घराच्या इंटिरियरचा घरात राहणाऱ्या व्यक्तींवर कळत नकळत बरा-वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच इंटिरियर खूप महत्त्वाचे आहे व पर्यायाने डिझायनरही. शिल्पकार जसा एखाद्या दगडातून सुंदर शिल्प साकारतो तसेच इंटिरियर डिझायनर एका रुक्ष सिव्हिल स्ट्रक्चरमधून आपल्यासाठी आपल्या स्वप्नातले सुंदर घरकुल साकारतो.
होम इंटिरियर्स हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या घराचे इंटिरियर आपली अभिरुची, पतप्रतिष्ठा दर्शविते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्या घराच्या इंटिरियरद्वारे समोर येतात. घरी राहणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक कंगोरे आपणांस घराच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. प्रत्येक घराला स्वत:चे असे वेगळे व्यक्तिमत्त्व असते.
होम इंटिरियर्स करणे हे पैसेवाल्यांचे काम आहे, अशी बहुतांश लोकांची मानसिकता होती. पण गेल्या काही वर्षांपासून ही मानसिकता खूप बदलली आहे. आजची पिढी स्वत:ची खूप काळजी घेते. फिटनेस, कपडे, हेअरस्टाईल अशा सगळ्याच बाबतीत खूप जागरूक आहे. आजची पिढी इंटरनेटच्या युगातील असल्याने, जगभरातील गोष्टी अगदी एका क्लिकवर पाहता येतात. आजची पिढी खूप प्रयोगशील व नव्या वाटा धुंडाळणारी आहे आणि हा त्यांचा स्वभाव त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आढळून येतो; अगदी त्यांच्या घराच्या इंटिरियर्समध्येही!
केवळ मोठय़ा बजेटमध्येच इंटिरियर करता येते, ही समजूत चुकीची आहे. बजेट कितीही लहान किंवा मोठे असो, आपण त्यात सुंदर इंटिरियर करू शकतो. त्यासाठी चार अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणे खूप गरजेचे आहे. त्या म्हणजे- १) सर्जनशीलता २) चित्रदृष्टी ३) पसा आणि वेळेचे व्यवस्थापन व ४) कामाची आखणी. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक तज्ज्ञ मदत करतो, तो म्हणजे ‘इंटिरियर डिझायनर’.
इंटिरियर डिझायनर हा प्रतिष्ठित महाविद्यालयातून शिकलेला असावा; जेणेकडून त्याला मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर होऊ शकेल. आपण इंटिरियर डिझायनर नियुक्त करण्याअगोदर त्याची शैक्षणिक पात्रता तपासून पाहावी. काम सुरू असताना आपला इंटिरियर डिझायनर वरचेवर आपणास भेटत असतो म्हणूनच आपल्या दोघांमधील सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे.
आपल्या घराचा आपल्याला अपेक्षित असलेला लुक साकारण्यासाठी इंटिरियर डिझायनर त्याचे कौशल्य पणाला लावतो. त्यासाठी त्याला सर्जनशीलतेबरोबरच आपले बजेट व अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागतो. आपले इंटिरियर हे केवळ सुंदर न दिसता, ते तितकेच योजनाबद्ध असावे लागते. देखभालीसाठी कमी खर्चिक असावे लागते.
काहीजण इंटिरियर डिझाइन करताना घराची अंतर्गत रचना बदलतात. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून हवे तसे बदल करून घेतात. या घरमालक व कॉन्ट्रॅक्टरपैकी कोणालाही इमारतीच्या रचनेचे ज्ञान नसते. त्यामुळे अशा व्यक्तींकडून केलेले बदल केवळ एका सदनिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण इमारतीसाठी धोकादायक ठरू शकतात व असे प्रकार आडमुठेपणाने किंवा लपवून केले जातात. हे बेकायदेशीर आहे. अशा बदलांमुळे इमारती कोसळल्याची अनेक उदाहरणे आहेत. संबंधित दोषी व्यक्तींना तुरुंगवासही भोगावा लागतो. म्हणूनच इंटिरियर डिझायनरचे मत व सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण सुशिक्षित व अनुभवी इंटिरियर डिझायनरला इमारतीच्या स्ट्रक्चरचे तांत्रिक ज्ञान असते.
आपण इंटिरियर डिझायनरच्या कार्यप्रणालीची माहिती घेऊ या. इंटिरियर डिझायनर आपल्या घराची काटेकोर मोजमापे घेऊन, आपल्या घराचे स्ट्रक्चर दाखवणारे ड्रॉइंग बनवतो. या ड्रॉइंगला एक्झिस्टिंग सिव्हिल लेआऊट असे नाव आहे. यानंतर आपल्या कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून सगळ्यांच्या आवडीनिवडी तपासल्या जातात. बजेटची माहिती घेतली जाते व या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपला इंटिरियर डिझायनर एखादी थीम सुचवतो. ती थीम अप्रूव्ह केल्यानंतर डिझाइन बनते व या ऑप्शनपैकी एकाची निवड होऊन फायनल डिझाइन बनते. हे डिझाइन कसे दिसेल हे स्केचेसच्या माध्यमातून दाखवले जाते. जेणेकरून आपण आपले घर काम पूर्ण झाल्यावर कसे दिसेल, प्लंबिंग, फॉल सिलिंग, इलेक्ट्रिकल वर्क अशी सगळी ड्रॉइंग्ज बनवली जातात. तसेच बजेटनुसार कोणती मटेरियल्स वापरायची हेदेखील ठरवले जाते.
यानंतर खात्रीच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून कोटेशन्स मागवली जातात. ही कोटेशन्स पास झाल्यावर कामाची आखणी म्हणजे प्लॅनिंग केले जाते. इंटिरियर डिझायनर नेमल्यामुळे होणारा सगळ्या मोठा फायदा म्हणजे कामाची संपूर्ण जबाबदारी इंटिरियर डिझायनर स्वत:च्या शिरावर घेतो. ग्राहकाला केवळ मटेरियल सिलेक्ट करणे व पेमेंट करणे इतकेच काम उरते. कॉन्ट्रॅक्टरमुळे व पूर्वानुभवामुळे कोणते मटेरियल डिझायनरला कोठे सगळ्यात चांगले व किफायतशीर दरात मिळेल याची माहिती असते. त्यामुळे त्याच्या सल्ल्याने मटेरियल खरेदी करणे फायदेशीर ठरते. आपल्याला आवडलेले मटेरियल आपल्या जागेला योग्य आहेत का, हे ठरवण्याची मुभा आपण आपल्या डिझायनरला द्यावी. उगाच अट्टहास करू नये, अन्यथा लुक बिघडण्याची शक्यता असते.
सुपरविजन करून, काम वेळेत व अपेक्षेनुसार करून घेणे हे इंटिरियर डिझायनरचे महत्त्वाचे काम आहे. साधारणपणे हा झाला ढोबळमानाने इंटिरियर डिझायनरच्या कार्यप्रणालीचा आढावा.
बहुतांश लोकांना लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे इंटिरियर करावेसे वाटत असते, पण ते इंटिरियर सुंदर असण्याबरोबरच त्या घराला ते लागू पडेल की नाही याची काळजी आपला डिझायनर घेतो.
इंटिरियर डिझायनर आपल्याला पुरवत असलेल्या सेवांसाठी काही रक्कम आकारतो. ही रक्कम आपल्या घराच्या कामासाठी येणाऱ्या खर्चाच्या काही टक्के असते, अथवा काही ठरावीक रक्कम असते. बरेच जण लाखो रुपये खर्च करून होम इंटिरियर करतात, पण इंटिरियर डिझायनरची काही हजार रुपये फी देणे त्यांना जड जाते. पण वस्तुस्थिती ही आहे की आपण इंटिरियर डिझायनर नेमल्यामुळे आपल्या कामाचा खर्च कमी होतो तसेच काम वेळेत पूर्ण होते. डिझायनरच्या प्लॅनिंगमुळे काम खोळंबून राहत नाही.
बरेचसे इंटिरियर डिझायनर हे स्वत: कॉन्ट्रॅक्टिंगही करतात. याचा फायदा असा की, आपण डिझायनर व कॉन्ट्रॅक्टर अशा दोन एजन्सीबरोबर व्यवहार न करता एकाच एजन्सीबरोबर व्यवहार करतो. त्यामुळे आपल्याला तारेवरची कसर करावी लागत नाही.
इंटिरियर डिझायनरच्या जबाबदाऱ्या बऱ्याच आहेत. जसे की- उत्तम डिझाइन बनवावे, जे योग्यही असेल, योग्य क्रमाने काम व्हावे, खर्च कमी करावा. कामगारांना योग्यरीत्या सांभाळावे. काम करताना अपघात होऊ नयेत याची काळजी घ्यावी. महापालिकेचे व सोसायटीचे नियम पाळावेत. यासाठी अनुभवी तज्ज्ञ हवा.
हल्ली आपण एकेका स्क्वेअर फुटाला हजारो रुपये मोजतो. त्यामुळे त्या जागेचा प्रत्येक इंच योग्य रीतीने वापरला जावा. आपले घर हे मायेचा ओलावा असणारे हसते खेळते, आपलेपणा जपणारे हवे. उगाच इंटिरियरच्या नावाखाली फिल्म सेट किंवा म्युझियम बनवू नये. प्रत्येकाच्या जीवनातील राहते घर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
आताच्या धकाधकीच्या आयुष्यात रोजच्या धावपळीनंतर रिचार्ज होणे खूप गरजेचे असते. या रिचार्जसाठी गरजेचे असते ते घर. घर म्हणजेच आपली माणसे व घराचे इंटिरियर. घराच्या इंटिरियरचा घरात राहणाऱ्या व्यक्तींवर कळत नकळत बरा-वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच इंटिरियर खूप महत्त्वाचे आहे व पर्यायाने डिझायनरही. शिल्पकार जसा एखाद्या दगडातून सुंदर शिल्प साकारतो तसेच इंटिरियर डिझायनर एका रुक्ष सिव्हिल स्ट्रक्चरमधून आपल्यासाठी आपल्या स्वप्नातले सुंदर घरकुल साकारतो.
(इंटिरियर डिझायनर)
अजित सावंत – ajitsawantdesigns@gmail.com

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…