X

रंगविश्व : रंगहीन

काळ्या रूंगाचा वापर हा सांभाळून केला पाहिजे. ज्या जागी हा रंग वापरायचा आहे,

एकदा का स्थितप्रज्ञता आली की त्यानंतरची परमोच्च अवस्था म्हणजे परमेश्वराशी तादात्म्य पावणे.. अशाप्रकारे जेव्हा निराकार, निर्गुण परमात्म्यासारखी अवस्था होते, तेव्हा श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो या विश्वात व्यापून उरला आहे आणि सारे विश्व त्याच्यात सामावले आहे, पण तरीही तो कशातच नाही, अशी अवस्था प्राप्त होते. याचा अर्थ कळायला थोडा कठीण वाटतो ना? पण याचा अर्थ आपल्याला दोन रंग समजावून सांगतात. रंगूनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा, असं ज्याचं स्वरूप आहे, तो काळा आणि पांढरा! काळा आणि पांढरा यांना संबोधण्यासाठी आपण रंग म्हणत असलो, तरी हे खरं तर रंग नाहीत. ते रंगचक्रावरही नाहीत. तरीही त्यांचा मनावर खास प्रभाव पडतो आणि त्यामुळेच त्यांचा वापर इंटिरिअर डिझाईिनग करताना बऱ्याच ठिकाणी केला जातो. कधी त्यांच्या वापरामुळे इतर रंगांना उठाव येतो, तर कधी इतर रंगांचा मनावर तीव्र परिणाम होत असेल, तर त्यांच्यावरून लक्ष इतरत्र वळवून त्यांची तीव्रता कमी करण्यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. इतर रंगांच्या छटा निर्माण करायचं काम हे रंग करतात. त्यामुळे ते सर्व रंगांमध्ये आहेत. सर्व रंग एकत्र हजर असतील, तर त्यांच्या एकत्रीकरणातून तयार होतो तो पांढरा प्रकाश, हे आपण या सदराच्या पहिल्या भागात सूर्यकिरणांचं उदाहरण घेऊन बघितलं होतं, तर याच सदराच्या सहाव्या भागात ‘सब्ट्रक्टिव्ह कलर सिंथेसिस’ याविषयी जाणून घेताना पाहिलं होतं की, एखाद्या रंगावरून कोणताच रंग परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचू शकला नाही, तर रंगांची ही गरहजेरी काळा अंधार निर्माण करते. म्हणूनच याआधी म्हटल्याप्रमाणे काळा आणि पांढरा हे सर्व रंगांमध्ये असूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला परमेश्वराप्रमाणे जाणवतं, पण दिसत मात्र नाही. तसंच सर्व रंग याच पांढऱ्या किंवा काळ्या रंगामध्ये सामावलेले आहेत.

काळ्या रूंगाचा वापर हा सांभाळून केला पाहिजे. ज्या जागी हा रंग वापरायचा आहे, ती जागा आकारमानाने कमी असावी, म्हणजे काळ्या रंगातली आकाराने मोठी वस्तू ठेवण्याऐवजी एखादी छोटय़ा आकारातली काळ्या रंगाची वस्तू ठेवली, तर ती अधिक उठावदार दिसते. एखाद्या खोलीत या रंगाचा वापर जर जास्त प्रमाणात केला तर त्या खोलीत मनाला विषण्णता येते. बंदिस्तपणाची जाणीव मनात जोर धरते. त्याउलट जर काळ्या रंगाचा थोडासा वापर केला, तर मात्र हाच थोडय़ाशा प्रमाणातला बंदिस्तपणाचा भाव सभोवताली एकप्रकारची संरक्षक तटबंदी असल्याची भावना मनात निर्माण करतो. त्यामुळे अशा खोल्यांमध्ये सुरक्षित वाटतं. पांढऱ्या रंगाच्या बाबतीत याच्या अगदी उलट घडतं. आपण अशी कल्पना करू की, खोलीत फक्त पांढऱ्या रंगाचाच वापर गाद्या-उशांची कव्हरं, िभती, पडदे, फíनचरची सनमायका यासाठी केला, तर कसं वाटेल? शुद्धता आणि मोकळेपणाचं प्रतीक असलेला पांढरा रंग जर मोठय़ा प्रमाणात वापरला तर अशा खोलीतलं आयुष्य हे बेचव वाटायला लागेल. सीमाहीन अशा अथांगपणामुळे मनात कुठेतरी आधार किंवा संरक्षण हरपल्याची जाणीव निर्माण होऊन एकटेपणा जाणवायला लागतो. अशावेळी थोडासा बंदिस्तपणा मनाला हवाहवासा वाटतो. म्हणूनच काळा काय किंवा पांढरा काय इतर रंगांबरोबर योग्य तिथे आणि योग्य प्रमाणात वापरले गेले पाहिजेत.

