News Flash

दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!

जावळी जिंकल्यामुळे तत्कालीन स्वराज्यातून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे जायच्या वाटा खुल्या झाल्या.

डॉ. मिलिंद पराडकर

रामचंद्रपंत अमात्य त्यांच्या विख्यात आज्ञापत्रात या देशीच्या दुर्गाची आणि शिवछत्रपतींची महती गाताना मोठय़ा गौरवानं अन् आदरानं म्हणतात- ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुग्रे. दुग्रे नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस जाल्यावरी राज्य यसे कोण्हास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे जाले त्याणी आधी देशामध्यें दुग्रे बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले संकट दुर्गाश्रयी परिहार केले.’

‘हे राज्य तरी तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय, त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधिले. तसिच जलदुग्रे बांधिली त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासोन कावेरी तीपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.’

‘पुढे औरंगजेबासारिखा महाशत्रू चालोन येऊन विज्यापूर-भागानगरासारखी महासंस्थाने आक्रमिली, संपूर्ण तीस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यासी अतिशय केला, त्याचे यत्नास आसाध्य काये होते? परंतु राज्यांत किले होते म्हणोन आवसिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला..’

दुर्ग म्हणजे जणू अवघ्या राज्याचा पाठकणा. जर कुण्या राज्यात दुर्ग नसतील तर त्या राज्याला कुणी वाली उरत नाही. राज्य उद्ध्वस्त होते. प्रजा बारावाटा होऊन जाते. असे राज्य मग कुण्या कामाचे. पंत म्हणतात की, केवळ याच कारणास्तव यापूर्वी जे विख्यात राज्यकत्रे झाले त्या अवघ्यांनीच राज्याच्या संरक्षणाकरिता राज्यात जागोजागी दुर्ग बांधून ते राज्य चिरस्थायी करून घेतले. हे हिंदवी स्वराज्य तर शिवछत्रपतींनी दुर्गाच्या आधारानेच निर्माण केले. जो जो मुलूख स्वत:च्या आधिपत्याखाली येत नव्हता, त्या मुलखाची नीट पाहणी करून मोक्याच्या जागी गिरिदुर्ग आणि जलदुर्गाची निर्मिती केली. त्या नूतन दुर्गाच्या आश्रयाला सेना ठेवली. त्या दुर्गाच्या मदतीने आक्रमणे करीत आजूबाजूचा मुलूख स्वत:च्या आधिपत्याखाली आणला. या दुर्गाच्या मदतीनेच टीचभर स्वराज्य नाशिकमधल्या अहिवंतगडापासून कावेरीतीरावरल्या जिंजीपावेतो विस्तारलं.

