17 January 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : कपडेच कपडे

कपडय़ांच्या पसाऱ्याला आटोक्यात ठेवायला एक मंत्र खूप फायदेशीर ठरू शकतो.

कपडय़ांचे कपाट

घराघरातल्या कप्प्याकप्प्यांत कपडे ओसंडून वाहत असतात. कधी कोंबलेले, कधी नीट रचून ठेवलेले. घर पटकन आवरायची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे कप्प्यांमध्ये सामान कोंबून ठेवणे. ‘करू नंतर’, ‘वेळ मिळाला की बघू’ अशी तात्कालिक कारणे आपण स्वत:ला देत असतो. वय, आपली नेमकी गरज, ऋतुमान, आजारपणं, राहण्याचे ठिकाण, कपडे धुण्याची पद्धत या आणि अशा अनेक गोष्टींवर ‘आणून ठेवलेले बरे’, ही सगळ्यांत सोपी स्ट्रॅटेजी कपडे विकत घेण्यामागे असते. कधी काही जणांना उगाच खरेदी करायची सवयदेखील लागलेली असते. अशी खरेदी आपण करू शकतो, याबद्दल एक तात्पुरता फील गुड फॅक्टर आपण मिळवत असतो. हा फील गुड दर काही काळाने नवीन कपडे घरात आणून ठेवायचे काम करत असतो. घरातले कपडे, बाहेरचे कपडे, सणावारी घालायचे कपडे, खास ठेवणीतले कपडे, हवामानातील बदलांनुसार लागणारे कपडे, आजारपणातली विशेष सोय, असे कपडे साधारणपणे प्रत्येकाचे असतात. काम आणि वयानुसार कपडे कितपत मळतात, त्यावरदेखील नवीन कपडे येत असतात. हळूहळू कपाटं ओसंडून वाहू लागतात.

असे असूनही ‘एक ड्रेस धड नाही’ असे कुणाला आपल्या कपडय़ांच्या साठय़ाबद्दल वाटू शकते. कुठे तरी खास जायला तयार होताना ‘हे की ते’, ‘हे नको ते’, एक ड्रेस घालून परत बदलून दुसरा शोधून घालावा लागणे, म्हणजेच आपले मन आपल्याकडे असलेल्या कपडय़ांबद्दल विशेष समाधानी नाही. आणखीन बरे, आणखीन चांगले काही घालू यात ते अडकलेले आहे. तिथेच नवीन कपडे गरज नसताना घरात येऊन पडायचे बीज अनेकदा रोवलेले सापडते.

काही देशांमध्ये अनेक पॉन शॉप्स, कन्साइनमेंट शॉप्स असतात. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, घरोघरचे नकोसे झालेले कपडे इथे नीट धुऊन, दुरुस्त होऊन विक्रीसाठी उपलब्ध असतात. आपण नेऊन दिलेल्या कपडय़ांनादेखील काही ठरावीक किंमत मिळते. तुमची आर्थिक, सामाजिक पत काहीही असली, तरी तिथून जुने, वापरलेले कपडे घेऊन जायला कोणाला कमीपणा वाटत नाही. उलट, वाढत्या वयातल्या मुलांसाठी, स्वस्तात मस्त कपडे शोधणाऱ्यांसाठी ही सोय महत्त्वाची ठरते. आपल्याकडे जुने कपडे वापरणे म्हणजे सधनांनी, घरात कपडय़ांचा महापूर आलेल्यांनी गोरगरीब गरजूंना ‘देऊन टाकलेस’ म्हणून द्यायची आणि मिरवायची गोष्ट असते. आर्थिक, सामाजिक पत असणारे किती जण आपल्या मुलांना जुन्या बाजारातले कपडे ‘काय हरकत आहे वापरायला’ म्हणून वापरतील, हा खरा प्रश्न आहे.

जुन्या कपडय़ांचे काय करावे, असा विषय आला की जणू घरातला कचरा काढून फेकतोय, अशा थाटात मळके, फाटके, बटणं तुटलेले, उसवलेले कपडे विविध संस्थांच्या दारात नेऊन टाकले जातात. जुनी वस्तू असली तरी देताना नीट धुऊन, दुरुस्त करून, वापरण्याजोगी करून, व्यवस्थित घडय़ा घालून, गरजेनुसार इस्त्रीसुद्धा करून देता येतेच की! फडकी म्हणूनसुद्धा वापरता येणार नाहीत, असे जुने कपडे टाकल्यासारखे दिले जातात. त्यावर आपण काय थोर समाजकार्य केले, असेही वर मिरवत असतो! काही ठिकाणी खरोखर जुन्या, जास्तीच्या आणि बऱ्या गोष्टींची गरज असू शकते. तिथे जरूर मदत करावी. पण नकोसा झालेला, साठून राहिलेला कचरा काढून टाकल्यासारखे ते करणे बरोबर वाटत नाही, इतकेच.

