जेव्हा आपण मातीविना शेती किंवा कमीत कमी माती आणि पाणी वापरून जे शेतीमधील संशोधन होत आहे तिची माहिती करून घेणार आहोत. मुख्य म्हणजे शेतीसाठी खेडय़ांकडे चला, या समजाला छेद देऊन शहरी भागांमध्ये शेती करण्यासाठी हा उत्तम पर्याय आपल्यासमोर येत आहे. जर्मनीसारख्या देशाने शहरांची वाढ नियंत्रित राखून आणि खेडय़ांमध्ये सर्व आधुनिक प्रणाली योग्य पद्धतीने निर्माण करून विकेंद्रित स्वरूपात जी नेत्रदीपक प्रगती केली ती कौतुकास्पद म्हणावी लागेल. जपानमधील शहरी संस्कृतीत वाढलेल्या जनतेने टोकियोसारख्या महानगरात जवळजवळ प्रत्येक उंच इमारतींच्या गच्चीवर आणि उंच उंच भिंतींवर फुलझाडे, भाज्या आणि फळे वाढविण्यास सुरुवात केली आणि एक मोठी शेती क्रांतीच करून दाखविली. इस्राएलने वाळवंट आणि पाण्याचा अभाव आणि जागेची कमतरता या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती घडवून आणली आहे.

त्याच काळात भारतात मात्र शहरांची बेसुमार वाढ झाली. खेडय़ात राहणाऱ्या लोकांना नागरी सुविधा प्राप्त होत नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करून शहरांकडे धाव घ्यावीशी वाटू लागली तर त्यांना दोष तरी कसा देणार? त्यामुळे एके काळी ७० ते ७५ प्रतिशत खेडय़ात राहणारी जनता आता कितीतरी मोठय़ा प्रमाणात शहरात राहावयास गेली. शहरे बकाल झाली आणि खेडी ओस पडू लागली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी घर ही संस्थाच कोलमडू लागली. घरापासून दूर राहिल्यानंतर घराबद्दलची आत्मीयता अनेक कारणांमुळे कमी होऊ लागली. तर शहरातील जागेच्या अडचणींमुळे म्हणा किंवा सतत पैसे कमावण्याचे विचार प्रबळ झाल्यामुळे म्हणा, पण घर या संस्थेचा ‘रात्रीचा निवारा’ एवढाच मर्यादित अर्थ उरला आणि निकटवर्तीय एकमेकांपासून हळूहळू दूर जाऊ  लागले आहेत. त्यातच मोबाइलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे शुभ प्रभातचे संदेश न विसरता पाठविणारी मंडळी एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद मात्र विसरून चालली आहेत. या शहरी शेतीच्या माध्यमातून कदाचित हरवलेले घरपण सापडेल आणि लोक पुन्हा एकदा शेतीकडे लक्ष पुरवू लागतील अशी अपेक्षा वाढीस लागली आहे.

या शेतीचे अनेक फायदे आहेत आणि तिला आजघडीला मर्यादादेखील आहेत. पण नजीकच्या भविष्यात या शेतीतील मर्यादा दूर करून तिची क्षितिजे विस्तारण्याचे कार्य चालू आहे. प्रत्येक पिकाला लागणाऱ्या मातीचा, पाण्याचा, पोषण घटकांचा आणि योग्य हवामानाचा अभ्यास करून नेमक्या स्वरूपात त्यांच्यासाठी हे सूक्ष्म पर्यावरण निर्माण करणे, ही या उभ्या शेतीतील मध्यवर्ती कल्पना आहे. प्रथम आपण या शहरी शेतीचे नेमके कोणते फायदे असू शकतील ते पाहू.

अविरत शेती : या शेतीचा हा सर्वात मोठा फायदा ठरणार आहे. आपल्या पारंपरिक शेतीमध्ये दोन पिकांमध्ये अंतर राखावे लागते. कारण तिथे एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करून दुसऱ्या पिकासाठी जी तयारी करावी लागते त्यामध्ये बराचसा वेळ द्यावा लागतो.

या नवीन प्रकारच्या उभ्या शेतीत मात्र हा वेळ बऱ्यापैकी वाचू शकेल. कारण आपण या पद्धतीत जी नैसर्गिक संसाधने वापरणार आहोत त्यात बरीच बचत तर होईलच, पण एक संच वापरला जात असताना दुसरा संच तयार ठेवून मग पहिल्या संचाचे काम झाले की तो वापरता येईल. दुसरा संच कार्यरत असताना पहिल्या संचाला पुन्हा कार्यान्वित करून तो पुन्हा वापरात आणता येईल. म्हणजे शेतीचे उत्पादन घेताना त्यात खंड पडणार नाही. या शेतीतील एक तज्ज्ञ डॉक्टर डिक्सन डॉपीमायर यांच्या अंदाजानुसार  एक एकर पारंपरिक शेतीतून जेवढे उत्पन्न मिळते त्याच्या २५ ते ३० पट उत्पन्न आपण तेवढय़ाच एक एकर उभ्या शेतीतून घेऊ  शकू. वाढत्या लोकसंख्येचे आणि शेतीच्या घटत चाललेल्या क्षेत्रफळात अन्नधान्याचे प्रमाण कसे वाढवायचे हा प्रश्न जो आपल्यासमोर आ वासून उभा आहे त्याला या शेतीतून जबरदस्त उत्तर मिळू शकेल.

कीटनाशकमुक्त शेती : या शेतीमध्ये पर्यावरणातील सर्व घटकांचे योग्य नियंत्रण केल्यामुळे आणि या शेतीसाठी लागणारे क्षेत्र मर्यादित असल्यामुळे त्यावर पडणाऱ्या किडीचे प्रमाण आपण कमीत कमी राखू शकू असा विश्वास आतापर्यंतच्या अनुभवावरून वाटत आहे. त्यामुळे आपल्याला कीटनाशकेदेखील अत्यल्प प्रमाणात वापरावी लागतील किंवा पूर्णपणे त्यांचा वापर आपण थांबवू शकतो. असे झाले तर कीटकनाशकांचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळू शकू. काही मित्र कीटकांचा यासाठी वापर करून घेता येईल आणि आपल्या पिकांचे आपण संरक्षण करू शकणार आहोत.

पर्यावरणपूरक शेती : या उभ्या शेतीत ट्रॅक्टरचा आणि ऊर्जेवर चालणाऱ्या इतर अवजारांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे तेवढे जीवाष्म इंधन कमी लागते आणि त्यामुळे हरित गृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. तसेच या शहरी शेतीमुळे जी कृषी उत्पादने तयार होतील त्यांचा वापर शहरी लोकसंख्येतच अधिक होणार असल्यामुळे त्यांच्या आवक जावक प्रक्रियेत वाहतूक प्रणालीमध्ये भरपूर घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील इंधन कमी खर्च होऊन पर्यावरणातील हरित गृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. अर्थात उभ्या शेतीत प्रकाशाचे नियोजन करण्यासाठी विद्युत ऊर्जा खर्च करावी लागणार असल्यामुळे हरित गृह वायूंचे प्रमाण शून्य मात्र होणार नाही. ही विद्युत ऊर्जा प्रकाशापासून मिळविली आणि भविष्यात जर सौरऊर्जेच्या निर्मितीचा खर्च कमी करून जर त्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ करता आली तर मात्र हरित गृह वायूंचे प्रमाण अत्यल्प होण्यास मदत होईल.

आता या शहरी शेतीच्या समस्या आणि मर्यादांचा विचार करू.

पीक मर्यादा :  शहरी शेतीत सर्वच प्रकारची पिके वाढविता येणार नाहीत. पालक, काकडी, मेथी, इतर पालेभाज्या, तोंडली, भोपळा, मिरच्या, भेंडी, कोथिंबीर, लिंबे, दोडकी, घोसावळी यासारख्या भाज्या आपल्याला वाढविता येतील, पण तृण धान्य मात्र या पद्धतीने वाढविता येणे अजून तरी अवघड आहे.

कीटक परागीभवन आणि उभी शेती : ज्या वनस्पतींना परागीभवन होण्यासाठी कीटकांची किंवा पक्ष्यांची गरज असते त्या वनस्पती आपण या नवीन पद्धतीत घेऊ  शकणार नाही. आपल्याला जी तृणधान्ये मोठय़ा प्रमाणावर लागतात त्यांचे उत्पादन देखील शहरी शेतीत करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला पारंपरिक शेतीचाच वापर करावा लागणार आहे.

समाजात या व्यवसायाबद्दल रुची निर्मिती : आजकाल भारतातील कोणत्याही प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांशी बोलताना असे जाणवते की, शेती क्षेत्राविषयी या नवीन पिढीच्या मनात ना आकर्षण आहे ना कुतुहूल! देशभरचा तरुण विद्यार्थी जेव्हा असा विचार करीत असतो तेव्हा ही बाब देशाच्या भविष्यासाठी अतिशय घातक सिद्ध होऊ  शकते. एकेकाळी शेतीप्रधान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या देशात असे काय घडत आहे की विद्यार्थी वर्गाने या क्षेत्राकडे संपूर्ण पाठ फिरवावी? या शहरी शेतीविषयी जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र विद्यार्थी वर्गात जबरदस्त कुतुहूल निर्माण होऊ  शकते असे जाणवले. त्याचा योग्य फायदा घेऊन आपल्याला या दिशेने चांगली प्रगती करता येईल असा विश्वास वाटतो.

पाण्याचे नियोजन आणि  पुनर्चक्रांकन : जलशेती हा उभ्या शेतीचा एक प्रमुख प्रकार आहे. त्यात पारंपरिक शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत ७०% कमी पाणी लागते. पाण्याचा वापर तुषारसिंचनाच्या स्वरूपात केला तर पाण्याच्या गरजेमध्ये अजून कमी आणता येते.

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.

छायाचित्रे- मैत्रेयी केळकर