डॉ. शरद काळे

उन्हाळ्यात भाज्यांचे भाव चढे राहतात. कोथिंबिरीच्या जुडीला वीस रुपयेदेखील मोजावे लागतात. कांदे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतात. हिरव्यागार पालेभाज्या फक्त मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यात उन्हाळा कडक असेल तर त्या पाहावयासदेखील मिळत नाहीत. रेल्वेच्या कडेला घाणीच्या साम्राज्यात वाढणारी पालेभाजी खाताना मनात आरोग्याबद्दलची शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. भाज्यांवर कीटनाशके वापरली जातात व त्यांचे विघटन होण्यास फारसा अवधी मिळत नाही, कारण अनेक भाज्यांचे शेतातील आयुष्य दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक नसते. त्यामुळे त्यांचे अंश आपल्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. छोटे शेतकरी हल्ली भाज्या वाढविण्यात फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत, कारण ते क्षेत्र आता बहुराष्ट्रीय कंपन्या काबीज करण्याच्या मागे लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना आता चांगल्या भाज्या मिळणे अवघड होत जाणार आहे. यावर उपाय म्हणजे आता प्रत्येक घरात भाजीची बाग फुलायला हवी आहे.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

प्रत्येकाच्या घरात थोडीफार जागा असतेच. अगदी झोपडीतदेखील ती नीटनेटकी ठेवली तर आपल्याला तिथे जागा सापडेल. उदाहरणार्थ, एका ग्लासमध्ये आपण वाळू काठोकाठ भरू. वाळूने भरलेल्या या ग्लासात जागा उरली नाही असे म्हणता येईल का? त्यात जर आता पाणी ओतले तर ते त्यात सामावून जाते व ग्लासमध्ये पाण्यासाठी जागा होती असे लक्षात येते. वाळूने व पाण्याने भरलेल्या ग्लासात मीठ किंवा साखर टाकली तर ती विरघळून जाते व त्या ग्लासात अजूनही जागा होती हेही लक्षात येते. इच्छा असेल तर आपल्याला मार्ग सापडतोच. या जागेचा वापर आपण किती कल्पकतेने करू शकतो त्यावर आपले कर्तृत्व अवलंबून असते. ज्यांच्या घरासमोर अंगण असते किंवा ज्यांच्या घरात गच्ची किंवा बाल्कनी असते त्यांच्यासाठी तर जागा शोधण्याचीदेखील गरज नसते. गृहनिर्माण संस्थांच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागांचा वापरदेखील सर्व संमतीने यासाठी करता येईल. या जागांचा वापर छोटेखानी बागा व भाज्या वाढविण्यासाठी आपल्याला करावयाचा आहे. निसर्गात हिरवा रंग फुलविणे म्हणजे वसुंधरेचे सौभाग्य अखंड ठेवण्यास मदत करणे, याची आवर्जून नोंद घ्यावयाची आहे. ते प्रत्येकाचे कर्तव्यदेखील आहे. हे कर्तव्य निभावीत असताना त्यात आपण जेव्हा हरवून जातो, तेव्हाच आपल्याला वसुंधरेशी किंवा निसर्गाशी एकरूप होता येते व ती अनुभूती म्हणजेच विज्ञान असते.

कोणतीही बाग किंवा शेतीयोग्य जमीन बनविण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागते. मातीत हात घातल्याशिवाय त्यातून फुले किंवा मोती निर्माण होत नाहीत. एखादे रोप आपल्याला लावायचे असेल तर त्यासाठी चाळलेली लाल किंवा काळी माती कुंडीत, जाड प्लास्टिकच्या बरणीत किंवा पत्र्याच्या डब्यात भरावी. पण त्यापूर्वी त्या कुंडीच्या किंवा डब्याच्या तळाशी दोन ते तीन छोटी छिद्रे असावीत, म्हणजे पाणी जास्त झाले तर त्याचा निचरा होण्यास मदत होईल. ती छिद्रे फुटलेल्या बशीच्या किंवा विटांच्या तुकडय़ांनी झाकून टाकावीत, म्हणजे त्यातून माती बाहेर पडणार नाही किंवा पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. कारण माती वाहून गेली तर तिच्यातील पोषक द्रव्ये कमी होतातच, पण जमिनीला डागदेखील पडतात व मातीचे हे डाग कितीही प्रयत्न केला तरी निघता निघत नाहीत! कुंडय़ा, बरण्या किंवा डबे जमिनीवर न ठेवता प्लास्टिकच्या अथवा स्टीलच्या ताटलीत ठेवाव्यात. या ताटल्या वेळोवेळी धुवाव्यात व त्यातील जमा झालेली माती बेसिनमध्ये ओतून न देता पुन्हा कुंडीतच टाकावी. चाळलेल्या मातीत थोडे सेंद्रिय खत मिसळावे. मातीच्या वजनाच्या ८ ते १० टक्के सेंद्रिय खत वापरावे. कुंडीत मग माती पूर्ण ओली होईल एवढे पाणी घालावे. दररोज पाणी ठरावीक प्रमाणातच वापरावे. पाणी देण्याचा एक सोपा उपाय म्हणजे- आजकाल ज्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या रिकाम्या होतात त्यांच्या तळाला दाभणाने छोटी-छोटी २ ते ३ छिद्रे पाडून कुंडीत एका बाजूला ती थोडी मातीत खुपसून ठेवायची. पाण्याने ती बाटली भरली की हळूहळू ते पाणी दिवसभर झिरपत राहील व माती सतत ओलसर राहिल्यामुळे मातीतील सूक्ष्म जीवांची कार्यक्षमता कमाल मर्यादेपर्यंत वाढेल. जर कुंडी लहान असेल तर बाटली लहान वापरावी. दर सहा महिन्यांनी याच बाटलीतून जमिनीला आवश्यक असणारे काही क्षार देता येतील. त्यात मीठ, पोटॅशियम क्लोराइड, सोडियम नायट्रेट व फॉस्फेटयुक्त क्षार यांचा समावेश असावा. फक्त चिमटीभर क्षार छोटय़ा कुंडीतील मातीला सहा महिने पुरतात. दोन मुठी सेंद्रिय खत घातले तर मातीची सुपीकता कायम राहील.

आपण कोणती भाजी घरात चांगली वाढवू शकतो? घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर आणि प्रकाश किती वेळ उपलब्ध असेल त्या वेळेवर आपण कोणता भाजीपाला वाढवू शकतो, यावर ते बरेचसे अवलंबून असते. पालक, मेथी, लाल माठ व चवळी या पालेभाज्या तसेच कोथिंबीर, मिरची, आले, पुदिना व ओवा या आपल्या आवडत्या आणि स्वयंपाकाची लज्जत वाढविणाऱ्या वनस्पती; आणि कांदे, वांगी, काकडय़ा, दोडकी व तोंडली आणि कारली यांसारख्या फळभाज्या आपल्याला निश्चितपणे वाढविता येतील. अर्थात हे सर्व करण्यासाठी घरात प्रत्येकाची इच्छाशक्ती तर हवीच, पण त्याचबरोबर त्यासाठी वेळ द्यावयाची तयारी हवी. टी.व्ही वरील वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वेळ वाया दवडणाऱ्या मालिकांपेक्षा हे काम करणे अधिक मनोरंजक तर आहेच, शिवाय निसर्गातील अनेक गुपिते त्यात समजू लागतात व त्यामुळे तो छंद ज्ञानवर्धकदेखील आहे. प्रत्येक घरातून जर फक्त अर्धा किलो भाजी रोज निर्माण करता आली तर देशात भाज्यांची टंचाई तर जाणवणार नाहीच, शिवाय देशाचे आरोग्यदेखील सुधारेल.

घरातल्या भाजीपाल्याला उंदीर व घुशी यांच्यापासून वाचविले पाहिजे. घर स्वच्छ व कोरडे ठेवलेले असेल तर उंदीर व झुरळे कमी होतात. झुरळे नाहीशी झाली व घरातील धान्य सुरक्षितपणे ठेवलेले असेल तर मग उंदीरसुद्धा कमी होतात. ज्या कुटुंबात रात्री स्वयंपाकघरातील मोरी अथवा सिंकमध्ये खरकटी भांडी नसतात व ती जागा पूर्ण कोरडी आणि स्वच्छ असते तिथे झुरळे फिरकतही नाहीत. आपण जेव्हा आपल्या बागेत भाज्या वाढविण्यास सुरुवात करू तेव्हा आपण सेंद्रिय कीटनाशकांची माहिती करून घ्यावयास हवी. असे अगदी साधे कीटकनाशक म्हणजे तिखट हिरवी मिरची (५० ग्राम) व लसणाच्या  ५ ते ६ पाकळ्या एकत्र वाटून ते मिश्रण डावभर कडुनिंबाच्या तेलात खलून घ्यावयाचे व मग ते पाणी घालून पुरेसे पातळ करून भाज्यांवर फवारले तर बहुतेक उपद्रवी कीटक दूर ठेवता येतात. आपल्या बागेत एक-दोन कुंडय़ांमध्ये झेंडूची व शेवंतीची रोपे लावली तर फुले तर मिळतीलच, शिवाय त्यामुळे उपद्रवी कीटक आपल्या बागेपासून लांब राहतील.

एन्डोसलफोन, डी. डी. टी., एजंट ऑरेंज आणि आता सध्या ग्लायफोसेट या विविध कीटनाशकांच्या वापरामुळे जी वादळे उठली आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण होते. आपण खातो ते पदार्थ या कीटनाशकांपासून मुक्त आहेत की नाहीत याची सदैव चिंता लागून राहते. ग्लायफोसेट म्हणजे राउंडअप या नावाने मिळणारे तृणनाशक! शेतात आणि भाजीपाला संवर्धनात याचा वापर मोठय़ा प्रमाणात आपल्या देशातही होतो. परंतु याबाबतची मार्गदर्शक सूत्रे आपल्याला अनभिज्ञ असतात. शिवाय अतिरंजित बातम्यांमुळे गोंधळ अधिक वाढत जातो. मध्यंतरीच्या काळात शीतपेये आणि मॅगी या दोन उत्पादनांना यामुळेच वाईट दिवस आले होते! हे काही प्रमाणात टाळण्यासाठी विकेंद्रित स्वरूपातील भाजी उत्पादन ही संकल्पना आता जागतिक पातळीवर चांगलीच मूळ धरू लागली आहे. स्वित्र्झलड, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या थंड वातावरणात कडाक्याच्या थंडीचे ४ महिने सोडून सामान्य नागरिक शेतकऱ्यांच्या बरोबरीने आपल्या घरी विविध भाज्या उत्पादन करू लागला आहे. आपल्या देशात तर जवळजवळ बाराही महिने तापमान यासाठी अनुकूलच असते. म्हणून आपण आपल्या घरी भाजीपाला वाढविण्यास सुरुवात केली तर या कीटनाशकांवर थोडे तरी नियंत्रण ठेवता येईल.

नैसर्गिक स्रोतांच्या अमर्याद भासणाऱ्या मर्यादा आणि त्यांचे वाढत्या लोकसंख्येच्या गरजांशी असलेले व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करावयाची आहे. अन्नधान्य व जीवनोपयोगी विविध वस्तूंची उत्पादने वाढविण्यासाठी देशपातळीवर किंवा जागतिक स्तरावर विविध संशोधन संस्था, विद्यापीठे, प्रगतिशील शेतकरी आणि नावीन्याच्या शोधात असणारे उद्योजक कार्य करीत असतातच. दैनंदिन जीवनात आपला व्यवसाय करीत असताना आपण जर आपल्या परीने या स्रोतांच्या नियोजनात हातभार लावला तर वसुंधरेच्या अक्षय्यतेची जपणूक त्यातून साधली जाईल व आपल्यालाही एक सुंदर जीवन जगत असल्याचे समाधान मिळेल. खारीच्या वाटय़ाचे काय महत्त्व असते हे आपण जाणून आहोतच. वास्तवाचे भान ठेवणारी व विज्ञानावर निष्ठा असणारी एक सशक्त व सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे कार्य त्यातून होत राहील.

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.