आपल्या देशात कचरा वर्गीकरणाची एक अनौपचारिक व्यवस्था कायम कार्यरत असते. त्यात बरे-वाईट असे सगळे मुद्दे असले, तरी फाटक्या चिंधीपासून ते वापरलेल्या सोन्यापर्यंत काहीही इथे विकले जाते. चिंध्यासुद्धा किलोने विकत घेणारे लोक असतात. जुन्या कपडय़ांवर भांडी अजूनही कुठे कुठे मिळतात. चिंध्या, जुन्या चादरी यांच्या सतरंजा करणारे लोक कुठे दारोदारी जात असतात. अनेक घरांमध्ये जुन्या चादरी, कपडे पायपुसणी आणि फडकी म्हणूनदेखील वापरली जातात. नगाने जुने कपडे विकत घेणारे लोक त्यांच्या मर्जीनुसार त्याची किंमत सांगत असतात. अशा वेळी एकदम मोठे गाठोडे देण्यापेक्षा थोडे थोडे कपडे दिले तर काही बरी किंमत मिळू शकते. कपडय़ांवर भांडे देणाऱ्या मंडळींनादेखील त्यातल्या त्यात चांगल्या, नव्यासारख्या अशा गोष्टी हव्या असतात. तरच त्यावर जरा बरी किंमत येते. आपल्याकडचे कपडे तसे असतीलच असे नाही. त्यात पुरुषांच्या फुल शर्टला, कमी साइझ असलेल्या जीन्सला तरी बरी किंमत मिळते. पण स्त्रियांच्या कपडय़ांना तशी विशेष किंमत मिळत नाही जुन्या बाजारात. अशा वेळी आपली कपडय़ांची हौस नीट आखणे, त्यानुसारच खरेदी करणे, हेच महत्त्वाचे मुद्दे असतात.

कपडय़ांच्या पसाऱ्याला आटोक्यात ठेवायला एक मंत्र खूप फायदेशीर ठरू शकतो. आपल्याकडच्या सगळ्या कपडय़ांमधले ऐंशी टक्के कपडे आपण फारसे वापरतच नाही. वीस टक्के कपडेच आपण सातत्याने वापरत असतो. हे वीस टक्के कपडे नेमके कोणते आहेत, ते आपल्याला का आवडतात, काय सोय, स्टाइल त्या कपडय़ांमुळे मिळते, त्याचा विचार करून तसेच कपडे घ्यावे. म्हणजे नुसतेच पडून राहणारे, क्वचित वापरले जाणारे कपडे हळूहळू कमी होऊ  लागतात. आहे ते नीट वापरले जाऊ  लागतात. कपडे घरात पडू द्यायचे नाहीत, हे एकदा ठरवले की आपली गरज किती कपडय़ांची आहे, ते शोधून काढावे. जो आकडा येईल, त्यापेक्षा कमीच पण चांगल्या दर्जाचे कपडे आपल्या कपाटात ठेवावे. काही जण नवीन कपडा घेतला की जुना एक कपडा काढून टाकतात. पण ते जमतेच असे नाही. त्यापेक्षा एकदाच नीट ठरवून टाकायची आपली गरज. पडून असलेले सगळे कपडे नीट करून कुणाला द्यावे, विकावे, इतर गोष्टींसाठी वापरावे. मोकळा झालेला वॉर्डरोब तसाच मोकळा ठेवायचा आहे, हे आधी स्वत:वर बिंबवावे. नाही तर, काढून टाकलेल्या कपडय़ांइतकेच नवीन कपडे घरात परत येऊन पडतील. कपडय़ांच्या देखभालीवरदेखील आपला बराच वेळ जात असतो. जितके आपले कपडय़ांचे कपाट सुटसुटीत असेल, तितके मोकळे ढाकळे जगता येते. गरज नेमकी ठरवून आणि हौस न मारतादेखील हे साध्य होऊ  शकते.

प्राची पाठक prachi333@hotmail.com

First Published on February 10, 2018 12:22 am

Web Title: how to manage cloth wardrobe