दिवसेंदिवस मुंबईची गर्दी वाढत आहे. अशा वेळी शांत, निसर्गाच्या सान्निध्यातील घर हे कल्पनेतच साकारू शकते, असे वाटत असतानाच, सरकारी योजनांच्या योग्य पुढाकारामुळे अशी घरे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर निर्माण होऊ लागली आहेत. नेरळ-कर्जत पट्टा हे त्याचे उत्तम उदाहरण.

प्रधानमंत्री आवास योजना आणि २०२२ पर्यंत सर्वासाठी स्वत:चे घर या सरकारी योजनांच्या पुढाकारामुळे परवडण्याजोग्या किमतीत घरे ही संकल्पना मोठय़ा प्रमाणावर पुढे येत आहे. त्यातच रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्टमुळे घर खरेदी-विक्री करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शी झाले आहे.

नेरळ-कर्जत पट्टय़ाचा निरनिराळ्या मार्गाने विकास होऊ लागला आहे. विकास योजना, सरकारी कार्यालये, दळणवळणाच्या पायाभूत सोयी सुविधा यामुळे रिअल इस्टेट बाजारपेठेतील अनेक नामवंत मंडळी गृहसंकुलांसाठी तसेच व्यावसायिक प्रकल्पांसाठी नेरळ-कर्जत पट्टय़ाची निवड करू लागले आहेत. वेगाने नेरळ-कर्जत पट्टा विकसित होऊ पाहात आहे. याशिवाय, उत्तम पर्याय, प्रशस्त जागा त्याचबरोबर आरामदायी सेवासुविधा आणि तेदेखील परवडण्याजोग्या किमतीत या सर्व गोष्टींमुळे इथे घरे घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

याआगोदर येथील भौगोलिक घटकांचा योग्य तऱ्हेने विकास न झाल्यामुळे रेल्वे हाच मुंबईशी जोडले जाण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. कर्जतवरून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध असली तरीही ऐन गर्दीच्यावेळी या सर्व गाडय़ा तुडुंब गर्दीने भरलेल्या असतात. परंतु आता मात्र दळणवळणाच्या योग्य साधनांमुळे ही शहरे रेल्वे आणि रस्त्यामाग्रे देखील थेट मुंबईशी जोडली गेली आहेत. त्यातच अलीकडे केंद्र सरकारने मुंबई -मेट्रो फेज -३ पनवेल- कर्जत प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे मुंबईहून पनवेलमाग्रे नेरळ-कर्जत प्रवासाचे अंतर कमी वेळात पार पाडता येणार आहे. तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाव्दारे देखील ही शहरे जोडली गेली आहेत. जसे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या शहरांच्या जवळ असल्यामुळे मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी देखील थेट बससेवा इथे सहजपणे उपलब्ध असतात.

लवकरच, येथे नेरळ-दस्तुरी नाका-माथेरान रोड, चार पदरी बदलापूर-नेरळ-कर्जतरोड या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. सरकारच्या या प्रयत्नांमुळे अनेक नामवंत कंपन्या आपले दळणवळणाचे प्रकल्प येथे सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याशिवाय, विरार-मुरबाड-कर्जत-खोपोली-अलिबाग या िरग रोड प्रकल्पाचा भाग म्हणून कर्जत-मुरबाड रस्त्याच्या विकासाचे काम सुरू आहे.

दळणवळणाच्या उत्तमोत्तम सुविधांमुळे मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेलपासून नेरळ-कर्जतपर्यंत पोहोचण्यास अर्धा ते एक तासापर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे.

तसेच आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा शाळा, इंजिनीअिरग-मेडिकल-फार्मा महाविद्यालये, उच्च शिक्षण देणाऱ्या विविध संस्था, रिटेल दुकाने, आधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज असलेली रुग्णालये येथे विकसित होत आहेत. थोडक्यात काय, तर मुंबईचे रहाणीमान जगण्यासाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता असते, त्या इथे सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळेच मुंबइचे रहाणीमान, तेही शांत आणि आल्हाददायक वातावरणात नि आरामदायी सोयींसह यामुळे नेरळ-कर्जत पट्टय़ात घरे घेण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत.