इंटिरियर डिझाइनिंगमधील सर्वात आव्हानात्मक भाग जर कोणता असेल तर तो बाथरूम डिझाइनचा. बाथरूम लहान असो वा मोठे, त्यात तंत्रशुद्धता आणि सौंदर्य यांचा मिलाफ झाला तरच त्याला उत्तम डिझाइनचा दर्जा मिळतो.

बाथरूममध्ये वापरले जाणारे फिटिंग्ज व अ‍ॅक्सेसरीजदेखील त्यांच्या उपयुक्ततेसोबतच बाथरूमच्या सौंदर्यातही भर घालत असतात. आपलीही अपेक्षा असते की बाथरूम प्लम्बिंगचे काम एकदा केले की ते वर्षांनुवर्षे व्यवस्थित चालावे. म्हणूनच बाथरूमचे फिटिंग्ज निवडताना त्यांचा उत्तम दर्जा व अद्ययावतता पारखूनच घेतलेल्या बऱ्या. तसे पाहायला गेले तर आपण फार भाग्यवान माणसे आहोत. कारण आपण ज्या काळात जन्माला आलो आहोत त्या काळात रोज नवनवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. ज्या ज्या गोष्टींची पूर्वी फक्त कल्पना होत असे त्या आज आपण सहज उपभोगू शकतो. अशाच काही फिटिंग्ज आणि सॅनिटरी वेअरची आज आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

शॉवर- शॉवर म्हटले की पटकन नजरेसमोर येते ते आपल्या शत धारांनी शरीराला गुदगुल्या करत नखशिखांत भिजवून टाकणारे पाणी. पूर्वी बाथरूमच्या भिंतीवर सहा-सात फुटांवर लावलेली एक चार ते सहा इंची जाळी इतकीच काय ती शॉवरची ओळख होती. पण गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान आणि फॅशन दोन्हींमध्ये अनेक बदल घडून आल्याने शॉवरदेखील निरनिराळ्या रूपांत दिसू लागले आहेत. यापैकी बराच लोकप्रिय प्रकार म्हणजे रेन शॉवर. असं तर पावसात भिजणे कोणाला नाही आवडत, पण  नैसर्गिक पावसात भिजण्याला स्थळ-काळाच्या मर्यादा असतात. मग तोच पाऊस जर आपल्याला आपल्याच बाथरूममध्ये अनुभवायला मिळाला तर?

हे रेन शॉवर मोठय़ा गोल किंवा चौकोनी आकारात मिळतात. ते किती लहान किंवा मोठे घ्यायचे हे आपण ठरवू शकतो. हे शॉवर शॉवर एरियाच्या बरोबर मध्यावर बसविले जातात. बऱ्याचदा तर फॉल्स सिलिंगमध्ये कन्सिलदेखील केले जातात. यातून पडणाऱ्या धारा अंगावर झेलताना अगदी पावसात उभे असल्याचा भास होतो. शिवाय शरीरासोबतच मनालाही उल्हसित करण्यासाठी काही रेन शॉवरमध्ये छएऊ लाइटची देखील व्यवस्था केली जाते, ज्यामुळे तुमचा मूड देखील हलका होऊन जातो.

शॉवरमधील आणखी एक प्रकार म्हणजे वॉटर फॉल शॉवर. हे शॉवर भिंतीवर लावले जातात. थोडय़ाशा चपटय़ा, लांब व बारीक असणाऱ्या एका चिरेतून पाणी अक्षरश: धबधब्याप्रमाणे कोसळते.

सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बॉडी शॉवर्स. बॉडी शॉवर्स हा एक शॉवर्सचा सेट असतो. यामध्ये हेड शॉवरसोबतच आपल्या शरीराच्या विविध भागांवर समोरून पाणी उडेल अशा प्रकारे भिंतीमध्ये शॉवर जेट्स बसवले जातात. जणू काही भिंत फोडून पाणी तुमच्यावर बरसत आहे अशा प्रकारचा अनुभव या शॉवरमध्ये येतो. याची खासियत म्हणजे सॉफ्ट वॉटर फ्लो तसेच बॉडी मसाज अशा निरनिराळ्या प्रकारे हा अ‍ॅड्जस्ट करता येतो.

या सर्व शॉवरच्या भाऊ गर्दीत हॅन्ड शॉवरलादेखील विसरता कामा नये. याला हॅन्ड शॉवर किंवा टेलिफोन शॉवरदेखील म्हणतात. हा हातात घेऊन शरीराच्या हव्या त्या भागावर आपण यथेच्छ पाणी घेऊ  शकतो.

स्पाऊट- शॉवर पॅनेलवर सर्वात खाली येतो तो स्पाऊट किंवा साध्या भाषेत सांगायचे तर नळ. बऱ्याच लोकांना शॉवरखाली अंघोळ करण्यापेक्षा बादली भरून त्या पाण्याने अंघोळ करणे सोयीस्कर वाटते, अशांसाठी हा नळ गरजेचा. त्याचबरोबर आपला हॅन्ड शॉवरदेखील याच नळाला जोडलेला असतो म्हणून याचा दुहेरी उपयोग.

