20 September 2020

News Flash

विद्युतसुरक्षा : इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट.. काळाची गरज!

विविध राज्यांमधील विद्युत निरीक्षणालयातील आकडेवारीप्रमाणे हेच प्रमाण ५० टक्के आहे

वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. तिच्याशिवाय आपले पान हलत नाही

प्रकाश कुलकर्णीविजेचा शोध लागल्यापासून मानवी जीवनात क्रांती घडून आली. त्याच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये विजेची अनिवार्यता जाणवू लागली. समईच्या अथवा कंदिलाच्या मंद प्रकाशात ज्ञानेश्वरी, दासबोध लिहिणारे आणि त्याच मंद उजेडात शेकडो लोकांना ज्ञानामृत पाजणारी संत मंडळीसुद्धा मानवच होती. तोच मानव आज विजेशिवाय हतबल झाला आहे. छत्रपती शिवाजींच्या एका शब्दाखातर जे मावळे शेकडो फूट उंचावर जाऊन प्राणाची बाजी लावून किल्ले सर करीत तेसुद्धा मानवच होते, तोच मानव आज लिफ्ट किंवा एस्केलेटरशिवाय काही मजलेसुद्धा चढू शकत नाही. डे अँड नाइट क्रिकेट मॅचेस शेकडो लाइट्सच्या प्रकाशात आपण पाहू शकतो. हा सगळा वीज अर्थात विद्युतशक्तीचा परिणाम आहे.
वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. तिच्याशिवाय आपले पान हलत नाही, पण तिचा योग्य रीतीने वापर न केल्याने मानवी सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली येथील सिनेमागृहात शॉर्ट सर्किटने आग लागून शेकडो नागरिक मृत व जखमी, कोलकत्ता येथील रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कित्येक बालकांचा Incubator मध्येच शॉक लागून मृत्यू, अशा बातम्या वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात येतात.
दोन वर्षांपूर्वी मंत्रालयसारख्या, शासनाच्या महत्त्वाच्या इमारतीमध्ये जबर आग लागून त्यात तीन मजले जळून खाक झाले. आगीचे मूळ कारण अजून गुलदस्त्यातच आहे. मीडियाने मात्र शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा अंदाज केला होता. मात्र अहवालात तसा उल्लेख नाही. सर्वत्र चर्चा हीच सुरू झाली होती की मंत्रालयाचे सेफ्टी ऑडिट झाले असते तर ही आग लागली नसती. फायर ब्रिगेडच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनीसुद्धा असेच मतप्रदर्शन केले होते.
मंडळी, वरील चर्चेवरून तुमच्या लक्षात आले असेलच की ऑडिटचे किती महत्त्व आहे. नॅशनल सेफ्टी कौन्सिलने देशभरातून घेतलेल्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढला आहे की गेल्या काही वर्षांत एकूण लागलेल्या आगींपैंकी चाळीस टक्के आगी ह्या शॉर्ट सर्किटने लागतात. विविध राज्यांमधील विद्युत निरीक्षणालयातील आकडेवारीप्रमाणे हेच प्रमाण ५० टक्के आहे. सध्या एअरकंडिशनिंग आणि तत्सम भाराने आगींचे प्रमाण हे जास्तच वाढत आहे. म्हणूनच जर संपूर्ण विद्युत संच मांडणीचे नियमितपणे ऑडिट केल्यास शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या ५० टक्के आगीत कपात होऊन आगीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी सुरक्षितपणे टाळता येईल.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला असून त्याचा भूगर्भावरही परिणाम होत आहे. भूकंप, त्सुनामी अशा गंभीर घटनासुद्धा आपण अनुभवत आहोत. जीर्ण व धोकादायक इमारतींच्या दुर्दैवी घटनांचेसुद्धा आपण साक्षीदार आहोत. अनेकांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व पत्करावे लागले आहे. ह्यातून आपण काही बोध घेऊन ठोस उपाययोजनांबाबत विचार करणे आवश्यक आहे. अशा जीर्ण इमारतींबाबत शासनाने ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेअंतर्गत पुनर्विकास (Redevlopment) प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. त्यांचा संबंधित इमारतींनी कायद्यानुसार विचार करून सेफ्टी ऑडिट आणि पुनर्विकासाची प्रक्रिया जलद गतीने करणे आवश्यक आहे.
