पूर्णपणे दक्षिणी छाप असलेली अशी केरळची स्वतंत्र वास्तुशैलीही आहे. ती शैली इथली बांधकामं नजरेखालून घालताना जाणवते. इथली उच्च दर्जाची कारागिरी व बांधकामाची विशिष्ट पद्धत ही विश्वकर्मा स्थपतींची परंपरा दाखवते. दक्षिण भारतात इतरत्र लोकप्रिय असलेल्या द्रविड शैलीपेक्षा ही पूर्णपणे भिन्न असली तरी त्यावर गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात त्यावर असलेला विदेशी शैलीप्रमाणे प्राचीन वैदिक प्रभावही पडलेला प्रकर्षांने जाणवतो. विशेष करून तंत्रसमुच्चय, शिल्परत्नम्, मनुष्यालय चंद्रिका व वास्तुविद्या मणिप्रवालम् या उत्तरेकडे प्रचलित नसलेल्या ग्रंथातील मार्गदर्शक तत्त्वं व तंत्र या वास्तूंमध्ये वापरली गेलीत.

स्वागताला सज्ज अशी हिरवीकंच वृक्षराजी गर्द आमराईमधून येऊन आसमंत धुंद करणारा मोहोरांचा मादक गंध, निसरडय़ा पायवाटांवर मुलायम स्पर्शाचं आच्छादन घालणारा विविधरंगी पाचोळा, सूर्यप्रकाशानं लखलखणाऱ्या उंच माडांच्या झावळी, सुगंधी मसाल्याच्या बागांनी व्यापलेला परिसर, रबराच्या पानांची सळसळ, मधूनच होडय़ांनी हेलकावणारी बॅकवॉटर्स, खळाळणाऱ्या समुद्री लाटांचे धीरगंभीर पाश्र्वसंगीत व त्यातच गर्द वनश्रीतून (जणू) नम्रपणे डोकावणारं एखादं वाडय़ाचं वा राजवाडा वा महालाचं खूप वेळ वाट पाहात असल्यासारखं दिसणारं कलात्मक कौलारू छत पाहिलं, की आपली खात्री होते ती खऱ्या अर्थाने ‘God’s own country ’ असलेल्या देवभूमी केरळ राज्यात प्रवेश केल्याची! जसं हे समृद्ध राज्य आहे कथकलीच्या पदलालित्याचं, नारळी-पोफळीचं, अगणित वनौषधींचं, सर्वदूर पसरलेल्या निखळ समुद्रकिनाऱ्यांचं, अस्सल दक्षिणी परंपरांचं, कलेरी विद्येचं व मल्याळी हस्तकलांचं, तसंच ते आहे निसर्गाच्या हिरव्याकंच कोंदणात बसवलेल्या प्रशस्त घरं, वाडे, राजवाडे, महाल, प्रार्थनास्थळं, इ. भव्यदिव्य शैलीतल्या विविध वास्तुकृतींचंही!

Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

केवळ वास्तुकृतीच नव्हे, तर स्वच्छ पर्यावरण, नेटकं जलनियोजन, दळणवळण, वनरक्षण, सागरी वस्तूंचं उत्पादन, प्राचीन संस्कृतीचं जतन, वनस्पतीजन्य औषधनिर्मितीचं नियोजन व पर्यटनस्थळांचं योग्य व्यवस्थापन अशा सर्वच बाबींत केरळचा नंबर अव्वल आहे. पूर्वीच्या त्रावणकोर, कोचिन व कालिकत राज्य प्रभागांचं एकत्रीकरण असलेलं रामायण- महाभारतासारखी महाकाव्यं व अतिप्राचीन तामीळ ग्रंथांत उल्लेख असलेलं हे दक्षिण काश्मीर, समुद्रसान्निध्यामुळं रोमन, इजिप्शियन, फोनेशियन, सीरियन, ज्यू, ब्रिटिश, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा विदेशी संस्कृतींच्या संपर्कात राहिलं व त्यामुळे इथल्या स्थापत्यकलेवर त्यांचा प्रभाव प्रकर्षांनं जाणवतो. दक्षिणी साम्य टिकवत इथल्या वास्तुकृतींवर केरळची अशी एक वेगळी छाप असल्याचं जाणवतं व रसिक नजरेला या वास्तूंमधल्या सौंदर्याचा जिवंतपणाही जाणवतो. असं मानतात की, अत्युच्च व अलौकिक अशा अमर्याद ज्ञानाची उंची ही उत्तुंग गोपुरात सामावलेली असते, तर अपरिचित अशा गहन अंत:शांतीचा शोध दऱ्यांच्या खोलीमुळं लागतो. म्हणूनच की काय, उत्तरेकडील दऱ्याखोऱ्यांत विसावलेल्या विरळ वास्तूंची उंची कमी असते. समशीतोष्ण हवामान व अति पाऊस पडणाऱ्या ३०० हजार मीटर उंचीच्या पश्चिम घाटांनी हे राज्य शेजारच्या तामिळनाडूपासून विलग केलंय. विषुववृत्तीय प्रदेशामुळे होणाऱ्या जंगलवाढीमुळं इथं लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं इथल्या वास्तुरचनांमध्ये दगडाबरोबरीनं लाकडाचाही सढळ हातांनी वापर केला गेलेला दिसतो. पश्चिमी घाटांच्या उंचीमुळे कदाचित शेजारच्या तामिळनाडूमधील दगडी बांधकाम शैली इथं सरकली नसावी.

पूर्णपणे दक्षिणी छाप असलेली अशी केरळची स्वतंत्र वास्तुशैलीही आहे. ती शैली इथली बांधकामं नजरेखालून घालताना जाणवते. इथली उच्च दर्जाची कारागिरी व बांधकामाची विशिष्ट पद्धत ही विश्वकर्मा स्थपतींची परंपरा दाखवते. दक्षिण भारतात इतरत्र लोकप्रिय असलेल्या द्रविड शैलीपेक्षा ही पूर्णपणे भिन्न असली तरी त्यावर गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात त्यावर असलेला विदेशी शैलीप्रमाणे प्राचीन वैदिक प्रभावही पडलेला प्रकर्षांने जाणवतो. विशेष करून तंत्रसमुच्चय, शिल्परत्नम्, मनुष्यालय चंद्रिका व वास्तुविद्या मणिप्रवालम् या उत्तरेकडे प्रचलित नसलेल्या ग्रंथातील मार्गदर्शक तत्त्वं व तंत्र या वास्तूंमध्ये वापरली गेलीत. केरळी वास्तुशास्त्राचं बायबल मानलं गेलेलं नीलकंठ मूसलिखित मनुष्यालय चंद्रिका हे या यादीतील अधिक लोकप्रिय पुस्तक आहे. कोणत्याही वास्तूवर तिथली भौगोलिक परिस्थिती व वातावरण, इ.चाही प्रभाव नकळतपणे पडत असतो. म्हणूनच जसं समुद्रसान्निध्यामुळं इथल्या बांधकाम पद्धतीवर युरोप वा विदेशी वास्तुतंत्राची सावली पडलेली दिसते. तसंच इथल्या विषुववृत्तीय हवामानाचा, मान्सून व जंगल संपत्तीच्या विपुलतेचा प्रभावही इथल्या वास्तू पाहताना निश्चितच जाणवतो. त्यासाठी इथल्या डोंगराळ भागात तुरळक व सखल, सपाट व सुपीक भूभागावर असलेल्या दाट लोकवस्तीतील घर वा वाडे हेच सांगत असतात. केरळ राज्य हे एका बाजूला अरबी समुद्र, तर दुसरीकडे १५०० मीटर उंचीच्या पश्चिम घाटातील पर्वतरांगा यामध्ये असल्यामुळे इथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. अति पर्जन्यवृष्टीमुळं वेगानं वाढणारी जंगलं ही इथल्या काष्ठ संस्कृतीच्या प्रगतीचं कारण ठरली. इथल्या घरांची छप्परं कौलारू व उतरती आहेत. लाकडाचा अतिवापर हे दुसरं वैशिष्टय़ असून त्यामुळं जुन्या वास्तू एक तर नष्टप्राय झाल्यात किंवा पूर्णपणे मोडकळीला आल्यात. त्यातला चुन्याच्या बांधकामाचा भाग व दगडाचं बांधकाम मात्र टिकून आहे. सध्या इथं असलेली घरं ही फारशी जुनी नाहीत, ही मल्याळी घरं आपत्तीकाळात सुरक्षिततेचं स्थान म्हणून बनविली जातात. मुख्य घराभोवती बाग असून त्या बागेभोवती असलेली मातीची संरक्षक भिंत अति आवश्यक मानली जाते. त्या बाहेरील काटेरी बांबूसदृश झुडुपं बाह्य़ आक्रमणापासून घराचं संरक्षण करतात. हे आक्रमण विशेष करून चोराचिलटांचं वा हत्ती, इ. वन्यपशूंचं असू शकतं. मुख्य इमारतीबाहेर प्रशस्त अंगण असून मधल्या भागाला पूर्णघर म्हणजेच नालपुरा संबोधतात. ‘विश्वकर्मप्रकाश’ व ‘बृहत्संहिता’ या प्रमाणित वास्तुग्रंथांत उल्लेखलेली चार घरं वा आठ घरं अशी एकत्रितपणे बांधण्याची पद्धत एकत्र कुटुंबपद्धतीमुळे इथली अधिक प्रचलित असल्याचे या राज्यात फिरताना जाणवते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उंच व उतरतं घराचं (कौलारू) छप्पर हे इथल्या घरांचं मुख्य वैशिष्टय़ होय. केरळमधल्या घरांना वायुविजन व प्रकाशासाठी अधिक प्रमाणात खिडक्या, दारे, इ. असून बाल्कनी, माळे व पोटमाळे या सर्वासाठी लाकडाचा सढळ हाताने वापर करतात. याशिवाय इथल्या घरं, वाडे व महाल यामध्ये विविधरंगी लाकडी शिल्पं व इतर आकर्षक कलाकृतीही मुबलक प्रमाणात दिसतात. मातीच्या मोठय़ा उथळ घंगाळ वा थाळीत पाणी भरून त्यात रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या तरंगण्यासाठी टाकून ते भांडं उत्तर दिशेच्या बाजूला दिवाणखान्यात ठेवलेलं इथल्या घरातच नव्हे, तर हॉटेल्स, हॉस्टेल्स व इतर कार्यालयं इथं घर सजावट म्हणून ठेवलेलं अनेक ठिकाणी दिसतं.