ज्या खोलीत भरपूर सूर्यप्रकाश आहे, अशा जागी पांढऱ्या रंगाचा वापर केला, तर अशा जागा या अगदी जिन्याखालच्या जागा असल्या, तरी प्रसन्न आणि मोठय़ा वाटायला लागतात. (छायाचित्र १ पाहा) पण त्या पुरेशा मोकळ्या असतील, तरच हे शुद्ध सौंदर्य अनुभवता येतं. बरंच फíनचर असलेल्या खोल्यांमध्ये फíनचरच्या आड दडलेल्या पांढऱ्या रंगातल्या भिंतीचा खोलीचं सौंदर्य खुलवण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. जर खोलीत उन्हं येत असतील, तर पांढऱ्या रंगातली सूर्यप्रकाश ल्यायलेली खोली अधिकच सुंदर दिसते. त्यातल्या िभती, वस्तू सोनसळी होऊन जातात. अशा खोलीत जर हिरव्या रंगाचा वापर केला, तर तो खोलीच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. (छायाचित्र २ पाहा) किचनमध्येही उन्हं येत असतील, तर ओटय़ामागच्या टाइल्स काळ्या रंगात घेऊन किचन कॅबिनेट्ससाठी पांढऱ्या सनमायकाचा वापर खुलून दिसतो. (छायाचित्र ३ पाहा) पण या टाइल्स लहान आकाराच्या असतील, तरच हे दृश्य डोळ्यांना सुखावतं. मात्र, अशा किचनचा एक तोटा असतो. त्यातल्या पांढऱ्या सनमायकाचा पांढरेपणा राखणं हे एक आव्हानच असतं.

काळ्या-पांढऱ्याच्या संगमातून राखाडी रंग तयार होतो. गडद काळपट राखाडी सोफ्यावर लाल रंगातल्या उशा, किंवा पिवळ्या भिंतीपुढे काळ्या रंगाची कव्हरं असलेला सोफा आणि त्यावर ऑफ व्हाइट रंगांची कव्हरं असलेले तक्के खोलीला एक वेगळाच उठाव आणतात. शेवाळी हिरव्या रंगाच्या सोफ्यांवर दुधाळ पांढऱ्या रंगाचे तक्के आणि त्यामागे पांढरट राखाडी रंगातल्या भिंती हे रंगांचं ‘कूल’ समीकरण पाहतानाही डोळ्यांना शांती मिळते.

अशाप्रकारे कृष्णधवलाची मजा अनुभवायची असेल, तर ती इतर रंगांच्या साथीने अनुभवून आपल्याला हवा असलेला मानसिक परिणाम साधून खोलीच्या सौंदर्यात भर टाकता येते.

विविध रंगांचं असं हे एकमेकांशी असलेलं नातं आजवर या सदरातून आपण पाहिलं. आपल्या घरासाठी रंगांची निवड करताना आपण आपल्या आवडीनिवडींबरोबरच विशिष्ट रंगांबाबत आपल्या मनात काय भावभावना आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ एखाद्याच्या घरी अमुकएक कलर स्कीम निवडली आहे, म्हणून आपल्या घरी तीच निवडायचा निर्णय घेऊ नका. खोलीतला नसíगक प्रकाशही विचारात घ्या आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर हे घरासारखं वाटणं महत्त्वाचं आहे. त्याला एखाद्या हॉटेलचा लूक येता कामा नये. तसंच ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं असणं गरजेचं आहे. यासाठी योग्य रंगांची निवड जर आपण केली तर रंगांमुळे मनावर योग्य ते परिणाम होऊन घरात सुखदायी वातावरण निर्माण व्हायला हे रंग मदत करू शकतील.                             (इंटिरियर डिझायनर)

मनोज अणावकर anaokarm@yahoo.co.in

First Published on: September 30, 2017 1:30 am
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain