16 February 2019

News Flash

दुर्गविधानम् : आठवावा साक्षेप..!

संपूर्णतया दगडी बांधणीच्या या तटबंदीत पायऱ्या असलेला बुरूज आहे.

दुर्ग मुळात बांधले गेले ते लष्करी दृष्टिकोनातूनच. अन् हे तत्त्व केवळ मध्ययुगीन दुर्गानाच नव्हे, तर अगदी इतिहासपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या दुर्गानाही अगदी तंतोतंत लागू पडते. जगभरात याचे पुरावे पसरलेले आहेत. उदाहरणे खूप देता येतील : आजच्या पॅलेस्टीनमधील ‘जेरीको’  हे शहर पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते जगातील सर्वात जुनी मानवी वस्ती असलेले तटबंदीयुक्त शहर मानले जाते. पुरातत्त्ववेत्त्यांनी आजपर्यंत या शहराचे वीस थर उत्खनित केलेले आहेत. यांतला सर्वात खालचा थर अदमासे अकरा हजार वर्षांपूर्वीचा आहे (साधारणपणे ख्रिस्तपूर्व ९०००). एका नवाश्मयुगीन वसाहतीभोवती ही तटबंदी बांधलेली आहे. संपूर्णतया दगडी बांधणीच्या या तटबंदीत पायऱ्या असलेला बुरूज आहे. पाच फूट उंचीचा व सतरा फूट रुंदीचा हा तट, पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते आक्रमणापासून संरक्षण व्हावे याच हेतूने बांधलेला आहे.

‘गिल्गमेश’ या महाकाव्यात वर्णन केलेलं ‘उरूक’ हे सुमेरिअन संस्कृतीतले शहरही जगातल्या तटबंदीयुक्त शहरांमधले सर्वात जुन्यापैकी एक वसाहत म्हणून ओळखले जाते. मुंडीगाक-कंदाहार, ट्रॉय, इस्तंबूल, शिशुपालगड या साऱ्याच अतिप्राचीन शहरांच्या तटबंदी या लष्करी गरजेतूनच निर्माण झालेल्या आहेत. इतिहासपूर्व काळापासून वापरात असलेले हे तत्त्व युद्धसाहित्याच्या निरनिराळ्या शोधांसोबत वा प्रगतीसोबत उत्तरोत्तर प्रगतीच्या निरनिराळ्या पायठण्या ओलांडीत गेले. याचे पडसाद जगभरात उमटले. हिंदुस्थानात ही स्थित्यंतरे नोंदली गेली. राज्यसंरक्षण, राज्यसंवर्धन व राज्यप्रशासन या दुर्गाशी संबंधित असलेल्या सूत्रांपैकी पहिली दोन सूत्रे ही संपूर्णतया लष्करी गरजेशीच संबंधित होती. किंबहुना संरक्षणाच्या प्राथमिक गरजेतून झालेली ही उत्क्रांती आक्रमकतेचा परिपूर्ण साज लेवून मध्ययुगात विख्यात झाली.

दुर्गाचे महत्त्व सांगताना पंतअमात्य आज्ञापत्रात एके ठिकाणी म्हणतात, याकरिता पूर्वी जे जे राजे जाले, त्यांनी आधी दुग्रे बांधून तो देश शाश्वत करून घेतला, आले परचक्रसंकट दुर्गाश्रई परिहार केले. पंतअमात्यांचे हे शब्द स्वानुभवाचे होते. कारण शिवछत्रपतींनी घडवलेला इतिहास त्यांनी स्वदृष्टी पाहिला व अनुभवला होता.

राज्यस्थापनेच्या तत्कालीन प्रस्थापित नियमावलीला- खुनाखुनी, कटकारस्थाने अन् दगाबाजी- बगल देत, या राजाने राज्यसंपादनाच्या आणि विस्ताराच्या बाबतीत आपली स्वत:चीच मार्गदर्शक तत्त्वे रचली. युद्धशास्त्राचे तंत्र, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही अन् लढणाऱ्या सन्याची मानसिक भूमिका यांवरच युद्धातील विजय अवलंबून असतात. तत्कालीन युद्धतंत्राच्या सोबतीस अनपेक्षित धक्कातंत्राची वा गनिमी युद्धकाव्याची जोड देत शिवछत्रपतींनी शब्दश: न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. आजवर दुर्ग हे राज्यसंरक्षणाचे साधन म्हणूनच वापरले जात होते. मात्र दुर्गाचे हे लष्करी महत्त्व- जे आजपर्यंत राज्यविस्ताराच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिले होते, नेमके तेच हेरून शिवछत्रपतींनी पावले टाकली अन् केवळ दुर्गाच्या साहाय्यानं शून्यातून राज्य उभं करणारा जगातला एकमेव राजा अशी ख्याती मिळवली.

शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या लष्करी हालचाली केल्या वा लष्करी मोहिमा काढल्या, त्या सर्वच त्यांनी दुर्गाच्या आधाराने केल्या. एखादा दुर्ग पाठीशी घेत, बेसावध असलेल्या शत्रूवर तुटून पडायचे व त्याचे होईल तेवढे नुकसान करून, त्याने प्रतिकार सुरू करताच माघार घेत, त्या पाठीवरल्या दुर्गाचा आश्रय घ्यायचा.. अशीच युद्धपद्धती त्यांनी निदान सुरुवातीच्या काळात तरी अंगीकारली. त्यांची युद्धनीती अखेपर्यंत दुर्गाशीच निगडित राहिली. दुर्ग हीच लष्करी केंद्रे कल्पून त्यांनी राजकारणाचे डाव रचले. लष्करी मोहिमा आखून त्या अतिशय सफाईदारपणे तडीस नेल्या. नेत्रदीपक अशा विजयांची नोंद केली. हे सारेच विजय नेत्रदीपक वाटतात, याचे कारण त्यांनी अंगीकारलेल्या व आत्मसात केलेल्या युद्धतंत्रामध्ये आहे. आर्थिक बळ नसताना, लष्करी सामर्थ्य तुलनेने नगण्य असताना, स्वत:पाशी उपलब्ध असलेल्या संसाधनांची व स्वत: विकसित केलेल्या युद्धतंत्राची असाधारण अशी सांगड घालीत त्यांनी हे नेत्रदीपक वाटणारे विजय संपादित केले. दुर्गाना मध्यवर्ती ठेवीत, स्वत:च्या कमीतकमी सन्याचे कमीतकमी नुकसान होऊ देत, कमीतकमी वेळात त्यांनी जास्तीतजास्त शत्रुसन्याचा जास्तीतजास्त नुकसान करत पराभव केला.

कोणतेही बांधकाम करायचे झाले तर ते जागेची योग्य ती उपलब्धता लक्षात घेऊनच करावे लागते. ती जागा दुर्ग म्हणून अतिशय गरजेची असेल, तर मग त्या स्थळाच्या अनुरोधाने स्वत:च्या गरजा आखाव्या लागतात. जागेचा सर्वच दृष्टीने जास्तीतजास्त उपयोग करून जास्तीतजास्त गरजा भागतील हे पाहावे लागते. दुसऱ्या शब्दांत मांडायचे तर- उपलब्ध जागेच्या मर्यादा अभ्यासून गरजांची प्रतवारी लावावी लागते. कोणत्याही काळातील स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकूण उपलब्ध जागा व त्यातील प्रत्यक्षात वापरण्याजोगी जागा हा बांधकामातील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक ठरतो.

हे तत्त्व सर्वच प्रकारच्या बांधकामांसाठी लागू पडते. त्यात सार्वकालीन दुर्गाचाही समावेश करता येतो. याचे प्रमुख वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये करता येते : पहिले म्हणजे जुन्या दुर्गाची डागडुजी करून, ते दुर्ग स्वत:च्या गरजांच्या अन् प्राधान्यांच्या निकषांवर पुन्हा रचणे. दुसरे म्हणजे एखादा दुर्ग संपूर्णपणे नवीन रचणे.

दक्षिण दिग्विजयाच्या वेळी सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजीच्या दुर्गाची मूळ रचना त्यांच्या मनास आली नाही. त्यांनी ते बांधकाम समूळ पाडून टाकायच्या आज्ञा दिल्या व त्या जागी स्वत:ला हवा तसा दुर्ग रचून घेतला. या सगळ्या घटनेचा मागोवा त्या काळी मदुरेस असलेल्या जेसुईट आंद्रे फ्रेअर यानं त्याच्या लिखणात घेतला आहे.  जिंजीच्या दुर्गाच्या बांधकामाबद्दल म्हणतो :  He constructed new ramparts around Jinji, dug ditches, erected towers, created basins and executed all these works with such perfection, which European art would not have denied. या परिच्छेदाचा साधारण गोषवारा असा की, जिंजीच्या दुर्गाची शिवछत्रपतींनी केलेली पुनर्रचना ही एवढी अचूक होती की, ती या तंत्रामध्ये सरस असलेल्या पाश्चात्त्यांच्या तोडीस तोड ठरली. हे निरीक्षण एका अतिशय कडव्या जेसुईट मिशनऱ्याचे आहे हे इथे ध्यानी घेणे महत्त्वाचे आहे.

हा मुद्दा एवढय़ासाठी उद्धृत केला की, दुर्गबांधणीच्या या शास्त्रातील शिवछत्रपतींची अनन्यसाधारण गती अगदी पाश्चात्त्यांनीही- ज्यांना स्वत:पुढे सारे जग थिटे वाटते- तोंडात बोट घालण्याइतपत कशी होती, हे तुमच्या-आमच्या ध्यानी यावे. नैसर्गिक रचनेच्या दृष्टिकोनातून स्थळाची निवड, उपलब्ध संसाधनांचे उत्कृष्ट नियोजन व संरक्षक अन् आक्रमक दृष्टिकोन यांची अपूर्व अशी सांगड घालीत  शिवछत्रपतींनी, दुर्गाची जी बांधकामे केली, ती सार्वकालिक दुर्गबांधणीशास्त्रातील अखेरचा शब्द ठरली. राज्यव्यवहारात दुर्गाचा अत्युत्कृष्ट वापर करणारे अन् दुर्गस्थापत्यकला पूर्णपणे अवगत असणारे शिवछत्रपती हे अखेरचे द्रष्टे दुर्गविशारद राज्यकत्रे ठरले, हे मान्य करावेच लागते.

या संदर्भात स्वराज्याच्या अनभिषिक्त राजधानीचे- राजगडाचे – उदाहरण दिले नाही तर या विवेचनाला काहीच अर्थ राहणार नाही. या नूतन दुर्गाचा वापर त्यांनी राजधानी म्हणून इ.स. १६४५ ते १६७० असा जवळजवळ पंचवीस वर्षांपर्यंत केला.

नैसर्गिक रचना, भौगोलिक स्थान व मानवनिर्मित लष्करी स्थापत्य या साऱ्याच दृष्टीने हा दुर्ग केवळ अजोड आहे. या प्रकारचे, इतके विराट बांधकाम महाराष्ट्रातील इतर कोणत्याही दुर्गावर सापडत नाही. भौगोलिक रचनेच्या विषयाच्या अनुरोधाने बोलायचे झाले तर दुर्गाच्या बाबतीत इतकी मोक्याची जागा इतर कोणत्याही दुर्गाच्या वाटय़ाला आलेली नाही. सह्यद्रीच्या ऐन गाभ्यात असलेला हा दुर्ग चारही बाजूंनी दुर्गानी व नद्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे तत्कालीन युद्धशास्त्र व युद्धसाहित्य यांच्या पोहोचेपलीकडे आहे. राजगडाचा बालेकिल्ला हा दुर्गाचा सर्वात उंच भाग, तो समुद्रसपाटीपासून सुमारे ४५७४ फूट उंच. हवा निखळ, स्वच्छ असताना राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या माथ्यावर उभे राहून चहू दिशांस नजर टाकली तर पूर्वेस तोंड करून केलेल्या एका सव्य प्रदक्षिणेत, कऱ्हेच्या खोऱ्यात असलेले वज्रगड व पुरंदर, नीरा नदीच्या खोऱ्यातले रोहिडा व मोहनगड, कृष्णेच्या खोऱ्यातले कांगोरी, केंजळगड, कमळगड, कोळेश्वर, रायरेश्वर, पांचगणी व महाबळेश्वरची पठारे, सावित्री व कोयनेच्या खोऱ्यातले मकरंदगड व प्रतापगड, काळ नदीच्या खोऱ्यातला कैवल्यगड. लिंगाणा, रायगड व मानगड, पवनेच्या खोऱ्यातील तुंग व तिकोना, इंद्रायणीच्या खोऱ्यातील लोहगड व विसापूर, उल्हास नदीच्या खोऱ्यातील राजमाची अन् मुळा-मुठेच्या खोऱ्यातला सिंहगड- हे जवळजवळ वीस दुर्ग, प्रदक्षिणा पूर्ण होता होता दृष्टिपथात येतात. इतक्या दुर्गाच्या व नद्यांच्या वेढय़ात असलेल्या, तत्कालीन स्वराज्याच्या ऐन गाभ्यात असलेल्या या दुर्गाची राजधानी म्हणून निवड करण्यासाठी भूगोलाचे उत्कृष्ट ज्ञान, भविष्याचा वेध घेणारी प्रज्ञा अन् अतुलनीय लष्करी प्रगल्भताच हवी. ही गुणत्रिपुटी शिवछत्रपतींच्या व त्यांच्या कारभाऱ्यांच्या अंगी पुरेपूर होती, अन्यथा हे अवघं शक्य झालंच नसतं.

राजगडाचे सारेच बांधकाम मोठे करोल आहे. नैसर्गिक रचनेचा पुरेपूर लाभ घेऊन त्यास कृत्रिमरीत्या केवळ दुभ्रेद्य करण्यात शिवछत्रपतींची अन् त्यांच्या स्थपतींची प्रतिभा निर्वविादपणे सफल झाली आहे. दुर्गाच्या इतिहासात व गिरिदुर्ग या प्रकारात चिलखती तटबंदीचा प्रयोग राजगडाच्या बांधकामात पहिल्यांदाच केलेला आढळतो. अपवाद जवळजवळ नाहीच. कोणत्याही प्राचीन वा मध्ययुगीन दुर्गावर या चिलखती तटबंदीनामक तटबंदीचा मागमूसही आढळून येत नाही. अपवाद असायला हवा म्हणून की काय, राजमाचीच्या श्रीवर्धन या एका बालेकिल्ल्याचा एक बुरूज चिलखती बांधणीचा आहे. रायगडावरील महादरवाजाशेजारचा एक बुरूजही असाच दुहेरी बांधणीचा आहे. मात्र हे दोन अपवाद व तेसुद्धा बुरुजांपुरतेच! एरवी या प्रकारचे बांधकाम भारतात दुर्मीळ आहे.

या पद्धतीचे दुहेरी वा तिहेरी तटबंदीचे बांधकाम गोवळकोंडा, बीदर, देवगिरी, वेल्लोर, जिंजी, या दुर्गामध्ये पाहायला मिळते. पैकी गोवळकोंडा, बीदर व वेल्लोर हे भूदुर्ग आहेत. सपाटीवर रचलेले दुर्ग आहेत, तर जिंजी व देवगिरी हे गिरिदुर्ग असले तरी त्यांची तुलना राजगडाच्या उंचीशी होऊच शकत नाही. बीदरच्या दुर्गाला घेरून असलेला तिहेरी खंदक हीसुद्धा एक प्रकारची तटबंदीच म्हणायची, पण फार वेगळ्या अर्थाने. पैकी अगोदर म्हटल्याप्रमाणे जिंजीची पुनर्रचना स्वये शिवछत्रपतींनी केली. त्यामुळे चिलखती तटबंदीची पुनरावृत्ती तिथे होणं साहजिकच होतं. तर देवगिरी हे राष्ट्रकूट अन् यादवांचं दुर्गवैभव. मात्र राजगडाच्या बांधकामाची सर इतर कुणाही दुर्गाला नाही असं सारी अनुमानं आणि स्थलवर्णनं पडताळून व पाहून म्हणावंसं वाटतं.

अनुपमेय असे कृत्रिम बांधकाम हे राजगड या एका राजधानीचे वैशिष्टय़ तर रायगड ही उत्तरकालीन अनभिषिक्त राजधानी हे जणू दुसऱ्या ध्रुवाचे टोक. तिथे कृत्रिम तटबंदी अगदी शब्दश: केवळ औषधालाच सापडायची! नैसर्गिकरीत्याच रायगडाचा डोंगर इतका दुभ्रेद्य आहे की, रायगड पाहिलेल्या ब्रिटिश वकिलाला रायगडाची तुलना स्पेनच्या दुभ्रेद्य अन् अजिंक्य अशा जिब्राल्टरशी करावी असं वाटलं. त्यानं रायगडाचं वर्णन ‘पूर्वेकडला जिब्राल्टर’ असं केलं आहे.

चारही बाजूंनी उत्ताल डोंगरांनी वेढलेला, काळ व गांधारी या नद्यांच्या विळख्यात असलेला, अन् कोणत्याही डोंगररांगेशी थेट संबंध नसलेला रायगडाचा सुमारे तीन चौरस मलांचे पठार माथ्यावर असलेला, सुटावलेला असा डोंगर. याची निवड राजधानी म्हणून अचूक ठरली. या डोंगरास अद्वितीय नैसर्गिक दुभ्रेद्यता लाभली आहे. पश्चिमेकडला चितदरवाजाजवळचा भाग वगळला तर राहिलेल्या सर्वच बाजूंस दीड ते दोन हजार फूट उंचीचे ताशीव कडे आहेत. हे कडे आजही दरुलघ्य आहेत. गिर्यारोहणाच्या अत्याधुनिक साधनांमुळेच विसाव्या शतकातसुद्धा केवळ हिरकणी, टकमक व भवानी हीच टोके काय ती उल्लंघिली गेली आहेत. रायगडाचे इतर कडे अद्याप दरुलघ्यच राहिले आहेत. अन् कृत्रिम साधने न वापरता कुणीही रायगडाचे कडे चढलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. मग शिवकालीन युद्धतंत्र व युद्धसाहित्याच्या काळात रायगड दुर्जेय मानला गेला त्यात नवल ते काय!

दुर्ग ज्या स्थळी बांधायचा त्या स्थळावरील जागेची उपलब्धता या मुद्दय़ासोबत दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो वर्तमान व भविष्यकालीन गरजांचा. या प्रकारच्या गरजांचा मागोवा घेणे हे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याअगोदरच ठरवावे लागते. वर्तमान आवश्यकतांनुसार बांधकामाचा घाट कुणीही घालू शकतो. मात्र हे बांधकाम भविष्यकालीन गरजांचा वेध घेऊन केलेले नसेल, तर उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून ते कधीही चिरस्थायी होऊच शकणार नाही. तात्कालिक बांधकाम थोडय़ाच अवधीत कालबा ठरण्याचा धोका संभवतो.

शिवकाळामध्ये दुर्ग ही सत्तेची अन् राज्यव्यवस्थेची केंद्रस्थाने होती. लष्करी व मुलकी सत्ता या ठिकाणी एकवटलेल्या होत्या. आक्रमण व संरक्षण यांसाठी कराव्या लागणाऱ्या सर्वच हालचालींची ती अतिसंवेदनशील अशी केंद्रे होती; तर राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील त्यांचे कार्य हे मानवी शरीरातील नाडय़ांप्रमाणे होते. या नाडय़ा बंद पडल्या तर शरीर अचेतन व्हायला वेळ लागणार नाही. वेगळ्या शब्दांत बोलायचे झाले तर- आक्रमण व संरक्षण या दोन लष्करी उपयुक्तता ही या राज्यरथाची दोन चाके मानली तर प्रशासकीय व्यवस्थापन हा या रथचक्राचा आस होता असे म्हणावे लागेल.

इतकी महत्त्वपूर्ण भूमिका हे दुर्ग निभावत असल्याचे ठाऊक असल्यामुळे शिवछत्रपतींनी आपल्या राजकीय अन् लष्करी हालचालींना सुरुवात केली, तेव्हा महाराष्ट्रभूमीत पाळेमुळे घट्ट रुजलेल्या उपऱ्या सत्तेशी झुंज घ्यायचे त्यांनी ठरवले. यामागे काहीएक योजना होती, धाडस होते. परंतु मिळू शकणाऱ्या यशाविषयी शंका मनात उभी ठाकावी अशी परिस्थितीही त्या काळी अस्तित्वात होती. याच्या अगोदरही या यवनी सत्तांविरूद्ध उठाव करण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते जागच्या जागीच ठेचले गेले होते. मात्र त्यांत अन् आताच्या वेळी एक प्रमुख फरक होता : या वेळच्या उठावामागे असंतुष्ट अशा समाजाचा हुंकार होता. यावनी सत्तांच्या अस्थिर राजकीय अवस्थांची अचूक अशी जाणीव होती. भविष्याचा अचूक वेध घेऊन केलेले नियोजन होते. यामुळेच शिवछत्रपतींचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर त्यांनी पुनश्च मागे वळून पाहिले नाही! किंबहुना, वर्तमानाचा संदर्भ घेत भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन केलेल्या अतिशय अपवादात्मक वा अभूतपूर्व अशा नियोजनामुळेच पुन्हा मागे फिरून यावे लागेल अशी वेळच त्यांनी कधी निर्माण होऊ दिली नाही. भविष्याचा वेध घेऊ शकणाऱ्या कल्पक व सुसूत्र योजनाबद्धतेचा हा प्रभाव होता, ही गोष्ट कुणाही डोळस अभ्यासकाला मान्य करावीच लागते.

उपरोक्त आंद्रे फ्रेअर म्हणतो:  ‘‘with his pre-vision he applied all the energy of his mind, and all the resources of his dominion to the fortification of the principal towns.ll

kk … and nothing is more remarkable; in regard to Sivagee, than the foresight with which some of his schemes were laid and the finesse of his arrangements for the genius of his countrymen! Sivagee was patient & deliberate in his plans, ardent, resolute and persevering in their execution.ll

पुढे तो म्हणतो:

‘‘…Sivagee never permitted the Deshmukhs and Deshpandyas interfere in the management of the country. with the same view he destroyed all the village walls and allowed no fortification in his territory which was not occupied by his troops.ll

शिवछत्रपतींच्या बाबतीत सुरुवातीला केलेल्या गैरसमजांवर आधारित लिखाणानंतर स्वत:ला सुधारून घेताना जदुनाथ सरकारांसारखे विचक्षण इतिहासकार शिवछत्रपतींबद्दल अतिशय आदराने म्हणतात: ‘आठ विविध भाषांतून उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा बारकाईने अभ्यास केला असता, शिवाजी राजाच्या इतिहासकाराला हे मान्य करावेच लागेल की, शिवाजी हा केवळ मराठा-राष्ट्रनिर्माता नव्हता तर मध्ययुगीन हिंदुस्थानातील तो एक अतिशय श्रेष्ठ व रचनात्मक कार्य करणारा अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता – The Greatest constructive genius of Medieval India. राज्ये नष्ट होतात, साम्राज्यांचे विघटन होते, राजघराणी लुप्त होतात, परंतु कालातीत ऐतिहासिक वारसा म्हणून ‘लोक-नेता राजा’ या नात्याने शिवाजी राजाचे स्मरण अखिल मानव जातीला दीर्घकाल चेतना देणारे, कल्पनाशक्तीला चेतवणारे, बुद्धीला स्फुरण देणारे आणि अतिउच्च पराक्रम गाजवण्यास उद्युक्त करणारे असेच राहील!’

discover.horizon@gmail.com

First Published on September 15, 2018 2:00 am

Web Title: information about castle construction