19 November 2017

News Flash

केशवजी नाईक चाळीतला गणेशोत्सव मर्मबंधातली ठेव

आज माझ्या लग्नालाही पाच दशक पूर्ण होत आलीयेत आणि आप्पांनी चाळ सोडून ३६ वर्षांचा

वर्षां महाजन | Updated: August 26, 2017 1:51 AM

केशवजी नाईक चाळ यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करीत आ

लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली केशवजी नाईक चाळ यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. त्यानिमत्ताने गणेशोत्सवातील हृद्य आठवणी जागवणारा लेख..

‘आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचे तसेच आहे.’ वपुं.च्या या ओळी आठवायला निमित्त ठरलं ते गिरगावातील इतिहास प्रसिद्ध के. ना. (केशवजी नाईक) चाळींमध्ये साजरा होणाऱ्या यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचं. या संदर्भात आखणी करण्यासाठी अलीकडेच बोलविण्यात आलेल्या आजी-माजी रहिवाशांच्या बैठकीमध्ये विजय जोशी या उत्साही कार्यकर्त्यांने चावी दिली आणि माझ्या आठवणींची एक्स्प्रेस सुसाट सुटली. या गाडीला पुढे इतकर चाळकऱ्यांच्या स्मृतींचे डबेही जोडले गेले.

लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या के. ना. चाळीतील जन्म ही घटना म्हणजे मी अभिमानाने मिरवीत असलेल्या गोष्टींमधील मुकूटमणी. केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर इथे राहणाऱ्या आणि राहून गेलेल्या प्रत्येकासाठीच के. ना. चाळ ही मर्मबंधातील ठेव आहे. काही काळापुरतेच इथे राहिलेल्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीने- कल्याणजी-आनंदजी यांनीही हे अनेकदा बोलून दाखवलंय. आणि का नाही वाटणार अभिमान? आमच्या या चाळींचा पहिला गणपती साक्षात् लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू केलेला मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव. १८९३ पासून तो सलग सव्वाशे वर्ष उभ्या महाराष्ट्रात दुमदुमतोय.

एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळातर्फे (एम.टी.डी.सी.) अलीकडे गणपतीत मुंबईतील जे पाच महत्त्वाचे आणि मानाचे गणपती दाखवितात त्यात पहिला क्रमांक आमच्या के. ना. चाळींच्या गणपतीचा!

माझे वडील गोपाळ महादेव दीक्षित हे राजगुरूनगर (खेड) या आमच्या गावातून १९४० साली नेसत्या पंच्यानिशी घरातून पळून मुंबईला आले तेव्हा या चाळीनेच त्यांना आधार दिला. त्यानंतर अपार कष्ट करीत हळूहळू त्यांनी आपलं बस्तान बसवलं. लग्नानंतर आईनेही कॉफीच्या बिया गिरणीवर दळून कॉफी विकण्याचा व्यवसाय केला व संसाराला हातभार लावला. आमच्या या कॉफी उद्योगाची आप्पांनी (वडील) केलेली जाहिरात माझ्या चांगली लक्षात आहे. त्यातील परवलीचे शब्द होते.. ‘वापरणारे वाखाणतात आणि वाखाणणारे वापरतात.’

चाळ नं. दोन मधील २ खणी घरात आम्ही तीन भावंडे मी व माझे दोन मोठे भाऊ (मधुसूदन व विद्याधर) लहानाचे मोठे झालो. गाठीशी पैसा नसला तरी संस्कारांची श्रीमंती होती. मला आठवतंय तेव्हापासून चाळीतील गणपतीच्या पंचामृती पूजेच्या तयारीचे काम आईने स्वत:कडे घेतले होते. आम्हा मुलांच्या सकाळच्या शाळा, डबे तयार करणं, पाण्याच्या वेळा.. हे सगळं सांभाळून पूजेची तांब्याची भांडी चिंच लावून घासून चकाचक करणं, गंध उगाळणं, पंचामृत बनवणं, झालंच तर संध्याकाळची धूपआरतीची तयारी.. अशी सर्व कामं ती अगदी मनापासून श्रद्धेने करायची. या तिच्या तयारीत माझी मदत- फुलं आणायची. बनाम हॉल लेनमधील फुलं बाजारातून बाप्पासाठी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त फुलं आणण्यात मी शालेय वयातच तरबेज झाले.

गणपतीच्या दहा दिवसांतील एका रविवारी अथर्वशीर्षांच्या सहस्रवर्तनाचा कार्यक्रम असे, आजही असतो. यासाठी रहिवाशांपैकी किमान १५-२० जण तरी सकाळी ९.३० ला आपापला पाट व पळी भांडं घेऊन, सोवळं नेसून स्टेजवर हजर असत. ही परंपरा आजही चालू आहे. पठणानंतर या सर्वाना मसाला दूध, पेढा, केळं हा अल्पोपहार देण्याची जबाबदारी आप्पांनी आनंदाने स्वीकारली.

गणपतीचे नैवेद्यासाठी तर अहमहमिकाच लागे. त्यामुळे वेळापत्रक ठरवून द्यावे लागे. मात्र आम्हा बाळगोपाळांना वेध लागायचे ते अन्नकोटाचे. या दिवशी चाळीमधील यच्चयावत अन्नपूर्णा आपलं सगळं कसब पणाला लावून एक-से एक पदार्थ बनवायच्या. आणि नैवेद्य दाखवेपर्यंत कशीतरी कळ काढली की मग भट्ट जेवूनी तट्ट फुगले.. अशी आमची अवस्था होई. ही अन्नकोटीची परंपरा आजही सुरू आहे.

शतक महोत्सवी उत्सवाच्या प्रसंगी तर मंडळाने के. ना. चाळीच्या समस्त माहेरवाशिणींना आग्रहपूर्वक आमंत्रण दिलं आणि यशोमंगल कार्यालयात मोदकाचं जेवण वाढून तृप्त केलं.

परंपरा म्हणजे आपल्या अंगवळणी पडलेली आवडती गोष्ट. सहस्रावर्तन, अन्नकोट यांसारख्या अनेक परंपरा आमच्या गणेशोत्सव मंडळाने जपल्या आहेत. गणेशाच्या अर्धपद्मासनात बसलेल्या मूर्तीमध्ये आजही जराही बदल नाही. (त्यामुळे डोळे मिटून स्मरण करताच ती मूर्ती समोर येते). मूर्ती बनवणारे कारागीरही पिढय़ान्पिढय़ा चालत आलेले. प्रतिष्ठापनेची जागाही तीच (एक व दोन नंबरच्या चाळींमध्ये) गणरायाला आणताना, निरोप देताना पालखीतून मिरवत न्यायची प्रथाही श्रद्धेने जपलेली. या पालखीला खांदा देण्यासाठी केली जाणारी धडपडही तशीच. मिरवणुकीतील वेषही पारंपरिक, विसर्जनाच्या वेळी फुगडय़ा, झिम्मा, लेझीम आणि मुखाने मोरयाचा गजर हवाच. रोजची रात्रीची आरतीही तास दीडतास रंगायला हवी. या आरत्यांची पण एक नशा होती.. आहे. वाद्यांच्या तालावर तासान्तास चालणाऱ्या आरतीत अनेक जण उभ्या उभ्या समाधी अवस्थेत जात.

गणेशाच्या पूजेचा मान मात्र नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा. चाळीतील एक ज्येष्ठ देवमाणूस डॉ. ना. अ. देशमुख यांनी स्नुषा डॉ. स्नेहलता देशमुख (माजी कुलगुरू) व त्यांचे पती डॉ. श्याम यांना १९६५ साली हा मान मिळाल्याचं मी उभयता (आम्हीदेखील) अभिमानाने सांगतात.

श्रावण महिना उजाडला की आधी मखराचे वेध लागतात. यातही बनवणारे हात थोडे आणि या निमित्ताने खाली मंडपात येऊन हा ऽ हू करणारी डोकी जास्त. रात्रीचे १२ वाजून गेले तरी या भारलेल्या आसमंतातून घरी झोपायला जाण्याची कुणाचीही इच्छा नसे. लहान पोरं-टोरंही आईच्या हाकांना धूप घालत नसत. सगळ्या चाळीचं जणू एक कुटुंब होऊन जाई. जे काही थोडेफार मतभेद असत ते या वातावरणात आपसूकच विरघळून जात.

के. ना. चाळीचा गणेशोत्सव म्हणजे करमणुकीच्या कार्यक्रमांची मांदियाळी, हे एक समीकरणच बनून गेलं. आजही तसंच आहे. मी लहानपणी तर आचार्य अत्रे, बाबुराव अर्नाळकर, स. गो. बर्वे, काकासाहेब खाडिलकर.. अशा हस्तींना ऐकलेलं आठवतंय. शतकोत्सवी गणेशोत्सवात तर पंडित जीतेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, डॉ. अशोक रानडे, कल्याणजी-आनंदजी अशा दिग्गजांनी आपली कला गणेशासमोर सादर केलीय.

