23 October 2018

News Flash

आगप्रतिबंधक विद्युत सुरक्षा

वस्तुत: विद्युतशक्ती ही योग्य तऱ्हेने वापरल्यास इमानी व उत्तम सेवक आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई शहरात गेल्या तीन वर्षांत आगीच्या पंधरा हजारांहून अधिक घटना घडल्या व त्यातील सुमारे ८०% घटना या शॉर्ट सर्किटमुळे झाल्या, अशी एक बातमी वाचनात आली. दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, इ. महानगरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात अशाच घटना घडल्या असतील. अशा घटनांनी भरून न येणारी जीवित व वित्त हानी मोठय़ा प्रमाणात होते. असे का घडते याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न.

वस्तुत: विद्युतशक्ती ही योग्य तऱ्हेने वापरल्यास इमानी व उत्तम सेवक आहे; परंतु तिचा असुरक्षित वापर केल्यास काय होते हे वरील बातमीच्या संदर्भावरून ध्यानात येईल. विजेचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबतीत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (Central Electricity Authority- CEA) २०१० साली ‘सुरक्षा आणि विद्युत पुरवठा उपाय विनियम’ प्रसृत केले आहेत. त्यातील तरतुदींची जर कठोरपणे अंमलबजावणी केली तर अपघातांचे कारणच राहणार नाही. त्यातील तरतुदींचा जाणते वा अजाणतेपणी होणारा भंग अपघातांना कारणीभूत ठरतो.

विद्युत जाळ्यात सर्वात मोठा धोका असतो ‘शॉर्ट सर्किट’चा. विद्युत पुरवठय़ात घरगुती वापरात तीन वायर (तारा) असतात- फेज, न्यूट्रल व अर्थ. जेथे वापर मोठय़ा प्रमाणात असतो तेथे फेजच्या एकाऐवजी तीन वायर असतात. सामान्य स्थितीत या वायरच्या वरील इन्सुलेशनमुळे वायर एकमेकांना चिकटल्या तरी काही धोका होत नाही; परंतु काही कारणाने वायरचे इन्सुलेशन खराब झाले किंवा निघून फेजची तार अन्य वायरला जोडली गेली तर अतिउच्च विद्युतप्रवाह निर्माण होतो, यालाच शॉर्ट सर्किट करंट म्हणतात. या प्रचंड प्रवाहाने वायर, स्विच गरम होतात. अशा बाबतीत विद्युत परिपथात (Circuit) कोठे लूज कनेक्शन असल्यास तेथे ठिणगी (Arc)) पडते. ठिणगीचे तापमान सुमारे १००० अंश सेल्सिअस असते आणि इन्सुलेशनचे पीव्हीसी २४० ते ४०० अंश सेल्सिअसच्या दरम्यान पेट घेते. ऑक्सिजन, उष्णता व इंधन या गोष्टी असल्यास आग फोफावते. हे टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेत ‘आर्क फॉल्ट सर्किट इंटरप्टर’ (AFCI) बसविले असल्यास ठिणगीचा सुगावा लागताच संबंधित यंत्रणेचा विद्युत पुरवठा ताबडतोब बंद होतो व आगीचा धोका टळतो. अमेरिका व कॅनडामध्ये २०१५ सालापासून AFCI  बसविणे अनिवार्य केले आहे.

तारेवरचे इन्सुलेशन बऱ्याच कारणांनी खराब होऊ  शकते. जसे- तार दाराच्या सांध्यात दाबली जाणे, कन्सिल्ड वायरिंगमध्ये भिंतीत खिळे ठोकणे, मिक्सर/ हेअर ड्रायरभोवती तार वारंवार गुंडाळणे, इ. भिंतीत ओलावा असल्यास आणि अशा ठिकाणी इन्सुलेशन खराब झाल्यास भिंतीतून विद्युत प्रवाह वाहू लागतो, त्यामुळे भिंतीला स्पर्श केल्यास शॉक लागून धोका होऊ  शकतो. हे टाळण्यासाठी यंत्रणेत ‘अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर’ (ELCB) बसविले जातात. थ्री फेज विद्युत पुरवठा असलेल्या यंत्रणेत ELCB  बसविणे विनियमाप्रमाणे अनिवार्य आहे. तसेच ‘मिनिएचर सर्किट ब्रेकर’ (MCB) बसविल्यास शॉर्ट सर्किट किंवा यंत्रणेवर भार जास्त झाल्यास त्वरित संबंधित यंत्रणेचा विद्युत पुरवठा बंद होतो व आगीचा धोका टळतो. साध्या फ्यूजऐवजी MCB वापरणे योग्य. घरात किंवा कार्यालयात प्रत्येक कक्षास भिन्न MCB बसविल्याने जेथे यंत्रणेत बिघाड झाला असेल तेवढाच भाग बंद होतो व बाकी ठिकाणचा पुरवठा अबाधित राहतो. याशिवाय वायरवरील इन्सुलेशनचा विद्युत रोध (किमान ५ मेगाओहम असावा) नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.

