गौरी प्रधान ginteriors01@gmail.com

दिवाळी, दीपावली, दीपोत्सव म्हणजेच सण प्रकाशाचा, सण तेजाचा, सण दिव्यांचा. ज्या क्षणाला माणसाला अग्नीचा शोध लागला अगदी त्या क्षणापासून माणूस त्या तेजाने, प्रकाशाने प्रभावित झाला असावा. अंधकाराचे साम्राज्य नष्ट करणाऱ्या मिणमिणत्या पणतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज अशा टप्प्यावर येऊन ठेपलाय, की रोजच दिवाळी म्हटले तरी वावगे ठरू नये. घराचे किंवा कोणत्याही वास्तूचे इंटिरियर करत असताना त्यात प्रकाशयोजनेचा वाटा फार मोलाचा ठरतो. त्यातूनही आजचा काळ हा झगमगाटाचा आहे, त्यामुळे घरातील प्रकाशयोजना ही फक्त उपयुक्ततेची गोष्ट राहिलेली नाही, तर त्याच्या सोबत सौंदर्याचे आयामदेखील जोडले गेले आहेत. म्हणूनच आज दिव्यांच्या सणाच्या धर्तीवर आपणही घराच्या इंटिरियरमधील प्रकाशयोजनेबद्दल थोडे जाणून घेऊयात.

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

कोणत्याही घराच्या इंटिरियरमध्ये प्रकाशयोजना, मग ती कृत्रिम असो वा नैसर्गिक फारच महत्त्वाची भूमिका पार पाडते. नैसर्गिक प्रकाशयोजनेबद्दल थोडक्यात सांगायचे तर ती पूर्णपणे आपल्या घराच्या अथवा इमारतीच्या रचनेवर अवलंबून असते. कृत्रिम प्रकाशयोजना मात्र कशी करावी हे संपूर्णपणे आपल्या हातात असते.

कृत्रिम प्रकाशयोजनेचे ढोबळमानाने आपण दोन भाग करू शकतो. एक म्हणजे, टास्क लाइटिंग आणि दुसरे डेकोरेटिव्ह लाइटिंग. टास्क लाइटिंग या नावावरूनच आपल्याला त्याचे स्वरूप लक्षात येते. जेव्हा जेव्हा नैसर्गिक प्रकाशाची कमतरता भासते, अशा वेळी रोजचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ही प्रकाशयोजना आवश्यकच. ही प्रकाशयोजना शक्यतो छतावरून केली जाते. जेणेकरून, संपूर्ण खोलीत एकसारखा प्रकाश पसरेल. पूर्वी याकरता टय़ूब लाइट्स, सीएफएल लाइट्सचा वापर होत असे. आता मात्र एलईडी  पॅनल लाइट्सने यांची जागा घेतली आहे. एलईडी पॅनल लाइट्स हे टास्क लाइट्सचे एक उत्तम उदाहरण आहे. यात घरगुती वापरासाठी अगदी ५ व्ॉटपासून ते २२ व्ॉटपर्यंत निरनिराळ्या क्षमतेचे लाइट्स मिळतात. एलईडी पॅनेलचा विचार करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. एक तर याची प्रखरता सामान्य टय़ूब लाइट किंवा बल्बपेक्षा जास्त असते. शिवाय याचा उजेड एका सरळ रेषेत पडतो, यामुळे ज्या भागात लाइट लावलेला आहे तो भाग पूर्णपणे उजळून निघतो. परंतु तेवढा भाग सोडता, पुढे त्याचा प्रकाश तेवढय़ाच तीव्रतेने पोहोचत नाही. म्हणूनच खोलीतील कुठेतरी एकाच ठिकाणी फार जास्त क्षमतेचा लाइट लावून काही उपयोग नाही. त्याऐवजी थोडय़ा मध्यम क्षमतेचे चार लाइट चार कोपऱ्यांत लावणे जास्त सोयीस्कर. एलईडी लाइट्सच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, याचा उजेड जितका अधिक, त्या प्रमाणात काळानुरूप वापर हळूहळू कमी होत जातो. यामुळेच एका खोलीत जर चार लाइट्स लावले असतील तरी शक्यतो त्या चारींची बटणे अर्थात स्विचेस वेगवेगळी ठेवण्याचा प्रयत्न करावा. किंवा अगदीच शक्य नसल्यास एका बटणावर दोन किंवा तीन (खोलीत एकूण किती लाइट्स आहेत याचा विचार करून) लाइट्स ठेवावेत. याचा दुहेरी उपयोग होतो. एक तर खोलीतील ज्या भागात आपण काम करत असू तेवढीच वीज जळते, म्हणजे वीज बिलात कपात. आणि शिवाय योग्य तितकाच वापर झाल्याने एलईडीच्या आयुर्मानात वाढ.

टास्क लाइटचा वापर हा शक्यतो काम करत असताना केला जातो. उदा. स्वयंपाकखोली किंवा अभ्यासाची खोली, जिथे आपल्याला प्रखर प्रकाशाची आवश्यकता असते. परंतु याचसोबत महत्त्वाचे असतात ते डेकोरेटिव्ह लाइट्स हे आपल्या घराचे सौंदर्य खुलवण्याचे काम करतात. आपण जेव्हा डेकोरेटिव्ह लाइट्स म्हणतो त्या वेळी त्या लाइट्सपासून मिळणारा प्रकाश आणि त्याचे बारूप अर्थात, फिटिंगचादेखील विचार करावा लागतो. डेकोरेटिव्ह लाइट्समध्येदेखील कमी-जास्त प्रखरतेने आणि निरनिराळ्या रंगांचा प्रकाश देणारे लाइट्स उपलब्ध आहेत. पण डेकोरेटिव्ह लाइट्सकडून मुख्यत्वे जास्त प्रकाशा ऐवजी सुंदर, उबदार, किंवा प्रसंगानुरूप प्रकाशाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वातावरणाची अपेक्षा केलेली बरी.

डेकोरेटिव्ह लाइट्समध्ये भिंतीवर लावायचे- ज्यांना वॉल लाइट म्हणतात तसे झुंबर, टेबल लॅम्पचा समावेश होतो. त्याचसोबत यात भर म्हणून  एलईडी लाइट्सची पट्टीदेखील आता डेकोरेटिव्ह लाइट्सचा एक महत्त्वाचा भाग समजली जाते. डेकोरेटिव्ह लाइट्स निवडताना त्यातून आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रकाश अपेक्षित आहे हे आधीच स्पष्ट असावे. म्हणजे, त्यातून मिळणाऱ्या उजेडाला अधिक प्राधान्य द्यायचे की वरच्या फिटिंगला-  म्हणजेच  दृश्यरूपाला याचा निर्णय घेणे अधिक सोपे होऊन जाईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इंटिरियरचे काम सुरू असेल तर ते आपोआप घडेलच.

या दोन प्रकारांव्यतिरिक्त काही बहुपयोगी लाइट्सदेखील असतात. याचा उपयोग उजेडासाठी तर होतोच, पण त्याचसोबत त्यातून मिळणारा प्रकाश घरात छान वातावरणनिर्मिती करण्यास हातभार लावतो. महत्त्वाचे म्हणजे हे लाइट्स दिसायलाही सुंदर दिसतात. याचे फार उत्तम उदाहरण म्हणजे लोलकांचा वापर केलेले झुंबर.  शिवाय पिक्चर लाइट्सदेखील याच प्रकारात मोडतात. पिक्चर लाइट्स हे मुख्यत्वे एकाद्या पेंटिंग किंवा वॉल पीसला उठावदार किंवा प्रकाशित करण्यासाठी वापरतात. यासाठी आपण स्पॉट लाइटचादेखील वापर करू शकतो. स्पॉट लाइट या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. याचा रंग बरेचदा पिवळा असतो आणि याचं कामच हे की एखाद्या वस्तूला उठावदार बनवणे. याचे खास वैशिष्टय़ म्हणजे, याचा उजेड जराही इतरत्र ना पसरता ज्या वस्तूकडे याचा रोख आहे तिथे थेट जाऊन पडतो. अर्थात, यातही तुम्ही तो काय क्षमतेचा निवडलाय आणि जी वस्तू उठावदार करायची आहे तीपासून किती अंतरावर लावलाय या गोष्टी महत्त्वाच्या.

इन्डायरेक्ट लाइट म्हणजेच अप्रत्यक्ष प्रकाशयोजनादेखील सध्याच्या काळातील एक प्रचंड लोकप्रिय संकल्पना आहे. यात एलईडी लाइटची पट्टी एखाद्या कोनाडय़ात अथवा फॉल्स सीिलगच्या खाचेत लपवली जाते. यात ती पट्टी आपल्या नजरेला न पडता केवळ तिचा उजेड तेवढा दिसतो. याचा दृश्य परिणाम हा अतिशय जादुई दिसतो.

सर्वात शेवटी, पण सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की तुम्ही घरात किती लाइट्स लावलेत हे महत्त्वाचे नसून, ते कशा प्रकारे लावलेत हे जास्त महत्त्वाचे. घरगुती लाइट्समध्ये साधारणपणे टास्क लाइट घेताना स्वयंपाकखोलीसाठी पांढऱ्या स्वछ प्रकाशयोजनेचे लाइट्स पसंत करावेत. जेणेकरून स्वयंपाकखोलीतील प्रत्येक वस्तू तिच्या मूळ रंगात आणि स्पष्ट दिसू शकेल. पण इतर भागात मात्र आपण मध्यम पांढरा किंवा ज्याला डे लाइट असे म्हटले जाते, ती प्रकाशयोजना निवडावी. या प्रकाशयोजनेमुळे घरात एक प्रकारचे उबदार वातावरण निर्माण होते. डोळ्यांनाही याचा त्रास होत नाही. हल्ली डेकोरेटिव्ह लाइट्समध्येही विविध रंगांच्या प्रकाशयोजना असलेले लाइट्स उपलब्ध आहेत. एलईडी लाइट्सच्या पट्टय़ा तर अनेकविध रंगांत मिळतात. परंतु घरात उत्तम वातावरणनिर्मितीसाठी मात्र डेकोरेटिव्ह प्रकाशयोजनेत पिवळ्या प्रकाशाला वरचे स्थान आहे.

थोडक्यात सांगायचे तर घरातील प्रकाशयोजना करताना घराचे शोरूम होणार नाही याची काळजी घेऊन प्रकाशयोजना करा. फक्त झगमगाट म्हणजे उत्तम प्रकाशयोजना नव्हे, तर योग्य जागी योग्य वेळी योग्य तितक्याच प्रकाशाचे नियोजन करणे म्हणजे उत्तम प्रकाशयोजना.

(इंटिरियर डिझायनर)