22 February 2019

News Flash

खरंच गाव सुधारतंय?

एकदा काही कारणाने शेजारच्या ब्लॉकमध्ये गेले आणि चकितच झाले.

प्रतिनिधिक छायाचित्र

लग्न ठरलं तेव्हा प्रत्येकाच्या तोंडून मी हेच ऐकत होते, ‘नशीब काढलं पोरीनं. मुंबईत भरवस्तीत चार खोल्यांचा ब्लॉक आहे मुलाचा.’ मलाही आमच्या वाडय़ातून त्या ब्लॉकमध्ये जाण्याची अपूर्वाई वाटत होती.

लग्न होऊन घरात आले आणि आमच्या ऐसपैस अस्ताव्यस्त पसरलेल्या वाडय़ापुढे तो आखीव-रेखीव सामान मांडलेला ब्लॉक मला खूप छान वाटला.

एकदा काही कारणाने शेजारच्या ब्लॉकमध्ये गेले आणि चकितच झाले. अगदी आमच्यासारखाच मांडलेला ब्लॉक; त्याच जागी मांडलेला फ्रिज, त्याच जागी टी. व्ही. कपाट! मग कारणपरत्वे वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये गेले आणि नवल वाढतंच गेलं. तळापासून सहाव्या मजल्यापर्यंत सगळे ब्लॉक सारखेच. खोल्यांची रचना, व्हरांडे, दारं इतकंच काय आतलं सामान ठेवण्याच्या जागाही त्याच. सगळे ब्लॉक सारखे, फक्त आतली माणसं बदललेली. बदललेल्या माणसांवरून त्यांचं घर ठरवायचं. त्या ब्लॉक्सना, त्या घरांना स्वत:चं वैशिष्टय़च नाही. त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्वच नाही.

आमचं गाव छोटंसंच, पण तिथे प्रत्येक घर वेगळं, त्याचं वैशिष्टय़ वेगळं, घरातल्या माणसांपेक्षा त्या घराच्याच वैशिष्टय़ांवरून ते घर ओळखलं जायचं. आमचा देवधरांचा ऐसपैस वाडा, पण तो ओळखला जायचा ‘मांडवाचा वाडा’ म्हणून. पावसाळा सोडून उरलेले आठ महिने त्या वाडय़ाच्या भव्य अंगणात मांडव घातलेला असायचा. त्या मांडवाखालची जमीन चोपून चोपून गुळगुळीत केलेली असायची. दर आठ दिवसांनी शेणाने ती सारवली जायची. दिवसभर त्या मांडवात माणसांचा राबता असायचा. मुलांचे खेळ, बायकांची कामे, पुरुषांच्या गप्पा, रात्री निम्मा वाडा मांडवाखालीच झोपायचा. दसऱ्याला मांडव पडायचा तो पावसाळा सुरुवात झाल्यावर निघायचा. मांडव ही त्या वाडय़ाची शान होती.

शेजारी सामंतांचा वाडा. या वाडय़ाला ‘गजांचा वाडा’ म्हणत असत. त्यांच्या घराला पुढे अंगण नव्हते. रस्त्यावरच त्यांची पडवी होती. त्या पडवीला उभे गज लावलेले होते. त्या पडवीत पितळी कडय़ांचा मोठा झोपाळा होता. सतत त्या झोपाळ्यावर बसून कुणी ना कुणी झुलत असायचं. तिथे बसून रस्ता न्याहाळायचा, येणाऱ्या-जाणाऱ्यांना हटकायचं, दोन शब्द बोलायचे, ही त्या घरच्या माणसांची सवय. तहानेने व्याकूळ झालेले लोक हमखास त्या गजांशी थांबायचे आणि पाणी मागायचे. झोपाळ्याशेजारीच एक माठ भरलेला असायचा. सर्वाना तो तृप्त करायचा.

