News Flash

घर सजवताना : स्वयंपाक  घर

स्वयंपाक खोली जर प्रशस्त असेल तर खोलीच्या मधोमध बेटाप्रमाणे एक लहान ओटादेखील शोभून दिसतो.

गौरी प्रधान

घर  म्हणजे केवळ नुसत्या भिंती नव्हेत.  त्या घराला घरपण देण्यात अंतर्गत सजावटीचा मुद्दा फार महत्त्वाची भूमिका बाजावतो. घराच्या अंतर्गत सजावटीबाबत मोलाचं मार्गदर्शन करणारं सदर.

घर म्हणजे घर असते नसतात नुसत्या भिंती. म्हणूनच कोणत्याही जागेची अंतर्गत सजावट करताना बऱ्याच लहानसहान गोष्टींची काळजी ही इंटिरियर डिझाइनर म्हणून मला घ्यावीच लागते. एखादे घर डिझाइन करताना माझ्यातली डिझाइनर, त्या डिझाइनमधून त्या घरात राहणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व कसे झळकेल व त्याचसोबत ते वापरायलाही कसे सुखकर होईल हाच विचार सतत करीत असते. विशेषत: भारतीय घरांची सजावट करीत असताना गृहिणीचा विचार फार महत्त्वाचा ठरतो, त्यातही सजावट जर स्वयंपाक खोलीची असेल तर मग तर भारतीय गृहिणीचा अगदी जिव्हाळ्याचाच विषय. स्वयंपाक खोलीतील स्टोअरेज, त्यावरील लॅमिनेट, त्याची रंगसंगती, भिंतींवर साजेशा टाइल्स, स्वयंपाक खोलीतील आधुनिक उपकरणे आणि सर्वात महत्त्वाचा स्वयंपाकाचा ओटा. वर नमूद केलेली प्रत्येक गोष्ट जुळून आली तर स्वयंपाक खोलीच्या सौंदर्यात तर भर घालतेच पण त्याचसोबत गृहिणीचा तिथला वावरही सोप्पा करते.

स्वयंपाक खोली लहान असो अथवा मोठी, तेथील ओटय़ाची रचना जर व्यवस्थित असेल तर तिच्या जागेचा पूर्णपणे व वापर होऊ  शकतो. स्वयंपाकाचा ओटा बनवताना लक्षात घेण्याच्या काही गोष्टी म्हणजे त्याची लांबी, रुंदी, उंची व तो बनविण्यासाठी वापरली जाणारी सामग्री.

स्वयंपाकाच्या ओटय़ाची रचना ही शक्यतो वावरायला सुटसुटीत जागा उरेल अशी असायला हवी. जर स्वयंपाक खोली आयताकृती असेल तर समांतर दोन ओटे बनवून घ्यावेत परंतु, दोन ओटय़ांमध्ये किमान ३ फूट तरी अंतर असणे गरजेचे आहे. चौरसाकार स्वयंपाक खोलीत तिच्या आकारमानानुसार इंग्रजी ‘C ‘ अथवा ‘L ‘ आकाराचा ओटा बनवू शकतो. स्वयंपाक खोली जर प्रशस्त असेल तर खोलीच्या मधोमध बेटाप्रमाणे एक लहान ओटादेखील शोभून दिसतो.

स्वयंपाकाच्या ओटय़ाची उंचीदेखील तितकीच महत्त्वाची, ती नेहमी तो वापरणाऱ्यांच्या सवयीनुसार व उंचीनुसार असायला हवी. भारतीय गृहिणींच्या उंचीचा विचार केला तर साधारणपणे ३० इंच ते ३२ इंच उंची पुरेशी होते. परंतु काही वेळा अतिरिक्त बुटकेपणा अथवा अतिरिक्त उंचीच्या व्यक्तींसाठी थोडा वेगळा विचार करणे आवश्यक असते. मागे एकदा आमच्या एका क्लायंटची उंची सहा फुटापेक्षा जास्त होती. अशा वेळी त्यांना फार खाली वाकून काम करायला लागू नये म्हणून त्यांच्या ओटय़ाची उंची आम्ही ३४  इंच ठेवली, ज्यामुळे त्या आता अतिशय सहजपणे ओटा वापरू शकतात. तीच गोष्ट ५फूट पेक्षाही कमी उंची असणाऱ्यांची. अशा व्यक्तींसाठी ओटय़ाची उंची ही जास्तीत जास्त ३० इंच असावी.

