कोकणामधील रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड नावाच्या छोटय़ाशा गावात डिपार्टमेंटल स्टोअर (?) व तेही शतकी परंपरा लाभलेलं, ही आश्चर्यजनक बातमी कळताच ते दुकान आणि जवळजवळ तेवढेच ऊन-पाऊस झेललेलं त्यांचं, म्हणजे ताम्हनकरांचं घर पाहायला जाण्याचं मी ठरवून टाकलं.

केशव गोविंद ताम्हनकर हे सद्गृहस्थ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाला राजापुरातील कुवेशी या गावातून पत्नी व मुलांसह इथे आले. जिथे आता दुकान, घर आहे, ती जागा तेव्हा होडींच्या बंदराची होती. इथे व्यापाराला संधी आहे हे ओळखून त्यांनी जवळच्या किरकोळ पुंजीवर सुपारी, पान, तंबाखू याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यात किराणामालाची भर पडली. थोडा जम बसल्यावर त्यांनी दूरदृष्टीने (आताची) समुद्रकाठची नऊ गुंठे जागा ९९ वर्षांच्या भाडेकराराने घेतली. नंतर पुढच्या पिढीने एक पाऊल पुढे टाकत ३० वर्षांतच ती नावावर केली.

ही पुढची पिढी म्हणजे केशवरावांचे ३ मुलगे- वासुदेव, हरी आणि यशवंत. त्यांनी किरकोळ विक्रीसोबत होलसेल व्यवसायात उडी मारली. त्या काळी या ताम्हनकर कुटुंबाचं स्वत:च्या मालकीचं एक मोठं गलबत होतं. केवढं? तर तीन ट्रक सामान एका वेळी आणता येईल एवढं. त्या वेळी जलमार्ग हाच राजमार्ग असल्याने ही व्यवस्था. या गलबताने १९७८ पर्यंत सेवा दिली. त्यानंतर रस्ते बांधणी सुरू झाली आणि वाहतूक भूमार्गाकडे वळली तेव्हा या गलबताला निरोप द्यावा लागला.

ताम्हनकरांचं टप्प्याटप्प्याने वाढत गेलेलं भलं मोठं कौलारू घर बाहेरून बघतानाच ‘अबब’ हा उद्गार मनात उमटतो. यातील ६० टक्के भाग दुकानाकरिता व उर्वरित जागा राहण्यासाठी. खाडी तर इतकी जवळ की पूर्वी समुद्र दिवस-रात्र घराचे पाय धूत असे. पूर्वी का, तर त्सुनामी आल्यावर सरकारने दोघांमध्ये मोठाल्या काळ्या दगडांची संरक्षक भिंत उभी केलीय.

समोरच्या दारातून आत शिरताच आपण थेट दुकानातच प्रवेश करतो. (अर्थात घरात जायला बाहेरून दुसरी वाट आहेच). बारशापासून बाराव्यापर्यंत सर्व गोष्टी एकाच छपराखाली मिळण्याचे ठिकाण, असा या दुकानाचा लौकिक. (आता त्यात वायफाय सुविधाही समाविष्ट झालीय.) म्हणूनच तर त्याला डिपार्टमेंटल स्टोअर म्हणायचं. इथे मिळणाऱ्या वस्तूंच्या रेंजपेक्षाही त्यातील साठवणीचा माल त्यांनी ज्या निगुतीने ठेवलाय ते पाहूनच अवाक् व्हायला होतं. गहू, तांदळापासून पशुखाद्यापर्यंत आणि साबणाच्या विविध प्रकारांपासून कीटकनाशकांपर्यंत, प्रत्येकाला वेगळी कोठारे, हो उगाच वासांची झिम्मा-फुगडी नको. झालंच तर प्रत्येक गोदामात गरजेप्रमाणे हवाबंद वा खेळती राहण्याची व्यवस्था. मुंबईच्या होलसेल मार्केटमधून निवडक माल आणून, त्याला (डाळी, कडधान्य, इ.) कडकडीत उन्हं दाखवून मगच त्याची साठवण केल्यामुळे आठवडा बाजार असूनही पंचक्रोशीत ‘चवीनं खाणार त्याला ताम्हनकर देणार,’ अशी या मंडळींची ख्याती झालीय.

