18 January 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : घरातल्या वस्तूंचे आणि आपल्या सवयींचे ऑडिट

घरातल्या वस्तूंचे आणि वस्तू जमा करणाऱ्या आपल्या सवयींचे, गृहव्यवस्थापनाचे अचूक ऑडिट करणारे सदर..

प्रतिनिधिक छायाचित्र

घरातल्या वस्तूंचे आणि वस्तू जमा करणाऱ्या आपल्या सवयींचे, गृहव्यवस्थापनाचे अचूक ऑडिट करणारे सदर..
आपल्या घरात कळत-नकळत किती तरी केमिकल्स येऊन पडतात. घराची स्वच्छता करण्यासाठी लागणारे केमिकल्स तर भरमसाट असतात. हे केमिकल्स वापरून स्वच्छता झाली नाही तर काही तरी राहून गेलेय ही भावना मनात येत राहते, असे होतेय का? अनेक हॉटेलांमध्ये, क्लब हाऊसेस, हॉस्पिटल्समध्ये अर्ध्या-एक तासाने विविध काचा, टेबले आणि फारशा पुसणे सुरू असते. वेगवेगळी केमिकल्स, स्प्रे, द्रव पदार्थ पसरवण्याचं आणि पसरवलेला द्रव पुसण्याची वेगवेगळी आयुधे घेऊन ही साफसफाई सतत सुरू असते. अनेक जण जिथे एकत्र येतात आणि मुख्य म्हणजे आरोग्याशी जिथे संबंध असतो अशा हॉस्पिटल्ससारख्या जागी हे एक वेळ ठीकच आहे; नव्हे, अत्यावश्यक आहे. पण आपल्या तीन- चार- पाच माणसांच्या घरात सतत इतकी साफसफाई इतकी रसायने वापरून करायची खरोखर गरज आहे का? किती केमिकल्स यानिमित्ताने आपल्या घरात महिन्याच्या महिन्याला येतात? त्यांच्यावर होणारा खर्च, अतिरेकी स्वच्छतेसाठी वाया जाणारे पाणी आणि मुळात म्हणजे इतकी साफसफाई करूनदेखील नेमकी स्वच्छता होतेय का? की केवळ वरवरच्या फरश्या चकाचक केल्यात आणि कानाकोपऱ्यात जाळी जळमटी, असे चित्र आहे? घरातली कोणतीही एक मोठी वस्तू अगदी सहज जागची हलवली की तिच्या मागे, वर, आजूबाजूला, कोपऱ्यांमध्ये प्रचंड घाण, धूळ दिसणार आहे, विचार करू यात?

घरातली कपाटं आणि वेगवेगळे कप्पे सामानाने ओसंडून वाहत आहेत, असे चित्र अनेक घरी सहजच दिसते. खरोखर इतक्या सामानाची आपल्याला गरज असते का? आणलेल्या सामानातले आपण काय आणि किती वापरत असतो नेमके? सात्यत्याने ‘हे लागेल कधी तरी’ म्हणत जपून ठेवले जातेय का? जपून ठेवले तरी वर्षां-सहा महिन्यांत किमान एकदा तरी ते आपण वापरत आहोत का? कधी तरी लागेल म्हणजे नेमके कधी ते आपण वापरणार आहोत? काही गोष्टी लगेच कामास येणाऱ्या नसतात. पण ‘कधी तरी लागेल’ या गटात कधी तरी अगदी योग्य जागी वापरता येतातसुद्धा. जसे की, काही स्पेअर पार्ट्स. ते कसे आणि कुठे सांभाळून ठेवायचे मग? ते सांभाळायचे नसतील आणि कोणालाही वापरायला देण्यासारखे नसतील, तर त्यांची थोडीफार किंमत मिळून ते विकता येतील का? कुठे आणि कसे? घरातल्या अनेक जुन्या वस्तू केवळ जुन्या झालेल्या असतात, पण चांगल्या दर्जाच्या असतात. त्यांचे काय करायचे? त्यांच्यामुळे अडणारी जागा आपल्याला स्वस्थ बसू देत नसते आणि त्यांना काही किंमत येणार नाही म्हणून त्या सहजच टाकून/ फेकूनदेखील देता येणार नसतात.

घरातल्या एकेकाचे कपडे, शूज, मेक अप किट्स, लोशन्स, अ‍ॅक्सेसरीज, मॅचिंग सेट्स, सेल्फ केअरवाल्या तमाम गोष्टी, आवडी-निवडीचे सामान असे किती काय- काय सर्वत्र पडलेले असते. नव्याचे नऊ  दिवस सरले की वस्तू फक्त साचत जातात. जितक्या हौसेने वस्तू खरेदी केल्या जातात तितक्या हौसेने आणि सातत्याने त्या वापरल्या जात नाहीत. त्यांचा पुरेसा आस्वाद न घेताच त्या एक तर खराब होतात किंवा टाकून द्याव्या लागतात, कुठे तरी पडून राहतात. अशा वेळी नेमके काय करायचे? आजकाल अनेक घरांमध्ये चार्जर्स, हेडफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे नवे-जुने सेल, जुने मोबाइल, खराब झालेले गॅजेट्स वायरींचा गुंता होऊन पडलेले असतात. ओला कचरा आणि सुका कचरा हेच अजून अनेक लोकांना नीटसे अंगवळणी पडलेले नसताना या घरात साचत जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न पडतो. एक मोबाईल अधिकाधिक काळ वापरणे कमी- कमी होत जात असतानाच खराब झालेल्या वस्तू सरळ टाकून देण्यापलीकडे काहीच पर्याय नाही, अशाच वस्तू विक्रीला जास्त येताना दिसत आहेत. एखाद्याने भले ठरवले, एक मोबाईल सात-आठ वर्षे वापरेन असे, पण त्याचा मोबाइल तितका काळ सेवा देणारा तर हवा! आज विकत घेतलेली गोष्ट नेमकी किती काळ चालेल याची काही शाश्वती नसताना ती खराब झाल्यावर टाकून देऊन नवीन वस्तू घेणे अपरिहार्य होऊन जाते. वस्तू दुरुस्त करून वापरायच्या कोणी फारसे फंदात पडत नाही. याचे गमतीशीर उदाहरण म्हणजे पूर्वी लोक शाईचे पेन वापरत. मग बॉलपेन आले. पेनांच्या रिफिल्स बदलून वापरणारी एक पिढी होती, ती सरली. आता वापरा आणि फेका प्रकारचेच पेन जास्त दिसतात. रिफील घ्यायला गेलो तर नव्या पेनांपेक्षा रिफील महाग, अशी काही पेनांची परिस्थिती असते. किंवा त्या त्या मॉडेलच्या रिफिली बनतच नाहीत. शाई संपली की नवीन पेन! पूर्वी जरा पेन बंद पडला असे वाटले की रिफील काढून, जराशी गरम करून परत वापरली जात असे. आता दोन-पाच रुपयाच्या पेनावर तो दुरुस्त व्हायला किती वेळ खर्च करणार असे पाहून नवीन पेन वापरायला घेणे जास्त सोयीचे वाटते. मुळात अनेक पेनांच्या रिफिली वेगळ्या नसतात, तर इन बिल्ट असतात. पेन टाकून देण्यापलीकडे फार काही करता येत नाही. पेनाचा वापरदेखील कमी झालाय.

स्वयंपाकघर आणि त्यातला फ्रिज हे तर साफसफाईचे मैदान असते. अनेक वस्तू कोणी तरी कधी तरी वापरेल म्हणून त्यात आपली वाट बघत पडलेल्या असतात. किती तरी औषधे घरात उगाच येऊन पडतात आणि मग साचत जातात. त्यांची एक्स्पायरी डेट उलटून जाते, तरी घरात पडून असतात. ऑनलाइन खरेदी आणि त्यासोबत येणारे पॅकिंग हाही एक विषय असतो. ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ ही म्हण शिकवायचे प्रात्यक्षिकच जणू हे जास्तीचे आणि बरेचदा अनावश्यक असलेले पॅकिंग आपल्याला देत असते. करायचे काय त्या सामानाचे? घरात लहान मुले असतील, तर निदान क्राफ्ट आयटेम म्हणून त्या गोष्टी कुठे तरी वापरतील. एरवी ते फेकूनच द्यावे लागते. हा आणि घरात साचत जाणारा एकूणच कचरा कसा हाताळायचा? तो कमी कसा करत जायचा? घरासाठी लागणारी वीज, अन्न शिजवायला वापरला जाणारा गॅस आणि एकूणच विविध गोष्टींसाठी लागणारे पाणी यांचा डोळस वापर कसा करणार? पर्यावरणस्नेही राहणीमान कसे साध्या साध्या गोष्टींमधून आपण अंगीकारू शकतो, हे सर्व या सदरातून जाणून घेऊ  यात.

‘सुखवस्तू’ हा शब्द खरे तर ‘ओसंडून वाहणाऱ्या घरोघरच्या वस्तू’ याला समानार्थी शब्द झालाय. अशा सगळ्या घरातल्या वस्तूंचे आणि वस्तू जमा करणाऱ्या आपल्या सवयीचेदेखील ऑडिट या सदरातून करू यात!

prachi333@hotmail.com

First Published on January 13, 2018 5:37 am

Web Title: household items and collection hobby