उत्तरकाळात मुघल पातशहा औरंगजेब प्रचंड सेनासंभार घेऊन दक्षिणेत उतरला. त्याच्यापाशी सारंच मुबलक होतं. पसा-अडका, सन्य अशा साऱ्याचीच रेलचेल होती. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर दोनेक वर्षांनी औरंगजेब आपल्या सर्व सामर्थ्यांनिशी मराठय़ांचा नायनाट करण्याच्या इराद्याने दक्षिणेत आला. सारे सन्य, सारा खजिना, सारे सेनापती, जनानखाना सारे सारे आवरून तो इथल्या मातीत उतरला. जणू दिल्ली-आग्य्राच्या घराला कुलूप घालूनच तो दख्खनमध्ये आला. इ.स. १६८२पासून तो जवळजवळ पंचवीस वर्षे, म्हणजे इ.स. १७०७ मध्ये मृत्यू येईपर्यंत तो इथेच, याच मातीत, येथल्याच सह्यद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये, इथल्या दुर्गाच्या पायाशी डोके आपटत होता. मात्र ते दुर्ग काही त्याला अखेपर्यंत वश झाले नाहीत. सुरुवातीच्या वर्षभरात आदिलशाही, कुतूबशाहीने त्याच्या पायी लोटांगणे घातली. दोनशे वर्ष जुन्या शाह्य, राजधान्या कोसळताच, पार धुळीला मिळाल्या. पण सह्यद्री अन् त्यातले दुर्ग मात्र अजेय राहिले. एका प्रचंड अन् बलाढय़ साम्राज्याचा तो धनी, त्याचे ते पाच-सहा लाख सन्य अन् कोटय़वधींचा त्याचा खजिना हे सारेच इथे निरुपयोगी ठरले. इतिहास असे सांगतो की, या जवळपास दोन तपांच्या काळात त्याने लढून एकच दुर्ग जिंकला. तोरणा ऊर्फ प्रचंडगड हा एकच दुर्ग त्याला लढाई करून जिंकता आला. म्हणजे इतर दुर्गासाठीही तो लढला. तसे अनेक दुर्ग त्याच्या अधीन झाले. मात्र ते मोहोरांचे हंडे मराठय़ांच्या पदरी ओतून, लाच देऊन त्याने मिळविले. प्रचंडगडाच्या या विजयाचे त्याला एवढे अप्रूप वाटले की, हा विजय त्याला जणू दैवी वाटला. ‘फतेहुल घैब’ म्हणजे दैवी विजय असे या फत्तेचे मुघलांच्या तवारिखांमध्ये वर्णन आहे. युद्धाच्या त्या धामधुमीच्या काळात मराठय़ांनाही पशांची चणचण होतीच. त्या पातशहाने मोठय़ा प्रेमाने त्यांची ही नड दूर केली. काय कमी होते त्याच्याकडे? अपरंपार सन्यदळ होते. अपरंपार युद्धसाहित्य होते. मग्रुरी होती. उत्तान धर्मवेड होते. मात्र या दुर्गाच्या भौगोलिक दुर्गमतेपुढे कशाचीच डाळ शिजली नाही. आपल्या या भौगोलिक वैशिष्टय़ांमुळे शिवछत्रपतींचे हे दुर्ग अजिंक्यच राहिले. युद्धकाळात काहीसं जायबंदी झालेलं हे राज्य, या दुर्गाच्याच आधारामुळे पुढील काळात वैभवाप्रत नेता आलं.

हे वाचल्यावर ध्यानी येतं की, या विवेचनात शिवकालीन दुर्गविचार किती स्पष्टपणे उमटला आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने दुर्ग म्हणजे काय, त्यांचं महत्त्व काय, राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान काय या साऱ्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणे प्रतीत झाल्या आहेत. शिवपूर्वकाल, शिवकाल अन् शिवोत्तरकाल या तीनही कालखंडांमध्ये समाजसंरक्षण व प्रजापालन, राज्यसंरक्षण व राज्यविस्तार या तीनही बाबींचा विचार करता अबाधित असलेलं दुर्गाचं महत्त्व या तीन नेमक्या, नेटक्या अन् भावगर्भ भाषेत रचलेल्या परिच्छेदांमध्ये आलं आहे!

नूतन दुर्ग ज्या ठिकाणी बांधायचा त्या ठिकाणाची निवड करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाई. कोणताही नवीन दुर्ग बांधताना, त्या लष्करी बांधकामाची राजकीयदृष्टय़ा आवश्यकता आहे अथवा नाही हे पाहणे निरतिशय आवश्यक असे. हा दृष्टिकोन सरहद्दीवरल्या दुर्गाच्या बाबतीत विशेषत्वाने पडताळून पाहिला जात असे. राज्याच्या सीमा हा लष्करीदृष्टय़ा व राजकीयदृष्टय़ा अतिशय संवेदनशील विभाग. सरहद्दी जर सतत बदलत असतील वा सुरक्षित नसतील तर राज्याच्या दैन्यावस्थेस पारावार उरणार नाही हा निसर्गनियम. म्हणून मग नूतन राज्याच्या सरहद्दी सुरक्षित राखण्याकरता सह्यद्रीत योग्य स्थाने निवडून तिथे नवीन दुर्ग बांधणे गरजेचे ठरले वा उपलब्ध असलेल्या दुर्गाची स्वत:च्या आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून, त्यांस हवे तसे भक्कम रूप देणे आवश्यक ठरले.

बखरकार सभासद म्हणतो, ‘ज्या ज्या मुलखात आदिलशाही, निजामशाही, गड होते तितके घेतले. कित्येक डोंगर बांके जागेत होते. ते गड वसविले. जागजागा गावावरि मुलखात नूतन गड बसविले. गडाकरिता मुलूख जप्त होतो असे समजून गड बांधिले व कोकणात कल्याण, भिवंडी, राजापूर पावेतो देश काबीज केला.’

