14 December 2017

News Flash

फर्निचर : मुख्य दरवाजा

पाहुण्याने डोअर बेल वाजवल्यावर क्षणार्धात आतील स्क्रीन पॅनलवर बाहेरील दृश्य दिसते व व्हिडीओ चालू

अजित सावंत | Updated: February 11, 2017 2:42 AM

दरवाजावरील डिझाइन व फिनिश आपल्या इंटिरिअर डेकोरवर अवलंबून आहे. दरवाजाचे डिझाइन देखभाल करण्यास सोपे असावे. धूळ साचणारे डिझायन टाळावे. हल्ली जो विनियर अथवा जे लॅमिनेट डेकोरमध्ये वापरले जाते, त्याची एक पूर्ण शीट दरवाजास दोन्ही बाजूंनी लावली जाते. हे दिसावयास छान दिसते.

सेफ्टी डोअर अर्थातच सुरक्षा दरवाजा हा आपल्या सुरक्षेच्या गरजेवर असतो. जर गरज नसेल तर सेफ्टी डोअर नाही लावला तरी चालू शकते. पण मेन डोअर म्हणजेच मुख्य दरवाजाला अर्थातच पर्याय नाही. मुख्य दरवाजा हा अत्युत्तम दर्जाचा असणे गरजेचे आहे. हे दरवाजे कमीत कमी ३० एम.एम. जाडीचे असावेत. ३५ एम.एम. जाडीचा असल्यास उत्तम. सेफ्टी डोअर व मेन डोअरसाठी एकाच प्रकारचे दरवाजे वापरले जातात. हे दरवाजे मरीन व कमर्शियलपैकी मरीन प्रकारात मोडतात. हे दरवाजे वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात व आपल्या दरवाजाच्या चौकटीच्या योग्य आकारात ते कापावे लागतात. योग्य आकारात कापल्यावर त्यास चारही बाजूने जाड पट्टी ठोकली जाते. ही पट्टीही खूप चांगल्या प्रतीच्या लाकडाची लावावी. कारण ही पट्टीच दरवाजाचे रक्षण करते. या पट्टीला पॉलिश केले जाते. या पट्टीस जे पॉलिश केले जाते, त्या पॉलिशचा रंग दरवाजाला लावण्यात आलेल्या फिनिशप्रमाणे (विनियर/लॅमिनेट) असते. दरवाजाचे फिनिश आपल्या घराच्या इंटिरिअर स्टाइल अनुसार ठरते. विनियर फिनिश असो वा लॅमिनेट फिनिश ते गडद रंगाचे निवडणे हितावह ठरते. कारण सतत बऱ्याच जणांचे हात या दरवाजास लागत असल्याने दरवाजा मळतो. सतत साफ करणेही होत नाही म्हणून गडद रंगाचा दरवाजा घ्यावा, ज्यावर मळलेला भाग लगेच दिसून येत नाही.

आता आपण हार्डवेअर संदर्भात माहिती घेऊ या. मुख्य दरवाजासाठी हँडर्स, कडय़ा, नाइट लॅच, साखळी, पीप होल व डोअर स्पॉपर्स अशा प्रकारचे हार्डवेअर वापरले जाते. हँडल्स ही आतल्या बाजूचे व बाहेरील बाजूचे अशी दोन प्रकारची असतात. आतील बाजूस लहान आकाराचे व बाहेरील बाजूस मोठय़ा आकाराचे हँडल लावण्याची पद्धत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून दोन्ही बाजूस मोठय़ा आकाराचे हँडल्स लावण्याची सुरुवात झाली आहे. ही हँडल्स अंदाजे १२ इंचांचीच असावीत. हँडल्समध्ये अनेक प्रकारची व्हरायटी बाजारात उपलब्ध आहे. शक्यतो उंच हँडल निवडावे. कारण छोटे हँडल तितकेसे चांगले दिसत नाहीत. हँडलच्या खाली कडी लावली जाते. त्या कडीत मात्र आतील बाजूने छोटय़ा आकाराची व बाहेरील बाजूने मोठय़ा आकाराची कडी वापरली जाते. दोन्ही कडय़ा या चांगल्या दिसण्याबरोबरच मजबूतही हव्यात. हँडल व कडी याच्यामधील भागात नाइट लॅच फिक्स केले जाते. हे नाइट लॅच चांगल्या ब्रँडचे असावे. किमान दोन लिव्हर बोल्टचे असावे. त्याची चावी कम्प्युटराइज्ड असावी व त्याची वॉरंटी असावी. या नाइट लॅचमध्ये देखील बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

दरवाजाच्या मध्यभागी आय लेव्हलवर वाईड अँगलचे पीप होल हवे. या पीप होलमधून दरवाजाबाहेरील बराच परिसर दृष्टीस पडावयास हवा. सेफ्टी डोअर असल्यास त्याच्या ग्रीलचा अंदाज घेऊन पीप होल बसवावे. जेणेकरून पीप होलच्या दृष्टीमार्गात अडथळा येणार नाही. सेफ्टी डोअर नसेल तर पीप होलच्या लेव्हलवर व हँडलच्या वर डोअर चेन म्हणजेच साखळी लावावी. सुरक्षेच्या दृष्टीने ही साखळी गरजेची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे डोअर कॅम अर्थात दरवाजावर लावला जाणारा कॅमेरा. हल्ली डोअर कॅम वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या डोअर कॅममध्ये दरवाजाच्या बाहेरील बाजूस कॅमेरा भिंतीवर स्क्रीन पॅनल असते. पाहुण्याने डोअर बेल वाजवल्यावर क्षणार्धात आतील स्क्रीन पॅनलवर बाहेरील दृश्य दिसते व व्हिडीओ चालू होतो. हे पाहून आपण आलेल्या पाहुण्यासंदर्भात योग्य ती काळजी घेऊ शकता. या डोअर कॅममध्येही बरेच प्रकार उपलब्ध आहेत.

