27 October 2020

News Flash

मी आणि माझे घर

घराच्या सजावटीचा विषय निघतो तेव्हा ‘सिलेक्शन बाय  मेन अँड मॅनेज बाय वूमन’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.

नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्यावेळी विविध क्षेत्रातील स्त्रियांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली. आता महिलांची भूमिका ही केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. गृहिणीच्या भूमिकेतली महिलाही आता फारच सजग आणि जागरूक झाली आहे. तरीही अजूनही घराच्या सजावटीमध्ये अनेकदा त्या निर्णय घेताना दिसत नाही. घराच्या सजावटीचा विषय निघतो तेव्हा ‘सिलेक्शन बाय  मेन अँड मॅनेज बाय वूमन’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. स्त्रियांचा आपल्या घराच्या सजावटीच्या निर्णयामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे; अगदी बजेट, डिझायनरची निवड, आपल्या गरजा आणि आपल्या आवडीनिवडी.. या सर्व ठिकाणी स्त्रियांची भूमिका अजूनही मोठय़ा प्रमाणात फक्त स्वयंपाकघराच्या सजावटी पुरतीच मर्यादित राहते. हे आपले घर आहे, ते आपण सुंदर ठेवणार आहोत, तर मग सजावटीच्या वेळी आपलेही मत असणे आवश्यक आहे. ‘मला यातलं काही समजत नाही बघ!’ असं म्हणून आपण किती सहजपणे या प्रक्रियेतून बाजूला होतो. बऱ्याच ठिकाणी तर फ्रिज, टीव्हीसारखी विद्युत उपकरणं घेतानासुद्धा महिला मागे असतात. कारण एकच- ‘मला नाही समजत यातलं!’ मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की,घराच्या बजेट पासून सगळं ठरवणाऱ्या महिला इंटेरिअरच्या बाबतीत एकदम मागे का हटतात?

घराची सजावट हा प्रत्येक महिलेचा फारच आवडीचा विषय असतो, प्रत्येकीला आपले घर सुंदर असावे असे वाटते. माझ्या काही मैत्रिणी तर आठवडाभर वेळ नाही मिळत म्हणून रविवारी घराची सफाई स्वत:च करतात. सफाई जशी आपण स्वत: करावी किंवा आपल्या देखरेखीखाली व्हावी म्हणजे मला पाहिजे तशी साफसफाई करून घेईन. किंवा आज जरा बाईकडून जळमटं काढून घेऊ  म्हणून जातीने लक्ष घालणाऱ्या महिला, इंटेरिअर सुरू असताना का स्वत: पुढाकार घेत नाहीत?

आता पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रथम तर घराचे रिनोव्हेशन असेल किंवा नवीन घराचे फर्निचर असेल तर आपणही त्यामध्ये सुरुवातीपासूनच सहभागी व्हावे.

मला नेहमीच वाटते की, स्त्रियांना उपजतच जशी जाण असते तशीच सौंदर्यदृष्टीही असते. आणि आपल्या घराविषयीचा जिव्हाळाच आपल्या घराचे घरपण राखतो. तेव्हा मैत्रिणींनो, ‘मला यातलं काही समजत नाही’ हे वाक्य बाजूला ठेवलं तर तुमचे घर अगदी तुमच्याच स्वप्नातील घरासारखे प्रत्यक्षात उतरेल.

घरातील बाईचा सहभाग हवाच.

  • सर्व प्रथम इंटिरीअर डिझायनर निवडताना आपण ज्याच्याशी योग्य प्रकारे संवाद साधू अशाच डिझायनरशी बोलणे करावे. थोडक्यात, डिझायनर निवडताना प्रथम त्यांची वेबसाइट बघून, त्यांचे आधीचे काम आपल्याला आवडले का, त्यांनी वापरलेले मटेरियल, रंग, त्यांची डिझाइन स्टाइल आपल्याला आवडली आहे का नाही हे ठरवावे. केवळ महागडा डिझायनर आहे म्हणून एखाद्या डिझायनरची निवड केल्यास आपल्या पैशाला आणि घराला आपण योग्य न्याय देऊ शकणार नाही.
  • आजकाल इंटिरीअर डिझायनिंग या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात महिलासुद्धा कार्यरत आहेत. बऱ्याचदा आपल्याला त्यांच्याशी बोलणे सोपे जाऊ शकते.
  • काम सुरू करण्याआधी आपल्या घरातील अशा वस्तूंची यादी करा, ज्यांचा तुम्हाला- या कशा ठेवू- असा नेहमीच प्रश्न असतो. ज्या वस्तू कधीतरी लागतात त्यांची वेगळी यादी करा. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या घराचे डिझाइन सुरू असेल तेव्हा त्या वस्तूंचा विचार करून आराखडा बनवणे सोपे होईल आणि नंतर होणारा त्रास वाचेल.
  • तुम्हाला कोणते रंग आवडतात, कशा प्रकारचे फर्निचर आवडू शकते याबद्दल आपल्या डिझायनरशी आधीच चर्चा करा. आणि सर्व चर्चेत तुमचाही सहभाग असू द्या. कारण बऱ्याचदा अशा काही गोष्टी घरातल्या पुरुषांकडून सांगायच्या राहतात; परंतु ज्या त्या घरातील बाईसाठी फार महत्त्वाच्या असतात. जसे- तुम्ही जर डावखुरे असाल तर – तुम्हालाच ज्या गोष्टी वापरायच्या आहेत त्या त्या पद्धतीने तयार करून घेता येतील.

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:37 am

Web Title: kavita bhalerao article on house
Next Stories
1 कपडेच कपडे
2 वस्तू आणि वास्तू : घरातली पडीक यंत्रे
3 आखीव-रेखीव : मी आणि माझे घर
Just Now!
X