शिवकालामध्ये दक्षिण सीमेवरील पन्हाळा, जिंजी; पूर्व सीमेवरील सातारा, चंदनवंदन; उत्तरेकडील साल्हेर-मुल्हेर, अहिवंत, त्र्यंबकदुर्ग; पश्चिम सीमेवरील रायगड तर सागरी सीमेवरील दंडा राजपुरीपासून ते फोंडय़ापर्यंतच्या सागरी दुर्गास, सरहद्दीवरले दुर्ग असे जाणून योग्य ते महत्त्व दिले गेले अन् त्यांची नवीन रचना वा पुनर्बाधणी करून राज्याच्या सरहद्दी शिवछत्रपतींनी बेलाग केल्या. कारण सीमा सुरक्षित असणे ही कोणत्याही काळातील, कोणत्याही राज्यकर्त्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक गरज असते. अशी गरज पूर्ण करणे हा त्या दुर्गाच्या तिथे असण्याचा वा त्यांचा वापर होण्याचा प्रधान हेतू असतो. याखेरीज भविष्यकाळात होऊ शकणाऱ्या राजकीय हालचालींच्या दृष्टीने तिथे दुर्ग असणे आवश्यक भासले, तर अशा प्रदेशात मोक्याची जागा निवडून तिथे दुर्ग रचला जातो. याबाबतीत दोन उत्कृष्ट उदाहरणे देता येतील. प्रतापगड अन् सिंधुदुर्ग हे दोन अप्रतिम दुर्ग शिवछत्रपतींनी स्वत: स्थळे निवडून, स्वत:च्या खास देखरेखीखाली रचून घेतले. वाई, महाबळेश्वर, जावळी हा प्रांत ही स्वराज्याच्या उदयाच्या काळातली दक्षिण सरहद्द होती. हा सारा मुलूख हातात आल्याशिवाय त्या दिशेकडून- विजापूरकरांकडून- होणाऱ्या आक्रमणापासून आपले राज्य सुरक्षित नाही हे शिवछत्रपतींनी ओळखले होते.

शिवछत्रपतींचे ‘शिवभारत’ हे चरित्र रचणारे, समकालीन कवी परमानंद म्हणतात-

‘जयवल्ली वशा यस्य वैराटं तस्य सर्वथा।

तथा सह्यद्रिरखिल: सांतरीपश्च सागर:॥’

म्हणजे ज्याच्या ताब्यात जावळी, त्याच्या ताब्यात वाई प्रांत पूर्णत: आहे. त्याचप्रमाणे सर्व सह्यद्रीही अन् समुद्रकिनाराही आहे. जावळी जिंकल्यामुळे तत्कालीन स्वराज्यातून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे जायच्या वाटा खुल्या झाल्या. रायरी व वासोटा यांसारखे अतिदुर्गम दुर्ग स्वराज्यात आले. देशातून कोकणात उतरणाऱ्या अनेक व्यापारी वाटा या दुर्गम भागातून जात होत्या. त्यांतून मिळणारे जकातीचे उत्पन्न प्रचंड होते. किंबहुना या उत्पन्नाच्या जोरावरच चंद्रराव मोरे शिरजोर बनला होता. त्याला सामदामदंडभेदाचा उपयोग करीत शिवछत्रपतींनी बाजूला केलं अन् या अवघ्या व्यापारी वाटा स्वत:च्या ताब्यात घेतल्या. या नव्याने ताब्यात आलेल्या घाटवाटांचा रखवालदार म्हणून एखाद्या नूतन दुर्गाची आवश्यकता या भागात होती. अन् मग मोक्याच्या जागी असलेल्या भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगडाची उभारणी करून राजांनी नूतन राज्यासाठी मिळालेले उत्पन्नाचे स्रोत सुरक्षित केले अन् कोकणच्या संपन्न बंदरांची अन् प्रदेशाची वाट स्वत:साठी मोकळी करून घेतली. या भागातून होणाऱ्या वाहतुकीवर अन् व्यापारावर शिवछत्रपतींचे नियंत्रण आले. स्वराज्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत त्यांस उपलब्ध झाले. प्रतापगडासारखे अभेद्य व दुर्गम ठाणे उभे राहिल्यामुळे स्वराज्याची नवीन सीमा सुरक्षित झाली. याचे दूरगामी राजकीय परिणाम अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी स्पष्ट झाले. राजकीय गरजेपोटी उभ्या राहिलेल्या प्रतापगडाचा उपयोग करून शिवछत्रपतींनी अफजलखानास स्वराज्याच्या सीमेवर रोखले. युद्ध नेहमी शत्रूच्या प्रदेशातच लढावे, हे तत्त्व उपयोगात आणून शिवछत्रपतींनी प्रतापगडच्या रणांगणात खानास पुरते धुळीस मिळवले.