वाऱ्यामुळे दरवाजा आपटल्याने गंभीर इजा होऊ शकते. (बोटं चिमटणे) तसेच दरवाजाही खराब होतो. हे टाळण्यासाठी दरवाजाला डोअर स्टॉपर लावावा. यात दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात डोअर स्टॉपर दोन भागांत विभागलेला असतो. याचा एक भाग ज्या भिंतीवर दरवाजा उघडल्यावर टेकतो, त्या भिंतीवर फिक्स केला जातो व दुसरा भाग दरवाजावर आतील बाजूने फिक्स केला जातो. हे दोन्ही भाग स्कर्टिग लेव्हलवर फिरून केले जातात व हे दोन भाग त्यात असलेल्या मॅग्नेटमुळे एकमेकांस चिकटून राहतात. जेणेकरून दरवाजा भिंतीस टेकवल्यावर आपण प्रयत्न करून बंद केल्याशिवाय बंद होत नाही. या डोअर स्टॉपरच्या प्रकारात दरवाजा पूर्णपणे उघडा राहतो. आपल्यास दरवाजा अर्धवट उघडा ठेवायचा असल्यास दुसऱ्या प्रकारचा डोअर स्टॉपर वापरावा. जो दरवाजास बाहेरील बाजूने फिक्स केला जातो. या स्टॉपरचा वरील भाग दरवाजास फिक्स केला जातो. तर त्याचा खालील भाग जेव्हा गरज असेल तेव्हा जमिनीस चिकटवला जातो. या जमिनीस चिकटणाऱ्या भागास रबराचा बुरा लावला जातो. या रबरी बुरामुळे दरवाजा अडतो. या स्टॉपरमुळे आपण आपल्याला हव्या त्या कोनात दरवाजा उघडा ठेवू शकतो. जरी आपण या दोन्ही प्रकारांतील कोणताही स्टॉपर वापरणार नसाल तरीही एक साधे पीव्हीसी दोन इंच लांबीचे स्कर्टिग लेव्हलवर लावावे. जेणेकरून दरवाजा भिंतीस टेकल्यावर हँडलमुळे भिंतीचा रंग निघणार नाही.

वरील नमूद केलेल्या सगळ्या हार्डवेअरमध्ये क्रोम फिनिश, बफ्ड स्टील फिनिश, ब्रास फिनिश, गोल्डन फिनिश, कॉपर फिनिश, अँटीक फिनिश, रस्टीक फिनिश अशी बरीच फिनिशेस बाजारात उपलब्ध आहेत. आधीच्या काळात गोल्डन म्हणजेच सोनेरी रंगाच्या हार्डवेअरला प्रचंड मागणी होती. गेल्या काही वर्षांपासून बफ्ड स्टील/ मॅट स्टील फिनिश निवडले जाते. गोल्डन फिनिशचे कोटिंग निघू शकते. पण इतर फिनिशेस सहसा खराब होत नाहीत. आपण आपल्या इंटिरिअरप्रमाणे फिनिश ठरवावे.

सेफ्टी डोअर नसेल व मुख्य दरवाजाच्या अगदी बाजूस योग्य भिंतही नसेल तर आपल्या नावाची पाटी ही मुख्य दरवाजावरच लावावी लागते. अशा वेळेस ही पाटी जास्त मोठय़ा आकाराची घेऊ नये. ते तितकेसे चांगले दिसत नाही. नावाच्या पाटय़ांमध्ये हल्ली खूप डिझाइन्स उपलब्ध आहेत. यातील आपल्या आवडीचे डिझाइन काळजीपूर्वक निवडावे. नेमप्लेट अत्यंत महत्त्वाची आहे. दरवाजावरील डिझाइन व फिनिश आपल्या इंटिरिअर डेकोरवर अवलंबून आहे. दरवाजाचे डिझाइन देखभाल करण्यास सोपे असावे. धूळ साचणारे डिझायन टाळावे. हल्ली जो विनियर अथवा जे लॅमिनेट डेकोरमध्ये वापरले जाते, त्याची एक पूर्ण शीट दरवाजास दोन्ही बाजूंनी लावली जाते. हे दिसावयास छान दिसते.

आपल्या घराचे प्रवेशद्वार हे आपल्या घराचे पहिले इम्प्रेशन आहे. त्यामुळे त्याच्या सुशोभीकरणावर अंमळ जास्त मेहनत व पैसा खर्च करण्यास काहीच हरकत नाही.

(इंटिरिअर डिझायनर)

अजित सावंत – ajitsawantdesigns@gmail.com

First Published on February 11, 2017 2:42 am

Web Title: furniture main door