शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक मॉलचे दरवर्षी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे.
मंडळी, शॉपिंग हा सध्या अगदी ऐरणीवरचा विषय आहे. नुकतीच दिवाळी होऊन गेली, ज्या निमित्ताने सर्वच जणांना शॉपिंग ही करावीच लागली. विविध स्वरूपात, विविध प्रकारे खरेदी करीत असताना कधी निरनिराळ्या बाजारपेठा, किरकोळ विक्रीची दुकाने तर कधी भव्य अशा शॉपिंग मॉल्समधून फिरावे लागते. अशा वेळी दिवसातला बराच वेळ बाहेर काढावा लागतो, ज्यामुळे खानपान इ. ची सोय असेल अशी जागा मिळाली तर ‘ग्राहकास सोने पे सुहागा’ झाल्यासारखे वाटते. ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊनच आजकाल संपूर्ण जगात शॉपिंग मॉल्सचे जाळे विणले गेले आहे. सामान खरेदी, खानपान व्यवस्था आणि करमणूक या तिन्ही सुविधा एकाच छताखाली मिळत असल्यामुळे हे मॉल्स कमालीचे लोकप्रिय झाले आहेत.
शॉपिंग मॉल्समध्ये आलेल्या लोकांचा बराचसा वेळ तेथेच आपल्या कुटुंबीयांसमवेत व्यतीत होत असल्यामुळे मॉलमधील सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. मॉलमधील करमणुकीची विविध साधने, सिनेमा (मल्टिप्लेक्स), लिफ्ट्स, एस्कलेटर्स, मुलांच्या वेगवेगळ्या राईड्स, हॉटेल्स, निरनिराळ्या कंपनींचे विक्रीचे रीटेल आऊटलेट्स, पाणी व्यवस्थापन, एअर कंडिशनिंग इ. ठिकाणी विजेशिवाय एकही गोष्ट शक्य नाही. त्यामुळे तिचा वापर नियमाप्रमाणे करून विद्युत सुरक्षा प्राप्त करण्याबाबत घेण्यात येणारी दक्षता याबाबत आपण चर्चा करणार आहोत.
प्रत्येक मॉलला विद्युत पुरवठा हा त्याच्या इलेक्ट्रिक लोडप्रमाणे केला जातो. सर्वसाधारण लोड असेल तर मध्यम दाब (६५० व्होल्टस) पर्यंतचा वीजपुरवठा केला जातो. जास्त लोड असलेला मोठा मॉल असल्यास उच्चदाब (ऌळ) वीजपुरवठा द्यावा लागतो ज्यामध्ये एक किंवा अधिक ट्रान्सफॉर्मरचा (रोहित्र) उपयोग केला जातो. वीजपुरवठा कंपनी आणि मॉलच्या व्यवस्थापनाने विद्युतीकरणाची सर्व कामेही विद्युत कायदा २००३ आणि सी. ई. ए. रेग्युलेशन २०१० च्या आधीन राहून करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मॉलमध्ये विद्युत सुरक्षा प्राप्त होऊन लोकांना शॉर्टसर्किटमुळे आग लागण्यापासून वाचवता येईल. संपूर्ण मॉलमधील विद्युत यंत्रणेत सहभाग असणाऱ्या विविध लोकेशन्स, आऊटलेट्समध्ये घ्यावयाची दक्षता खालीलप्रमाणे-

सबस्टेशन
ws11मानवी शरीरात हृदयाचे जे स्थान आहे तसेच एखाद्या विद्युत यंत्रणेत सबस्टेशनचे महत्त्व आहे. मॉलमधील पूर्ण कार्यान्वित यंत्रणेला विद्युतप्रवाह देण्याचे काम व नियंत्रण हे या सबस्टेशनमधून होत असते. या सबस्टेशनमध्ये लोडप्रमाणे एक किंवा दोन रोहित्र उभारलेली असतात. वीजपुरवठा कंपनी (टाटा पॉवर, रिलायन्स, महावितरण अथवा बेस्ट) ह्या रोहित्रांना उच्चदाबाचा पुरवठा करतात. मॉलमधील रोहित्र याचे रूपांतर मध्यम दाबात करून (४४० व्होल्टस) सर्व मॉलमध्ये शोरूम्स, लिफ्टस्, एस्कलेटर्स, सिनेमा इ. ठिकाणी ही वीज वितरित केली जाते.
अ) सामान्यपणे सबस्टेशन्स ही कुठल्याही मॉलमध्ये बेसमेंटमध्ये बसविलेली असतात. त्यातील ट्रान्सफॉर्मर्स जर ऑईल कुल्ड (oil cooled) असतील तर सी. ई. ए. रेग्युलेशनच्या कलम क्र. ४४ प्रमाणे ते फक्त पहिल्या बेसमेंटवरच उभारता येतील. दुसऱ्या अथवा त्यापुढील बेसमेंटवर त्यांची उभारणी ही पूर्णत: बेकायदेशीर असून, तसे झाल्यास मॉलचे मॅनेजमेंट कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात.
ब) मॉलमध्ये येणाऱ्या गाडय़ांचे पार्किंग हे विविध बेसमेंटसमध्ये असते. सबस्टेशन असलेल्या बेसमेंटमध्ये पार्किंग लॉट उभारताना सबस्टेशनपासून विद्युत नियमात दिलेल्या सुरक्षित अंतरावर उभारण्यात यावे.
क) प्रत्येक रोहित्राला चार अर्थिग अशा प्रकारे सबस्टेशनजवळ एकूण अर्थपिटस IS3043 प्रमाणे उभाराव्यात आणि रोहित्राची बॉडी व न्यूट्रलला ती कनेक्ट करावी.
ड) सबस्टेशन्स ही बेसमेंटमध्ये असल्यामुळे ती स्वच्छ, हवेशीर आणि कीटकरहीत असावीत- जेणेकरून शॉर्टसर्किट होणार नाही.
इ) सबस्टेशनचे मेन कंट्रोल पॅनेल हे जमिनीपासून जास्तीत जासत १.७ मीटर अंतरावर उभारावे. (रेग्युलेशन २०१० च्या कलम क्र. ३६ प्रमाणे.)
ई) रेग्युलेशन २०१० च्या कलम क्र. ४९ प्रमाणे सबस्टेशनभोवती लोखंडी तारेचे कुंपण (कमीत कमी १.८ मीटर उंचीचे) उभारणे आवश्यक आहे, ज्यामुळे अनधिकृत इसम किंवा जनावरे रोहित्रांपासून दूर राहू शकतील, पर्यायाने मॉलला सुरक्षा मिळेल.
ए) कलम क्र. १९ प्रमाणे प्रत्येक कंट्रोल पॅनेलच्या समोर रबर मॅट किंवा इन्सुलेटिंग मॅट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवणे आवश्यक आहे.
ऐ) कलम क्र. २८ प्रमाणे मेन कंट्रोल रूममध्ये ‘शॉक ट्रीटमेंट चार्ट’ लावणे आवश्यक आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक शॉक बसणाऱ्यांना प्राथ्मिक उपचार देणे सुलभ होईल. मॉलमधील अन्य कंट्रोल पॅनेल व जनित्रांजवळ सुद्धा हे आवश्यक आहे.
ओ) सबस्टेशनमध्ये आग लागल्यास ती पाण्याने विझवता येत नाही, म्हणून स्वच्छ कोरडय़ा वाळूने भरलेल्या बादल्या ठेवणे आवश्यक आहे.
औ) रोहित्रांमधील तेलामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सबस्टेशनमध्ये अग्निरोधके (Fire extinguishers) लावणे कलम क्र. ४४ प्रमाणे बंधनकारक आहे.
क) प्रथमोपचार पेटी (First Aid Box) आवश्यक आहे.
ख) मॉलच्या विद्युत यंत्रणेतील रिटेलर दुकानांच्या विद्युत पॅनेलवर, प्रत्येक मजल्यावर असलेल्या सर्व ए. एच. यू. रूम्स, केबल डक्ट एंट्रीचे सर्व दरवाजे आणि रोहित्रे, जनित्रे इत्यादी ठिकाणी डेंजर बोर्ड (धोका दर्शविणरा) लावणे हे कलम क्र. १८ प्रमाणे बंधनकारक आहे.
ग) इमर्जन्सी लाइट्स सबस्टेशनमधे लावणे आवश्यक आहे, जेणेकरून आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीत देखभाल करण्यात मदत होईल.