एकीकडे वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने होणारे शहरीकरण व विकासाच्या माध्यमातून वाढणाऱ्या इमारती त्यांच्या विद्युतीकरणातील मालाचा दर्जा व त्यानुसार आवश्यक ती प्रमाणपत्रे विकासक व विद्युत् कंत्राटदाराने घेतली की नाही? ती तपासणे सर्वाचे कर्तव्य आहे. इमारतीतील वीज संच मांडणीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही नियम आणि र्निबध आहेत, त्यानुसार त्यांचे ठरावीक काळानंतर सेफ्टी ऑडिट करून घेणे गरजेचे झाले आहे. इमारतींच्या बाबतीत त्या धर्तीवर, स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच उद्योगक्षेत्रात फॅक्टरी अॅक्टप्रमाणे सेफ्टी ऑडिट हे बंधनकारक झाले आहे. विद्युत संच मांडणीच्या बाबतीत ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ कशा प्रकारे राबवता येईल त्याचा मागोवा खालीलप्रमाणे :-
कुठल्याही कंपनीचे, शॉपिंग मॉल, उद्योगांचे, सोसायटीज, इ.चे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करताना खालील गोष्टी पाळणे आवश्यक आहे.
१) संच मांडणीचा इतिहास : किती वर्षे जुनी, त्यानंतर काही फेरफार, इ. झाले असल्यास तपशील.
२) कायदेशीर बाबी : विद्युत अधिनियम – २००३ आणि सी. ई. ए. २०१० रेग्युलेशनचे पालन नसल्यास संबंधितांना तशी जाण देणे. आणि ऑडिटच्या दरम्यान त्याचे अनुपालन करून घेणे.
३) पाहणी (Observation) : यामध्ये रोहित्रे, जनित्रे, मेन कंट्रोल रूम, वर्कशॉप, प्रत्येक खात्याचा मेन पॅनेल, त्यांची नियमाप्रमाणे सुरक्षित अंतरे, रबर मेटिंग, कॉशन बोर्ड, अग्निरोधके, प्रथमोपचार पेटी, अर्थिग, लाइटनिंग अरेस्टर, इ. नियमांप्रमाणे दिली आहेत की नाहीत ते पाहणे. जेणेकरून विद्युत धोके होणार नाहीत.
४) कागदपत्रे, रजिस्टर : वीज संच मांडणीचा सिंगल लाइन डायग्राम (SLD), रोहित्रच्या ऑइलचा ब्रेकडाऊन व्होल्टेज (BDV), इन्सुलेशन रेझिस्टेन्स टेस्ट (IR test), अर्थ रेझिस्टेन्स टेस्ट (ER test) रिझल्ट्स, कपॅसिटर आणि रीले टेस्ट रिझल्ट्स, रोहित्रे, जनित्रे यांची लॉग बुक्स इत्यादी.
५) स्थिर विजेची तपासणी (Review) : पाइपलाइनच्या जॉइंट्सना ग्राउंडिंग व अर्थिग करणे, तसेच घर्षण पट्टे ज्यावर सुरू असतात त्या सर्व ठिकाणी ग्राउंडिंग करणे.
६) धोकादायक (Hazardous) परिक्षेत्राची पाहणी : कारखान्यांमधील ज्वलनशील क्षेत्र जसे पेंट हाऊस, गॅस सिलिंडर रूम, बॅटरी रूम, इ. ठिकाणी अज्वलनशील (Non-Flamable) लाइट फिटिंग्स उभारणे.
७) इलेक्ट्रिक प्रिव्हेंटिव मेंटेनन्सची तपासणी : विद्युत देखभालीमधील ऑपरेटिंग सिस्टिम (S.O.P) जसे परमिट, इंटरलॉक्स, लोटो इत्यादी यंत्रणा विद्युत कायदा व रेग्युलेशनप्रमाणे आहे का याची पडताळणी करणे. तसेच कंपनीच्या सेफ्टी पॉलिसीमध्ये इलेक्ट्रिक सेफ्टीला योग्य दर्जा देणे.
८) अर्थिग सिस्टिमची तपासणी : २०१० रेग्युलेशनच्या कलम क्र. ४१, ४८ आणि ७२ नुसार अर्थिग झाली आहे का याची तपासणी करून सर्व विद्युत संच मांडणीस ती जोडणे ज्यामुळे अर्थिग रिझल्ट ०.२ ओहमच्या वर जाऊ नये. आय. एस. ३०४३ प्रमाणे अर्थपिट असावे.
