गृहनिर्माण संस्थेत कार्यरत असणाऱ्या कार्यकारिणीच्या कार्यपद्धतीवर जरूर लक्ष असावं; नव्हे तो सभासदांच्या कर्तव्याचाच भाग आहे. पदाधिकाऱ्यांची मनमानी किंवा अरेरावी रोखलीच पाहिजे. पण हे करत असताना चुकीच्या पद्धतींचा अवलंब न करता सदनशीर मार्गाची कास धरायला हवी.

कोणतीही गोष्ट सुरळीत चालण्यासाठी काही ‘पथ्ये’ पाळावी लागतात. व्यक्ती आणि संस्था या दोघांनाही हा नियम लागू होतो. त्यातही सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या गृहनिर्माण संस्थेमध्ये याची गरज अधिक असते. पण याची नेमकी जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा -सभासद आणि कार्यकारिणी- या दोघांचीही असे त्याचे उत्तर देता येते. याला जे मान्यता देतात, त्या गृहनिर्माण संस्थेची प्रकृती व्यवस्थित असते.

‘मतभिन्नता’ हा गृहनिर्माण संस्थेची प्रकृती बिघडण्यास कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. मतभिन्नता ही व्यक्तीची स्वायत्तता आहे हे क्षणभर मान्य केलं तरी गृहनिर्माण संस्थेत ती किती असावी यालाही मर्यादा हवी. कार्यकारिणी पदाधिकारी आणि अन्य सभासद या दोघांनीही मर्यादेचं भान ठेवायला हवं. त्यातच संस्थेचं हित असतं.

एक निरीक्षण असं सांगतं की, गृहनिर्माण संस्थेमध्ये उद्भवणारे वाद आणि विसंवाद हे मुख्यत्वेकरून वर्तमान पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांमध्येच मोठय़ा प्रमाणात होत असतात. त्यांना त्यांच्या समर्थकांचा पाठिंबाही मिळत असतो. एकमेकांना शह देणं हाच हेतू या प्रकारांत दिसून येतो.

अनेकदा वर्तमान पदाधिकाऱ्यांकडून माजी पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा आत्मसन्मान गोंजारला जात नाही.. यातून मग विरोधाचा एककलमी कार्यक्रम सुरू होतो. संस्थेची विधायक कामे अशा प्रकारांमुळे अडून बसतात. शिवाय सुसंवादी वृत्तीच्या सभासदांना या प्रकारांचा त्रास होतो तो वेगळाच.. याचा अप्रत्यक्ष परिणाम असा होतो, की नि:स्वार्थी वृत्तीनं काम करू इच्छिणारे सभासद संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्यास उत्सुक होत नाहीत. स्वत:चा वेळ आणि ऊर्जा नाहक कटकटींमध्ये आणि निर्थक बाबींमध्ये व्यतीत करण्याची इच्छा नसते.

गृहनिर्माण संस्थेत कार्यरत असणाऱ्या कार्यकारिणीच्या कार्यपद्धतीवर जरूर लक्ष असावं; नव्हे तो सभासदांच्या कर्तव्याचाच भाग आहे. पदाधिकाऱ्यांची मनमानी किंवा अरेरावी रोखलीच पाहिजे. पण हे करत असताना चुकीच्या पद्धतींचा अवलंब न करता सदनशीर मार्गाची कास धरायला हवी. संस्थेचे हित जपणारे, पण पदाधिकारी असू शकतात यावर विश्वास ठेवायला हवा; अन्यथा संस्थेचं पथ्यपाणी कुणी सांभाळायचं हा प्रश्न अनुत्तरितच असेल.

vasturang@expressindia.com