केवळ घरांवरच नव्हे, तर धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वास्तू, प्रार्थनास्थळे, देवळे, चर्चेस, इ. बांधताना त्यावर नकळत केरळी छाप उमटलेली दिसते. इथे असलेल्या प्राचीन मंदिरांची संख्या सुमारे २००० च्या आसपास असल्याचं मानतात. इथे इतर धर्मस्थळं तुलनेनं कमीच आहेत. इथं मुबलक प्रमाणात लाकूड उपलब्ध असल्यामुळे शेजारच्या तामिळनाडू राज्यात जेवढा दगडाचा वापर बांधकामासाठी होतो तेवढा केरळमध्ये होताना दिसत नाही. यामुळेच इथल्या मंदिरापुढची गोपुरं ही वरचं टोक मुकुटासारखा असलेली उंच, उतरत्या कौलारू लाकडी छपरांची अशी आहेत. गाभारा व आतील बांधकामात (विशेषत: मंडप व सभागृह इ.साठी) लाकडाचा काहीसा अतिवापर केलेला दिसतो. त्यामुळेच की काय, इथल्या वास्तूंचा टिकाऊपणा कमी झाला व अतिप्राचीन व जुन्या वास्तू कौलाघात नष्ट झाल्या वा ज्या थोडय़ाफार शिल्लक आहेत त्या मोडकळीला आलेल्या आहेत.

इथं असलेल्या अन्य धर्मीयांच्या वास्तूंवरही चक्क मंदिर स्थापत्यशैलीचा प्रभाव विशेष करून जाणवतो. भारतातले पहिलं चर्च केरळमध्ये बांधलं गेलं. त्रिसूर जिल्ह्य़ातील पुलथूर इथं सेंट थॉमस याने इ.स. ५२ मध्ये सायरो मलबार कॅथॉलिक हे अपॉस्टॉलिक प्रकारातलं हे चर्च बांधताना रिकामी मंदिरं वास्तू चर्चच्या रूपात बदलून मंदिर व पर्शियन प्रकारची चर्चबांधणीची पद्धत याचं एकत्रीकरण केलं. म्हणूनच हिंदू शिल्पशास्त्रानुसार विमान व गोपुरासारखं उंच छत व त्यातली कलाकुसर व कारागिरी ही पर्शियन चर्च प्रकारानं मोठय़ा खुबीनं केली. मुख्य द्वारही मंडपासारखं बांधलं. हे बरंचसं मूळ लाकडी बांधकाम (मुख्यत: सागाचं) तसंच ठेवून इटलीच्या धर्मप्रसारकानं स्थानिकांची परवानगी मिळवून ते अधिक भव्य व सुंदर केलं, ज्याचा बराचसा भाग आक्रमकांनी जाळला व अठराव्या शतकानंतर

