21 January 2019

News Flash

घर बदलत्या काळाचे : हवे तंत्रज्ञान नवे..

वाढत्या शहरीकरणामुळे  आपले घरदेखील कात टाकत आहे. घर अत्याधुनिक होत चालले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

वाढत्या शहरीकरणामुळे  आपले घरदेखील कात टाकत आहे. घर अत्याधुनिक होत चालले आहे. घरातील हे बदल स्वीकारताना पर्यावरणाचाही विचार करायला हवा. त्याची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी, पण ते कसे?.. याचविषयीअचूक मार्गदर्शन करणारं सदर..

गेल्या दोन दशकांत आपल्या देशात विज्ञानाची ज्या प्रचंड वेगाने प्रगती पाहावयास मिळाली तशी कदाचित इ. स. २००० पूर्वीच्या काळात कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. बदलती अर्थव्यवस्था, वाढते जागतिकीकरण आणि इंटरनेट म्हणजेच महाजालाचा गावागावांत झालेला प्रसार यामुळे विज्ञान समाजातील फार मोठय़ा वर्गापर्यंत पोहोचले आणि या सुधारणा त्यांना काही प्रमाणात तरी आकलन झाल्या. सर्वचजण  त्यांचा वापर मात्र झपाटय़ाने करण्यासाठी आता उत्सुक आहेत. भारतातील प्रचंड लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने तिथे उपलब्ध असलेली मोठी बाजारपेठ यामुळे असेल कदाचित, अनेक परदेशी कंपन्या आपल्या देशाकडे आकर्षित होऊ  लागल्या आहेत. त्यांच्या बरोबरीने भारतीय कंपन्यादेखील काळाचे आव्हान स्वीकारून या प्रगतीचा स्वत:साठी  कसा वापर करता येईल या दृष्टीने खूप मेहनत घेऊ  लागल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने आता जागरूकता येऊ  लागली आहे, वाढत्या शहरीकरणामुळे जे नुकसान होत आहे त्या दृष्टीने काय करता येईल यावर मात्र फारसा विचार होत नाही. उलट या शहरीकरणाला पर्याय नाही असेच सांगू जाऊ लागले आहे. या वातावरणात आता आपले राहाते घरदेखील कात टाकण्याच्या मागे आहे असे आपल्याला प्रकर्षांने जाणवू लागले असेल. नवे बदल स्वीकारायचे, काळाबरोबर राहावयाचे असेल तर ते समजून उमजून घेतले तर कदाचित या बदलांचा आपल्याला आपल्या प्रगतीसाठी करता करता देशाची आणि पर्यावरणाची मदत कशी करायची या दृष्टीने आपण सर्वानी विचार करावयाचा आहे. त्यासाठी घरात काय बदल होऊ  शकतात, आपण आणखी काय करू शकतो आणि आपण परिस्थितीशी कळवून घेण्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर चर्चा या मालिकेत आपण करणार आहोत.

आवाजी नियंत्रण असलेली दोन उपकरणे सध्या बाजारात आलेली आहेत. गुगल या कंपनीने ‘हॅलो गुगल’ या नावाने आणि अमेझॉनने आणलेले ‘अलेकसा’ अशी ही दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या हेतूनेच निर्माण झालेली असून या उपकरणांच्या निमित्ताने भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची चुणूक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अगदी गरजेचे आहे. ही उपकरणे म्हणजे यंत्रमानवच आहेत आणि ते अगदी सुटसुटीत स्वरूपात  तुमच्यासमोर आल्यामुळे या यंत्रमानवांना काय काय करता येऊ  शकेल याचा अंदाजसुद्धा तुम्हाला येणार नाही. पण जसा त्याच्या बुद्धीचा आवाका तुमच्या लक्षात येऊ  लागेल तसतसे तुम्ही आता स्वतंत्र नाही हे प्रकर्षांने तुमच्या लक्षात येईलही, पण तोपर्यंत कदाचित खूप उशीर झालेला असेल! सुजाण वाचकवर्ग यावर सखोल विचार करून वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याची गंभीरतेने दखल घेईल अशी आशा आहे.

