25 September 2020

News Flash

वस्तू आणि वास्तू : घराघरांतली पायपुसणी आणि फडकी

लोक फडकी विकत आणू लागले. कॉटन वेस्ट म्हणून किलोने देखील फडकं मिळायला लागलं.

प्रतिनिधिक छायाचित्र

घराघरांतली फडकी बघा. ज्या कापडाने स्वच्छता करायची आहे, तेच अतिशय काळंकट्ट, कडक कॅनव्हाससारखं, लक्तरं निघालेलं असतं. त्याचे धागे घरात कुठे कुठे साफसफाई केली, तिथे तिथे अडकून फडक्यांच्या खुणा सोडतात. सगळेच कापडे पाणी शोषत नाहीत. नीट पुसण्याचे काम त्यांनी होईलच असे नाही. कुठे आणि कशी स्वच्छता करायची आहे, त्यावर सुद्धा कापडाचा पोत बदलत जातो.

अनेक घरांमध्ये पुरुषांच्या फाटक्या, जीर्ण झालेल्या अंतर्वस्त्रांना कपडय़ाच्या रिटायरमेंटनंतर ‘पुसायचं फडकं’ म्हणून रोजगार मिळतो! आपल्याकडे पुरुषी अंतर्वस्त्रं सर्वासमोर वाळत घालायला कोणाला लाज वाटत नाही. गॅलरीगॅलरीतून, अंगणांमधून ही अंतर्वस्त्रं वाळत घातलेली कुठेही दिसतात. हीच सवय ही वापरलेली अंतर्वस्त्रं फडकं म्हणून जेवायची ताटं पुसायला देखील कळत नकळत परावर्तीत होतं. कितीतरी घरांमध्ये पुरुषांच्या फाटक्या बनियनने स्वयंपाकघरातली भांडी पुसली जातात. ते कापड सॉफ्ट असतं. पाणी शोषून घेतं नीट. पण अनेक वर्षांचा शरीराचा घाम त्या धाग्यांनी शोषलेला असतो. स्त्रियांच्या स्लिप्सही त्याच, तश्याच कापडाच्या असतात. पण त्यांना असा ‘मान’ मिळत नाही हो! काटकसरी स्वभाव घरोघरी अशा बनियन्स आणि अंडरवेअरला फडकं करतो, असंच नाही, ही एक सवय होऊन गेलेली असते. आर्थिक सुस्थितीत असलेल्या घरी देखील असंच एखादं केविलवाणं बनियन ताटं पुसायला अपॉइंट केलेलं असूच शकतं. देवपूजा करताना देखील वापरलेलं चालतं असं फडकं, ही तर या सवयीची गंमतच असते!

स्त्रियांचं नवं कोरं अंतर्वस्त्रदेखील काहीतरी भयानक घाणेरडं आहे, अशा थाटात घरोघरी लपूनछपून वाळत घातलं जातं. त्यांच्या नशिबी मोकळं, खुलं, हॉलच्या गॅलरीत, अंगणात स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घातलं जाणं फारसं नसतं. ते आपले केविलवाणे कापडाचे तुकडे म्हणून पडून राहतात. फडकी म्हणून सुद्धा त्यांना उघड कोणी वापरत नाहीत. फारतर स्त्रियांच्या जुन्या फाटक्या परकराला पायपुसण्याचा दर्जा मिळू शकतो, तो सुती असेल तर! साडी तर कितीही गैरसोयीची एरवी असली, तरी ‘साडी म्हणजे काय सौंदर्य’ असंच कंडिशनिंग झालेलं असल्यानं जुन्या साडय़ांना तसा बरा भाव मिळतो. जुन्या सुती साडय़ांची दुपटी, गोधडय़ा, फडकी होतात. कुठे शेतात कुंपणाला बांधायला होतात. कुठे उन्हाळ्यातल्या पापड, कुरडईच्या वाळवणासाठी, धान्याला ऊन दाखवायला त्या वापरल्या जातात.