सागरकिनारा अन् पर्यायाने व्यापार ताब्यात ठेवण्यासाठी समुद्रावर घिरटय़ा घालणाऱ्या अन् आधिपत्य गाजवू पाहणाऱ्या पोर्तुगीज, इंग्रज, अन् जंजिऱ्याचा सिद्दी या परकीय त्रिकुटाला शह देण्यासाठी शिवछत्रपतींनी दर्यावर दुर्गाची बलदंड ठाणी उभारली. बाणकोटच्या खाडीपासून ते मुंबईपर्यंतच्या उत्तर कोकणच्या भागावर जरब ठेवण्यासाठी त्यांनी दंडाराजपुरी, कासा अन् खांदेरी-उंदेरीची दर्यातली ठाणी उभारली, तर दक्षिणेकडे कारवापर्यंतचा मुलूख त्यांनी सिंधुदुर्गाच्या वज्रमुठीत आवळला.

लष्करीदृष्टय़ा हे महत्त्वाचे होतेच, मात्र त्यापूर्वी अनेक शतके या भागात एतद्देशीय राजवटींचा एकछत्री अंमल नव्हता. तो तसा असणे ही त्या काळाची राजकीय गरज होती. जावळीच्या पाडावानंतर शिवछत्रपतींना कोकणची द्वारे मोकळी झाली, अन् त्यामुळे मग नंतरच्या काळात ही गरजही भागली. यादव साम्राज्याच्या अस्तानंतर या भागात एतद्देशीय राजवट नव्हती. होती ती केवळ लहान लहान कूपमंडूक वृत्तीची संस्थाने. जो चारा घालील त्याच्या पायाशी घोटाळणारी जमात. राजकीयदृष्टय़ा त्यांना काहीच महत्त्व नव्हते. ती मोठी पोकळी शिवछत्रपतींनी भरून काढली. त्यांनी उभ्या केलेल्या राजकीय सामर्थ्यांपुढे भलेभले दबून गेले. याचे श्रेय त्यांनी निर्माण केलेल्या सिंधुदुर्गासारख्या जलदुर्गाना अन् ताब्यात घेतलेल्या व्यापाराच्या वाटांना होते.

अजून एक उत्तम उदाहरण रायगडाचे आहे. राजगड सोडून रायगड ही स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्यामागे जसा लष्करी भूगोल कारणीभूत होता, त्याचप्रमाणे राजकीय कारणपरंपरासुद्धा होती. शिवछत्रपतींना नेमके ठाऊक होते की, आज ना उद्या पातशहा औरंगजेब आपल्या सर्वशक्तीनिशी दक्षिणेत उतरेल, अन् शेवटची लढाई आपल्याला त्याच्याशीच खेळावी लागेल. मग त्यासाठी अतिशय सुरक्षित ठिकाण की जिथे आक्रमण करणे या पातशहांच्या ऐदी फौजांना निरतिशय कठीण व्हावे. असे ठिकाण कोकणच्या अतिदुर्गम सह्यद्रीमध्येच हवे. कारण तिथवर स्वारी करायची, तर या अचपळ सन्यास सह्यद्रीचा उभा दांड तिथल्या दुष्कर वाटांनी उतरावा लागेल. ही गोष्ट कठीण तर खरी, मात्र याहीपेक्षा या सन्याला पावलापावलावर झुंजायला लावणारे बळकट दुर्ग घाटमाथ्याच्या कण्यावर आहेत. त्यावेगळे सह्यद्री न उतरता कोकणात यायचे तर ते गुजरातेतून यायला हवे. तिथेही वाटभर दुर्ग आहेतच. त्यामुळे मग घाटमाथ्यावरल्या राजधानीपेक्षा कोकणातील मकाण अधिक सुरक्षित हे शिवछत्रपतींच्या द्रष्टय़ा नजरेने पुरते ओळखले होते. रायगड पाहिल्यावर ‘तख्तास जागा हाच गड करावा’  हे शब्द त्या लोकविलक्षण राजाच्या मुखातून काही उगाच उमटले नव्हते.

विस्तारत्या स्वराज्याचे दुसरे शत्रू म्हणजे व्यापाराच्या मिसे सागरकिनाऱ्यावर पाय घट्ट रोवून राहिलेल्या इंग्रज, डच, फ्रेंच अन् पोर्तुगीज या दर्यावर्दी जमाती. हे सारेच व्यापाराचे निमित्त करून स्वत:चे राज्य निर्माण करायच्या खटपटीत आहेत, हे शिवछत्रपतींनी अचूक ओळखले होते. पंतअमात्य आज्ञापत्रात म्हणतात, ‘साहुकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, वलंदेज, फरांसिस, िडगमारादि टोपीकर हेहि लोक सावकारी करितात, परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारास स्थळलोभ नाही, यसे काय घडो पाहते? तथापि टोपीकरांचा या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्णाभिमान. तद्नुरूप स्थलोस्थली कृतकार्यही जाले आहेत. त्याहीवरी ही हट्टी जात. हातास आले स्थल मेलियानेही सोडावयाचे नव्हेत.’

त्याहीवेगळा जंजिऱ्याचा सिद्दी कपाळशूळासारखा होताच! अन् मग या राजकीय गरजांपोटी त्यांनी राजगड सोडून रायगड ही राजधानी म्हणून मुक्रर केली. त्यांचा हा निर्णय किती अचूक व दूरदर्शीपणाचा ठरला ही गोष्ट वादातीत ठरलेली आहे!

ही झाली राजकीय वा लष्करी कारणे. मात्र राजधानी राजगडाहून रायगडावर हलविण्यासाठी याहीपेक्षा प्रबळ कारण आर्थिक होतं. स्वराज्याचं जकातीचं उत्पन्न साधारण दोन कोटी होन इतकं होतं. त्यापैकी कोकणातील बंदरातून मिळणाऱ्या जकातीच्या उत्पन्नाचा वाटा एक कोटी चाळीस लक्ष होनांचा होता. ज्या प्रदेशातून मिळणाऱ्या भक्कम उत्पन्नावर राज्याचा आर्थिक डोलारा सावरला जातोय त्या प्रदेशाचं रक्षण कोणताही राज्यकर्ता जीवेप्राणे करेल. मग शिवछत्रपतींसारखा सावध, दक्ष राजाचं याकडे दुर्लक्ष होईल हे केवळ अशक्य आहे. बलाढय़ मुसलमानी अन् युरोपीय सत्तांशी भविष्यात टकरा घ्याव्या लागणार हे पुरेपूर उमजून असलेल्या शिवछत्रपतींनी मग फारसा वेळ न घालवता राजधानीचं ठाणं ऐन कोकणात वसलेल्या दुर्गम रायगडावर हलवलं. कोकण सुरक्षित केलं, किंबहुना स्वराज्य राजकीय व आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित केलं.

अतिशय अस्थिर अशा राजकीय परिस्थितीचा अन् असंतुष्ट अशा सामाजिक मन:स्थितीचा अचूक वेध घेत, अन् याची सह्यद्रीच्या भौगोलिक रचनेशी सांगड घालीत शिवछत्रपतींनी नूतन राज्यनिर्मितीचा हव्यास धरला व तो निश्चयाने तडीसही नेला. पंतअमात्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर ‘हे राज्य तो तीर्थस्वरूप थोरले शिवछत्रपती कैलासवासी स्वामी यांणि हे राज्य कोणे साहसे व कोणे प्रतापे निर्माण केले ..पंधरा वर्षांचे वय असता त्या दिवसापासोन तितकेच स्वल्पमात्र स्वास्तेवरी उद्योग केला ..शरीरास्ता न पाहता केवल अमानुष पराक्रम, जे आजपर्यंत कोण्हे केले नाहीत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना, यसे स्वांगे केले.. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले ..देशदुर्गादि सन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखे महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न करून दिगांत विख्यात कीर्ति संपादिली, ते हे राज्य.’

discover.horizon@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:02 am

Web Title: historical background of maharashtra
Next Stories
1 घर बदलत्या काळाचे : घरचा भाजीपाला..
2 मानीव अभिहस्तांतरण : स्वागतार्ह सुधारणा
3 रेरा आदेशातील चूक दुरुस्ती
Just Now!
X