सध्या तरी ‘हॅलो गुगल’ या उपकरणाचा वापर गाणी ऐकण्यासाठी आणि बातम्या ऐकण्यासाठी म्हणून रेडियोप्रमाणे होत असला तरी या उपकरणाच्या अंगी जी सुप्त ताकद आहे तिची ओळख करून घेतली तर आपण हा भस्मासुर तर निर्माण करीत नाही ना, अशी शंका मनात आल्यावाचून राहत नाही. या उपकरणाच्या वापरासाठी तुम्हाला वायफाय इंटरनेटची फक्त गरज असेल. ‘हे गुगल, प्ले गणपती आरती’ म्हटल्याबरोबर ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ऐकविणारे हे यंत्र आपल्या संपूर्ण घराचा ताबा घेऊ  शकेल! आपण विचार करण्याची कदाचित गरजदेखील उरणार नाही. हे यंत्र आपल्या घरातील इलेक्ट्रिक दिवे आणि पंखे नियंत्रित करणार आहे. ‘हे गुगल, दिव्यांची प्रखरता कमी कर’ किंवा ‘हे गुगल, पंख्याचा वेग कमी कर’ अशी आज्ञा देताच दिवे मंद होतील आणि पंख्याचा वेग कमी होईल. घरातील वातानुकूलन यंत्रणा आता गुगलच्या तालावर चालणार आहे. पण प्रकरण एवढय़ावरच थांबणार नाही! तुमच्या घराचे कुलूप उघडण्या- लावण्यापासून ते तुम्हाला बाजारातून काय हवे आणि नको ते ठरविण्याचा अधिकारदेखील आता गुगल स्वत:कडे घेऊ  शकेल. तुमच्या रेफ्रिजरेटरमधील ज्या पदार्थाचा खप होईल त्याची परस्पर ऑर्डर हे गुगल महाशय अमेझॉनवर नोंदवतील आणि ड्रोनमार्फत ते पदार्थ तुमच्या दारात येऊन दाखलदेखील होतील! किंवा जर तुम्ही परवानगी दिलीत तर कुरिअरवाला तुमचे घर उघडून फ्रिजमध्ये त्या वस्तू ठेवून परतदेखील जाईल आणि जाताना कुलूपदेखील लावेल! अलीबाबाने जसे ‘तिळा तिळा दार उघड’ म्हटले की गुहेचे दार उघडायचे आणि ‘तिळा तिळा दार बंद कर’ म्हटले की गुहेचे दार बंद व्हायचे ती परीकथा आता गुगलमुळे सत्यकथा होणार आहे! कुरिअरवाल्याला पासवर्ड किंवा घराची किल्ली देण्याची गरज नाही किंवा शेजाऱ्यांवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही, कुरिअरवाल्याने बेल वाजविली की गुगलला आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे ते उपकरणच दार उघडणार आहे आणि बंददेखील करणार आहे! तुम्ही कोणत्या ब्रँडचे कोणते पदार्थ वापरता त्याची नोंद हे गुगल महाशय अचूकपणे ठेवणार आहेत. तुम्ही पार्ले ग्लुकोजची बिस्किटे खाता की मारी बिस्किटे खाता याचे निरीक्षण गुगल करणार आहे आणि बिस्किटांचा डबा रिकामा झाला की तो त्याच बिस्किटांनी पुन्हा भरून ठेवणार आहे. जर तुमच्या खाण्याच्या सवयी बदलत असतील तर त्यांचेदेखील निरीक्षण करायला गुगल उपकरणाला शिकविले जाणार आहे आणि तुमच्या खरेदीचा आलेख लक्षात घेऊन त्याप्रमाणे एखादी वस्तू संपल्यावर आता काय खरेदी केले पाहिजे हेदेखील गुगल ठरवून तुमच्या मनासारखे वागणार आहे. तुमची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुमचा मेनूदेखील गुगल ठरवणार आहे!