त्यानंतरचे घर साठय़ांचे. खूप जुना वाडा, मोडकळीस आलेला, गरिबीही खूप. दैवाने नशिबी गरिबी आणली असली तरी निसर्गाने त्यांना खूप श्रीमंती दिली होती. वाडय़ाच्या दारात दोन पारिजातक होते. पहाट होते ना होते तोच शुभ्र फुलांची पखरण दारात पडायची. वाडा प्रसन्नतेने न्हाऊन निघायचा. मागील दारी चिंचेची थंडगार सावली देणारी झाडं. कधीही चिंचेवर मुले चढत. मूठभर चिंचा खिशात भरत, त्यांना कुणीही ओरडत नसे. साठेकाकूंना कुणी विचारलं तर त्या म्हणत, ‘घेऊ  देत. आमच्याजवळ दुसरं देण्यासारखं काय आहे?’

त्यानंतरचं घर प्रतिष्ठित श्रीमंतांचं. गावात फक्त त्यांच्याचकडे मोटारसायकल होती. म्हणून त्याला ‘फटफटीचं घर’ म्हणत.

दामल्यांचं घर तर ‘दूर्वा आजीचं’ घर म्हणून ओळखलं जायचं. घरामागल्या अंगणात दूर्वा आणि तुळशी. आजींच्या जिवावर अनेक जणी दूर्वाचा लक्ष वाहण्याचे व्रत करीत. आजींना नुसतं सांगत, ‘आजी दुर्वाचा लक्ष वाहायचा म्हणतेय.’ लगेच आजी म्हणत, ‘कर गं बायो! मी दूर्वा मोजून देईन.’ मग दिवसभर आजी उन्हाकडे पाठ करून दूर्वा मोजत बसत. वाडय़ातली मुले, बायका वेळ मिळेल तेव्हा आजींजवळ बसून दूर्वाच्या जुडय़ा बांधत. कुणाकडे पूजा असली की फक्त सांगायचं, ‘आजी, उद्या पूजा आहे.’ लगेच १००८ तुळशीच्या पानांचा पुडा गुरुजी यायच्या आत त्या घरी पोहोचायचा.

एकदा गंमत झाली. गावात एक घर होतं. ती माणसं मुंबईला राहायची. घर बंदच असायचं. पण एकदा त्यांनी या घरी पूजा करायचं ठरवलं. आजींचा दूर्वा आणि तुळशीचा पुडा त्यांच्या घरी गेला. पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी घरातली बाई प्रसाद घेऊन आजींकडे गेली आणि म्हणाली, ‘किती पैसे द्यायचे दूर्वा आणि तुळशीचे?’ अरे बाप रे! तिचं वाक्य पुरं व्हायच्या आत आजींनी असं तोंड सोडलं, ‘मला माहित्येय तुम्ही मुंबईवाले फारच श्रीमंत आहात. आम्ही गरीब असलो तरी अजून पूजेच्या दूर्वा-तुळशीचे पैसे घेऊन जगायची वेळ आमच्यावर आलेली नाही, समजलीस. म्हणे पैसे किती?’ त्या बाईला आपलं काय चुकलं तेच कळलं नाही.

लिमयांच्या वाडय़ात कृष्णाचं देऊळ होतं, घरातलंच देऊळ असल्याने एरवी फारसं कुणी तिथे जात नसे. पण कृष्णाष्टमीला साऱ्या गावाचे रस्ते लिमयेवाडय़ाकडे जात असत. कृष्णाची पूजा आणि त्यानंतरचे गावजेवण कुणी चुकवत नसे. साधी अळूची भाजी, भात आणि मूठभर गोड बुंदी.. हेच जेवण सर्वाना, पण गावातला गरीब, श्रीमंत प्रत्येक जण त्या दिवशी मांडीला मांडी लावून भातभाजी ओरपत असे. वर्षभर पै-पैसा साठवून लिमये ते जेवण देत असत. त्यांची कुणाकडून अपेक्षा नसे, पण गाव ते जेवण आपलं समजत असे. जितक्या घरी अळू असेल तेवढं सगळं न सांगता तिथे पोहोचे. कुणी तांदूळ पाठवत, कुणी पैशाची मदत करीत. गावात एकच आचारी असल्याने एरवी त्याला मोठं मानाचं बोलावणं लागे, पण कृष्णाष्टमीच्या दिवशी न सांगताच पहाटे अंघोळ करून, पंचा लावून तो भाजी फोडणीला टाकायचा. त्याच्या भाजीची चव काही औरच असायची. गावातल्या बायका-पुरुष वाढणं, उष्टी काढणं याला मदत करायच्या. हा सोहळा संपला की वाडा परत चिडीचूप व्हायचा.

