16 November 2018

News Flash

निसर्गाशी जवळीक साधणारं पाभऱ्यातील घर!

एवढेच नव्हे तर त्या वेळच्या मऊ भाताची चव माझ्या जिभेवर अजून रेंगाळते आहे.

गुहागर तालुक्यातील एका छोटय़ा गावी म्हणजे पाभरे या गावचे माझे आजोबा. माझ्या आजोळच्या घराबद्दल मला लहानपणापासून खूप कुतूहल तर आहेच, परंतु ते दरभेटीत वाढतच आहे. या घराकडे पाहिले की, मामाच्या गावच्या साऱ्या प्रचलित कल्पना गळून पडतात. तिथे राहणे हा एक विलक्षण अनुभव आहे. आज आपणाला एकविसाव्या शतकातसुद्धा आधुनिकतेचा जरासुद्धा स्पर्श नसणारे तसेच निसर्गाशिवाय काहीच अनुभवता न येणारे, आपल्याच मस्तीत जगणारे प्रशस्त असे घर आपणाला पाहायचे असेल तर मग आपणाला या माझ्या आजोळच्या गावाला भेट द्यायलाच हवी.
जुन्या आख्यायिकेनुसार गावामध्ये कोणीही ब्राह्मण कुटुंब नसल्याने दोन भावांना या कुटगिरी व पाभरे गावांत आणले गेले आणि त्याच ठिकाणी सावरकरांचे कुटुंब स्थिरावले. नैसर्गिक नियमाप्रमाणे एका घराची ४/५ घरे झाली खरी, परंतु या साऱ्या मंडळींनी या ठिकाणी कसे दिवस काढले असतील याचा खूपच अचंबा वाटतो. पाऊलवाटेशिवाय या घरात जाता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्य़ातील भौगोलिक रचनेप्रमाणे चारही बाजूंनी वेढलेल्या डोंगरातील एका छोटय़ाशा खोलगट भागात हे घर वसले आहे. कुठूनही या घरी जायचे म्हटले तर किमान पर्वती दोन वेळा चढावी वा उतरावी इतकी वाटचाल चढउतारात करावी लागते. या ठिकाणी कसलेही प्रदूषण नाही, ध्वनी प्रदूषणसुद्धा नाही. आवाज ऐकू येण्याची शक्यता नाही. आलाच तर तो फक्त बाजूने खळखळणाऱ्या पऱ्ह्य़ाचा अथवा पक्ष्यांचा. घराजवळ तळी आहे. तळी म्हणजे छोटीशी विहीर. या ठिकाणी सुमारे ३/४ फूट खोल खणल्यावर कुठेही पाणी लागते, अगदी भर मे महिन्यातसुद्धा आणि या पाण्याची चव तरी काय वर्णावी? अगदी अमृततुल्य! शुद्ध स्वच्छ असे हे पाणी कितीही उपसले तरी तळीमधून आटतच नाही.
तसे घरात शिरताना प्रचंड अंगण! त्यावर मजबूत असा घातलेला मांडव. त्यातून पडवीत प्रवेश केला की पडवीचे प्रशस्तपण जाणवते पुढील दाराच्या पडवीप्रमाणेच. चारी बाजूंना पडव्या आणि त्या मजबूत अशा गजांनी बंदिस्त केलेल्या. त्यानंतर डोळ्यात भरते ते भाताचे कोठार. सुमारे २०/२५ खंडीचे असणारे मजबूत कोठार लाल दगडांच्यावर उभे आहे. या कोठारातील कप्प्यातून उतरण्यासाठीदेखील शिडय़ा लागतात. त्याच्या बाजूलाच दिसतील ती कणगं. कणगं म्हणजे पुढील बियाणांसाठी वेगळा ठेवलेला भात; परंतु भाताच्याच पेंढय़ात बांधून ठेवलेले. यालाच कणग्या असं म्हणतात. त्यानंतर लागते ती ओटी. ओटीवर आल्यावर उंच अशी असणारी काळी तक्तपोशी. बाजूला लाल रंगाच्या भिंतीत असणारे कोनाडे. एक