रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या महिन्यात येऊ घातले आहे. यंदा या पतधोरणापासून व्याजदर कपातीची आशा वाढली आहे. त्याला कारण- जूनमधील महागाई दर किमान स्तरावर आला आहे. प्रत्यक्षात रिझव्‍‌र्ह बँक काय करते ते लवकरच कळेल. रिझव्‍‌र्ह बँकेला मात्र अजूनही महागाई वाढण्याची भीती आहे.

जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही तुलनेत वाढीव नफ्याचे येत आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्र मात्र अद्यापही मंदीच्या गर्तेतून बाहेर पडलेले नाही. सध्याचा तर त्यांच्यासाठी ‘ऑफ सिझन’च आहे. ओणमनंतर यंदाच्या सणांच्या हंगामाला सुरुवात होईल.

दसरा-दिवाळीपर्यंत तरी या क्षेत्रात खरेदी – विक्रीचे व्यवहार वाढण्याची शक्यता कमी आहे. घरांचे दर सध्या स्थिर आहेत. तर बँकांचे गृहकर्ज दर किमान स्तरावर आहेत. यात येणाऱ्या अल्प कालावधीत फारसा फरक पडण्याची शक्यता धूसर आहे. तेव्हा आणखी काही महिने एकूणच गृहनिर्माण उद्योगाला कळ सोसावी लागणार आहे.

आधी नोटाबंदी आणि नंतर रेरा कायद्यामुळे हे क्षेत्रही व्यवसायवाढीबाबत चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच नव्याने लागू झालेल्या वस्तू व सेवा करप्रणालीची मात्रा या क्षेत्रावरही काही प्रमाणात लागू झाली. या क्षेत्राला सेवा करापासून दूर ठेवले असल्याचे सरकार स्तरावरून सांगितले जात असले तरी हे क्षेत्र या करप्रणातील तरतुदींचा अप्रत्यक्ष भागीदार बनला आहे.

‘नाइट फ्रँक’ या सल्लागार कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख महानगरातील घरांच्या किमती गेल्या तीन वर्षांत स्थिर अशाच राहिल्या आहेत. २०१४ च्या तुलनेत काही शहरांमधील दर उलट कमी झाल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

मात्र वस्तू व सेवा करामुळे हा उद्योग ज्यावर अवलंबून आहे त्या घटकावर, त्यांच्या किमतींवर परिणाम होणार आहे. मुंबईसारख्या शहरात स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा गेल्या काही कालावधीत अवघा ३ टक्के राहिला आहे. तर अद्यापही शहरात दीड लाख घरे विक्रीविना आहेत.

अशा स्थितीत बँकांचे या क्षेत्रासाठीचे कर्जपुरवठा धोरण कसे राहते, हे पाहावे लागेल. सध्या एकूणच कर्ज मागणी कमी आहे. बँका आधीच मोठय़ा रकमेच्या बुडित कर्जाचा सामना करत आहेत. मार्च २०१७ अखेर बँकांची एकूण थकित रक्कम ११ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याची आकडेवारी आहे.

स्टेट बँकेसारख्या बँकेचे गृहकर्ज व्याजदर सध्या सर्वात कमी ८.३५ टक्के आहेत. अन्य बँकांचेही जवळपास त्याच्यानजीक जाणारे आहेत. सध्याचा १० टक्क्यांपर्यंतचा गृह कर्ज व्याजदर मान्य केला तरी तो गेल्या अनेक वर्षांतील किमान आहे. तेव्हा बँका यापेक्षा आणखी खाली उतरतील का, याबाबत शंकाच आहे. तिकडे रिझव्‍‌र्ह बँकही व्यापारी बँकांसाठीचे दर आणखी कमी करण्याची शक्यता कमीच आहे.

दसरा-दिवाळी येईपर्यंत बँकाही त्यांच्या सध्याच्या व्याजदरात फारसे बदल करण्याची शक्यता कमीच आहे. सणांच्या तोंडावर अनोख्या, अधिक सूट-सवलतीच्या गृहकर्ज योजना कदाचित त्यांच्याकडून सादर केल्या जाण्याची अटकळ अधिक आहे. ऑगस्टमधील रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात आश्चर्यकारक व्याजदर कपात झाली तर मात्र बँकांना गृहकर्जदारांना आकृष्ट करण्यासाठी पावले उचलावी लागतील.