‘श्री’ची भूमिका साकारताना ‘गोकुळ’ या वास्तुविषयी शशांक म्हणूनही एक आपलेपण निर्माण झालं.
गेली पावणेतीन वर्षे मी ‘लक्ष्मी स्टुडिओ’मध्ये म्हणजेच ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘गोकुळ’ या घरात शूटिंग करतोय. शूटिंगच्या अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या ८०८ व्या भागापर्यंत या घरात मला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. खरं तर प्रत्येक घराला त्या घरातली माणसं आनंदी राहण्यासाठी एकप्रकारचं चैतन्य लागतं आणि तरच ते घर सदैव आनंदी, समाधानी राहतं.. नेमकी हीच गोष्ट या घराचीही आहे. मला वाटतं, अशाच एका अदृश्य चैतन्यामुळे या मालिकेला पहिल्या भागापासून ते अगदी शेवटच्या भागापर्यंत भरभरून प्रसिद्धी मिळाली.. प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
‘होणार सून..’ या मालिकेतील ‘गोकुळ’साठी घर शोधताना मालिकेचे निर्माते- दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी बघताचक्षणी या लक्ष्मी स्टुडिओची निवड केली, हेही एक विशेषच! या घराच्या भोवताली खूप मोकळी जागा आहे; आपण खऱ्या अर्थाने त्या जागेला ‘ओपन स्पेस’ म्हणू अशी! कदाचित जागेतील हाच ‘ओपननेस’ (मोकळेपणा) आम्हा कलाकारांच्या स्वभावात, वागण्या-बोलण्यातही उतरला असावा. त्यामुळेच या मालिकेपलीकडेही वैयक्तिक पातळीवर आम्हा कलाकारांमध्ये एक प्रकारचं मोकळं, प्रेमळ नातं दृढ झालं. या दृढ बंधामुळेच असेल कदाचित, आमच्या मालिकेत एकही बदली कलाकार घ्यावा लागला नाही. प्रत्येकालाच या वास्तूने, सेटवरच्या वातावरणाने आपलंसं केलं. त्यामुळेच कदाचित एकाही कलाकाराला मालिका सोडून जाण्याची इच्छा झाली नसावी.
हे घर निसर्गरम्य परिसरात आहे. त्यामुळे इथल्या निसर्गाची लाभलेली साथ ही आमच्यासाठी मोलाची ठरली. इतकं बिझी शेडय़ुल असूनही इथल्या निसर्गाने आम्हाला कधी थकवा जाणवू दिला नाही, ही या निसर्गाचीच किमया! मला प्राणी-पक्ष्यांची खूप आवड. इथल्या निसर्गामुळे अनेक सहचरांचा सहवासही मला लाभला. पशु-पक्ष्यांबरोबरच शहरात दुर्मिळ असलेले साप, अजगर यांचं दर्शनही या वास्तूच्या भोवती घडलं. इतकंच काय, आमच्या सेटभोवती असलेल्या श्वानकुळाशी आम्हा कलाकारांचं मैत्र जुळलं. इतकं की, या घराची देखभाल करणारे पाटील कुटुंबीयही आमचं श्वानकुळाविषयी असलेलं प्रेम लक्षात घेऊन परिसरातील कुत्र्यांची पिल्लं सेटवर घेऊन येत. मग फावल्या वेळेत या कुत्र्यांची काळजी घेणं, त्यांना जेवू घालणं हा कार्यक्रम चाले. आमच्यासाठी हा एक विरंगुळाच! इथे जवळच एक मोठा गोठा आहे. हास्यास्पद वाटेल, पण या काळात तिथल्या गायी-म्हशींशीही आमचं सख्य जुळलं.
आमच्या मेकअप रूममधील भिंती या आम्ही जिंकलेली बक्षिसं, लेख यांनी सजवलेल्या असत. मालिकेच्या यशाचा हा चढता आलेख असा चित्र-शब्दरुपांत सदैव पाहताना अधिक चांगलं काम करायची सतत जाणीव होत असे. घर म्हणजे प्रत्येकाचा एक हळवा कोपरा. इथेही आमची खोली, आई-आजीची खोली, आईची खोली यांचा सेट तयार करताना प्रत्येकाच्या वयानुसार फर्निचरमध्ये बदल करून ती सजवली जात असे. त्या वस्तूंशीही माझं एक अनोखं नातं जुळलं.
मालिका शेवटच्या वळणावर आली आहे. मी इथली बाल्कनी, खिडकी खूप मिस करेन. मी जवळजवळ १२ ते १३ तास या घरात शूट करायचो. शूट संपल्यावर मी गमतीने म्हणायचो, ‘मी घरातून (सेटवरून) आता लॉजवर (माझ्या स्वत:च्या घरी) जातोय.’ माझ्यासाठी हे घर म्हणजे खरंखुरं गोकुळ आहे आणि ते कायम माझ्या स्मरणात राहील.
शशांक केतकर -shashphotos@gmail.com 
शब्दांकन : 

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट