16 January 2019

News Flash

आग प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना दुर्लक्षीतच

वाईटातून नेहमी चांगले निष्पन्न होते याचा प्रत्यय कमला मिल आगप्रकरणीदेखील आला.

 

राज्यात १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिनम्हणून  पाळण्यात येतो. मुंबईतील कमला मिलला लागलेली आग व त्यानंतर राज्यातील प्रमूख शहरात सातत्याने लागलेल्या आगीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना पूर्णपणे दुर्लक्षीत होत असल्याचे अधोरेखित करणारा लेख..

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरातील व्हिक्टोरिया गोदीतील फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीला लागलेली आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळला जातो. या वर्षी या घटनेला ७४ वर्षे पूर्ण होत आहेत.

आत्तापर्यंत लागलेल्या आगीच्या संख्येपैकी ९० हून अधिक टक्के आगीच्या घटना मानवी निष्काळजीपणा व चुकांमुळे लागलेल्या आहेत. उर्वरित १० टक्के आगीच्या घटना मानवी विचारांच्या पलीकडील कारणांमुळे लागलेल्या आहेत. मग ती राज्याच्या मंत्रालयाला लागलेली आग असो अथवा कमला मिलला. या दोन्ही घटनांमध्ये समान धागा एकच आणि तो म्हणजे ‘अग्नित्रिकोण’ म्हणजेच आग लागण्यास मदत करणारे तीन घटक. (१) हवेतला प्राणवायू (२) कागद किंवा लाकूड (३) शॉर्टसर्किटमुळे किंवा शेगडीतील कोळशाच्या जळत्या निखाऱ्यांमुळे पडलेली ठिणगी. यामुळे आगीस साहाय्यभूत होणारा ‘अग्नित्रिकोण’ तयार होऊन वरील आगीच्या घटना घडल्या असा निष्कर्ष काढण्यात आला.  मंत्रालयात मोठय़ा संख्येने असलेल्या फायली, लाकडी पार्टिशन व फर्निचर आणि भरपूर वारा. तर कमला मिलमध्ये हॉटेलमध्ये पदार्थ बनविण्यासाठी स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर्स, हुक्का पिण्यासाठी कोळशाच्या शेगडय़ा व अत्यंत दाटीवाटीने तयार केलेल्या खोल्या व प्रसाधनगृहे आगीसाठी कारणीभूत ठरली आहेत. वलयांकित उद्योगांची बेकायदा बांधकामे, सर्व नियमांची पायमल्ली करून लोकांच्या जिवाशी खेळ करणारे तिथले मोहमयी व्यवसाय याकडे शासन आणि महानगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या अनास्थेतून २०१७ वर्ष सरता सरता मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील भीषण आगीमध्ये दोन हॉटेलमध्ये अडकलेल्या  १४ लोकांचा होरपळून मृत्यू झाला तर सुमारे ५४ जण जखमी झाले. आगीचे नेमके कारण काय इत्यादी बाबींचा संपूर्ण तपास अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. वन अबव्ह हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी हुक्का विक्री सुरू होती. हुक्क्यासाठी दगडी कोळसा पेटविण्याचे किंवा ज्वलनशील निखारे तयार करण्याची यंत्रणा हॉटेलच्या एका कोपऱ्यात होती. दगडी कोळशाचे निखारे करण्याच्या प्रक्रियेत आगीसाठी हुक्क्याच्या जळत्या कोळशामधील ठिणगी कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अहवाल अग्निशमन दलाने दिला. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारे कोणतेही चिन्ह अथवा स्टिकर्स लावले नव्हते. जिंन्यावर येणाऱ्या सर्व मार्गावर अडसर होते व अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नव्हती. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे आग प्रतिबंधक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आग लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी आग लागूच नये अशी काळजी सर्वानीच घेणे अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजीत अशी एक म्हण आहे की,  ” Prevention is better than cure ” या उक्तीस अनुसरून खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे :-

वाईटातून नेहमी चांगले निष्पन्न होते याचा प्रत्यय कमला मिल आगप्रकरणीदेखील आला. कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या पाश्र्वभूमीवर हुक्का-पार्लरवर बंदी घालणारे विधेयक बुधवार दिनांक २८ मार्च २०१८ रोजी विधान सभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे, हुक्का-पार्लर, हॉटेलांमध्ये हुक्क्याची सोय करून देण्यावर बंदी येणार आहे.  यावरून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे आगीचे कारण शोधून काढणे व तसे पुन्हा होऊ  न देणे यासाठी सुयोग्य पद्धत ठरवणे व ती पद्धत काटेकोरपणे अमलात आणणे ही काळाची गरज आहे.

आग प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • आपल्याकडे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ येऊन बारा वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारच्या उपरोक्त अधिनियमानुसार घर मालकांनी व सहकारी गृहनिर्माणसंस्थांनी घर / इमारत आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे याची तपासणी करून घेणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र वर्षांतून दोन वेळा सादर करावे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अग्निशमन दलासाठी इमारतीच्या एका बाजूस सहा मीटर मोकळी जागा ठेवण्याच्या आदेशाचे सोसायटीने पालन करावे.
  • सोसायटीच्या सभासदांच्या सोयीनुसार दर महिन्यातून एकदा फायर-ड्रिल करावे. फायर-ड्रिल म्हणजे आग विझविण्याच्या शास्त्रोक्त शिक्षणाची रंगीत तालीम. याचा उपयोग सरवासाठी आवश्यक असतो. असा सराव नसेल तर प्रत्यक्ष आग लागेल तेव्हा उपकरणे हाताळण्याचे तंत्रज्ञान माहिती नसल्यामुळे गोंधळ उडतो व विलंब लागल्यामुळे आग सर्वत्र पसरण्यास व वित्तहानी आणि जीवितहानीस मदत होते.
  • मॉक फायर ड्रिल म्हणजे लुटूपुटूची आग विझविणे अथवा प्रतिकात्मक आग विझविणे. कार्यालयाच्या सोयीनुसार सहा महिन्यांतून एकदा मॉक फायर ड्रिलचा सराव करणे आवश्यक आहे. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी मॉक फायर ड्रिल घेण्यात आले.

vish26rao@yahoo.co.in

First Published on April 14, 2018 12:08 am

Web Title: fire prevention measures ignorance life preserver