जावई खिडकी आणि माजघरात प्रवेश करण्यासाठी असणारे भक्कम दार. त्यावर शोभणारे नवान्नाचे जुनाट तोरण. ओटीवरून माजघरात प्रवेश करताना भिंतीची रुंदी आपल्या लक्षात येते. या भिंतीतच सदर दरवाजा बंद करण्यासाठी वापरला जाणारा मजबूत दांडा. हा दांडा तोडून दार उघडायचे म्हणजे मोठे कठीणच काम. त्यानंतर भव्य परंतु काळोख असणारे माजघर लागते, त्यात प्रशस्त देवघर! त्याला टांगलेली भाळी जेवायला पंगत बसली तर त्यांना टेकता यावे म्हणून बेमालूमपणे भिंतीत बसवलेली गुळगुळीत फळी! सारेच काही भव्यदिव्य. त्यात खाली शेणाने सारवलेली, परंतु काळी तुकतुकीत दिसणारी जमीन व तिचा उबदारपणा आपले मन आकर्षून घेतो. त्यानंतर लागते ते स्वयंपाकघर! स्वयंपाकघरातील असणाऱ्या दोन चुली. त्यांच्या बाजूला असलेला वल, दूध ठेवण्यासाठीचे फडताळ, ताकाची मेढ, त्यावर असणाऱ्या दोऱ्या, बाजूला असलेली भाळी, रवी, भिंतीत असणारी कपाटं, स्वयंपाकघरातील धूर जाण्यासाठी व प्रकाश येण्यासाठी केलेली योजना या साऱ्या गोष्टी मनाला भिडतात. स्वयंपाकघराच्या बाजूलाच असणारी बाळंतिणीची खोली, बाजूलाच असणारे भिंतीत बसवलेले लोटे, त्यामध्ये बिब्यांसारख्या ठेवलेल्या गोष्टीदेखील आपणास भावतात.
त्यानंतर मागच्या पडवीत प्रवेश केल्यावर जाणवते ते गरे कुटून साठे (फणसपोळी) बनवण्यासाठी बनवलेले लाकडी पसरट भांडे, त्यात गरे कुटण्यासाठी केलेला मोठा लाकडी गोल बसवलेला दांडका, भात भरडण्यासाठी घरट, घरटाची काठी अडकवण्यासाठी भालाला बसवलेला वाक (भोक असलेले अर्धगोल लाकूड), बाजूला असणारा औट (जुनी रचून ठेवलेली लाकडे) आणि बाजूला नुकतंच व्यायलेल्या गायीचे पाडस, एक पहार जमिनीत खुपसून त्याला बांधलेलं. कुठेही कृत्रिमता नाही. सारं कसं निसर्गाशी जवळीक सांगणार. त्यानंतर मागील दाराच्या अंगणात असणारे तुळशी वृंदावन, त्याच्या बाजूला असणारे बेलाचे झाड, त्यावर चढण्यासाठी त्यावर उभा केलेला कळकाचा बांबू. बाजूला दिवली (पणती) लावण्यासाठी कोरलेला दगड. बाजूला असलेले वाहीन.(कुटण्यासाठी दगडात खोदलेला खड्डा) वळचणीला ठेवलेली मुसळ आणि बाजूला २/३ उखळी. (कुटण्यासाठी लाकडाच्या ओंडक्यात खोदलेला खड्डा) या साऱ्या गोष्टी मनात भरतात. थोडंसं चढून गेलं की, लागते ते कावण! कावण म्हणजे गुरे बांधण्यासाठी घातलेला तात्पुरता मांडव. या मांडवात उन्हाळ्यात सर्व गुरे बांधतात. तो कायमस्वरूपी वाडा (गोठा) त्याच्याही वर आहे सायंकाळी सर्व गुरांपैकी गाय, बैल, वासरे यांना वाडय़ात बांधले जाते, कारण रात्री या ठिकाणी वाघांचा मुक्त संचार असतो. अशा वातावरणात इथे लोक कसे राहत असतील याचेच मला आश्चर्य वाटते.