साप्ताहिक सुट्टी नाही. दुपारी वामकुक्षीसाठीही शटर बंद नाही. स. ७ ते रात्री ८।। व्यवहार अखंड सुरू. साध्या काडेपेटीच्या विक्रीचीही नोंद. सगळा शिस्तबद्ध कारभार.

दुकान आणि गोडाऊन सोडून उर्वरित जागेत ताम्हनकरांचं मकान. तेही ओटी, पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, बाळंतिणीची खोली.. असं जुन्या घराच्या पठडीतलं, वाढत वाढत मोठं होत गेलेलं.. सागवान, फणस, ऐन, शिसम या झाडांच्या लाकडापासून बनलेलं हे घर गेली अनेक वर्षे खारा वारा आणि पावसाच्या धारा झेलत व डोक्यावरील कौलांचा भार पेलत ताठ उभं आहे.

मध्यंतरी, म्हणजे आठ-नऊ वर्षांपूर्वी नव्या पिढीने वाडवडिलांच्या संमतीने आपल्या एका आर्किटेक्ट मित्राला घराच्या पुनर्रचनेसाठी आमंत्रण दिलं होतं. पण मग विचार आला, की घर पाडल्यावर बांधकामातली ही अनमोल संपत्ती (लाकडाची) मातीमोल होणार. त्यापेक्षा हे घर तसेच ठेवून आत सुधारणा करू. त्यानंतर स्वयंपाकघरात उभ्याचा ओटा आला, लाद्या बसल्या, माडीवर स्वतंत्र बेडरूम्स उभ्या राहिल्या. मात्र भिंतीतील दोन-दोन वीत रुंद कोनाडे (जे भिंतीची रुंदी दाखवतात), शर्ट, टोपी अडकवायच्या खुंटय़ा, न्हाणीघराबाहेरील बंब आणि चूल आजही आपला आब राखून आहेत.

माजघरात साधारण मध्यभागी २ बाय २ फुटांची जागा वेगळी फरशी लावून बंद केलेली दिसली. विचारल्यावर कळलं, की त्या जागी दोन वेळा ऋग्वेद संहितेचा स्वाहाकार (मोठा यज्ञ) करण्यात आला होता. त्यासाठी जमिनीखाली २ फूट खोल खणून तयार केलेली यज्ञवेदी होती ती!

ताम्हनकरांच्या आत्ता हयात असलेल्या तिन्ही पिढय़ांतील सर्व पुरुषवर्गाच्या मुंजी आणि बरीच धार्मिक कार्ये याच घरात पार पडली. शंभर-दीडशे माणसं आरामात उठू, बसू, जेवू, झोपू शकतात असं हे ऐसपैस घर. मात्र जिकडेतिकडे जिने चढ आणि उतर. देवघरात जाताना दोन पायऱ्या चढायच्या आणि न्हाणीघरात शिरताना चार पायऱ्या उतरायच्या. वेगळा व्यायाम नको!

छत्तीस एकर जमिनीवर डोलणाऱ्या आंब्याच्या बागा हे ताम्हनकरांचं आणखी एक अभिमानस्थळ. या जमिनीही तीन पिढय़ांनी वाढवलेल्या. एकूण साडेआठशे कलमं. सगळी हिरवीगार आणि रसरशीत. आपल्या निगराणीचा दाखला देणारी. बागेतील शेतघरात आंबे पिकवण्यासाठी शास्त्रशुद्ध व्यवस्था (रायपनिंग चेंबर). ममतेने जोपासलेल्या त्यांच्या आंब्यांना साहजिकच भरपूर मागणी असते. या शिवाय काजू, नारळ, पोफळी, शेवगा, पपई, झालंच तर यज्ञाला लागणाऱ्या सर्व पत्रींची झाडं (पिंपळापासून पळसापर्यंत) तसंच तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं याने बागेला श्रीमंत केलंय.