स्वातंत्र्यपूर्व काळात तर लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आमच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं व्यासपीठ त्यांच्यासह अनेक देशभक्तांनी दणाणून सोडलंय. जमनादास मेहता, दादासाहेब खापर्डे, सेनापती बापट, बॅरिस्टर जयकर, स्वातंत्र्यवीर सावरकर.. इत्यादींच्या ओजस्वी वाणीने ऐकणाऱ्यांच्या मनातील  राष्ट्रभक्तीचं स्फुलिंग पेटून उठे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सेतू माधवराव पगडी, शिवाजीराव भोसले, य. दि. फडके, प्रा. राम शेवाळकर, माजी पोलीस कमिशनर रिबेरो अशा रथी महारथींच्या विचारधनाने आमच्या मंडळाला श्रीमंत केलंय.

हा १२५ वर्षांचा दुर्मीळ दस्तऐवज त्या त्या वेळी विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या कात्रणासह आमच्या मंडळाने प्राणपणाने जपलाय.

उत्सवाचं स्वरूप वाढत ग्ेलं तसं पारदर्शी व्यवहार व शिस्तबद्ध  कारभारासाठी नियमावली असावी म्हणून मंडळाची घटना लिहायचं ठरलं. त्र्यंबक पुरुषोत्तम थोरात या त्यावेळच्या अध्यक्षांनी प्रचंड मेहनत घेऊन मसुदा तयार केला, जो १९३५ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. पुढे काळानुरूप त्यात बदल झाले; परंतु स्वत:ची घटना असलेला पहिला गणेशोत्सव हे आणखी एक सोनेरी पीस मंडळाच्या मुकुटात विराजमान झालं.

आमचे आप्पा तर जिभेवर सरस्वतीचा वास असलेले कीर्तनकार, प्रवचनकार शोधून शोधून आणायचे. स्थानिक कलाकारांसाठी तर हे मुक्तांगणच. तुझे आहे तुझपाशी, काका किशाचा.. अशा फार्सिकल नाटकांबरोबर एकच प्याला, मृच्छकटिक अशी तीन अंकी संगीत नाटकंही आमच्या उत्साही मंडळींनी मेहनतीने सादर केलीयत. त्यावेळी पुरुष पात्रांनी केलेल्या स्त्री भूमिकांचे फोटो बघताना आज गंमत वाटते. (हा १२५ वर्षांचा दस्तऐवज आमच्या मंडळाने प्राणापलीकडे जपलाय.)

कीर्तन, प्रवचन आणि हळदीकुंकू या अनिवार्य कार्यक्रमांबरोबरच काही सरप्राइज शोदेखील असत. अभिरूप न्यायालय हा त्यापैकी एक. या कार्यक्रमात भालदार, चोपदारांपासून न्यायाधीशांपर्यंत प्रत्येक कलाकार भूमिकेनुसार कडक वर्दीत अवतीर्ण होत असल्याने स्टेजवर खरंखुरं कोर्ट भरलंय असंच वाटे.

२००१ साली मंडळाने केलेला एक अफलातून प्रयोग आठवतोय. त्या दिवशी साक्षात् लोकमान्य (वेषधारी) बग्गीतून बंदूकधारी इंग्रज सोल्जरांसह चाळीत अवतरले आणि शंभर वर्षांपूर्वीच्या या आठवणीने समस्त चाळकरी हेलावले.

हे वाचताना तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील की केवळ गणेशोत्सवाच्या परंपरेतच नव्हे, तर आमच्या के. ना. चाळींच्या भौगोलिक रचनेतही आजवर फरक पडलेला नाही. १५० वर्षे जुन्या या इमारती, पण आजही एकसुद्धा टेकू नाही. तेच लाकडी जिने आणि मागे पुढे व्हरांडा असलेली एक मजली कौलारू घरं. मागच्या व्हरांडय़ात आपआपली पाण्याची साठवण. आमच्या नंबर २ चाळीच्या तळमजल्यावरील सर्व बिऱ्हाडांची पुढची खोली मधल्या दाराने जोडलेली. त्यामुळे कोणाच्याही घरात लग्न, मुंज वा बारसं काहीही असलं की मधील दार उघडून एक हॉल होत असे.

गिरगाव भागातील आमच्या या चाळी प्रसिद्ध उद्योगपती केशवजी नाईक यांनी १८६०-६२ मध्ये मुख्यत्वे मध्यमवर्गीयांसाठी बांधल्या. अभिमान वाटावा अशा अनेक व्यक्ती इथे वास्तव्याला होत्या. केशवसुत, कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे ही त्यातील काही नावे. के. ना. चाळींशी संबंधित एक रोमहर्षक घटना म्हणजे सावरकरांनी स्वातंत्र्य लढय़ासाठी एक पिस्तूल डिक्शनरीत दडवून लंडनहून पाठवलं ते थेट इथेच. त्यांचे एक पाटणकर नावाचे अनुयायी इथे रहात. त्यांचा मागोवा घेत ते पार्सल इथे आले असं म्हणतात.

