कांजूरमार्गमधील ‘क्वारी’ नावाच्या इटालियन मार्बलच्या एका नावीन्यपूर्ण दालनाला भेट दिली आणि सुंदरतेचे प्रतीक असलेल्या ‘इटालियन मार्बल’ या खनिजाला ‘दगड’ का म्हणतात हा प्रश्न पडला. अविस्मरणीय कलाकृतींचे कलादालनच होतं ते आणि कलाकार खुद्द निसर्गच!

एखाद्या वास्तूला  वापरण्याजोगे करण्यासाठी व  त्यात एक जिवंतपणा आणण्यासाठी अंतर्गत सजावटीचं खूपच महत्त्व आहे. सजावटीतून ‘सौंदर्य’ आणि या सौंदर्यातून वेगवेगळे भावनानुभव. त्यामुळे वास्तू ही शरीर आणि अंतर्गत सजावट हे त्याचे मन, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माणूस हा भावनेतून जगतो आणि त्यामुळे जमेल त्या पद्धतीने तो प्रत्येक गोष्टीला  सौंदर्यपूर्ण बनवायचा प्रयत्न करतच राहतो. या अंतर्गत सजावटीचे तीन  मुख्य भाग, भिंत, छत आणि त्याचा जमिनीचा म्हणजे फ्लोअरिंग भाग. जमिनीचा भाग आणि भिंतीचा भाग माणसाच्या सतत स्पर्श अनुभवात असतो त्यामुळे त्याचा खूप जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे घर बांधणी असो वा मोठी इमारत बांधणी, त्याचा सजावटीच्या योजनेमध्ये फ्लोअरिंग वा भिंतींवरची कलायोजनेला खूप महत्त्व दिले जाते. अशा या सजावटींमध्ये कलायोजनेमध्ये शतकानुशतके माणसाच्या मनाला भुरळ पाडणारी एक वस्तू आहे ‘मार्बल’ ! संगमरवरी, सांगेमरमर, आरास, पालींकु अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या खनिजाची आपल्याला माहिती होते ती  शाळेच्या पुस्तकातील  ‘ताज महाल’च्या धडय़ातून!

संगमरवर हा जगात अनेक ठिकाणी सापडतो-  ग्रीस, स्पेन, जर्मनी, अमेरिका, भारत, इटली, रशिया, रोम व इतर. भारतात राजस्थानमधील माकराना येथे पांढऱ्या मार्बलच्या खाणी आहेत, तर इंग्लंडमध्ये करडय़ा रंगाचा संगमरवर असतो, अमेरिकेत लालसर रंगाचा, स्वीडनमध्ये हिरव्या रंगाचा, तर इटलीमध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाचा. या क्रमावलीत इटलीतील शुभ्र पांढऱ्या संगमरवर- म्हणजे करारा मार्बलची तर काही बातच और आहे! शतकानुशतके त्याच्या सौंदर्याने जगभरातील लोकांना भुरळ पाडली आहे. संगमरवर हा वालुकामय दगड आहे त्यामुळे ठिसूळ आहे. मूर्तिकलेसाठी या दगडाचा उत्तम उपयोग होतो आणि होत आला आहे. मूर्तिकलेपासून ते स्थापत्यकलेत या इटालियन मार्बलचा अगदी शतकानुशतके वापर केला गेला आहे. मायकल अँजेलोचा डेविडचा पुतळा, लंडनचा मार्बल आर्च, रोममधील पँथिऑन अशा काही शतकांपूर्वीच्या युरोपमधल्या प्रसिद्ध कलाकृतीपासून ते या शतकातल्या  हार्वर्ड मेडिकल स्कूल, अबूधाबीमधील शेख झाएद मस्जिद, दिल्लीमधील अक्षरधाम मंदिर, वृन्दावनमधील प्रेम मंदिर  व इतर प्रसिद्ध  वास्तूंमध्ये या करार मार्बलचा मुक्त संचार आहे.

इटलीच्या तस्कानी राज्यामध्येआल्प्स पर्वतांच्या पायथ्याशी, कॅरिओन नदीच्या काठावर ‘करारा’ आणि ‘मस्सा’ हे दोन प्रांत वसले आहेत.  निसर्गाची कृपा असलेला हा प्रभाग अगदी प्राचीन काळापासून शुभ्र पांढऱ्या मार्बल पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत इथे मार्बलचे उत्खनन होत आले आहे. या मार्बलच्या डोंगरांनी इटलीमध्ये सुबत्ता आणली, भरभराट आणली आणि आजतागायत त्यांची मक्तेदारी कोणी मोडू नाही शकले. पण त्याच प्रांताने अराजकता पण बघितली आहे. अनेक शतके राज्यकर्त्यांच्या छायाछत्राखाली असलेल्या या उद्योगाला १९ व्या शतकाच्या शेवटी राजेशाही जशी लोप पावली तशी वेगळी दिशा मिळाली. जगभरातून इथल्या मार्बलला प्रचंड मागणी नेहमीच असे, प्रचंड मेहनतीच्या या कामामध्ये कामगारांच्या शारीरिक व मानसिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जायचे, यात भर म्हणून अमेरिका, युरोपमधल्या शिक्षा झालेल्या कैद्यांना खाणीत कामला पाठविले जायचे. या कैदी, कामगार  मानसिकतेचा  एकत्रित असा  एक अक्राळविक्राळ चेहरा सामोरा आला आणि अराजक माजले. मोठय़ा कामगार चळवळी सुरू झाल्या, अनेक कामगार संघटना उघडपणे प्रस्थापित झाल्या. बऱ्याच काळानंतर १९२९ मध्ये इथे महापालिका स्थापना झाली आणि सुस्थिती परत येण्यास सुरुवात झाली.

आजही  करारामधील मार्बलला जगभर प्रचंड मागणी आहे. तिथे शुभ्र पांढऱ्या मार्बलव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे अतिशय मोहक प्रकारही आहेत, पण त्याचे प्रमाण कमी आहे. बघितल्यावर ते नैसर्गिक आहेत यावर विश्वासच बसत नाही. या व्यवसायाचे  स्वरूप एका प्रचंड मोठय़ा कारखानदारी उद्योगासारखे आहे. डोंगरच्या डोंगर व्याप्त करणारे कारखाने अथवा खाणी आहेत. सर्वप्रथम डोंगराचा अभ्यास करून विशेषत: भागाचे साधारण  ३० ते ५० फुटी आकाराचे तुकडे केले जातात, हे शक्य होते ते अजस्र अशा ‘कटिंग’ यंत्रांमुळे. या उद्योगामुळे ‘ Stone cutting tools ‘ या अजून एका प्रचंड उद्योगाला उभा राहिला आहे. विशेष आकारचे तुकडे करायला विशेष यंत्र, विशेष करवती, चकती करवत, हिऱ्याची धार असलेल्या करवती अशी अनेक यंत्रसामग्री वापरली जाते. या मोठय़ा शिळा मग मोठय़ा ट्रकवरून कारखान्यामध्ये नेतात, तिथे मग अजून छोटे म्हणजे साधारण  १५ फुटी तुकडे  करतात. ही प्रचंड शिळा मग एका कुकरसारख्या बाष्पीकरण यंत्रात ठेवली जाते. या प्रक्रियेमध्ये त्या दगडाच्या नसांमधील अशुद्धता स्वच्छ  केली जाते. त्यानंतर थंड झाल्यावर  ‘ Gangsaw ‘ नावाच्या कंगव्यासारख्या चक्ती करवतीने त्याचे साधारण १ इंच जाडीच्या चक्त्या केल्या जातात. या चक्त्या साधारण १२ बाय ५ फूट लादी स्वरूपात असतात. या लाद्यांवरच्या  वरच्या  नसा  रसायनांनी भरल्या जातात आणि  मग एक एक करून त्यावर पॉलिशच्या वेगवेगळ्या ५ प्रक्रिया केल्या जातात. इटलीची  मार्बल पॉलिशिंग तंत्रामध्येही मक्तेदारी आहे. जगभरातल्या विविध खाणींतून मार्बल इटलीला खास पॉलिश करावयास पाठवतात आणि मग तिथून तो मागणी असलेल्या देशांकडे पाठवला जातो. या सगळ्या प्रक्रियेतून जाऊन, हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या समोर प्रकटते ते एक अविस्मरणीय कलाकृती!

या कलाकृतींना ‘मार्बलची लादी’ कसे काय संबोधायचे तुम्हीच सांगा?

पराग केन्द्रेकर – parag.kendrekar@gmail.com