सी. ई. ए रेग्युलेशन २०१० च्या कलम क्र. ४४ नुसार आगप्रतिबंधक मोहीम म्हणून सर्व मॉल्समध्ये ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मरच्या ऐवजी रेझिनकास्ट ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर चाच उपयोग करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत वीज कंपनी व विद्युत निरीक्षक यांनी कारवाई करणे जरुरी आहे.

अर्थिग
मॉलमधील विद्युत यंत्रणेची सुरळीत आणि सुरक्षित हाताळणी करण्यामध्ये तेथील अर्थिगचा मोलाचा वाटा असतो. कलम क्र. ४१ आणि ४८ प्रमाणे व IS3043 अनुसार मॉलच्या विद्युत यंत्रणेला अर्थिग करणे हे बंधनकारक आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात अर्थपिट्स उभारून नियमितपणे त्याची देखभाल करणे हे मॉल व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे.
काही मॉल्सचे सेफ्टी ऑडिट करीत असताना मला असे आढळले, की तेथील अर्थपिट्स हे बागेमधील झाडांच्या खाली अथवा काँक्रीटीकरणामुळे रस्त्याच्या खाली दबून दिसेनासे झाले होते. हे अत्यंत चूक असून कुठेही शॉर्टसर्किट झाल्यास अर्थिग न मिळाल्यामुळे आग लागू शकते. मॉलमधील सगळ्या अर्थपिट्सना नंबर दिले गेले पाहिजे. नियमितपणे पाणी, कोळसा व मीठ घालून त्याची योग्य ती देखभाल केली पाहिजे. प्रत्येक अर्थपिटला कास्ट आयर्न प्लेटने झाकून त्याला पेंट केले पाहिजे.
अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ई. एल. सी. बी) सर्व वितरण फलक व एम. सी. बी वर वापरणे हे विद्युत् कायद्याने बंधनकारक आहे.

रिटेलर आऊटलेट्स
शॉपिंग मॉलमध्ये विविध ब्रॅण्डेड कंपनीज जसे लाइफ स्टाइल, सेंट्रल, आदिदास, स्टारबक्स इत्यादींचे शोरूम्स व सेल काऊंटर्स असतात. त्या सर्वाना मिळून ‘रिटेलर आऊटलेट्स’ (थोडक्यात सांगायचे झाल्यास किरकोळ विक्रीचा स्टॉल) असे म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या आऊटलेट्सना होणारा विद्युत पुरवठा हा वर उल्लेख केलेल्या सबस्टेशनमधून केला जातो व त्याची मार्गक्रमणा मॉलमध्ये असलेल्या पॉवर डक्टमधून केली जाते.
* अशा प्रत्येक आऊटलेट्सच्या कंट्रोल पॅनेलला वर उल्लेख केलेले सुरक्षा नियम लागू आहेत. त्याची जागा मोकळी ((Free access) असावी. कित्येक मॉल्समध्ये अशा पॅनेलसमोर खोके, कापडांचे ढीग इत्यादी सामान रचून ठेवलेले आढळते, ज्यामुळे काही फॉल्ट झाल्यास वायरमनला कंट्रोल पॅनेलपर्यंत जाणेही कठीण होते. अशा सामानामुळे कलम क्र. ३७ प्रमाणे फायर हॅझ्ॉर्ड (आगीचा धोका) मध्ये लक्षणीय वाढ होते.
* मॉल्सच्या ऑडिटमध्ये असेही आढळून आले आहे की ‘फन सिटी’ अथवा विविध गेम्सच्या विभागात विद्युत यंत्रणेची कपाटे व निरनिराळय़ा राइड्स यामधील अंतर हे खूपच कमी आढळले, ज्यामुळे शॉक आणि आगीचा धोका वाढल्याचे दिसून आले. अशा केसेसमध्ये सुरक्षेसाठी कमीत कमी तीन मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे, तसेच लाकडी कपाटांच्या ऐवजी स्टील कपाटांचा वापर केल्यास आगीचा धोका कमी होतो.
* प्रत्येक मॉलचे मॅनेजमेंट आणि रिटेलर ह्यांच्यात जे अ‍ॅग्रीमेंट झालेले असते त्यात रिटेलरच्या एरियाच्या ‘विद्युत देखभालीची जबाबदारी रिटेलरनेच सांभाळावी, असे कलम हे नियम क्र. १६ प्रमाणे टाकणे अनिवार्य आहे. शॉपिंग मॉल्समध्ये आग लागल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. वरीलप्रमाणे कलम असेल तर आगीची जबाबदारी फिक्स करणे सुलभ होईल.

इतर कायदेशीर बाबी
ws13अ) शॉपिंग मॉलला उच्चदाबाचा वीजपुरवठा असेल तर कलम क्र. ४३ प्रमाणे विद्युत निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे.
ब) जर मॉलची उंची ५० फुटांपेक्षा जास्त असेल तर कलम क्र. ३६ प्रमाणे विद्युत निरीक्षकाची एन. ओ. सी. आवश्यक आहे.
क) जर मॅनेजमेंटने स्टॅण्ड बाय सप्लायसाठी विद्युत जनित्र बसविले असेल तर त्यालाही कलम क्र. ३२ प्रमाणे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ड) आजकाल बऱ्याच मॉल्समध्ये मल्टिप्लेक्स सिनेमांची उभारणी होताना दिसत आहे. पी. व्ही. आर, मूव्ही टाइम, आयनॉक्स, कार्निवल हे ग्रुप्स याबाबतीत आघाडीवर आहेत. अशा सिनेमांना महाराष्ट्र सिनेमा कायदा १९६६ अंतर्गत शासनात कार्यरत असलेल्या विद्युत निरीक्षक आणि कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे.

विद्युत उद्वाहन (लिफ्ट्स) आणि एस्केलेटर्स
उभ्या रेषेतील (व्हर्टिकल) वाहतुकीसाठी जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित साधन म्हणजे ‘उद्वाहन’ अर्थात लिफ्ट्स. विविध मॉल्समध्ये यांचा वापर अनिवार्य असून तो प्रकर्षांने होत असताना दिसतो. मॉल्समध्ये सामान्यपणे कॅप्सुल लिफ्ट्स वापरतात.
ह्या सर्व लिफ्ट्स अत्याधुनिक ग्लास बॉडीच्या असतात व त्यांची उभारणी आणि देखभाल महाराष्ट्र लिफ्ट अ‍ॅक्ट १९३९ आणि लिफ्ट कायदा १९५८ नुसार करण्यात येते. मॉल्समध्ये कॅप्सुल लिफ्टबरोबर काही सव्‍‌र्हिस लिफ्टसुद्धा उभारल्या जातात, ज्यामध्ये देखभालीसाठीचे कर्मचारी ये-जा करतात. अशा सर्व उद्वाहनांना उपयोगात आणण्यापूर्वी शासनाचे उद्वाहन निरीक्षक यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे. शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक मॉलचे दरवर्षी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे.
आजकाल सर्व शॉपिंग मॉल्समध्ये एस्केलेटर्सचा वापर हा प्रामुख्याने होत असतो. एस्केलेटर्स हे सरकते जिने असून, ते वरील शॉफ्टवर बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटर्सवर कार्यरत असतात. प्रत्येक राज्य शासनाने तयार केलेल्या अ‍ॅक्ट आणि कायद्यानुसार यांची कार्यवाही होत असते. मॉल्समध्ये रोज हजारो लोक मुलाबाळांसहित येत असतात, त्या वेळी अज्ञानामुळे एस्केलेटर्सवर बरेच अपघात झालेले आढळले आहेत. प्रत्येक एस्केलेटरच्या दोन्ही बाजूस सुरक्षा सूचनांचे बोर्ड लावणे आवश्यक आहे. असा एक सूचनाफलक सोबत जोडला आहे.
मित्रांनो, विज्ञानाने आपल्यासाठी शॉपिंग, डायनिंग आणि मनोरंजनाची साधने ‘शॉपिंग मॉल’ ह्या एका छताखाली आणली आहेत, त्याचा परिपूर्ण सुरक्षितपणे उपयोग कसा करावा यासाठीच वरील चर्चा, दुसरे काय? सो.. हॅपी शॉपिंग! ल्ल ल्ल
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
plkul@rediffmail.com