९) हॉट स्पॉट डिटेक्शन : विद्युत संच माडणीमधील अति गरम होणाऱ्या जागांचे (spots) थर्मोग्राफीच्या साहाय्याने थर्मल इमेजिंग करून ओव्हरलोडिंगवर नियंत्रण ठेवणे, जेणेकरून विद्युत सुरक्षा प्राप्त होईल.
१०) विद्युत अपघात व आग : अपघातांच्चे रजिस्टर पाहून त्यांच्या कारणांचे निराकरण झाले की नाही पाहणे.
११) प्रशिक्षण (Training) : विद्युत क्षेत्रातील अभियंते, तंत्रज्ञ, वायरमन, इ.साठी ‘‘विद्युत नियम व सुरक्षा’ ह्या विषयावर नियमितपणे प्रशिक्षण आयोजित करणे.
१२) लिफ्ट्स आणि एस्केलेटर्स : शॉपिंग मॉल, कापरेरेट्स, कंपनी, इ. ठिकाणी असलेल्या लिफ्ट्सची उभारणी व देखभाल ही लिफ्ट अॅक्ट १९३९ आणि लिफ्ट रुल्स १९५८ प्रमाणे होणे बंधनकारक आहे.
वरीलप्रमाणे ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट बनवून आवश्यक त्या फोटोंसोबत कंपनीला पाठविला जातो, त्यापूर्वी क्लोजिंग मटिंग घेऊन क्रिटिकल मुद्दय़ांची त्यांना जाणीव करून दिली जाते. ज्यामुळे धोके कमी होऊन सुरक्षा प्राप्त होते.
मित्रांनो, वरीलप्रमाणे ऑडिट झाल्यानंतर ठरावीक दिवसांनी त्याचे रिव्ह्यू (Review) ऑडिट करण्यात येते. जेणेकरून ऑडिटच्या दरम्यान निदरेषित केलेल्या त्रुटींचे अनुपालन झाले की नाही हे पाहण्यात येते. इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट हे खालील ठिकाणी कायद्याने बंधनकारक करणे आवश्यक आहे.
D) सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस सुरू राहणाऱ्या तात्पुरत्या बांधकाम जागा ((Temporary Construction sites), b) उच्च आणि अतिउच्च दाबांचे (HV आणि EHV) कारखाने, संस्था हाऊसिंग सोसायटीज, इ. c) सर्व शॉपिंग मॉल्स ) d) वीज कंपन्यांचे जनरेटिंग, रिसीव्हिंग स्टेशन्स इत्यादी.
वरील ठिकाणी ऑडिट हे शासन मान्यताप्राप्त अथवा राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) पुरस्कृत Accredation मिळालेल्या सेफ्टी ऑडिटरकडून करून घेणं आवश्यक आहे, ज्यासाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी
१) विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी.
२) विद्युत संच मांडणीचे निरीक्षण अथवा ऑडिट, किंवा विद्युत संचांची नियमाप्रमाणे देखभाल, दुरुस्तीचा किमान २५ वर्षांचा अनुभव.
३) ‘विद्युत कायदा २००३’ आणि ‘सी. ई. ए. रेग्युलेशन २०१०’, ‘लिफ्ट अॅक्ट १९३९’ तसेच ‘लिफ्ट नियम १९५८’’ ह्या कायद्यांचे आवश्यक ते ज्ञान असणे गरजेचे. ‘महाराष्ट्र सिनेमा रुल्स १९६६’ची जुजबी माहिती असणे आवश्यक.
४) वरीलप्रमाणे Accredated Safety Auditor चा परवाना प्राप्त झाल्यावर दर दोन वर्षांनी शासनाकडून त्याचे नूतनीकरण होणे आवश्यक.
५) विद्युत निरीक्षकांनी त्यांच्या पाहणीत ऑडिटमधील मुद्दे पाहून संबंधितांना त्यांच्या अनुपालनाच्या सूचना द्याव्या.
मंडळी, वर उल्लेखलेल्या धर्तीवर जर मान्यताप्राप्त ऑडिटरकडून चर्चा केलेल्या वीज संच मांडणीचे सेफ्टी ऑडिट झाल्यास शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी व अपघातात कमीतकमी ४० टक्के कपात होईल आणि विद्युत सुरक्षा मिळेल हे निश्चित! मुख्य विद्युत निरीक्षकांकडे हा प्रस्ताव पूर्वीच सादर केला आहे, तो फलद्रुप होईल तो सुदिन!
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
plkul@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:06 am

Web Title: electrical safety audit
Next Stories
1 बडय़ा विकासकाविरोधात कामी आले एकीचे बळ!
2 सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांना दंडात्मक कारवाईची तरतूद सहकार कायद्यात नाही
3 सागरातील अलौकिक स्मारक
Just Now!
X