18 February 2019

News Flash

घरातील विद्युत सुरक्षा

विनियमाप्रमाणे प्रत्येक विद्युत संच मांडणीत विद्युत पुरवठा कंपनीने ‘अर्थ टर्मिनल’ बसविणे अनिवार्य आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘वास्तुरंग’ (६ जानेवारी) मध्ये विद्युत सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची (AFCI, ELCB, MCB) माहिती घेतली. ही उपकरणे व्यवस्थित चालण्यासाठी व एकंदर सुरक्षिततेसाठी ‘अर्थिग’ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अर्थिग जर अयोग्य असेल तर ही उपकरणे अपेक्षित सुरक्षा देऊ  शकणार नाहीत. अर्थिग म्हणजे सामान्यत: विद्युत उपकरणाचे बाह्य़ आवरण/कवच, रोहित्रा (Transformer) ची न्यूट्रल वायर यांची भूगर्भाशी तारेने केलेली जोडणी. यातून सामान्य परिस्थितीत विद्युत प्रवाह नगण्य असतो. ज्यावेळी विद्युत यंत्रणेत बिघाड होतो त्याच वेळी यातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होते. यासाठी संबंधित भूमीचा विद्युत रोध कमीतकमी असणे आवश्यक असते. भूमीचा विद्युत रोध बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो. भूगर्भातील ओलसरपणा जितका जास्त (२०% पर्यंत) तितका विद्युत रोध कमी होतो. त्यासाठी जेथे अर्थिग करतात त्या ठिकाणी ओलावा टिकून राहण्यासाठी कोळसा व मीठ यांचे मिश्रण किंवा बेंटोनाइट मिश्रण वापरले जाते व वेळोवेळी त्यात पाणी ओतले जाते.

विनियमाप्रमाणे प्रत्येक विद्युत संच मांडणीत विद्युत पुरवठा कंपनीने ‘अर्थ टर्मिनल’ बसविणे अनिवार्य आहे. सदर टर्मिनलपासून अर्थिगची वायर संपूर्ण विद्युत संच मांडणीत फिरविण्याची असते. विनियमाप्रमाणे सर्व विद्युत उपकरणांना तीन पीन प्लग दिलेले असतात. त्यातील सर्वात वरची पीन ही अर्थिगची असते; तिची जोडणी अर्थ टर्मिनलशी करावी लागते व अर्थ टर्मिनलची जोडणी विद्युत पुरवठा यंत्रणेतील अर्थिगशी करावी लागते. साधारणत: त्यासाठी ३ चौ. एमएम आकाराची जी. आय. वायर वापरली जाते. जेथे विजेची मागणी सुमारे दहा किलोवॅटपेक्षा जास्त असते तेथे थ्री-फेज विद्युत पुरवठा केला जातो. अशा ठिकाणी अर्थ टर्मिनल जवळच जमिनीत खड्डा करून त्यात अर्थिग इलेक्ट्रोड बसवून ते परस्परांना जोडावे लागतात. काही काळापूर्वी गुजरात राज्यात विद्युत पुरवठा कंपनीने ‘अर्थ टर्मिनल’ बसविले नव्हते. तेव्हा एका स्वयंसेवी संघटनेने ‘गुजरात विद्युत नियामक आयोगा’कडे याचिका दाखल केली. त्याची सुनावणी होऊन आयोगाने अर्थ टर्मिनलची तरतूद करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने ते बसविण्याचे आदेश विद्युत पुरवठा कंपनीस दिले.

विद्युत उपकरणे जोडण्यासाठी ३-पीन प्लग वापरला जातो. यात सर्वात वरची पीन ही अर्थिग वायरला जोडलेली असते. ही पीन इतर पिनांपेक्षा लांबीला व आकाराला मोठी असते. तिची लांबी जास्त असल्याने प्लग जोडताना सॉकेटमध्ये ही पीन प्रथम आत जाते, त्यामुळे उपकरणाचे बाह्य़ आवरण हे अर्थिग यंत्रणेला जोडले जाते. हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच उत्तम दर्जाच्या सॉकेटमध्ये आतील बाजूने विद्युतरोधक आवरण दिलेले असते. त्यायोगे कळत-नकळत सॉकेटमध्ये वीजपुरवठा चालू राहिला तरी शॉक लागू शकत नाही. अर्थिगची पीन आत सरकवल्यावरच ते आवरण दूर होते. उपकरणामध्ये काही अंतर्गत दोष निर्माण झाल्यास उपकरणाचे बाह्य़ आवरण हे अर्थिग यंत्रणेला जोडलेले असल्याने फ्युज किंवा एमसीबी वीजपुरवठा खंडित करतो. अशा बाबतीत दोन-पीन प्लग वापरल्यास ही सुरक्षा मिळत नाही, त्यामुळे धोका होऊ  शकतो. पाण्यात कॉइल बुडवून पाणी तापवले जाते, तेथे हा धोका संभवतो. उत्तम दर्जाचे मानांकित प्लग सॉकेटमध्ये चपखल बसतात. अन्य प्लग चपखल बसत नाहीत ते अंशत: बसतात व प्रवाह चालू असताना गरम होऊन निकामी होऊ  शकतात, तसेच त्यामुळे अपघातही संभवतात.

स्वयंपाकघरात ओव्हन, मिक्सर, इ विद्युत उपकरणांचा वापर बराच वाढला आहे. तसेच कॉम्प्युटरही घरोघरवापरले जातात. त्यासाठी मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, इ. साठी वीजपुरवठा लागतो. अनेकदा  वरील दोन्ही बाबतीत एक सॉकेटमधून ‘अडाप्टर’  बसवून अनेक उपकरणांना वीज पुरविली जाते. असे केल्याने सॉकेटच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह वाहिल्यामुळे अपघात होऊ  शकतो आणि बऱ्याच वायर्स एकत्र आल्याने गुंतागुंत होते. हे टाळण्यासाठी जितकी उपकरणे जोडण्याची शक्यता आहे तितके सॉकेट बसवावेत. ओलसरपणा व पाणी यांचे विजेला वावडे आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या ओटय़ावरील सॉकेट हे तेथील सिंकपासून दूर ठेवावेत. हीच दक्षता स्नानघरातही घेणे आवश्यक असते. तसेच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे टाळावे. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी वरील लेखात मांडल्या आहेत. नवीन घरात वायरिंग करण्यापूर्वी किंवा जुने वायरिंग बदलण्यापूर्वी जाणकार व्यक्तीशी किंवा परवानाधारक कंत्राटदाराशी चर्चा करूनच कामाचा आराखडा बनवावा व त्यानंतर काम सुरू करावे, जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील.

श्रीनिवास मुजुमदार shrimujumdar@gmail.com

(सल्लागार- विद्युत प्रणाली)

 

First Published on January 26, 2018 1:10 am

Web Title: electrical safety around the home