उंचीसोबतच महत्त्वाची असते ओटय़ाची रुंदी. ओटय़ाची रुंदी ही ओटय़ाजवळ उभे राहून सहजपणे ओटय़ाच्या भिंतीला हात लागेल इतकीच असायला हवी. हल्ली हॉब म्हणजेच ओटय़ात बसविण्याची शेगडी लोकप्रिय आहे. या शेगडय़ा दोन-तीन चुलींपासून ते सहा चुलींपर्यंत बाजारात उपलब्ध असतात. या प्रकारची शेगडी बसवायची असल्यास ओटय़ाची रुंदी २६ इंच पर्यंत ठेवावी. त्याचप्रमाणे ओटय़ाचे काम चालू असतानाच कारागिराला या शेगडीची व्यवस्थित मापे द्यावीत जेणेकरून, ती बसवता येईल असा कट आऊट ओटय़ात त्याला काढता येईल. नेहमीची ओटय़ावर ठेवण्याची शेगडी घेणार असाल तर २४ इंच रुंदीचा ओटादेखील पुरतो. जर कुकिंग रेंज घेण्याचे ठरत असेल तर मात्र दोन वेगवेगळ्या ओटय़ांच्या मध्ये कुकिंग रेंजला लागेल इतकी जागा सोडावी लागेल. त्यामुळेच ओटा तयार होण्यापूर्वीच आपल्याला कोणत्या प्रकारची शेगडी घ्यायची आहे हे ठरवलेले बरे.

शेगडीच्या बरोबरीने महत्त्वाचा घटक म्हणजे सिंक. सर्वसाधारण चार ते सहा माणसांच्या कुटुंबासाठी २४ इंच  ७  १८ इंच आकारमानाचे सिंक पुरते, पण पुन्हा प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार सिंगल बाउल, डबल बाउल, ड्रेन बोर्डसकट व विनाड्रेन बोर्ड असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. सिंक घेताना मुळीच तडजोड न करता नेहमी चांगल्याच प्रतीचे घ्यावे, कारण एकदा बसविलेले सिंक सहजासहजी बदलता येत नाही. बाजारात स्टेनलेस स्टीलच्या सिंकमध्ये ग्लॉसी, मॅट व नॉन स्क्रॅचेबल असे पर्याय उपलब्ध असतात. यातील आपल्या आवडीचा पर्याय निवडून आधीच कारागिराला नेऊन द्यावा म्हणजे ओटा बनविताना ते कायमस्वरूपी आत बसविता येते.

वरील सर्व गोष्टींसोबत एक आधुनिक स्वयंपाक खोली डिझाइन करताना फ्रीझ व डिश वॉशरसारख्या महत्त्वाच्या घटकांना विसरता कामा नये. आपण ज्या प्रकारचा फ्रीज घेणार आहोत त्याची आधीच माहिती काढून त्याच्या रुंदीइतकी जागा आधीच सोडायला हवी, त्याचबरोबर डिश वॉशर हा शक्यतो स्वयंपाकाच्या ओटय़ाखाली राहतो, परंतु त्यासाठी योग्य जागा सोडण्यासोबतच जिथे तो ठेवणार तेथील ओटय़ाची उंचीदेखील त्याला अनुरूप असणे आवश्यक आहे. सोबत दिलेल्या आकृत्यांमधून काही गोष्टींचा व्यवस्थित अंदाज येऊ  शकेल.

हे झालं ओटय़ाच्या आकारमानाविषयी आणि त्यावरील उपकरणांविषयी, आता थोडं ओटा बनविण्याच्या सामग्रीविषयी. पूर्वी ग्रॅनाइट अथवा काडाप्पाच्या ओटय़ाला खालून ४ इंच जाडीच्या भिंतीचा आधार दिला जायचा. या प्रकारच्या ओटय़ात बरीच जागा वाया जात असे. जसा काळ बदलला, त्याप्रमाणे ओटय़ासाठी वापरण्याच्या साहित्यातही आमूलाग्र बदल झाले. आता नव्या पद्धतीप्रमाणे कडाप्पा, कोटा अथवा हलक्या प्रतीच्या मार्बल चा वापर ओटय़ाला आतून आधारासाठी केला जातो व वरून आपल्या आवडीनुसार ग्रॅनाइट, मार्बल किंवा एखादे आधुनिक कृत्रिम मटेरियल वापरले जाते. काही वेळा आतून आधारासाठी स्टेनलेस स्टीलची फ्रेम बनवून वरून आपल्या आवडीनुसार फिनिशिंग मटेरियल टाकले की झटपट ओटा तयार.

ग्रॅनाइट हा त्यातल्या त्यात स्वयंपाकाच्या ओटय़ासाठी लोकप्रिय परंपरागत प्रकारात मोडतो. साधारणत: रु.१८०/- ते रु. २५०/- प्रति चौ. फुटाने बाजारात सहज उपलब्ध असणारा ग्रॅनाइट त्याच्या गुणांमुळे आपली लोकप्रियता टिकवून आहे. मार्बल त्यामानाने स्वयंपाकाच्या ओटय़ासाठी कमीच वापरला जातो. याची काही ठळक कारणे म्हणजे मार्बलच्या तुलनेत ग्रॅनाइट हा तसा टणक, कोणत्याही केमिकलला म्हणजे हळद, व्हिनेगर वगैरेला दाद न देणारा, जात्याच कठीण असल्याने पटकन कोणते ओरखडेही उठत नाहीत, त्याचसोबत उच्च प्रतीचे पॉलिश केल्यास छान चमकदार दिसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रॅनाइट हा बॅक्टरिया प्रतिबंधक आहे, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित. ग्रॅनाइटप्रमाणेच ग्रीन मार्बलचा देखील स्वयंपाकाच्या ओटय़ासाठी एक स्वस्त तरीही उत्तम पर्याय म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही. भारतात राजस्थानात उत्तम प्रतीचा ग्रीन मार्बल आढळतो. चांगला ग्रीन मार्बल बडोदा ग्रीन नावाने प्रसिद्ध आहे जो रु. ९०/- ते रु.१००/- प्रति चौ. दराने मिळतो.

हे झाले काही नैसर्गिक दगडांचे प्रकार पण त्याचसोबत बाजारात स्वयंपाकाच्या ओटय़ासाठी काही कृत्रिम पर्यायदेखील उपलब्ध आहेत. कोरियन हा त्यातीलच एक पर्याय. काही काळापूर्वी डय़ू पॉन्ट कंपनीने कोरियन या नावाने acrylic polymer  पासून बनविलेले उत्पादन बाजारात आणले. आज कोरियनसदृश अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. ग्रॅनाइट अथवा मार्बलप्रमाणेच कोरियनदेखील ओटय़ाच्या दर्शनी भागाला लावता येते. मॉडय़ुलर प्रकारच्या स्वयंपाकाच्या ओटय़ावर कोरियनचा सर्रास वापर केला जातो. याचे वैशिष्टय़ म्हणजे अनेक रंगांत व जाडींमध्ये ते उपलब्ध होते. पाहिजे त्या आकारात वळवता येत असल्याने त्याचे सिंकदेखील बनवता येतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे जोड दिसत नाही, त्यामुळे संपूर्ण ओटा एकसंध दिसायला मदत होते. कोरियनचा ओटा वापरताना थोडी काळजी मात्र घ्यावी लागेल. गरम भांडी वगैरे ठेवताना खाली स्टॅण्ड आठवणीने ठेवावे अन्यथा त्याचा ठसा उमटू शकतो. काही नामांकित कंपन्यांचे हे उत्पादन रु. ७००/- ते रु. ९००/- प्रति चौ. फूट दराने बाजारात मिळते. ग्रॅनाइट किंवा मार्बलच्या तुलनेत थोडे महाग असले तरी कोरियन स्वयंपाकाच्या ओटय़ाला एक आधुनिक स्वरूप देते हे नक्की.

आज इथेच थांबू या, पण स्वयंपाक खोलीची सजावट मात्र अजून संपलेली नाही. अजून बरेच काही आपली वाट पाहत आहे.

गौरी प्रधान ginteriors01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 5:19 am

Web Title: home kitchen
Next Stories
1 उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्वकिासाचा मार्ग मोकळा
2 बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा : काल आणि आज
3 लळा लागला असा की.. : लाडकं त्रिकूट
Just Now!
X