एका वाडय़ात गाई, म्हशींचा गोठा पुढे, तर घर मागे होतं. त्याला ‘गोठय़ातलं घर’ म्हणत. ‘बोरीखालचं घर’, ‘भुताचा वाडा’ अशी घरं ओळखली जात. पैशाने श्रीमंत, मनाने श्रीमंत, गरीब, रडकी, हसरी, बोलकी, अबोल सर्व तऱ्हेची घरं गावात होती. प्रत्येकाला स्वत:चं वेगळेपण होतं. स्वत:चं वैशिष्टय़ होतं. स्वत:चं व्यक्तिमत्त्व होतं. म्हणूनच इथे आल्यावरही चेहरा नसलेली, सर्वानी सारखाच मुखवटा घातलेली, व्यक्तिमत्त्व हरवलेली, अलिप्त घरं बघून मन उदास झालं. ही घरं घरातल्या वेगवेगळ्या माणसांवरूनच ओळखायची.

पण माणसं तरी वेगळी आहेत का?

दरवाजाला लॅच लावून बंद घरात वावरणारी, दाराच्या ‘आय होल’ मधून बाहेरच्या विश्वाचा अंदाज घेणारी, शेजारच्या ब्लॉकमध्ये कोण राहतात हेही माहीत नसलेली, घराच्या एखाद्या खिडकीतून आकाशाचा तुकडा दिसत असेल तर वातानुकूलित यंत्र लावून ती खिडकीही बंद करणारी, बॉक्स ग्रिल लावून आपल्याभोवती कुंपण करून त्यात राहणारी, संकुचित विश्वाला जग समजणारी, त्यांच्यात तरी वेगळेपणा कुठे आहे?

मला भीती वाटते, मी, माझी बायको, माझी मुले ‘या संकुचित परिघाला जग समजणारी ही माणसं, हळूहळू हा परीघ आक्रसत जाऊन शेवटी ‘मी आणि मीच’ एवढंच त्यांचं विश्व उरेल की काय? ही चेहरा नसलेली घरं त्याची माणुसकीच गिळून टाकतील की काय? यांना घरं तरी का म्हणावं? यांनी घराची संकल्पनाच मोडून काढली आहे.

ठरवलं आता एकदा वेळात वेळ काढून गावी जायचं. स्वत:चं वैशिष्टय़ असलेल्या, आपुलकी आणि माणुसकी जपणाऱ्या त्या सगळ्या वाडय़ांतून चक्कर टाकून यायची. पण मी जायच्या आधीच भाऊ  आला, दारातूनच ओरडला, ‘ताई! आपला वाडा विकला गेला, आता तिथे छान सात मजली इमारत होणार आहे. आपल्याला दोन ब्लॉक मिळणार आहेत, आपल्या आजूबाजूचे जवळजवळ सर्वच वाडे विकताहेत. सगळीकडे टुमदार ब्लॉक होणार आहेत. आपलं गावंढळ गाव आता स्मार्ट होणार आहे. आपलं गाव आता सुधारतंय.’

शैलजा दांडेकर  dandekarshailaja@gmail.com

First Published on January 20, 2018 3:34 am

Web Title: improving village in india