20 September 2020

News Flash

अहमदाबादचा वास्तुवैभव वारसा

गेल्या सहा दशकांमध्ये अहमदाबाद या ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या शहराने आता औद्योगिक नगरीचा चेहरा धारण

गेल्या सहा दशकांमध्ये अहमदाबाद या ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या शहराने आता औद्योगिक नगरीचा चेहरा धारण केल्यावर येथील नगररचनेत बदल होणे स्वाभाविक आहे. आता स्वयंपूर्ण-सुसज्ज अशा अनेक इमारती उभ्या राहात आहेत. त्यातूनही या विशाल नगरीचे वेगळेपण दिसतंय. या पाठीमागे फ्रेंच वास्तुविशारद ला-कार्बुझिए, चार्लस् कोरिया, बाळकृष्ण दोशी आणि अच्युतराव कानविंदे या जगविख्यात वास्तुविशारदांची कल्पकता आणि दूरदृष्टीची इतिहासाने दखल घेतलीच आहे.

महाराष्ट्राचा शेजारी कर्नाटक प्रदेश जसा शिल्पवैभवात मशहूर आहे, तसेच गुजरात भूमीवरील अजोड शिल्पकामही त्या प्रांताची ओळख आहे. या दोन्ही प्रदेशांवर अधिसत्ता असलेल्या राजघराण्यांच्या वैभवशाली कारकीर्दीचे प्रतिबिंब येथील शिल्पवैभवावर पडणे तसे स्वाभाविक आहे. येथील प्रत्येक सत्ताधीशाने आपल्या कल्पनेनुसार तसेच त्यांच्या धर्माच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे निर्माण केलेली शिल्पकामे वास्तुकारागिरी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी आढळते. महाराष्ट्राच्या सीमेवरील संजाणपासून थेट कच्छच्या रणापर्यंत निर्माण केले गेलेले हे शिल्पकाम म्हणजे पर्यटकांचे आकर्षण असल्याने त्यांचा तेथील स्थळदर्शनात समावेश आहेच..

गुजरातमधील शिल्पकलेत खास करून वाखाणली गेली ती म्हणजे अहमदाबाद वास्तुशैली. भारतीय-इस्लामी वास्तुकलेचा मनोहारी आविष्कार गुजरातमधील घोलका, भरुच, चंपानेर, खंबायत येथे जरी पाहावयास मिळत असला तरी आजच्या आधुनिकतेचा अंगीकार करणाऱ्या अहमदाबादने हे वैभव आजही सांभाळले आहे. ही वास्तुकला पाहताना हिंदू, जैन वास्तुकलेवर आक्रमक इस्लामी वास्तुशैलीचा प्रभाव असल्याचे जाणवते. गुजरात प्रांत इस्लामी अधिपत्याखाली गेल्यावर दोन संस्कृतींच्या अनोख्या संगमातून येथील वैभवशाली इमारती आणि प्रार्थनास्थळं निर्माण झाली आहेत..

आक्रमकांपैकी अल्लाउद्दीन खिलजीचा सुभेदार मुजप्फरखान हा मूळ राजपूत वंशीय असल्याने त्याला गुजरातमधील सोळंकी राजघराण्याच्या काळातील अलौकिक, भव्य वास्तूंबद्दल प्रेम होते. (जशी ब्रिटिशांना ‘गॉथिक’ वास्तुशैलीची भुरळ पडली होती.) या सोळंकी साम्राज्यकाळातील वास्तुशैलीवर चालुक्य काळातील कलापूर्ण बांधकामाचा प्रभाव होता. मात्र मुजप्फरखान स्वकर्तृत्वावर स्वतंत्र झाल्यावर त्याने आपल्या अधिकारात ज्या ज्या शहरांची निर्मिती केली त्यातील मशिदी, कब्रस्ताने, आकर्षक बागबगिचे, किल्ले, राजवाडे उभारले. त्यातील बांधकामात वास्तुसौंदर्याबरोबर पारंपरिक पद्धतीचा वापर करण्याचे स्वातंत्र्य कलाकारांना दिले होते. हा काळ म्हणजे १५व्या शतकाचा उत्तरार्ध होता.

