27 January 2021

News Flash

घर सजवताना : फर्निचर मेक-अप

फर्निचर जर लाकडाचे असेल किंवा विनिअरचा वापर केलेले असेल तर त्यावर पॉलिश करणे सयुक्तिक ठरते.

काहीच दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनासोबतच त्यांच्या सौंदर्य जोपासनेबद्दल अनेकविध चर्चा रंगल्या. इतक्या की, अगदी त्यांच्या मृतदेहाला केलेल्या शेवटच्या साजशृंगारापर्यंत. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील तिचं सौंदर्य खुलविण्यात मेक-अपचा किती मोठा वाटा आहे हे उघड केलं होतं.

थोडं बुचकळ्यात पडलात नं? विषय इंटेरिअरचा आणि ही बया कुठे चालीये! पण मी मुळीच भरकटत नाहीए. सांगण्याचा उद्देश इतकाच, मेक-अप जसा मानवी चेहऱ्यावर महत्त्वाचा तसाच तो फर्निचरला देखील करावा लागतो आणि आज आपण त्याचाच विचार करणार आहोत.

मागे काही लेखांमधून फर्निचर बनविण्यासाठी वापरात येऊ शकणाऱ्या निरनिराळ्या उत्पादनांबद्दल बोललो. परंतु लाकडापासून किंवा प्लायवूडपासून अथवा अन्य कोणत्या वस्तूंपासून बनवलेल्या फर्निचरवर पॉलिश, लॅमिनेट किंवा रंगाचा मेक-अप् चढवल्याखेरीज त्याला पूर्णत्व येत नाही.

फर्निचर जर लाकडाचे असेल किंवा विनिअरचा वापर केलेले असेल तर त्यावर पॉलिश करणे सयुक्तिक ठरते. लाकूड तसेच विनिअर या पूर्णत: नैसर्गिक वस्तू असल्याने त्यावरील रेषा, गाठी तेच त्याचे सौंदर्य असते. पॉलिशच्या वापराने हेच सौंदर्य आणखी उठावदार करता येते. खेरीज लाकडात जर कुठे नैसर्गिक खाचखळगे असतील तर पॉलिश करताना ते कौशल्याने भरून काढून लाकडाला आश्चर्यकारक गुळगुळीत, चमकदार स्वरूप मिळते. शिवाय, शेवटी यावर कॉम्प्रेसर मशिनचा वापर करून मॅलॅमाइन पॉलिशचा थर चढविला जातो. या पॉलिशमुळे लाकडावर एक प्रकारचे प्लास्टिकचे आवरण घातल्यासारखे होते. ज्यामुळे लाकडाला पाणी, वारा, इ. पासून संरक्षण मिळते आणि त्याचे रंगरूप थोडा अधिक काळ टिकण्यास मदत मिळते. पूर्वी काही काळ लाकडाचे फर्निचर रंगविण्याचीदेखील प्रथा आली होती. अर्थात आजही आपण ते करूच शकतो; पण मग यामध्ये लाकडाचे नैसर्गिक सौंदर्य लोप पावते. शिवाय लाकडी फर्निचर रंगविण्यासाठी ज्या विशिष्ट रंगांचा वापर केला जातो ते रंग लाकडामध्ये काही प्रमाणात शोषले गेल्याने पुन्हा लाकडाला पूर्वीचे स्वरूप देणे जरा अवघड होऊन बसते. लाकडाचेच आधुनिक स्वरूप म्हणजे विनिअर. विनिअर म्हणजे चांगल्या प्रतीच्या लाकडाचे पातळ पापुद्रेच. बाजारात निरनिराळ्या झाडांपासून तयार केलेले विनिअर मिळते. ज्यांच्या उपयोगाने आपण जणू त्याच झाडाच्या लाकडात फर्निचर बनविल्याचा आव आणू शकतो. याची निवड करताना हे एकाच झाडाचे आणि एकसारख्या रेषा आणि गाठी असणारे निवडून घ्यावे. विनिअरमुळे संपूर्ण लाकडात फर्निचर न बनवताही लाकडात फर्निचर बनविल्याचा आनंद आपण उपभोगू शकतो. यावर मात्र पॉलिशच आवश्यक. जर काही वर्षांनी पुन्हा पॉलिश करत राहिले तर लाकूड काय किंवा विनिअर काय आपल्याला कायमस्वरूपी आनंद देत राहील.

आता थोडं लॅमिनेटकडे वळूयात. खरं तर आता लॅमिनेट हा काही तसा आधुनिक वगैरे प्रकार राहिलेला नाही. प्रत्येक घरात लॅमिनेट लावलेलं काही ना काही फर्निचर मिळेलच. प्लायवूड, पार्टीकल बोर्ड, एम्. डी. एफ, एच. डी. एफ., इ.पासून बनवलेल्या फर्निचरला टिकाऊ आणि सुंदर बनविण्याचं काम लॅमिनेट चोख बजावते. पूर्वीपेक्षा आज बाजारात क्रांती झाल्याप्रमाणे लॅमिनेटचे निरनिराळे प्रकार उपलब्ध आहेत. काही लॅमिनेट तर विनिअरलादेखील मागे टाकतील इतके सुंदर असतात. याची जमेची बाजू म्हणजे  एक तर लॅमिनेट अनेकविध रंगात आणि अनेकविध पोतांमध्ये सहज उपलब्ध होते. शिवाय लॅमिनेट लावल्यानंतर विनिअर अथवा लाकडाप्रमाणे पॉलिशची वगैरे भानगड नसते. अर्थात देखभालीचा खर्च कमी. याला ओल्या कपडय़ाने पुसून काढले तरी चकचकीत नव्यासारखे दिसते.

लॅमिनेट लावत असताना घेण्याची महत्त्वाची काळजी म्हणजे शक्यतो फर्निचरच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूंना लॅमिनेट लावावे. यातून फर्निचरचा टिकाऊपणा तर वाढतोच; पण त्याचसोबत प्लायवूडला वक्रता येत नाही. आणखी एक मुद्दा, जो सर्वसामान्यांना माहीत नसतो, तो म्हणजे लॅमिनेटची जाडी. प्रत्येक कंपनीप्रमाणे लॅमिनेट निरनिराळ्या जाडींत उपलब्ध होते. साधारण २० ते २५ वर्षांपूर्वीपर्यंत सर्रास दीड मि. मी.  जाडीचे लॅमिनेट मिळत असत; परंतु आज मात्र एक मी. मी. जाडीचे लॅमिनेट स्टँडर्ड समजले जातात. क्वचित काही कंपन्या दीड मी. मी. जाडीचेही लॅमिनेट बनवतात. परंतु त्यावरही काही मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता एक मी. मी जाडीचे लॅमिनेट वापरायला काही हरकत नाही; परंतु त्याहून पातळ लॅमिनेट मात्र शक्यतो टाळावे, अगदी स्वस्त असले तरी.

वर नमूद केलेल्या गोष्टी फर्निचरचे रंगरूप तर खुलवतातच, पण त्याचबरोबर फर्निचरचा टिकाऊपणा देखील वाढवायला मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  फर्निचर हाताळण्यायोग्य बनतात. म्हणूनच मी याला फर्निचरचा मेक-अप् म्हणेन.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 1:13 am

Web Title: furniture make up interior design
Next Stories
1 बुलबुल जन्मोत्सव
2 गुढीपाडव्याला ग्राहकांचा परवडणाऱ्या घरांकडे कल
3 स्वच्छतेच्या साधनांमागची मानसिकता!
Just Now!
X