News Flash

फर्निचर : टीव्ही युनिट

या अवजड डिझाइनमध्ये उत्सवमूर्तीनी म्हणजेच टी. व्ही.नेच बदल घडवून आणला. टी.

आपल्या लिव्हिंग रूममधील सगळ्यात महत्त्वाचं फर्निचर म्हणजे ‘टी.व्ही. युनिट’. हे टी. व्ही. युनिट लिव्हिंग रूमचा अविभाज्य घटक आहे. आधीच्या काळात आत्ता जसे टी. व्ही. युनिट असते त्याच्या अगदी विरुद्ध प्रकारे टी. व्ही. युनिट बनवले जायचे. आत्ताचे युनिट हे खूप सुटसुटीत असते तर आधीच्या काळातील युनिट हे खूप मोठे असायचे. एक संपूर्ण भिंत या युनिटमुळे व्यापली जायची. किंबहुना म्हणूनच या युनिटला टी. व्ही. युनिट न म्हणता ‘वॉल युनिट’ असे संबोधले जायचे. या युनिटमध्ये टी. व्ही.बरोबरच इतरही गोष्टींचा भरणा असे. जसे की- व्ही. सी. आर, पुस्तके, देवांच्या मूर्त्यां, व शोपीसेस. या शोपीसनामक वस्तूची पिल्लावळ खूप असे. कोठेही कुटुंबाची सहल गेली की तेथील शो-पीसेस विकत घेतले जात व त्यांची रवानगी वॉल युनिटमधील शोकेसमध्ये होत असे. यातच मुलांनी मिळवलेली मेडल्स व कप्सही दाखल होत व अशा प्रकारे  कालांतराने हे वॉल  युनिट भरगच्च दिसू लागे. अशा प्रकारच्या सजावटीने सजलेले युनिट बरीच र्वष घराघरात दिसत असत. अजूनही काहीजणं हौसेने असे युनिट बनवून घेतात. ज्यांच्याकडे मोठी जागा नसायची ते केवळ टी. व्ही. सेट मावेल एवढा बॉक्स असलेले टीपॉयचे पाय असलेले रेडीमेड युनिट वापरत. या युनिटला लाकडाचे स्लायडिंग शटर असायचे. हे शटर उघडल्यावर युनिटच्या आत स्लाइड होत अदृश्य व्हायचे. टी. व्ही. पाहून झाला की शटर बंद करायचे व यात एक खास बात होती. ती म्हणजे या शटरला चक्क लॉक करायची सोय होती. म्हणजे टी. व्ही. पाहून झाला की बंद करायचा व युनिटदेखील लॉक करायचे. थोडक्यात काय तर आई-बाबा ऑफिसला गेल्यावर घरातील  मुलांना टी. व्ही. पाहणे अशक्य असे. आत्ताच्या काळासारखी त्या काळात टी. व्ही.चा चंगळवाद नव्हता. या युनिटला लॅमिनेटचे फिनिश असायचे तर याआधी वर्णन केलेल्या वॉल युनिटला व्हिनियरचे फिनिश असायचे.

काही वर्षांनी वॉल युनिटचा आकार कमी होत गेला. संपूर्ण भिंतीऐवजी अर्धी भिंत व्यापणारे युनिट डिझाइन लोकप्रिय होऊ लागले. तरीही यात शोकेस नामक प्रकार होताच. यात टी. व्ही.च्या दोन्ही बाजूस शोकेस बनवले जायचे व त्याला काचेची शटर्स असायची. या डिझाइनमध्ये  टी.व्ही. युनिट भिंतीपासून तब्बल दोन ते सव्वादोन फूट पुढे आलेले असायचे. ही एवढी डेप्थ घेणं गरजेचं असायचं, कारण त्या वेळचे टी. व्ही. जवळपास दोन फूट डेप्थचे असायचे. त्यामुळे ही दोन-सव्वादोन फुटांची डेप्थ, जवळजवळ अडीच फुटांची उंची व पाच फुटांची लांबी असे हे बेस युनिट. त्यावर तो टी. व्ही. व टी. व्ही.च्या  बाजूला शोकेस युनिट्स त्यामुळे हे टी. व्ही. युनिटदेखील खूप मोठ्ठे वाटायचे. व मोठय़ा आकारच्या बेस युनिटमुळे रूममधील खूप जागा व्यापली जायची. या बेस युनिटमधील स्टोरेजदेखील भरगच्च असे. यात फुटबॉल, बॅडमिंटन रॅकेट्स्पासून रद्दीपर्यंत वाट्टेल ते स्टोर केले जायचे. एकंदरीत ही टी. व्ही. युनिट्स् केवळ टी. व्ही. युनिट्स नसून मल्टीपर्पज स्टोरेज व डिस्प्ले युनिट्स असायची.

या अवजड डिझाइनमध्ये उत्सवमूर्तीनी म्हणजेच टी. व्ही.नेच बदल घडवून आणला. टी. व्ही.ची डेप्थ दोन फुटांवरून थेट तीन / चार इंचांवर आल्यामुळे टी. व्ही. युनिटची डेप्थदेखील खूप कमी झाली व टी. व्ही. युनिट सुटसुटीत झाले. टी. व्ही. युनिटचा आकार कमी झाला, मात्र टी. व्ही. युनिटमध्ये टी. व्ही. संबंधित गोष्टींची संख्या वाढली. आधीच्या काळात केवळ टी. व्ही. व सुखवस्तू घरात व्ही. सी. आर.  किंवा व्ही. सी. पी. एवढेच टी. व्ही. युनिटमध्ये ठेवले जायचे. अँटेना तर गच्चीवर असायचे. आता मात्र खूप प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् ठेवली जातात. ज्यात टी.व्ही.बरोबर सेट टॉप बॉक्स, व्ही. सी. डी. किंवा  डी. व्ही. डी. प्लेअर, होम थिएटर, अ‍ॅम्प्लीफायर, स्पीकर्स, वुफर, ब्लू रे प्लेअर, प्लेइंग स्टेशन्स असे बरेच प्रकार असतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला लागणारी इलेक्ट्रिक कनेक्शन्स तयार करावी लागतात व या सगळ्याच्या अभ्यासाअंती एक वापरण्यास सोप्पे व दिसावयास सुंदर असे टी. व्ही. युनिटचे डिझाइन तयार करता येते.

क्रमश:

(इंटिरियर डिझायनर)

अजित सावंत ajitsawantdesigns@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:25 am

Web Title: furniture tv units tv cabinet
Next Stories
1 बांधकामाची स्ट्रक्चरल डायरी सक्तीची हवी
2 रंगविश्व : टेश्चर पेंट
3 घर सजवताना : जागेचे सुनियोजन
Just Now!
X