यासंबंधी मी माझ्या मामांशी बोललो. त्यांचे वय ९० वर्षांपेक्षा पुढे आहे व अद्यापही ते सर्व व्याप सांभाळत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेली १०/२० वर्षे परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. लाल धुरळा उडवत का होईना, पण दिवसातून एकदा तरी धारेवर (डोंगरावर) एसटी येऊ लागली आहे. कुठल्या तरी वाडीवर का होईना विजेचा खांब दिसू लागला आहे. कुठे तरी तरंग फोनचा डबा डोकावू लागला आहे; पण त्यापूर्वी त्यांना गणपतीही हाती करून घ्यावा लागे. मुलींच्या वेण्यांना केळीची सोपे लावत, कोणी सणासुदीला जर रंगीत गोफ आणला तर त्याचा मुलींना केवढा आनंद होई. गावात घडय़ाळ नव्हते. नंतर जेव्हा घडय़ाळ आले तेव्हा ते बरोबर लावायचे कसे, हा प्रश्न निर्माण होई. मग धारेवर जायचे व सूर्य माथ्यावर आला, की घडय़ाळात दुपारचे १२ वाजले असे समजून घडय़ाळ लावायचे. कुणाला सर्पदंश झाला तर कोंबडय़ा लावण्यासारखे उपचार करायचे. कुणाचा हात मोडला, पाय मोडला, तर बांबूच्या कपडय़ांनी बांधी (प्लॅस्टर) करायचे, त्यामध्ये झाडपाला भरायचा करायची अशी बांधणी करण्यात माझे मामा खूपच कुशल आहेत. बिब्बा, सुंठ, आले, पाती चहा अशी गावठी औषधेच वापरायची. आता या गावाभोवती असणारा निसर्गाचा घट्ट दरवाजा हळूहळू किलकिला होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत हे चित्र बदलणार आहे हे निश्चित. मात्र अजूनही मला ते घर साद घालते. या मोबाइलच्या दुनियेत तसेच फास्ट फूडच्या या जमान्यात माझे मन तिथे ओढ घेते. जिथे कोणत्याही प्रदूषणाचा प्रादुर्भाव झाला नाही अशा वातावरणात आपणाला राहण्यासाठी तरी जागा आहे याचा नकळत का होईना पण त्याचा अहंकार सुखावतो. अशा या नैसर्गिक वातावरणात जे लोक राहात होते. ते खरोखरच भाग्यवान समजले पाहिजे. अशा या घरात हिवाळ्यात उबदारपणा, उन्हाळ्यात थंडावा मिळतो, पावसाळ्यात पडवीमध्ये पेटवलेल्या चुल्याशी बसून शेकण्याची मजा मी अनुभवली आहे, तर रात्री बैलगाडी जोडून पुन्हा गावाला जाताना मामा अन् मी झोपून जायचो तरीसुद्धा बैलगाडी गाडीतळावर बरोबर जायची हे मी पाहिले आहे. तसेच झोपाळ्यावर बसून गाणी म्हणायची मजा मी चाखली आहे. सायंकाळ झाली की तुळशीच्या अंगणात बसून परवाचा म्हणायचा आणि लहान मुलांनी वर्तुळाकार बसून जेवायचा अनुभव मी घेतला आहे. एवढेच नव्हे तर त्या वेळच्या मऊ भाताची चव माझ्या जिभेवर अजून रेंगाळते आहे. असे हे माझे आजोळच्या घराचे काळाच्या ओघात काय होणार ते ठाऊक नाही, परंतु बहुतांशाने ते माझ्या हयातीपर्यंत तसेच राहावे, ही प्रार्थना! कालाय तस्मै नम:।
श्रीनिवास घैसास

First Published on August 6, 2016 1:02 am

Web Title: houses close to nature in pabhare village of guhagar taluka