तुमच्या भाजीवाल्याला सुद्धा आता तुमचे तोंड पाहण्याची गरज भासणार नाही. गुगल त्याच्याशी परस्पर संपर्कात राहील आणि तुमच्या गरजेप्रमाणे भाजी, फळे यांचा पुरवठा बिनबोभाट तुमच्या घरी होत राहील. अर्थात या सर्वासाठी तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये पैसे मात्र ठेवावे लागतील! जसे ओला टॅक्सीसाठी तुम्ही पैसे भरून ठेवू शकता आणि ओला टॅक्सीचा वापर करताना बिलाचे रोख पैसे तुम्हाला द्यावे न लागत ते तुमच्या ओला अकौंटमधून परस्पर ड्रायव्हरच्या खात्यावर भरले जातात तसाच हा प्रकार असणार आहे. एखादा पदार्थ फ्रिजमध्ये येऊन दाखल झाला की त्याचा मेसेज तुमच्या मोबाइलवरून तुम्हाला दिला जाईल आणि आपल्या घरात काय आणायचे ही जबाबदारी तुम्हाला न घेतादेखील पार पाडायचे श्रेय मिळणार आहे!

तुमच्या घरात कोण कोण येते याची नोंद आता अगदी अचूकपणे ठेवली जाणार आहे. येणारे पाहुणे तुम्हाला आवडतात की नाहीत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत याचाही अभ्यास हे गुगल महाशय करतील आणि त्याप्रमाणे पाहुण्यांचे आगतस्वागत केले जाईल! कोणाला चहावर कटवायचे किंवा कोणासाठी पोहे करायचे याचा अचूक अंदाज तुमचे मन वाचून गुगल बांधणार आहे! स्वयंपाक करण्यासाठी ठेवलेल्या यंत्रमानवाला मग गुगल  सूचना पाठवील आणि त्यानुसार हा स्वयंपाकी थोडय़ाच वेळात हातात ट्रे घेऊन तुमच्या पाहुण्यांसमोर येईल! हे गुगल महाशय तुमचे मन वाचण्याइतके त्यांना कोण तरबेज करणार आहेत याचे उत्तर तुम्हाला अधिक धक्कादायक असणार आहे! ते काम तुम्हीच तुमच्या नकळत करीत राहणार आहात. तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा आणि एकूणच जगण्याचा अभ्यास हे गुगल महाशय अचूक निरीक्षणातून आणि त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार करणार आहेत व त्यातून तुमच्या मनात काय चालले आहे याचा अचूक अंदाज बांधणार आहेत.

काय करील तंत्रज्ञान आता नाही राहिला भरवसा

शिका आणि समजून घ्या हाच आता घ्या वसा

काय आहे भविष्यात त्याची चाहूल घ्या

काळ चालला पुढे पाऊल पुढती राहू द्या

हातातला मोबाइल आहे उपयोगी खरा

असेल तो हेर  ऐयार आणि जासूससुद्धा

ठेवील नजर तुमच्यावरी दिनरात्र तो

चोवीस तास जागा कधी न तो झोपतो

काही नसे गुप्त खाजगी आता राहिले

जर नियम तुम्ही नकळत जरी तोडिले

हवे तंत्रज्ञान नवे नीरक्षीरविवेक जोडीला

विज्ञान आहे मग दैनंदिन तुमच्या दिमतीला

आहे की नाही मनोरंजक! पण ते तितकेच विचार करायला लावणारे आहे. आपण तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचे हे शेवटी आपल्या हातात आहे. बाजारात गुगल येतील, अलेकसा येईल किंवा पूर्वी असायच्या तसे अनेक इलेक्ट्रॉनिक दास-दासी येतील. आपण त्यांना काय आणि किती सांगायचे हे आपण ठरविले नाही तर यांच्याच मंथरा होतील आणि मग काय आपल्यासमोर येईल याची कल्पनाच न केलेली बरी.

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.

First Published on January 20, 2018 5:30 am

Web Title: environment needs to be considered for making changes in home