हळूहळू फडक्यांमध्ये, स्वच्छतेच्या साधनांमध्ये बरंच वैविध्य आलं. मॉल्समध्ये डिस्प्लेवर ही वेगवेगळी साधनं झळकू लागली. लोक फडकी विकत आणू लागले. कॉटन वेस्ट म्हणून किलोने देखील फडकं मिळायला लागलं. चकचकीत काचांची घरं आणि ऑफिसं वाढू लागली. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या देशात हवा आणि ऊन सहज उपलब्ध असतानादेखील बंदिस्त जागेत भर दिवसा दिवे लावून बसायची गरज असलेली कार्यालयं तयार झाली. एसीसाठी तर अजूनच बंदिस्त केल्या जातात जागा. ऑफिसातल्या आणि घरांच्या काचा पुसायला विशिष्ट वर्तमानपत्रांचे कागद कुठे कुठे वापरतात. गाडय़ांच्या काचा पुसायला ती विशिष्ट ऑरेंज फडकी सिग्नल सिग्नलवर विकायला आलेली दिसू लागली. मोबाइल, चष्मे, गॉगल्स, स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीन्स, लॅपटॉप्स, संगणक, टॅब हे पुसायला वेगळे मायक्रो फायबर कापड शो केसेसमध्ये दिसू लागले. स्वयंपाकघरासाठी, फरशी पुसण्यासाठी, वस्तूंवरची धूळ झटकण्यासाठी वेगवेगळी साधनं, कापडं बाजारात मिळू लागली. त्यांच्या दर्जात देखील हळूहळू सुधारणा होताना दिसते. न उसवणारे, जास्तीचे कापडाचे पॅच लावलेले, वेगवेगळे पृष्ठभाग साफ करणारं, जास्त टिकणारं पुसायचं कापड असं ब्रॅण्डिंग होऊ  लागलं. स्पंजने पाणी शोषून घेणं, वेगवेगळे वायपर्स पाणी लोटायला वापरणं अशा नव्या सवयी लोकांना जसजशा त्या वस्तू बाजारात आल्या, तसतशा लागल्या. काही उत्पादनांमध्ये खरोखर चांगली सोय असते. विविध प्रकारचे टॉवेल्स आणि नॅपकिन्स मिळायला लागले. जुन्या चादरींचं पायपुसणं एरवी घरोघरी शिवलं जायचं. तेच आता जुन्या-नव्या कापडाचं असं बाजारात देखील मिळू लागलं. काही नुसतंच शो असतात आणि त्यांना काहीच पुसलं जात नाही. पाणी शोषलं जात नाही आणि किंमत अवाच्या सवा, असे लक्षात आल्यावर लोक घरगुती पायपुसणी शिवणाऱ्यांकडून देखील ऑर्डर्स देऊन ते बनवून घेऊ  लागले. चिंध्या चिंध्या जोडून बनणारं पायपुसणं विकणं, हा काहींचा रोजगार झाला. स्पिन मॉप्स घरोघरी दिसू लागल्या. थ्रेडेड मॉप्स, वायपर मॉप्स वेगवेगळ्या हॉस्पिटल्सपासून ते विविध कार्यालयांपर्यंत जागोजागी वापरल्या जातात हल्ली. घासण्यांचे अनेक प्रकार आले. कुंचे, झाडण्या वेगवेगळ्या कामांसाठी अशा तयार झाल्या. विविध स्प्रे बाजारात आले. घासून काढायच्या ब्रशचे नानाविध आकारप्रकार दिसू लागले. ग्लोव्हज् घालून, मास्क घालून, पाय योग्य पादत्राणाने नीट झाकून साफसफाई करणं जास्त सोयीचं आणि आरोग्यदायी आहे, हे हळूहळू रुजू लागलं.

साफसफाई करणं हे आनंदाचं, आरोग्याचं आणि प्रसन्नतेचं साधन म्हणून बघितलं जातं. पण त्यासाठी विविध केमिकल्सचा भसाभस वापर देखील वाढला. तितकी साधनं, सुविधा नसतील तर पुरेशी साफसफाई झालेलीच नाही, असंही नकळत कंडिशनिंग झालं. हातापायांची आणि आरोग्याची काळजी घेणं वेगळं आणि भसाभस केमिकल्स वापरल्याशिवाय, टॉयलेट्समध्ये अमकेच लिक्विड अमक्या प्रमाणात रोजच्या रोज ओतल्याशिवाय ते स्वच्छ होऊच शकत नाही, अशाही सवयी कळत नकळत जडल्या. बाळांना रांगायला सगळीकडे अतिरेकी स्वच्छ असलेले वातावरण देण्याचा कल एकीकडे- जो एरवी काही अंशी ठीकच आहे, पण त्यांना धूळच लागू देऊ  नये, मातीत खेळातच येऊ  नये, असेच सगळे खबरदारीचे उपाय असतात अनेक ठिकाणी. त्या उलट म्हणजे, ऐवी तेवी ते घरभर रांगतातच, तर त्यांना असे विशिष्ट ‘बेबी मॉप्स’ म्हणून मिळणारे कपडे घालायचे की रांगता रांगता ते घराच्या फरशा पुसून काढतील ते कपडे घालून, असं ब्रॅण्डिंग देखील झालं या कपडय़ांचं! त्याने खासकरून घरातल्या बाईचा कसा वेळ वाचला, अशा जाहिराती आल्या. जणू घरगृहस्थी सांभाळणं हे बाईच्याच कपाळावर कोरून ठेवलेलं आहे! अशाच जाहिरातींच्या ट्रेंड्समधून अंतर्वस्त्रांपासून सुरू होणारं फडकं पुराण मॉल्समधल्या अत्यंत हलक्या दर्जाच्या, पण तशा जास्त किंमत असणाऱ्या पुसायचा फडक्यांची वर्दी घरात लागून पुढे जाऊ  लागली. आपलेच सुती जुने कपडे फाडून देखील फडकं म्हणून वापरायचे असतील, तर नीटशा टिपा घालून, ठरावीक छोटय़ा आकारात ते बनवता किंवा बनवून घेता येतात. पण फडक्यांच्या नशिबी अशी साधीशी टापटीप, ऐट क्वचितच असते! ज्याने स्वच्छता करायची, तेच बिचारं केविलवाणं असतं. घराघरातली पायपुसणी तर फार क्वचित आंघोळ करून स्वच्छ होतात. उन्हात वाळतात.

आपल्या घरातल्या फडक्यांचं आणि पायपुसण्याचं ऑडिट केलं, तर आपल्या स्वच्छतेच्या कल्पनांचा भोपळाच फुटायची शक्यता जास्त आहे!

प्राची पाठक prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:02 am

Web Title: home cleaning cloths and kitchen cleaning duster
Next Stories
1 घरगोष्टी : आटोपशीर स्वयंपाकघरे
2 गाळयाचे हस्तांतरण कायद्यानेच!
3 घर बदलत्या काळाचे मातीविना शेती
Just Now!
X