मिक्सर / डायव्हर्टर- शॉवरच्या खाली येतो तो मिक्सर किंवा डायव्हर्टर. बऱ्याच वेळा लोक मिक्सर आणि डायव्हर्टर यात गल्लत करतात. मिक्सर आणि डायव्हर्टर या दोन्हीचे काही उपयोग सारखे असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र भिन्न आहे. मिक्सरमध्ये एक गरम व गार पाण्याचा असे दोन पाइप भिंतीतून एकमेकांना जोडलेले असतात. कन्सिल स्टॉप कॉकच्या चाव्या अ‍ॅड्जस्ट करून यात गार व गरम पाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येतो.

डायव्हर्टरचा मात्र एक भाग भिंतीत कन्सिल केला जातो. ज्याला आतून गार व गरम पाण्याच्या जोडण्या दिलेल्या असतात. वरून पाणी नियंत्रित करण्यासाठी चावी असणारी प्लेट लागते ज्याच्या उपयोगाने गरम गार पाणी नियंत्रित करता येते. त्यासोबत या प्लेटच्या वर असणाऱ्या बटणाचा उपयोग करून शॉवर किंवा नळ असे पर्याय आपण सहज निवडू शकतो.

W.C. किंवा वॉटर क्लोजेट- आजकाल अनेक घरांमधून कधी फॅशन तर कधी गरज म्हणून युरोपिअन शौचालये वापरली जातात. यात वॉल हँग म्हणजे भिंतीवर लावायची किंवा फ्लोअर माउंट म्हणजे जमिनीवर फिक्स करायची असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. फ्लोअर माउंट थोडी अधिक जागा घेतात म्हणून बरेचदा वॉल हँगला पसंती मिळते. युरोपिअन W.C. सोबत  सीट व सीट कव्हर असे आणखी दोन प्रकार येतात हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. त्याच्या धाडकन आपटण्यामुळे आपण त्रस्त देखील झालो असू. पण गेल्या काही वार्षांतील तांत्रिक प्रगतीमुळे नवीन प्रकारच्या W.C. मधे हळुवारपणे बंद होणारे सीट कव्हरदेखील उपलब्ध आहेत, अगदी त्याही पुढे जाऊन ज्यांना W.C. च्या सीट कव्हरला हात लावणे अवघड वाटते अशांसाठी रिमोटवर चालणारी सीट कव्हर्सदेखील बाजारात मिळतात.

फ्लश टाकी / फ्लश व्हॉल्व- W.C. सोबत येणारा अविभाज्य भाग म्हणजे फ्लश टाकी किंवा फ्लश व्हॉल्व. प्रथम आपण फ्लश टाकीविषयी जाणून घेऊ . यात मुख्य दोन प्रकार पाहता येतील. एक म्हणजे एक्सपोज फ्लश टाकी तर दुसरी कन्सिल फ्लश टाकी. एक्सपोज फ्लश टाकी ही बऱ्याचदा W.C. सोबतच येते (अशा प्रकारच्या W.C. ला कपल म्हटले जाते), तर कधी कधी वेगळी बसवावी लागते. दुसऱ्या प्रकारची कन्सिल फ्लश टाकी ही सर्वानाच माहिती नसते. या प्रकारात भिंत तोडून विशिष्ट प्रकारची टाकी आत बसविली जाते. बाहेरून दिसताना टाइलिंग केलेल्या भिंतीवर फक्त याची बटणे दिसतात, यामुळेच ही बाथरूमच्या सौंदर्याला बाधा आणत नाही. हल्ली बऱ्याच फ्लश टाक्यांना फूल फ्लश आणि हाफ फ्लश अशी बटणे असतात ज्यांच्या उपयोगाने आपण योग्य तितकाच पाण्याचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळू शकतो.

आता थोडेसे फ्लश व्हॉल्वविषयी माहिती करून घेऊ . फ्लश व्हॉल्वची सोय बिल्डिंगकडून दिली असल्यासच मिळते. यामध्ये बिल्डिंगच्या ओव्हर हेड टाकीपासून ते तळ मजल्यापर्यंत दीड इंच व्यासाचा पाइप बसविला जातो आपले काम फक्त त्याला जोडून बाथरूममध्ये फ्लश व्हॉल्व बसविणे. बरेच वेळा हे पाणी बोअर विहिरीचे किंवा पुनर्वापरीत असते. अन्यथा फ्लश व्हॉल्वला फूल फ्लश व हाफ फ्लश असे पर्याय नसल्याने बरेच पाणी वापरले जाऊ  शकते.

वॉश बेसिन- आधुनिक बाथरूमचा विचार करता वॉश बेसिन ही फक्त गरजेची गोष्ट न राहता ते एक स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. वॉश बेसिनमध्ये अगणित प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील प्रमुख काही आपण जाणून घेऊ या. सर्वसाधारणपणे भिंतीवर थेट बसवता येणारे व ग्रॅनाईट किंवा मार्बलच्या काउंटरला कट करून त्यात बसवले जाणारे सिरॅमिकचे वॉश बेसिन आपल्या सर्वाच्या परिचयाचे असते. याव्यतिरिक्त बाजारात काचेची, धातूची, मार्बलची तसेच टेराकोटा म्हणजेच मातीची हाताने बनविलेली वॉश बेसिनदेखील मिळतात. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे काउंटरच्या वर बसवल्या जाणाऱ्या वॉश बेसिनची फॅशन आहे. यामध्ये ग्रॅनाईट, मार्बल किंवा अगदी लाकडाचे काउंटर बनविले जाते, ज्याच्यावर नंतर वॉश बेसिन ठेवले जाते. या प्रकारच्या वॉश बेसिनसाठी खास उंच डिझाइनचे नळदेखील मिळतात.

बेसिन मिक्सर- हा वॉश बेसिनसाठी लागणारा नळ, पण जर गरम पाण्याचीही जोडणी हवी असेल तर मात्र मिक्सरच घ्यावा लागतो. यात एकाच नळाला दोन चाव्या येतात ज्या नियंत्रित करून गार व गरम पाण्याचा समतोल राखला जाऊ  शकतो. यातही अनेक डिझाइन बाजारात मिळतात.

बाथटब- मुद्दामच हा विषय सर्वात शेवटी ठेवला. बाथटब म्हटले की कसे रोमँटिक व्हायला होते. आयुष्यात एकदा तरी बाथटबमध्ये बसून यथेच्छ डुंबावे ही आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाची इच्छा असते. जर बाथरूममध्ये बाथटब बसवायचा झाला तर एकमेव महत्त्वाची अट म्हणजे बाथरूमचे क्षेत्रफळ. अगदी लहानात लहान जरी बाथटब बसवायचा तरी एका मोठय़ा व्यक्तीला सामावून घेण्यासाठी किमान साडेपाच फूट बाय अडीच फुटाचा तरी बाथटब हवाच. जर तुमचं बाथरूम आलिशान असेल तर मात्र चिंताच नको. तुमच्याकरता निरनिराळ्या साइझमध्ये बाथटब उपलब्ध आहेत.

बाथटबमध्ये निरनिराळ्या साइझसोबतच निरनिराळे प्रकारही पाहायला मिळतात. त्यातले काही ठळक प्रकार आपण पाहू. पहिला आहे अल्कोव्ह, यात बाथटबची दर्शनी बाजू डेकोरेट केलेली असते. दुसरा म्हणजे ड्रॉप इन प्रकार. याला चारही बाजूनी बांधकाम करून त्याच्या आत बसवावे लागते. तिसरा प्रकार हा फ्री स्टँडिंग, हा थोडासा महागडा व राजसी प्रकार असून यात बाथटबला कोणताही वेगळा आधार द्यावा लागत नाही. हा अतिशय सौंदर्यपूर्ण असून या प्रकारच्या बाथटबसाठी बाथरूम बरेच मोठे असण्याची गरज असते.

पूर्वीच्या काळी पोर्सेलिनचे कोटिंग असणारे बिडाचे किंवा पोलादी बाथटब बनत, त्यामुळे शक्यतो बाथटबचा आकार आयताकृती असे. काळानुसार मात्र यात बरेच बदल होऊन प्लास्टिक, अ‍ॅक्रॅलिकअशा वस्तूंचा वापर करून आता हव्या त्या आकारात बाथटब बनू लागले आहेत.

बाथटबबद्दल बोलताना जाकुझी किंवा व्हर्लपूलला आपण विसरू शकत नाही. जाकुझी म्हणजे घरातील स्पा असे म्हणायला हरकत नाही. यामध्ये तळाला काही नोझल्स दिलेले असतात ज्यामधून हवेचे बुडबुडे टबमध्ये सोडले जातात, ज्यामुळे शरीराला छान मसाज मिळतो.

या सर्व सुखसोयींबद्दल बोलत असताना माझ्यातील सांवेदनशील व्यक्तीला असेही वाटते की वर उद्धृत केलेल्या सर्व वस्तू वापरत असताना पाणी जे जीवन आहे त्याचा अपव्यय देखील होता कामा नये. हाच विचार अनेक नामांकित कंपन्या त्यांची उत्पादने तयार करताना करत असतात. यामुळेच अनेक उच्च प्रतीच्या नळ व शॉवर्समध्ये पाण्याच्या प्रवाहात थोडय़ा प्रमाणात हवेचाही प्रवाह सोडला जातो. यामुळे पाणी वेगानेही येते पण त्याचसोबत पाण्याची बचत देखील होते. याकरिता बाथरूमसाठी खरेदी करताना दर्जाच्या बाबतीत फार जागरूक राहणे आवश्यक. नामांकित कंपन्यांचीच उत्पादने घेणे कधीही योग्य. तरच तुमच्या बाथरूमच्या उपयुक्ततेसोबत तुम्ही पर्यावरणाचीही काळजी घेतल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com