15 December 2017

News Flash

सेकंड होमसाठी बचत करताना..

रिअल इस्टेट हा मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग राहिला आहे.

विजय पवार | Updated: May 20, 2017 12:15 AM

संग्रहीत छायाचित्र

सेकंड होम घेण्यापूर्वी लक्षात घ्याव्या अशा काही बाबींविषयी..

रिअल इस्टेट हा मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग राहिला आहे. गेल्या दशकाचा आढावा घेतला असता सेकंड होममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असल्याचे आपल्याला दिसून येते. काही जण गुंतवणुकीसाठी सेकंड होमचा पर्याय निवडतात, तर काही जण शहरी जीवनातील धकाधकीपासून सुटका मिळवण्यासाठी शांत ठिकाण म्हणून सेकंड होमची निवड करतात. पण सेकंड होम खरेदी करण्यापूर्वी काही बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या बाबी पुढे नमूद केल्या आहेत. त्याच्या आधारे सेकंड होमचा पर्याय स्वीकारताना तसेच खरेदी करताना निर्णय घेणे सोयीचे होऊ  शकेल.

तुमची गरज विचारात घ्या

सेकंड होममध्ये वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याकडून गुंतवणूक केली जाते. काही जण गुंतवणुकीच्या कारणाने करतात, तर काही जण सुट्टीतील विश्रांतीसाठी हा पर्याय निवडतात. त्यामुळे आपली नेमकी गरज काय हे आपण त्याच्या खरेदीचा निर्णय घेताना निश्चित केली पाहिजे. सेकंड होमची खरेदी ही आपल्यावर अतिरिक्त जबाबदारी व खर्च असतो, हे ध्यानात घेऊनच आपण निर्णय घेतला पाहिजे. घाईघाईने निर्णय घेऊन नंतर दु:ख करण्यापेक्षा योग्य विचार करूनच त्याबाबतची निश्चिती करावी.

आकर्षक कर्जदार व्हा

ज्या कर्जदाराचा इतिहास व्यवस्थित असतो, अशा कर्जदारांना वित्तीय सहकार्य करण्यास बँका उत्सुक असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण त्यांच्याशी सौदा करू शकतो. सिबिलच्या अहवालाबरोबरच यापूर्वी कर्जदाराचे वित्तीय संस्थेशी पूर्वीचा व्यवहार तसेच संबंध कसे होते, याचाही विचार केला जातो. ज्यांचे व्यवहार क्लेषदायी आहेत, अशा कर्जदारांच्या बाबतीत व्यवहार करण्यास बँका उत्सुक नसतात. याशिवाय, आणखी एक बाब विचारात घेतली जाते आणि ती म्हणजे हे कर्ज फेडण्याचे दायित्व स्वीकारण्यास कर्जदार सक्षम आहे की नाही याचे. त्याचबरोबर कर भरण्याच्या बाबतीत कुणी टाळाटाळ केली नसेल तर त्याचा विचार बँका निश्चितपणे कर्ज देण्यासाठी करतात.

घरासाठी राखीव निधी तयार ठेवा

एक घर सांभाळताना त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून खर्च होत असतो. सेकंड होमची त्यात भर पडल्यास त्याच्या खर्चासाठी राखीव निधी निश्चित केला पाहिजे. सेकंड होमच्या खरेदीनंतर वेगवेगळ्या प्रकारचे खर्च वाढू लागतात. उदाहरणार्थ- देखभालीचा खर्च, किरकोळ दुरुस्तीचे काम, वेगवेगळ्या प्रसंगी येणारा खर्च. त्यानंतर त्याच्या देखभालीसाठी केअरटेकरची नियुक्ती करावी लागते. त्याचा खर्च वाढतो तो वेगळा. शिवाय विमा पॉलिसीचे प्रीमियम हप्तेदेखील भरायचे असतात. हे सर्व विचारात घेतले पाहिजे.

 अतिरिक्त खर्च वाढवू नका

काही साध्या-साध्या गोष्टींबाबत आर्थिक नियोजनाची गरज नाही. कारण अतिरिक्त खर्च टाळला तर त्याची गरज भासणार नाही. अतिरिक्त खर्चामुळे आपले नियोजन ढासळते व आपला वित्तीय कामगिरीचा इतिहास बदलू शकतो. त्याचा येणाऱ्या काळात विपरीत परिणाम होऊ  शकतो. सेकंड होमच्या खरेदीची संधीदेखील हातातून निघून जाऊ शकते. वेळेवर कर्जाचे हप्ते फेडण्यास अडचण आल्यास कायदेशीर कारवायांनादेखील सामोरे जावे लागते.  हे टाळण्यासाठी आपण आपली आर्थिक परिस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. पुढील मुद्दय़ांच्या आधारे आपण त्याचे परीक्षण करूनच निर्णय घेतला पाहिजे.

आपण खरोखरच सक्षम आहोत का? हा आपला यादीतील शेवटचा प्रश्न असावा आणि तो कमी महत्त्वाचा आहे हे अजिबात समजू नये. सेकंड होममधील गुंतवणुकीची अतिरिक्त जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर पेलण्यास तयार आहोत का, हे ध्यानात घेतले पाहिजे. मोठी गुंतवणूक ही अनेकदा आपली निकोप गुंतवणुकीची जीवनशैली बदलण्यास भाग पाडते. म्हणून मोठी झेप घेण्याआधी या शेवटच्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर शोधले पाहिजे.

याशिवाय आपल्याला मोठय़ा प्रमाणावर साहाय्यभूत ठरेल, असेदेखील अनेक घटक असून तेसुद्धा विचारात घेतले पाहिजेत. शेवटी हे ध्यानात ठेवले पाहिजे की, रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. त्यातील जोखीम घेण्याचे प्रमाण कमीत कमी कसे करता येईल, हे विचारात घेऊन गुंतवणूक केली तर निश्चितपणे त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आपल्याला सर्वाधिक परतावा त्यातून मिळू शकेल.

विजय पवार

First Published on May 20, 2017 12:15 am

Web Title: important things to know before taking a second home