News Flash

‘नकोत नुसत्या भिंती’ घनकचरा एक समस्या

वाढत्या शहरीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापन दिवसेंदिवस फारच कठीण समस्या होत चालली आहे.

घर कितीही छान व स्वच्छ असले तरी घराच्या बाहेरील वातावरणात दरुगध दिवसरात्र रेंगाळत असतील तर त्या सुंदर घराचा आनंद मिळणे अवघड आहे! मुलुंड, देवनार, कांजूर इत्यादी भागांमध्ये याचा प्रचंड त्रास गेली अनेक वर्षे लोकांना सहन करावा लागत आहे. कचऱ्याचा प्रश्न फक्त शहरामध्येच आहे असे नाही, तर औद्योगिक क्षेत्रातदेखील त्याने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे. विशेषत: रासायनिक उद्योगांमधून जो कचरा निघतो त्याला जमिनीखाली गाडतात व मग त्याला मातीने झाकतात आणि त्यावर हिरवळ लावून सांगतात, की आम्ही या आरोग्याला अपायकारक असलेल्या कचऱ्याचे नियोजन केले आहे! वास्तविक या पद्धतीने आपण एका नव्या टाइम बॉम्बचा सुरुंग लावून ठेवत आहोत याकडे माहितगार सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

वाढत्या शहरीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापन दिवसेंदिवस फारच कठीण समस्या होत चालली आहे. या विषयावर वारंवार अनेक परिसंवाद घेतले जातात, चर्चासत्रे आयोजित केली जातात, मोठमोठे प्रकल्प लावण्याच्या गोष्टी केल्या जातात, पण वास्तवात मात्र त्याचे दृश्य परिणाम कुठे फारसे जाणवत नाहीत. कारण समस्या समजावून घेण्याची तयारी कुणीच दाखवत नाही. डम्पिंग क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच चालली आहे, हेच वास्तव आहे. सामान्य माणसाची उदासीनता आणि शासनाची हतबलता यातून हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. डम्पिंग क्षेत्रातून येणाऱ्या प्रचंड दरुगधीमुळे त्या परिसरात राहाणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून आरोग्यविषयक समस्यादेखील निर्माण होत आहेत. घर कितीही छान व स्वच्छ असले तरी घराच्या बाहेरील वातावरणात हे असले दरुगध दिवसरात्र रेंगाळत असतील तर त्या सुंदर घराचा आनंद मिळणे अवघड आहे! मुलुंड, देवनार, कांजूर इत्यादी भागांमध्ये याचा प्रचंड त्रास गेली अनेक वर्षे लोकांना सहन करावा लागत आहे. कचऱ्याचा प्रश्न फक्त शहरामध्येच आहे असे नाही, तर औद्योगिक क्षेत्रातदेखील त्याने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे. विशेषत: रासायनिक उद्योगांमधून जो कचरा निघतो त्याला जमिनीखाली गाडतात व मग त्याला मातीने झाकतात आणि त्यावर हिरवळ लावून सांगतात की आम्ही या आरोग्याला अपायकारक असलेल्या कचऱ्याचे नियोजन केले आहे! वास्तविक या पद्धतीने आपण एका नव्या टाइम बॉम्बचा सुरुंग लावून ठेवत आहोत याकडे माहितगार सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
‘निसर्गऋण प्रकल्पा’ची निर्मिती करून आता १५ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात राहाणाऱ्या समाजात निर्माण होणाऱ्या जैविक टाकाऊ पदार्थाचे विघटन घडवून त्यांच्यापासून मिथेनच्या स्वरूपात ऊर्जा व खत निर्मिती केली तर त्यातील दरुगधी तर संपतेच, शिवाय योग्य मार्गाने कचऱ्याचे निराकरण होऊन त्यातून विविध मूलतत्त्वांच्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या पुनर्चक्रांकणाला चालना मिळते. समाजमनात हा प्रकल्प रुजण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल असे वाटते. कारण कचऱ्यावर प्रक्रिया ही संकल्पनाच दखल घेण्यासारखी आहे असे अजून सर्वसामान्य नागरिकाला वाटत नाही. त्याच्या मानसिकतेत ते बसत नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेला पैसे खर्च केलेले दाखवायचे असतात तेव्हाच हा प्रकल्प आठवतो. तो चालला काय किंवा न चालला काय याचा फारसा फरक त्यांना पडत नाही.
आज या घन कचऱ्याच्या समस्येचे आणखीन काही पैलू आपल्याला बघायचे आहेत. त्यातून ही समस्या विविध क्षेत्रांमध्ये कशी मुळापासून रुजली आहे आणि ती समाधानपूर्वक सोडविण्याच्या दृष्टीने कोणीच कसे मनापासून प्रयत्न करीत नाही हे लक्षात येईल. काही ठिकाणी ही समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातात, पण त्याला म्हणावे तसे प्रोत्साहन मिळत नाही. आमच्याकडे काही वर्षांपासून जवाहरलाल पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयातून विचारणा करण्यात आली होती, की बंदरात आयात करणाऱ्या देशांनी नाकारलेला बराच माल पडलेला आहे. त्यातील जैविक विघटन होण्यासारखा माल खूप मोठय़ा प्रमाणावर मोठमोठय़ा कंटेनर्समध्ये बंदिस्त आहे. कस्टम्सचे त्याबाबतीतले नियम अतिशय कडक आहेत व त्या मालाचा नाश फक्त कस्टमच्या देखरेखीखाली झाला पाहिजे. हा सारा माल त्यांच्या नियमाप्रमाणे जाळला जाऊन नष्ट झाला पाहिजे. एक शास्त्राचा विद्यार्थी या नात्याने कोणतीही स्रोतरूपी गोष्ट जाळणे हा माझ्या दृष्टीने आपण निसर्गाशी केलेली प्रतारणा आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण कोणताही स्रोत जाळला तर त्यातून पुन्हा जैविक स्वरूपात पदार्थ परत मिळविण्यासाठी निसर्गाला अनेक शतके लागतात. पण जर त्याचे जैविक विघटन घडवून आणले तर मात्र ते सर्व पदार्थ केवळ काही महिन्यांनी चक्रात परत येतात हा निसर्गनियम आहे. या निसर्गनियमाला हरताळ फासण्याचा अधिकार आम्ही जो स्वत:कडे घेतला आहे त्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही. केवळ सोय म्हणून तो स्वीकारला गेला आहे. कस्टम्सच्या याबाबतीत नाकारलेल्या मालावर प्रक्रिया आमच्याकडे होऊ शकेल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी आम्ही याबाबतीत काही मदत करू शकतो का, अशी विचारणा केली होती. प्रायोगिक तत्त्वावर हे करून पाहायला हरकत नाही म्हणून आम्ही काही गोष्टींवर आमच्या ‘निसर्गऋण प्रकल्पा’त प्रक्रिया करू शकतो असे सांगून अनुकूलता दर्शविली. बरेचसे सोपस्कार पार पडल्यावर आमच्या प्रकल्पात आम्ही प्रथम ५६ टन आंब्याच्या रसावर प्रक्रिया केली. हा हापूस आंब्याचा रस जपानला निर्यात केला गेला होता आणि केवळ त्यावर लिहिलेल्या वापराच्या कमाल मर्यादेपेक्षा २ ते ३ दिवस अधिक झाले होते म्हणून जपानी अधिकाऱ्यांनी तो नाकारला. या रसाची २५ किलो वजनाची पाकिटे उघडून ते आमच्या प्रकल्पात टाकताना आमच्या कामगारांना देखील अतिशय वाईट वाटत होते. कारण एवढय़ा महागमोलाचा तो फळाच्या राजाचा रस असा जावा हे पाहणे सर्वासाठीच अतिशय क्लेशदायक होते. पण निदान हा रस जाळला न जाता त्याचे विघटन होऊन त्यातील मूलतत्त्वांचे योग्य मार्गाने पुनर्चक्रांकण होत होते ही बाब तेवढीच महत्त्वपूर्ण होती. शिवाय तो ५६ टन रस जाळण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागली असती आणि त्यातून हवेचे प्रदूषण झाले असते ते वेगळेच! ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि स्रोत पुनर्चक्रांकण अशा तीन गोष्टी या प्रयत्नांतून साध्य झाल्या ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर अशा अनेक गोष्टी आमच्याकडे नष्ट करता येतील का, यावर विचारणा होऊ लागली. या समस्येचे गांभीर्य आणि अक्राळविक्राळ स्वरूप त्यातून जाणवते व जाणवत राहते, की आपली खरोखर प्रगती होत आहे की आपली वाटचाल नाशाच्या दिशेने चालू आहे! जुने नियम, प्रदूषणविषयक उदासीनता, सृष्टीच्या स्रोतांचा बेसुमार गैरवापर यातून आम्ही नेमके काय साधत आहोत?
काही वर्षांपूर्वी आमच्याच राजस्थानमधील एका जड पाणी प्रकल्पात या घनकचऱ्यामुळे एक आणीबाणीचा प्रसंग उद्भवला होता. रावताभाटा येथील या प्रकल्पात ३३ मीटर उंचीच्या एका हवाबंद टाकीत प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यातील पाण्याच्या प्रवाहात फरक जाणवला म्हणून त्यांनी तो उघडून पाहिला. या प्रचंड मोठय़ा टाकीत खालपासून वपर्यंत एकावर एक विशिष्ट प्रकारच्या स्टीलच्या चाळण्या रचलेल्या होत्या व या प्रत्येक चाळणीमध्ये एका जिलेटीनसारख्या पदार्थाचा १ ते २ इंचापर्यंत जाड थर बनला होता. या थरामुळे पाण्याच्या प्रवाहाची गती अतिशय मंद झाली होती व त्यामुळे प्रकल्पाची क्षमता एकदम कमी झाली. हा थर नेमका कशाचा आहे याविषयी कोणीच काही सांगू शकत नव्हते. कारण त्यातील पदार्थ धड ना प्रथिनं, ना कर्ब पदार्थ, ना मेद वाटत होता. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या समस्येचे निराकरण कसे करावयाचे यावर खूप मोठी चर्चा झाली होती व त्यासाठी प्रचंड पैसा लागेल असे अनेक खाजगी कंपन्यांनी सांगितले होते. त्या प्रचंड टाकीतील सर्व चाळण्या बाहेर काढून त्या धुणे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यामुळेही प्रकल्प अधिकाऱ्यांची कोंडी होत होती. शिवाय हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून काय करावयाचे या समस्येचे देखील उत्तर हवे होते. त्यावेळी ‘निसर्गऋण प्रकल्पा’ची निर्मिती होऊन चार-पाच वर्षे होऊन गेली होती म्हणून जड पाणी प्रकल्पातील माझ्या सहकाऱ्याला माझी आठवण झाली व त्याने त्या पदार्थाचे नमुने मला आणून दिले व त्यावर माझे मत विचारले.
प्रयोगशाळेत थोडा वेळ खर्च केल्यावर माझ्या असे लक्षात आले, की हा पदार्थ जरी जैविक असला तरी त्यात काही प्रमाणात तरी काही रेसिन्स मिसळली असावीत म्हणून तो प्लास्टिकसारखा बनला होता व पाण्याचा प्रवाह पुढे जाऊ देत नव्हता. या टाकीत पाणी येण्यापूर्वी ते रेसिन्सच्या कॉलम्समधून गाळून येते असे आम्हाला चौकशी केल्यावर समजले. आमच्या ‘निसर्गऋण प्रकल्पा’तील एरोबिक टाकीतील सूक्ष्म जीव वेगळे करून त्यांना प्रयोगशाळेत मोठय़ा प्रमाणावर वाढविले व त्यांच्या हवाली हा पदार्थ केला. आणि जादूची कांडी फिरवावी तसा तो पदार्थ केवळ ४८ तासांत विरघळून गेला. प्रयोगशाळेतील हा परिणाम रावतभाटय़ाच्या माझ्या सहकाऱ्यांना दिलासा देऊन गेला. मात्र माझी काळजी त्याने वाढविली! कारण त्यांच्या अपेक्षा वाढल्या व माझ्या नाडीचे ठोके वाढले! पण सूक्ष्म जीवांवरचा माझा जबरदस्त विश्वास असल्यामुळे मी पुढची तयारी सुरू केली.
कोणतीही गोष्ट प्रयोगशाळेत सिद्ध झाली म्हणजे ती प्रत्यक्ष मैदानावर कार्य करील याची खात्री देता येणे शक्य नसते. प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरण व प्रत्यक्षातील वातावरण यातील फरक, तिथे असलेला संमिश्र सूक्ष्म जीवांचा समूह, त्यांचे परस्पर सहकार्य किंवा विरोध, इतर सजीव सृष्टीचा त्या वातावरणावर असलेला प्रभाव इत्यादी अनेक कारणांमुळे साध्य सिद्ध होत नाही. म्हणूनच मला अधिक काळजी वाटत होती. पण या प्रयोगावर बरेच काही अवलंबून होते म्हणून आता मागे हटायचे नाही असे ठरविले व आमच्या विरजणाचा साठा घेऊन निघालो. तिथे एका मोठय़ा पातेल्यात पिठाचे पाणी बनवून ते विरजण तर लावले. दुसऱ्या दिवशी त्याला जो वास आला तो घेतल्यावर लोकांनी नाके मुरडली व त्यांच्या चेहऱ्यावर सहानभूती, दया, राग आणि निराशा हे सर्व भाव मला स्पष्ट दिसले. काहीही न बोलता मी अजून ४ मोठय़ा पातेल्यांमध्ये पिठाचे पाणी करून ते सूक्ष्म जीवांचे मिश्रण त्यात कालवून ठेवले. तिसऱ्या दिवशी माझ्याबरोबर फक्त माझा सहकारी राहिला होता. आम्ही दोघांनी ते मिश्रण त्या ३३ मीटर उंचीच्या टाकीमध्ये ओतले. टाकीत पूर्ण पाणी भरले व दोन दिवस टाकी उघडू नका असे सांगून आम्ही परत मुंबईला आलो. पाचव्या दिवशी तिकडून फोन आला तो आमचे अभिनंदन करणारा! त्यांच्या दृष्टीने ती सर्व टाकी चार दिवसांत स्वच्छ होणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. पण तसे झाले होते. प्रत्येक चाळणीला चिकटलेला तो कठीण पदार्थ विरघळला होता. मग फक्त पाणी जोरात मारून टाकी स्वच्छ केली. नंतर त्यात बरीच वर्षे असा काही त्रास झाला नाही. सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून निर्माण झालेला हा प्रश्न सूक्ष्म जीवांनीच सोडविला. सूक्ष्म जीवांची मारक आणि तारक ताकद किती प्रचंड आहे याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 6:32 am

Web Title: garbage problem in residence
Next Stories
1 गृहनिर्माण नियामक आयोग सदनिका खरेदीदारांसाठीचा आशेचा किरण
2 सुरक्षित स्वयंपाकघर
3 मायेची ऊब देणारं घर!
Just Now!
X