागराला आणि सीमा? पण आपल्या ‘कुसुमाग्रज’ यांनीच लिहून ठेवलंय. ‘.. किनारा तुला पामराला’ !) कुठेही टेक्टॉनिक प्लेटच्या आसपास येत नसल्याने, अटलांटिकमध्ये भूकंप होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अर्थात, त्यानंतर सुनामी येण्याचा फारसा प्रश्नच येत नाही. जगाचा नकाशा बघितला तर लक्षात येईल, युरोप आणि आफ्रिकेचा पश्चिम भाग आणि अमेरिकेचा पूर्व भाग, इ. सुनामीपासून संरक्षित म्हणता येईल. त्याउलट ऑस्ट्रेलिया, आशिया, जपान, चिली, पेरू आणि आपल्या तरुणाईची स्वप्नभूमी (अमेरिकेचा  पश्चिम भाग -सिलिकॉन व्हॅली). भागाला सुनामीचा धोका सतत होता आणि उद्याही असेल.  किनाऱ्याचा भाग सोडला तर देशांतर्गत प्रदेशात भूकंपामुळे काय धोका होऊ शकतो आणि काय खबरदारी घेतली तर जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येऊ शकते ते बघूयात पुढच्या लेखांत.