नवसाला पावणारा अशी आमच्या गणपतीची ख्याती असल्यामुळे गणरायाला गाऱ्हाणं घालणं हा कार्यक्रम समस्त चाळकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा. दोन- दोन तास चालणाऱ्या या कार्यक्रमात सर्वाची गाऱ्हाणे खणखणीत आवाजात बाप्पापर्यंत पोहोचवण्याचा मान डॉ. ना. अ. देशमुख यांचा.. ‘ऐक रे महाराजा, अमक्या तमक्याच्या मुलीचं लग्न बरीच वर्षे रखडलंय.. यंदाच्या मोसमात ते होऊन जाऊ दे रे महाराजा.. काम झाल्यावर ते दोन किलो केशरी पेढय़ांचा प्रसाद दाखवतील, ते तू मान्य करून घे रे महाराजा।’ किंवा ‘अमुक सद्गृहस्थांच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळत नाहीये रे महाराजा इथली झाडलोटीची सेवा तो अनेकवर्षे करतोय त्याचं त्याला फळं मिळू दे आणि त्याच्या मनासारखं होऊ दे रे महाराजा..’ या गाऱ्हाण्यातील प्रत्येक वाक्याला होय महाराजा.. असं एका सुरात अनुमोदन देण्यात बाकी सर्व मंडळी तत्पर.

गणपतीचे दहा दिवस वाऱ्याच्या वेगाने जात आणि गणरायाची स्वारी परत निघाली की सगळ्यांना गलबलून येई. त्या रिकाम्या जागेकडे पाहताना मला तर रडूच कोसळे. पण एक जाणीव मनात पक्की होती.. आहे की तो सगुण रूपात सतत समोर दिसत नसला तरी त्याचा आशीर्वादाचा हात मात्र सतत आपल्या पाठीवर आहे.

एक गोष्ट शंभर टक्के खरी की गणेशाच्या अखंड वास्तव्याने इथली जमीन सुपीक झालीय. अनेक उद्योजक इथे घडले.. शिक्षणाची कास धरून सामान्य परिस्थितीतून असामान्य पदापर्यंत पोहोचले. आमच्या वेळची तर निम्मी पिढी आज परदेशात वास्तव्याला आहे. याच देवाचे आर्शीवाद घेऊन मी व माझ्या यजमानांनी (विजय महाजन) १९७९ साली सुप्रा केमिकल्स या नावाने व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्या बीजाचा वृक्ष झालाय. ही त्याचीच कृपा हा भाव मनात पक्का असल्याने दरवर्षी १० दिवसांतल्या एका रविवारी त्या वरदविनायकाच्या चरणी नतमस्तक झाल्याखेरीज आम्हाला चैन पडत नाही. शिवाय जुन्या शेजाऱ्यांच्या भेटीगाठींचा बोनस खुणावत असतोच.

या चाळीने अनेकांना रक्तापलीकडची नाती दिली. माझ्यापुरतं सांगायचं तर शेजारच्या नेन्यांची मुलगी लता नेने-बेडकर हिची माया सख्या बहिणीसारखी. प्रसिद्ध लेखिका शोभा बोंद्रे हिची मैत्री हे के. ना. चाळीचंच वरदान. इथल्या अनंत आठवणी माझ्या मनाच्या चांदण्यात अखंड वास्तव्य करून आहेत. एम.एस्सी झाल्यावर घराघरांतून झालेलं कौतुक आठवताना आजही डोळे पाणावतात.

आज माझ्या लग्नालाही पाच दशक पूर्ण होत आलीयेत आणि आप्पांनी चाळ सोडून ३६ वर्षांचा काळ लोटलाय. ती दोघंही (आई-आप्पा) आज हयात नाहीत. पण के. ना. चाळींशी आणि त्या विघ्नहर्त्यांशी जुळलेले ऋणानुबंध मात्र तसेच दृढ आहेत.

शेवटी एक मन की बात.. नशिबाने जर का मला पुढचा जन्म कुठे घ्यायचा हा पर्याय मिळाला तर.. माझं उत्तर काय असेल ते तुम्ही ओळखलं असेलच. काय म्हणता.. होय महाराजा!

info@suprachemicals.com

वर्षां महाजन

शब्दांकन – संपदा वागळे

First Published on August 26, 2017 1:51 am

Web Title: keshavji naik chawl completes 125 years of ganesh festival