संजय बहादूर

टाइल्स हा गृह सजावटीचा आवश्यक भाग आहे. लिव्हिंग रूममधील फ्लोअरिंग टाइल्सचा रंग आणि प्रकार यामुळे रूप खुलू शकते. मोठय़ा टाइल्समुळेही जागा मोठी असल्यासारखे वाटते. तसेच, स्वयंपाकघर किंवा बाथरूमचा विचार करता, विविध प्रकारच्या, रंगांच्या आणि अगदी म्युरल्सच्याही टाइल्स उपलब्ध आहेत.

टाइल्सबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे, त्या दीर्घकाळ टिकतात आणि योग्य उत्पादनासह त्या योग्य प्रकारे लावल्या तर जीवनभरही टिकू शकतात. परंतु त्याच त्याच टाईल्स पाहून आपल्यालाही कंटाळा येतो. मन मनात विचार डोकावतो तो टाईल्स बदलण्याचा.  तुम्ही घरातील फर्निचर बदलायचे ठरवता त्यावेळी त्याला साजेशा टाइल्स बदलाव्याशा वाटतात. अशावेळी घराचे रूप बदलण्यासाठी रीटायलिंग हा चांगला पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे तो कायमस्वरूपी ठेवायला हवे असेही नाही, तर टाइल-ऑन-टाइल पर्यायाचा स्वीकार केला तर हा पर्याय खूपच सोपा वाटतो.

टायलिंगची पद्धत                 

अनेकदा घरमालकांना टाइल्समध्ये बदल करण्याची इच्छा नसते. याचे कारण म्हणजे, जुन्या टाइल्स तोडून आणि त्या काढून टाकून, त्या ठिकाणी नव्या टाइल्स बसवून पारंपरिक पद्धतीने टाइल्स बदलल्या जातात. यामुळे खोलीतील भिंतींना काही प्रमाणात धक्का पोहोचू शकतो. मग पुन्हा रंगकाम आलेच! किंवा वॉलपेपरची गरज भासू शकते. अगोदर, स्लिपेज्ची शक्यता असल्याने, कंत्राटदार टाइलवर टाइल बसवण्याचा सल्ला देतात.

सुलभ पर्याय

काही अत्याधुनिक उत्पादनांमुळे टाइल्स बदलणं अतिशय सुलभ व सुरक्षित झालं आहे. त्यामुळे  आता तुम्हाला जुन्या टाइल्स काढताना अनेक दिवस मोठा आवाज ऐकण्याची गरज नाही आणि नव्या बसवण्यासाठी बरेच दिवस घरात गैरसोय सोसावी लागणार नाही. टाइल-ऑन-टाइल पद्धतीमध्ये अतिशय कमी वेळ लागतो आणि नक्कीच कमी गोंधळ होतो. टाइल्स चिकटवण्यासाठी चांगल्या उत्पादनांचा उपयोग केल्यास टाइल्सच्या मेकओव्हरच्या टिकाऊपणाबद्दल काळजी करावी लागणार नाही.

जुन्या टाइल्सवर नव्या टाइल्स चिकटवून तुमच्या फ्लोअरचा व भिंतींचा झटपट मेकओव्हर करा. पण त्यावेळी पुढील मुद्दे लक्षात घ्या :

मूळ टाइल्सपैकी काही सैल असतील तर त्या पुन्हा बसवून घ्याव्यात व नंतर रीटायलिंग करावे.

नव्या टाइल्सचे सांधे जुन्या सांध्यांवर असावेत.

मूळ टाइल्स स्वच्छ असतील, याची खात्री करा आणि एखादी सैल किंवा खराब असेल तर ती काढून टाका.