ते पुन्हा अधिक चांगल्या पद्धतीनं बांधलं गेलं. जे आजपर्यंत सुस्थितीत असून त्यावरही बऱ्यापैकी हिंदू शिल्पकलेची छाप दिसते. थोडय़ा फार फरकाने अशाच प्रकारे बांधलेली सहा चर्च केरळमध्ये प्रसिद्ध आहेत. येथे काही बौद्ध स्तूप व बुद्ध मूर्ती उत्खन्ननात सापडल्या. त्या विशेष करून करुमाडी व अलपुझा इथं आहेत. मशिदीही बऱ्याच प्रमाणात या राज्यात दिसतात. त्यावर मात्र स्थानिक शिल्पकलेची झाक दिसत नाही.

केरळमधील देवालयं ही मात्र ‘शिल्परत्नम्’ व ‘तंत्र समुच्चय’ या ग्रंथांतील सूत्रानुसार बांधलेली आहेत. यामध्ये वास्तूमध्ये जिवंतपणा आणण्यासाठीही विशिष्ट पद्धतीच्या बांधकामाचा उल्लेखही आहे. इथे गोल, अंडाकृती, चौकोनी, आयताकृती वा नालाकृती आकाराची मंदिरे आहेत. गोल आकाराच्या मंदिरावर मात्र अंडाकृती आकाराचे छप्पर, विशेष करून तांब्याच्या पत्र्यापासून बनविलेले असते. हा गोल आकार बुद्धविहार वा बौद्ध स्तुपांपासून घेतला असावा असंही मानलं जातं. हा श्रीलंकेतील वास्तुशैलीचा प्रभाव मानण्यास एक मतप्रवाह आहे. मूलावासाच्या बुद्धविहाराच्या भग्न अवशेषाप्रमाणे असलेली पल्लकुडजवळची जैन मंदिरं व काही जैन आश्रय इथली समुद्रकाठची खारी हवा व आद्र्रता यामुळे नष्ट झाल्याचे सांगतात. म्हणूनच की काय, मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर लाकडी फळ्यांचे छप्पर, मंदिर अधिष्ठान म्हणजेच चौथऱ्यावरील शिलालेख व लाकडीपट्टय़ांवरील लिखाण, मंदिरातलं कथकलीची आठवण करून देणारं मंडपावरील कोरीव नक्षीकाम, चौरस वा अष्टकोनी छतावरचं तसंच आतल्या आधारपट्टय़ावरच कोरीवकाम व नक्षी लाकडी असल्यामुळं टिकलं असावं. याशिवाय कोचिनच्या राजांचे कार्यालय म्हणून बांधलेला डोंगरमाथ्यावरचा राजवाडा, पद्मनाभपुरम्, कोचिनचं म्युझियम, डच व पोर्तुगीज पॅलेस, इ. काहीसे नेपाळच्या वास्तूंशी साधम्र्य दाखवत असले तरी सर्वच भव्य, कलापूर्ण राजवैभवाचे, संपन्नतेचे व कल्पकतेचे द्योतक आहेत.

भारतीय स्थापत्यवेद हा मुळात वास्तुशास्त्र, शिल्पकला व चित्रकला, इ. शास्त्र व विद्या यांचा उत्तम समावेश व समन्वय साधणारा आहे. यातही केरळच्या वास्तू अभ्यासताना गंधर्ववेदाबरोबर आयुर्वेद व ज्योतिष या उपांगांनाही स्पर्श करताना दिसतो. ज्ञात इतिहासशास्त्रानुसार गेल्या ३००० वर्षांत फुललेली ही केरळची वास्तुसंस्कृती ही सर्वसमावेशक अशी, कोणताही गडद धार्मिक रंग नसलेली, इथला भूगोल व हवा पचवून टिकलेली, प्राचीन व अर्वाचीन अशा दोहोंचं जणू मिश्रकाव्यच भासणारी, जशी आध्यात्मिक तेवढीच धार्मिकही, कलापूर्ण, बहुरंगी, लोभस, कल्पकतेने ओतप्रोत, सतत उत्क्रांत होत असलेली, सतत आकर्षित करणारी, अभ्यासकाला प्रेरणादायी व एकात्मतेचं सुरेख प्रतिबिंब असलेली अशी आहेच. या वास्तुसंस्कृतीच्या शिलेदारांचे कौतुक करावे तेवढे कमीच!

डॉ. उदयकुमार पाध्ये cosmic_society_india@yahoo.co.in