पुणे- ठाणे- मुंबईतील बहुसंख्य सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सदनिका एक रूम किचन वा दोन रूम किचन या रचनेच्या व ३०० चौ. फूट ते ४०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाच्या होत्या. या संस्थांच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर सुमारे चाळीस टक्के वाढीव क्षेत्रफळाची सदनिका प्रत्येक सभासदाला मोफत मिळाली.

जुन्या इमारतीतल्या मूळ सभासदांपैकी एखाददुसऱ्या सभासदाकडे (सुमारे ५%) चार चाकी वाहन होते, तर ४-५ सभासदांकडे (सुमारे २०%) स्वयंचलित दुचाकी वाहने होती. ही सर्व वाहने संस्थेच्या मोकळ्या आवारातच उभी केली जात. उर्वरित ७५% सभासदांकडे कोणतेही वाहन नव्हते.

पुनर्विकसित केलेल्या सर्व इमारतींमध्ये पुरेशी कार पार्किंगची सोय करण्यासाठी स्टिल्ट कार पार्किंग्जची व्यवस्था विकासकांनी केली. काही थोडय़ा इमारतींमध्ये स्टिल्ट कार पार्किंगच्या ऐवजी पोडियम पार्किंगची व्यवस्था केली गेली.

बऱ्याच संस्थांमध्ये सदनिकांच्या संस्थेच्या ९०% संख्येएवढी कार पार्किंग्ज दिली गेली. या बहुतेक संस्थांनी विकासकाला ५०% स्टिल्ट कार पार्किंग विकण्याचा अधिकार डेव्हलपमेंट अ‍ॅग्रिमेंटद्वारे दिला. ५०% स्टिल्ट कार पार्किंग्ज व सर्व ओपन कार पार्किंग्जची मालकी सहकारी संस्थेकडेच राहिली.

पुनर्विकास योजनेत बांधलेल्या अतिरिक्त सदनिका विकत घेणाऱ्यांनी कार पार्किंग एरियादेखील विकासकाकडून विकत घेतला होता. त्याचप्रमाणे जुन्या सधन आर्थिक परिस्थिती असलेल्या व चार चाकी वाहन असलेल्या जुन्या सभासदांनी कार पार्किंग एरिया विकासकाकडून विकत घेतला होता. त्यामुळे ज्या तीन-चार नव्या/ जुन्या सभासदांनी कार पार्किंग एरिया विकासकाकडून विकत घेतला नव्हता त्यांच्याच गाडय़ा संस्थेच्या ताब्यात असलेल्या कार पार्किंग एरियामध्ये उभी राहू लागली. त्यामुळे संस्थेच्या ताब्यातील ७०% कार पार्किंग्ज रिकामीच राहिली. या रिकाम्या राहणाऱ्या कार पार्किंग्जचा मेंटेनन्स खर्च, प्रॉपर्टी टॅक्स व अन्य खर्च (ही कार पार्किंग्ज सहकारी संस्थेच्या मालकीची म्हणजेच सर्व सभासदांच्या सामायिक मालकीची असल्यामुळे) संस्थेच्या सर्व सभासदांना उचलावा लागत आहे. हा सर्व खर्च प्रति कार पार्किंग आजच्या घडीला किती आहे याची पुनर्विकास करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांच्या सभासदांना कल्पना असावी यासाठी खाली नमूद करत आहे.

१) स्टिल्ट कार पार्किंग मशीनची किंमत दहा वर्षांत जमवण्यासाठी रु. ८००

२) स्टिल्ट कार पार्किंगमध्ये रोज संध्याकाळी सात ते सकाळी सात वापरल्या जाणाऱ्या टय़ूब लाइट्सच्या विजेचा खर्च रु. १५०

३) सिक्युरिटी गार्ड्सच्या खर्चातील वाटा (सिक्युरिटी गार्डस् गाडय़ांच्या सुरक्षेचे व गाडय़ा येण्या- जाण्याचे वेळी गेट उघडण्याचे व बंद करण्याचे काम करतात. रु. १५०

४) स्टिल्ट कार पार्किंग प्रॉपर्टी टॅक्स रु. ७०

५) स्टिल्ट कार पार्किंगच्या दैनंदिन सफाई खर्चापोटी रु. ३०

६) स्टिल्ट कार पार्किंगच्या मशीन व सिव्हिल स्ट्रक्चर मेंटेनन्सचा खर्च रु. २००

दरमहा रु. १४००

रिकाम्या राहणाऱ्या स्टिल्ट कार पार्किंग्जचा वरील खर्च संस्थेच्या सर्व सभासदांना उचलावा लागत आहे. उदाहरणार्थ तीस सभासदांच्या संस्थेतील आठ कार पार्किंग्ज रिकामी राहात असतील तर प्रत्येक सभासदाला दरमहा रु. २७५ कॉन्ट्रिब्यूट करावे लागतील व प्रत्यक्षात तसे घडत आहे.

पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या अनेक सहकारी संस्थांमध्ये हल्ली प्रत्येक सदनिकेमागे एक कार पार्किंग मोफत उपलब्ध करून देण्याची पूर्वअट पुनर्विकास योजनेत ठेवण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. प्रत्येक सदनिकेमागे एक कार पार्किंग मोफत देण्यासाठी जो खर्च येईल तेवढी विकासकाच्या नफ्यात घट होईल. ही नफ्यात होणारी घट भरून काढण्यासाठी विकासक ‘मोफत’ उपलब्ध करून द्यावयाच्या सदनिकेच्या चटई क्षेत्रफळात प्रत्येक सदनिकेमागे सुमारे १५ चौ. फुटांची कपात करेल. ३०० ते ४०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकेच्या बदल्यात मिळू शकणाऱ्या ४०० ते ५२० चौ. फूट क्षेत्रफळाच्या नवीन सदनिकेत १५ चौ. फुटांची घट आपल्याला मान्य आहे का, याचा विचार प्रत्येक सभासदाने गंभीरपणे करावा. नव्या सदनिकेतील बरेचसे क्षेत्रफळ वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर टेबल, डायनिंग टेबल- चेअर्स, कपडे वाळत घालायचे स्टॅण्ड्स, लहान मुलांच्या ट्रायसिकल्स व तत्सम खेळणी, अद्ययावत फर्निचर अशा अनेक वस्तुंनी व्यापले जाणार असताना त्यात १५ चौ. फूट क्षेत्रफळाची घट करून घेणे व्यावहारिक शहाणपणाचे ठरणार नाही. प्रत्येक सदनिकेमागे स्वतंत्र कार पार्किंगची सोय/ अट त्यामुळे कार घेण्याची इच्छा नसलेल्या वा कार घेणे न परवडणाऱ्या सभासदांना नुकसानकारकच ठरेल. परंतु हे व्यावहारिक शहाणपण बहुतांश सभासदांना नसते. एखाद्या सभासदाने हा व्यावहारिक शहाणपणा समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यास कार पार्किंग मोफत मिळवण्यास इच्छुक व उत्सुक असलेले मूठभर सभासद ‘दहा- पंधरा वर्षांनी तुमच्या मुलांना कार घ्यावीशी वाटली तर त्या वेळी कार पार्किंग उपलब्ध होणार नाही वा सदनिकेला अटॅच्ड कार पार्किंग नसेल तर भविष्यकाळात अशी सदनिका लवकर विकली जाणार नाही व विकल्यास चांगला भाव मिळणार नाही, अशी भीती घालतात. या स्वकीयांनीच घातलेल्या भीतीने आणि मोफत स्वतंत्र कार पार्किंगच्या आमिषाला बळी पडून कार पार्किंगची गरज नसलेले सभासद अशा प्रस्तावाला विरोध करत नाहीत.

भविष्यकाळात कधीतरी (म्हणजे कित्येक वर्षांनी) आपली आर्थिक परिस्थिती उत्तम होईल व त्या वेळी आपण कार घेऊ या आशेने प्रदीर्घ कालावधीपर्यंत वर उल्लेख केलेला भरुदड सहन करावयाचा का (स्वतंत्र कार पार्किंगसाठी) याचा विचार प्रत्येक सभासदाने (भविष्यकाळातल्या संभाव्य लायबिलिटीज लक्षात घेऊन) करावयास हवा. असा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी राहत्या घरांच्या संदर्भात काय वास्तव आहे, हे वाचकांना समजावे यासाठी खाली महत्त्वाची माहिती नमूद करत आहे.

नुकत्याच विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार दहा वर्षांपूर्वी विकल्या गेलेल्या (वा पुनर्विकासामुळे जुन्या सभासदांना मोफत उपलब्ध झालेल्या) सदनिकांच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत आता सुमारे २५% घट झाली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे सदनिकांच्या किमतीत गेल्या दहा वर्षांमध्ये झालेली प्रचंड वाढ. विकासकांना बांधकाम व विक्री करताना पूर्तता करण्याच्या विविध अटी व कायद्यांमध्ये नवीन नियमांमध्ये वाढ झाल्यामुळे सदनिकांच्या किमतीत अधिकच वाढ होणे अपरिहार्य आहे. म्हणजे सदनिकांच्या क्षेत्रफळात घट होण्याची टक्केवारी वाढणारच आहे. या परिस्थितीत आधीच सुमारे २५% कमी क्षेत्रफळाची जागा मिळणार असल्याने त्यात स्वतंत्र कार पार्किंगच्या पूर्वअटीमुळे वाढीव ५% घट होणे आपल्याला परवडणार आहे का? याचा आवर्जून विचार प्रत्येक सभासदाने करावा.

विकास नियंत्रण नियमांमध्ये कार पार्किंग्ज सुविधेची किमान पूर्तता करण्याची विकासकावर सक्ती आहे. या किमान सोयीचे प्रमाण काही अभ्यास करून व पूर्वानुभवार ठरवले आहे. त्या संदर्भातील नियमाप्रमाणे ३५ स्क्वे.मी. (म्हणजे ३७७ चौ. फूट) क्षेत्रफळाच्या चार सदनिकांमागे फक्त एक कार पार्किंग देणे आवश्यक आहे. याचाच अर्थ ३७७ चौ. फू. क्षेत्रफळाच्या चार सदनिका मालकांपैकी फक्त एकच मालक कार असणारा वा भविष्यकाळात घेऊ शकणारा असेल, या निष्कर्षांवर आधारीत वरील किमान कार पार्किंग्ज देण्याची अट आहे असे समजावयास हवे. या गृहीतकानुसार जे वास्तवाच्या अगदी जवळ आहे, ७५% सदनिकाधारकांना कार पार्किंगची गरज भासण्याचा संभव नाही.

या परिस्थितीत वर उल्लेख केलेला कार पार्किंगचा संभाव्य अनावश्यक खर्च वाचवण्यासाठी पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सभासदांनी/ सहकारी संस्थांनी डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्सप्रमाणेच कार पार्किंग्ज उपलब्ध करून देण्याची अट पुनर्विकासाच्या टेंडरमध्ये ठेवण्याचा आग्रह धरावा. यामुळे एकूण सदनिकांच्या संख्येच्या सुमारे ३० टक्केच कार पार्किंग्ज सहकारी संस्थेच्या म्हणजे सर्व सभासदांच्या सामायिक मालकीची राहतील व त्यातील फारच थोडी रिकामी राहिल्याने कार नसलेल्या सभासदांवर येणारा आर्थिक भार खूपच कमी असेल. हे होण्यासाठी कार पार्किंगची आवश्यकता नसलेल्या सभासदांनी प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र कार पार्किंग या संकल्पनेला/ पूर्वअटीला जोरदार विरोध करावा व सहकारी संस्थेला तो वेळीच लेखी स्वरूपात कळवावा.

नव्या सदनिका ताब्यात आल्यानंतर सदनिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स व मेंटेनन्सचा मासिक खर्च आता होत असलेल्या खर्चाच्या सुमारे आठपट वाढणार असताना कार पार्किंगसाठी येणारा अनावश्यक वाढीव खर्च (कार पार्किंग नको असलेले) किती सभासद करू शकतील याचा विचार प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र कार पार्किंगची मागणी करणाऱ्या सभासदांनी अवश्य करावा.

ज्या सभासदांना स्वतंत्र कार पार्किंगच्या गरजेच्या तुलनेत सदनिकेच्या क्षेत्रफळाचा मुद्दा गौण वाटत असेल वा सभासदांनी स्वतंत्र कार पार्किंग ‘पैसे’ मोजून विकासकाकडून अवश्य विकत घ्यावे. परंतु स्वत:च्या सोयीसाठी कमकुवत वा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या अन्य सभासदांवर कार पार्किंगच्या खर्चाचा बोजा टाकू नये.