कोणत्याही ठिकाणी नवीन विद्युत पुरवठा करण्याच्या वेळी तेथील विजेचा संभाव्य वापर ध्यानात घेऊन त्यातील वायर (तारा), स्विचेस यांची क्षमता ठरवली जाते. त्याप्रमाणे वायरिंगचे काम परवानाधारक विद्युत कंत्राटदाराने पूर्ण करून त्याचा चाचणी अहवाल दिल्यानंतरच त्या ठिकाणी वीजपुरवठा केला जातो. त्यानंतर गरजेनुसार वीजग्राहक त्यात नवीन उपकरणे (जसे- एसी, ओव्हन, डिश वॉशर, इ.) जोडत जातो, त्या वेळी पूर्वी बसविलेल्या वायरची पुरेशी क्षमता आहे किंवा नाही याची पडताळणी केली जातेच असे नाही. अशा परिस्थितीत वायरची पुरेशी क्षमता नसेल तर वायर गरम होतात व त्यांचे तापमान आग लागायला कारणीभूत होण्याइतकेदेखील अति उष्ण होऊ  शकते. जर वायरवरील  इन्सुलेशन सामान्य प्रतीच्या पीव्हीसीचे असेल तर ते विषारी धूर ओकते आणि आग पसरवते.

प्रस्तुतच्या उदाहरणात अयोग्य काय झाले ते पाहू. अस्तित्वात असलेल्या विद्युत रचनेत काही फेरफार करावयाचे असल्यास ते परवानाधारक विद्युत कंत्राटदाराने अस्तित्वात असलेल्या यंत्रणेची क्षमता विचारात घेऊन, फेरफार करून त्याचा चाचणी अहवाल विद्युत पुरवठा कंपनीस देणे व त्यांच्या अनुमतीनेच सदर फेरफार केलेली यंत्रणा जोडणे अपेक्षित असते. तसेच संपूर्ण वायरिंगमध्ये वायर, स्विचेस, उपकरणे, इ. केवळ करक मार्क असलेलेच वापरणे अपेक्षित आहे. हॉटेल, हॉस्पिटल, वर्कशॉप, गगनचुंबी इमारती, कार्यालये, नाटय़/ चित्रपटगृहे अशा ठिकाणी ‘आग-निरोधक-कमी-धूर’ (Fire Resistant Low Smoke – FRLS) पीव्हीसीचे इन्सुलेशन असलेल्या वायर वापरणे अत्यावश्यक आहे. या वायर सामान्य वायरपेक्षा महाग असतात; परंतु वर उल्लेखिलेल्या ठिकाणी लोकांची वर्दळ आणि वीजवापर जास्त प्रमाणात होत असतो, त्यामुळे ही काळजी घेणे अनिवार्य आहे. अपघात होण्यापूर्वीच तारा कितपत गरम होतात हे थर्मल इमेजिंगच्या साहाय्याने तपासता येते; जेणेकरून त्यावर उपाययोजना करता येते.

अ‍ॅल्युमिनियम हे तांब्यापेक्षा स्वस्त असल्याने कोठे कोठे वायरिंगसाठी अ‍ॅल्युमिनियम धातूच्या वायर वापरल्या जातात. अ‍ॅल्युमिनियम धातू तांब्यापेक्षा मऊ  असल्याने वीजप्रवाह चालू असताना तारेचे प्रसरण व प्रवाह बंद झाल्यावर आकुंचन होत राहते. त्यामुळे जेथे अ‍ॅल्युमिनियम तार स्क्रूने आवळली असेल तेथे सैल पडते व त्या ठिकाणी ठिणगी पडण्यास सुरुवात होते. त्याची वेळीच दखल न घेतल्यास आगीचा धोका संभवतो.

वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की, साध्या बाबी दुर्लक्षित केल्यास केवढा प्रसंग ओढवू शकतो. त्यासाठी ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणांचे विद्युत सुरक्षा ऑडिट दरवर्षी  होणे आवश्यक आहे.

(सल्लागार- विद्युत प्रणाली)

श्रीनिवास मुजुमदार shrimujumdar@gmail.com

First Published on January 6, 2018 5:58 am

Web Title: fire protection electricity security