सणासुदीच्या काळात घरखरेदी शुभ मानली जाते. अशा वेळी अनेक विकासक आपली घरे विकली जावीत या हेतूने घरखरेदीवर भरपूर सवलती देतात. सद्य:स्थितीत परवडणाऱ्या घरांची मागणी अधिक आहे. अशात मुंबईत एखादे घर घेणे हे सामान्यांसाठी सोपे नाही. गुढीपाडवा, दिवाळी अशा अनेक मुहुर्तावर ग्राहक घरांचे बुकिंग करतात. सरकारच्या सर्वासाठी घर या योजनेला अनुसरून अनेक विकासक त्या दृष्टीने घरबांधणी करत आहेत. ठाणे, कल्याण, अंबरनाथ पलीकडे काही विकासक १५ ते २० लाखांत घरे देत आहेत. नोटबंदी, रेरा व जीएसटीनंतर सर्वात मोठा फटका बसला तो रिअल इस्टेट क्षेत्राला. त्यानंतर या क्षेत्राची परिस्थिती अधिकाधिक ढासळतानाच दिसली. मात्र सरकारच्या योजना किंवा ग्राहकांचा घर घेण्याकडे वाढता कल यामुळे रिअल इस्टेटला उभारी येत असल्याचे चित्र सध्या आहे. घरांच्या विक्रीत किमान ६ ते १० टक्के वाढ होईल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी वर्तवली होती. संपूर्ण महाराष्ट्रात पाहावे तर गृहविक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत इतर ठिकाणांपेक्षा प्रतिसाद थोडा कमी होता. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईत घरांच्या वाढत्या किमती हेच आहे. मुंबईत जागांचे दरही झापाटय़ाने वाढत आहेत. त्यात किमान १ कोटींपेक्षा कमी किमतीत घर मिळवण्यासाठी ग्राहकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. बोरिवली, मुलुंडमधील प्राइम लोकेशनसाठी, ठाण्यात अशा ठिकाणी ग्राहकांना अनेक बडय़ा व आकर्षक किमतीत घरे मिळत आहेत. परवडणारी घरे ही ग्राहकांना कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ तसेच नवी मुंबईतील उलवे, पनवेल अशा ठिकाणी मिळत आहेत. या ठिकाणी सरकारचे अनेक प्रस्तावित प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीतही ग्राहक भविष्याच्या दृष्टीने घरे विकत घेत आहेत.

दुसरीकडे, घर घेण्यासाठीही कल्याणपलीकडे देखील ग्राहकांचा कल आहे. कारण अगदी कमी किमतीत त्यांना सर्व सोयीसुविधांसह घरे या ठिकाणी मिळत आहेत. राहण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी देखील ग्राहक सरसावत आहेत. ८० टक्के ग्राहक हे राहण्यासाठी घर घेत आहे, तर २० टक्के ग्राहक गुंतवणूक करत आहे. जेवढी बुकिंग एका महिन्याभरात होत होती, ती गुढीपाडव्याच्या एका दिवसात झाली आहे, अशी माहिती हावरे बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिकेत हावरे यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये मात्र हे चित्र अगदी उलट आहे. यावर्षी मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे गृहविक्रीला प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गृहविक्रीमध्ये २० टक्क्यांपर्यंत घरखरेदीत वाढ झाली होती. मात्र यावर्षी हा आकडा १० टक्क्यांपर्यंतदेखील पोहोचला नाही अशी माहिती साई इस्टेट कन्सलटंटचे अमित वाधवानी यांनी दिली. त्याचप्रमाणे विरार, भाईंदर या ठिकाणी गृहविक्रीमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

घरविक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीसा दिलासा या क्षेत्राला तसेच विकासकांना मिळाला असल्याचे एकता वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक व नरेड्कोचे उपाध्यक्ष अशोक मोहनानी यांनी सांगितले. विकासक सध्या कॉम्पॅक्ट हाऊसिंग व नॅनो हाऊसिंग या संकल्पनेकडे वळताना दिसत आहेत. तेव्हा जे ग्राहक लक्झुरी हाऊसिंगमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा उत्तम कनेक्टिव्हिटीसह अशा कॉम्पॅक्ट घरांकडे पाहतात त्यांच्यासाठी देखील हा गुढीपाडवा सुवर्णसंधी होती, अशी माहिती निर्मल लाइफस्टाइलचे धर्मेश जैन यांनी दिली आहे. पहिल्यांदा घर घेणारा ग्राहक पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र असल्याने विकासकांना नक्कीच या योजनेचा आधार मिळाला आहे असेही त्यांनी सांगितले. एकंदर यावर्षीचा गुढीपाडवा हा परवडणाऱ्या घरांसाठीचा ठरला आहे. परिणामी, ग्राहकांनाही याचा मोठा लाभ झाला आहे. येत्या नववर्षांत अशाच प्रकारे रिअल इस्टेट क्षेत्राला नवसंजीवनी मिळाल्यास या क्षेत्रातील मंदीचे सावट दूर होण्यास मदत होईल.

vasturang@expressindia.com