प्रचंड बांधकामाचे वजन पेलणारे भव्य स्तंभ आणि त्यावरील आडव्या तुळया येथील बांधकामात आढळतात. तसेच या बांधकामात पिवळ्या रंगाची वाळू आणि संगमरवराचा वापर करून त्याला आकर्षकता आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र येथे विटांचे बांधकाम अभावानेच आढळते. बांधकामाची भव्यता साधताना ते अधिकाधिक चित्ताकर्षक करण्यासाठी त्यावर विविध आकारांची निसर्गचित्रं तर स्तंभावरील कंठमाळा, घंटामाळा, सूर्यकमळाची प्रतिकृती चितारण्यात कलाकारांचे कसब नजरेत भरते.

देशातील पुरातन लेण्या, अन्य शिल्पकाम साकारताना येथील दूरदृष्टीच्या कलाकारांनी  त्या त्या ठिकाणचे हवामान आणि पर्यावरणाचा अभ्यास केलाय. अहमदाबाद वास्तुशैलीतील स्तंभावरील कलापूर्ण पडदासदृश बांधकामामुळे छायाप्रकाशाचा मेळ साधला गेलाय. उन्हाळ्यातील उष्ण वारे आणि सूर्यप्रकाशाची दाहकता कमी करण्यासाठी कोरीव कामाच्या जाळ्यांचा अनेक ठिकाणी वापर केलेला आढळतो. इमारतीचे सज्जे तसेच विहिरींच्या बांधकामातही हे जाळीकाम दिसते. एकाच ठिकाणी या बांधकामशैलीचे वैशिष्टय़ पाहावयाचे असेल तर सिद्दी सय्यदच्या मशिदीची आंतरबाह्य़ रचना जरूर पाहावी.

व्यापारी-सुखवस्तू लोकांची हवेली स्वरूपाची गृहरचना हेसुद्धा अहमदाबादचे वेगळेपण दाखवते. हवेली वास्तूंतून नक्षीकामाचे सुरक्षित दरवाजे आणि वेगवेगळ्या भागांतील सज्जे हे त्यांचे वैशिष्टय़ आहेच. उन्हाळ्यातील उष्ण हवेची तीव्रता जाणवणार नाही त्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी हवेलीची रचना त्या वेळच्या वास्तुविशारदांनी केली आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाप्रमाणे ‘तीन दरवाजा’ ही वास्तू म्हणजे अहमदाबाद नगरीचा मानबिंदूचा त्याला लौकिक आहे. अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या वैभवाच्या पाऊलखुणा मिरवताना इतिहासाचा साक्षीदार राहावे म्हणून उभारलेल्या वास्तूंपैकी ही वास्तू म्हणजे विजयद्वार म्हणून ओळखली जाते. यातील तिन्ही कमानींची उंची एकसारखी आहे. पण मधली मात्र जरा जास्त रुंद आहे. सुलतान अहमद शहाने इ.स. १४११ मध्ये साबरमती नदीकिनारी अहमदाबाद शहर वसवले तेव्हा अनेक इमारतींसाठी स्थानिक मधाच्या रंगाच्या दगडाचा वापर केलाय. त्यात आकर्षकपणा साधण्यासाठी इंडो सोरासेनिक वास्तुशैलीचा आधार घेतल्याचे जाणवते.

वेरुळ येथील लेण्यांप्रमाणे अहमदाबाद नगरीतील ऐतिहासिक इमारतींवर हिंदू, जैन, इस्लामी कलाकृतीचा सुनहरा संगम जाणवतो. मशिदीच्या बांधकामातून मध्य भागातील उंची दोन्ही बाजूंस कमी कमी झालेली दिसते. तर सभागृहातील स्तंभ एकमेकांवर उभारले गेलेत. धार्मिक स्थळांमध्ये राणी सिप्रीच्या दग्र्यातील कबर आणि समोरील मशिदीवर अप्रतिम कलाकृती पाहावयास मिळते.

हैदराबाद, भोपाळ, दिल्लीप्रमाणे अहमदाबादची जामा मशीद मोगल-हिंदू वास्तुसौंदर्याचा देखणा आविष्कार आहे. इ.स. १४२३ मध्ये अहमदशहाने ही टोलेजंग वास्तू बांधली. २१० फूट लांब, ९५ फूट रुंद अशी २५५ खांबांवर उभी असलेली ही इमारत म्हणजे अहमदाबाद शहराची शान आहे. इस्लामी बांधकामात घुमट वास्तुकलेला अनन्यसाधारण  स्थान आहे. येथील दमीर खानच्या कबरीवरील विटांनी बांधलेल्या घुमटाची रचना विजापूरच्या गोल घुमटाची आठवण करून देणारी आहे.

गुजरातच्या पूर्वापारच्या शासनकर्त्यांनी जलसंवर्धनाचे मोल जाणले होते. पाटणनजीकची ‘रानी की बाव’ आणि  मोदेरा सूर्यमंदिरासमोरील जलाशयासाठी निर्माण केलेले अप्रतिम बांधकाम हेच दर्शवते. अहमदाबादमधील ‘दादा हरीकी बाव’ ही विहीर आणि विशाल कांकरिआ तलाव बांधकामातून शास्त्यांची कल्पकता दिसते. ‘अदा लज बाव’ ही विहीर इ.स. १४९९ मध्ये राणी रुडाबाईच्या काळात बांधली गेली. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून हिचे बांधकाम हाती घेण्यात आले.

अहमदाबादमधील दिलखेच मंदिर बांधकामामध्ये जैन मंदिराचे सौंदर्य लाजवाब आहे. जैन वास्तुप्रकारच्या हाथीसिंग मंदिरासाठी संगमरवरी दगडावरील कोरीवकाम व त्यावरील घुमट-मनोरे म्हणजे या वास्तुसौंदर्याचा अनोखा नमुना आहे. धर्मनाथ या जैनांच्या १५व्या र्तीथकराच्या नावाने हे मंदिर बांधले गेले.

मध्ययुगीन काळातील भलेभक्कम तट आणि प्रवेशद्वारे हे येथील इतिहासाचे साक्षीदार आहेत. कलाकुसरीची कामं करणाऱ्या कारागीर आणि व्यापारी वर्गासाठी जी वसाहत त्या काळी निर्माण झाली त्याचे अवशेष आजही आढळतात.. त्यातून त्या वेळच्या निवासी बांधकामाची कल्पना येते.

स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या सहा दशकांमध्ये अहमदाबाद या ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या शहराने आता औद्योगिक नगरीचा चेहरा धारण केल्यावर येथील नगररचनेच बदल होणे स्वाभाविक आहे. आता स्वयंपूर्ण-सुसज्ज अशा अनेक इमारती उभ्या राहात आहेत. त्यातूनही या विशाल नगरीचे वेगळेपण दिसतेय. आजच्या ज्या टोलेजंग, चित्ताकर्षक इमारती उभ्या राहिल्यात त्या पाठीमागे फ्रेंच वास्तुविशारद ला-कार्बुझिए, चार्लस् कोरिया, बाळकृष्ण दोशी, अच्युतराव कानविंदे या जगविख्यात वास्तुविशारदकांची कल्पकता आणि दूरदृष्टीची इतिहासाने दखल घेतलीच आहे. हे जरी खरं असलं तरी पाचशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या येथील इस्लामिक, हिंदू, जैन वास्तुशैलीच्या इमारतीच्या अनेक आठवणींचा ठेवा आपल्या मन:पटलावर कायमचा अधिवास करून राहतो.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाप्रमाणे ‘तीन दरवाजा’ ही वास्तू म्हणजे अहमदाबाद नगरीचा मानबिंदूचा त्याला लौकिक आहे. अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या वैभवाच्या पाऊलखुणा मिरवताना इतिहासाचा साक्षीदार राहावे म्हणून उभारलेल्या वास्तूंपैकी ही वास्तू म्हणजे विजयद्वार म्हणून ओळखली जाते. यातील तिन्ही कमानींची उंची एकसारखी आहे. पण मधली मात्र जरा जास्त रुंद आहे. सुलतान अहमद शहाने इ.स. १४११ मध्ये साबरमती नदीकिनारी अहमदाबाद शहर वसवले तेव्हा अनेक इमारतींसाठी स्थानिक मधाच्या रंगाच्या दगडाचा वापर केलाय.

अरुण मळेकर
 vasturang@expressindia.com

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 6:27 am

Web Title: historical background of ahmedabad
Next Stories
1 पाटा-वरवंटा
2 रंग वास्तूचे हॉस्टेल
3 नंदनवन
Just Now!
X