News Flash

रिअल इस्टेट क्षेत्राला गुढीपाडव्याची संजीवनी!

घरांच्या विक्रीसाठी विकासक नेहमीच दिवाळी, पाडवा अशा सणांची वाट पाहत असतात.

रिअल इस्टेट क्षेत्राच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागणार आहे.

निश्चलनीकरणामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला अवकळा आली असून, गृहविक्रीमध्ये जवळजवळ ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. गुढीपाडवा या गृहविक्रीला नवी संजीवनी देईल अशी अशा विकासक बाळगून आहेत.

घरांच्या विक्रीसाठी विकासक नेहमीच दिवाळी, पाडवा अशा सणांची वाट पाहत असतात. निश्चलनीकरणानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला अवकळा आली असून, गृहविक्रीमध्ये जवळजवळ ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु यंदाचा गुढीपाडव्याचा सण मात्र या क्षेत्रासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

स्थावर-जंगम मालमत्तांवरील दीर्घकालीन उत्पन्न कराचा होल्डिंग कालावधी कमी करणे, तसेच नॅशनल रेंटल उत्पन्नावरील एका वर्षांचा कर माफ करणे.. यांसारख्या विविध उपाययोजना सरकारने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्यासारखा पारंपरिक सणाचे औचित्य साधून विकासकांनी गृहविक्री वाढवण्यासाठी काही विशेष सवलती दिल्या तर त्यात काहीही आश्चर्य नाही.

विकासक आपले प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  सोशल मीडियासारख्या विविध प्रसारमाध्यमांचा वापर करीत आहेत. गुढीपाडव्यासारख्या पवित्र सणाच्या दिवशी कोणतीही नवी सुरुवात करू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. याआधीच सांगितल्याप्रमाणे, मालमत्ता बाजारपेठेला आलेल्या अवकळेमुळे सक्षम गृहग्राहक शोधण्यासाठी विविध विकासक आकर्षक अशा सवलती ग्राहकांपुढे ठेवत आहेत. गुढीपाडव्यासारख्या सणासुदीच्या दिवसानिमित्त लढवलेल्या विविध शक्कलींचे सकारात्मक परिणाम कदाचित त्वरित पाहायला मिळणार नाहीत; परंतु असे सण विकासकांसाठी एक नवी आशा घेऊन येत असतात, यात शंका नाही.

गृहखरेदीदार या सणाचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो. परंतु त्याबाबत त्याने सजग असणे आवश्यक आहे.

सध्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आलेली उदासीनता ही नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्या  ग्राहकांच्या पथ्थ्यावरच पडणार आहे. कारण घरखरेदीवर सोन्याची नाणी, स्टॅम्प डय़ुटीची रक्कम विकासक भरणार, कौटुंबिक सहल, सज्ज स्वयंपाकगृहासारख्या विविध सवलती विकासकांकडून ग्राहकांना दिल्या जात असल्याने सध्याचा काळ हा ग्राहकांच्या फायद्याचा काळ आहे. विकासक देत असलेल्या विविध सवलीतींपैकी काही सवलती या केवळ विपणनासाठी दिल्या गेल्या असतील. किंवा काही खरोखर आकर्षक असतील. त्यामुळे ग्राहकांनी याविषयी सखोल माहिती करून घेऊन मगच योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या योजनांविषयी तज्ज्ञांचे सल्ले घेणे केव्हाही हितावह ठरते.

इतकेच नव्हे, तर गृहकर्जदारही विविध सवलती देण्याच्या मागे आहेत.

ईएमआय हॉलीडे, ईएमआय रिसेट, प्रक्रिया शुल्कात माफी, व्यवहार कागदोपत्री करण्याचे शुल्क माफ करणे, अल्प व्याजदर आदी योजना ते ग्राहकांपुढे ठेवत आहेत.  ग्राहकांनी मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी  सर्व कागदपत्रे व्यवस्थित वाचून घेणे आवश्यक आहे. मालमत्तेचे विविध पर्याय आणि वित्तसाहाय्याचेही अनेक पर्याय ग्राहकांसाठी खुले असल्याने ग्राहकांना आपल्या आवडीची मालमत्ता सहज निवडण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. असे असले तरीही, कोणत्याही आकर्षक योजनेला बळी पडून ग्राहकाची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने या योजनांचा व सवलतींचा सजगपणे अभ्यास करणे गरजेचे आहे.

– कल्पेश दवे

कॉर्पोरेट प्लानिंग अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी, अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 3:25 am

Web Title: gudi padwa festival create positive impact to invest in real estate sector
Next Stories
1 मोबाइल टॉवर्स, फलक उत्पन्न ५०% रक्कम सिंकिंग फंडमध्ये गुंतवणे आवश्यक!
2 केरळ : स्थापत्यशैलीची वास्तुसंस्कृती
3 बूच आणि फुलवात..
Just Now!
X