ताम्हनकरांच्या घरात आतापर्यंत फक्त एकच उणीव होती. ती म्हणजे जानेवारी- फेब्रुवारीपासून विहिरींना येऊन मिळणारं खारं पाणी. पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे पाणी खूप लांबून आणावे लागे. या कामात लहानापासून मोठय़ापर्यंत प्रत्येकाला आपापला वाटा उचलावा लागे. पोटभर आंबे खाल्ल्यावर खाऱ्या पाण्यानं चूळ भरणं जिवावर येई. पण सुदैवाने पाच वर्षांपूर्वी वरच्या भागात नव्याने खोदलेल्या बोअरिंगला गोड पाणी लागल्याने आणि ते नळावाटे घरात आल्याने आनंदीआनंद आहे.

एकत्र कुटुंबपद्धती आणि कामाचं चोख व्यवस्थापन हा ताम्हनकरांच्या घराचा आणखी एक दुर्मीळ पैलू. या घराला एकोप्याचा सुगंध आहे. घरात चुलत-चुलत भावांच्या तीन पिढय़ा गुण्यागोविंदाने नांदताहेत. यातील ज्येष्ठ सदस्य म्हणजे बाळकाका, बापूकाका व नंदूकाका हे केशवरावांचे तीन नातू. या तिघांचे मिळून राजू, अनिरुद्ध, विद्याधर, पुरुषोत्तम आणि विनायक असे पाच मुलगे. या सर्वाच्या बायका आणि ९ नातवंडे, असा एकूण पंचवीस जणांचा गोतावळा.

सीनिअरमोस्ट बाळकाका देवाधर्माचे प्रमुख, तर नंदूकाकांचं दुकानावर प्रेम. पुढच्या पिढीतही दोघं दुकानात रमलेले तर बाकीचे बागेत, नाहीतर गोठय़ात. मुलं एकत्र असली की कोणाची कोण ते भिंग लावूनही कळणार नाही.

खरं सांगायचं तर ताम्हनकरांच्या घरातील गोडव्याचं गुपित दडलंय ते त्यांच्या स्त्रीवर्गाच्या मेतकुटात. आजेसासूबाईंचं (माई) नाव येताच नातसुनेच्या (गीताताई) डोळ्यात जमा झालेलं पाणी हे त्याचंच द्योतक. मुळात मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांतून शिकलेल्या स्त्रिया (३ सासवा आणि ५ सुना) इतक्या दूर खेडेगावी येतात हे एक आश्चर्य. आल्यावर एकमेकींना धरून राहतात. सोवळंओवळं (बाजूला बसण्यासकट) पाळतात. आंब्याच्या सिझनला सगळ्या मिळून रोजचा तीनशे आंब्यांचा रस (फक्त दीड-दोन तासांत) काढतात. झालंच तर वीस-पंचवीस नोकरमाणसांचा रोजचा चहा-नाश्ता, माहेरवाशिणींचा राबता, आलागेला पै पाहुणा, कुळाचार आणि हो, याबरोबरच अधीमधी घरच्या गाडीतून रत्नागिरीला जाऊन गाण्याचे कार्यक्रम, कीर्तनं, नाटकांनाही हजेरी हे सर्व ऐकतानाच गरगरायला लागलं.

राजू ताम्हनकर म्हणाले, ‘याचा अर्थ असा नाही की आमच्यात वादविवाद, मतभेद होत नाहीत, ते होतच राहणार. मात्र ते उंबरठय़ाबाहेर जाणार नाहीत याची जबाबदारी प्रत्येकाने न सांगता उचललीय.’

मनात आलं, इथल्या प्रदूषणमुक्त वातावरणामुळे बहुधा मनाचं प्रदूषणही तत्काळ दूर होत असावं! अशी घरं फक्त सिनेमात दिसतात, असं थोडंच आहे?

संपदा वागळे waglesampada@gmail.com